अनुभव – जिज्ञासा कांबळे

उन्हाळ्याची सुट्टी लागली तसे मामाच्या गावी जाण्याचे वेध लागले. मी, माझे आई-बाबा आणि आत्तु आम्ही मामाच्या गावी गेलो. मामा मामीची लाडकी म्हणुन खुप लाड व्हायचे माझे. आम्ही गेलो त्यावेळी माझी मावशी आणि तीच्या २ मुली ही तिकडेच होत्या. त्यामुळे दिवसभर आम्ही अगदी धमाल करायचो. सुट्टीचा अगदी मनसोक्त आनंद घेत होतो. त्या रात्री आम्ही जेवण वैगरे आटोपून टिव्ही वर एक भुताची मालिका पाहत बसलो होतो.  रात्रीचे ११ वाजले असावे. तसे मोठे मामा आले आणि आम्हाला झोपायला जायला सांगितले. मी आणि माझ्या मावस बहीणी नेहा आणि ऋतू आम्ही तिघीही छोट्या मामींच्या खोलीत झोपायला गेलो. खोलीच्या दारासमोरच लोखंडाची खाट होती. त्या खाटेवर आम्ही तिघीनी झोपायचे ठरवले. 

आणि खाली अंथरूण वैगरे करून आई,आत्तु, छोट्या मामी आणि त्यांची छोटी मुलगी पियु झोपले. दिवसभर सगळी कडे भटकून आल्यामुळे मी बरीच थकले होते. त्यामुळे मला लगेच झोप लागली. मध्यरात्र उलटली असावी. ते उन्हाळ्याचे दिवस होते पण का कोण जाणे मला अचानक खुप थंडी वाजू लागली. त्यामुळे माझी झोप मोड झाली. जाग आली तसे मी पाहिले की माझ्या अंगावर पांघरूण नाहीये. मी खाटेच्या बाहेरच्या बाजुला, मध्ये ऋतू आणि भींतीकडे नेहा झोपली होती. मी पांघरूण थोडे माझ्या अंगावर ओढुन घेतले आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागले. झोपेत असल्यामुळे मला जास्त काही कळत नव्हते पण एकदमच गारठल्या सारखे वाटू लागले होते. काही केल्या झोप लागत नव्हती. 

बऱ्याच वेळ प्रयत्न केल्या नंतर मी तशीच पडून राहिले. त्या अंधाऱ्या खोलीत पाहू लागले. तसे तरी काहीच दिसत नव्हते पण त्या खोलीचं दार पूर्ण बंद होत नव्हत. त्यामुळे बाहेरच्या खोलीतून आजोबांच्या फोटो खालचा रंग बदलणाऱ्या लहान बल्ब चा मंद प्रकाश आत आमच्या खोलीत येत होता. तो थेट कपाटाच्या आरश्या वर पडत होता आणि त्याचे प्रतिबिंब म्हणजेच सावली खाटे समोरच्या भिंतीवर पडत होती. मी तसेच पडून सगळ्या गोष्टी न्याहाळत होते. हळु हळु या सगळ्या गोष्टींमध्ये एक वेगळेपणा आणि घुसमट जाणवू लागली. मनात एक वेगळीच चलबिचल एक अस्वस्थपणा जाणवू लागला. त्यात म्हणजे आमच्या छोट्या पियुचा भिंतीवर अडकवलेला एबिसिडी चा तक्ता. खिडकीतुन येणार्या मंद वाऱ्यामुळे तो सतत भिंतीवर आपटून टप टप असा आवाज होत होता. 

मी झोपण्याचा प्रयत्न करतच होते पण तितक्यात त्या बाहेरच्या खोलीतून आत येणाऱ्या प्रकाशा सोबत भिंतीवर पांढरट धुरा सारखी आकृती तयार होऊ लागली. माझी नजर तिथेच खिळली होती. बघता बघता एका लहान मुलाच्या आकाराची आकृती तयार होऊ लागली. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता पण जे समोर दिसत होत ते क्षणभर ही नजर न हटवता मी फक्त पाहत होते. काही वेळाने त्याच मुलाचे रूपांतर एका मध्यम वयीन पुरूषात झाले. तसे माझे हात पाय थंड पडू लागले. मला वाटले की मी स्वप्न पाहतेय. मी ३ ते ४ वेळा डोळ्यांची उघड झाप करून पाहिले पण ती पांढरट आकृती जिथल्या तिथेच होती. मी ठरवले, आता डोळे उघुन तिकडे पाहायचे नाही. भीतीपोटी मी पांघरूण पायाखालुन घेऊन डोक्यापर्यंत ओढुन घेतले. डोळे घट्ट मिटुन काय घडतय याचा विचार करू लागले. 

काही क्षण निघुन गेले. मी विचार केला की आता ते जे काही होत ते गेल असेल. असा विचार करून मी डोक्यावरून हळु हळू पांघरूण खाली सरकवू लागले आणि समोर भिंतीकडे पाहिले. ते दृश्य पाहून विजेचा तीव्र झटका लागल्या सारखे मी शहारले. कारण समोरची पांढरट आकृती आता एका बाईची झाली होती. माझा मणुष्य गण आहे. पण भुत खेत यांवर विश्वास नसलेली मी आता मात्र पुरती घाबरले होते. मी घाबरून पांघरूण पुन्हा डोक्यावर घेतले. समोर जे घडतय ते स्वप्न आहे की सत्य, भीती आहे की भास हे सगळ आता कळण्याच्या पलिकडे गेल होत. मी खात्री करण्यासाठी जवळ जवळ २ ते ३ वेळा डोळे मोठे करुन करुन पाहील पण ते स्वप्न किंवा भास नव्हता. मी घाबरुनच नेहाला हळु आवाजात उठवू लागले. मी तिला म्हणाले, “अगं नेहा, तिकडे भींतीकडे कुणीतरी आहे. बघ ना” त्यावर ती मलाच “झोप” अस म्हणत झोपून गेली. 

ती झोपली पण माझी झोप आता पुरती उडाली होती. मी पांघरूण अंगावर तर घेतलच होत पण आता मी ते अंगाखालुनही गुंडाळल. भीती काय असते हे मी त्या क्षणी अनुभवत होते. काही वेळाने पुन्हा डोळे हलकेच उघडुन पाहील आणि मला आता घाम फुटू लागला. कारण त्या बाईची ती पांढरट आकृती भिंतीपासुन थोडी पुढे सरकली होती. मी आता तिला स्पष्ट पाहू शकत होते. पांढरा फटक देह, उंची साधारण स्री च्या उंचीपेक्षा बरीच मोठी. काळे, लांब सडक आणि मोकळे सोडलेले केस. आणि सर्वात भयंकर म्हणजे तीच्या हातात असलेला चमकणारा धारदार सुरा. मी आता इतकी घाबरले होते की घशातुन आवाज काढायला काही त्राणच उरला नव्हता. मी पुन्हा डोळे घट्ट बंद करून घेतले. हे जे काही सगळ सुरू होत ते कळण्याच्या पलिकडच होत. बराच वेळ निघुन गेला.

मी आता थोडी हिंम्मत एकवटली आणि पांघरूण खाली घेतले आणि काळजात अगदी धस्स झालं. ती विक्षीप्त आणि भयानक बाई आता माझ्या पायाशी येऊन उभी ठाकली होती. मी प्रचंड घाबरले. शरीर जणु हाडा मासाच नाही तर बर्फासारख गोठुन गेल होत. हलता ही येत नव्हत आणि बोलता ही येत नव्हत. पण ती बाई थांबायच नाव घेत नव्हती. ती हळु हळु पुढे येऊ लागली. ती आता माझ्या अगदी जवळ आली तसे मी माझ्यातला होता नव्हता तेवढा जिव एकवटला आणि जोरात किंचाळले. 

तसे खोलीतील माझी आई आत्त्या वैगरे सगळे घडबडून जागे झाले. त्यानी लगेच खोलीतली लाईट लावली आणि माझ्याकडे पाहील. माझे डोळे अगदि विस्फारले होते. चेहरा भीतीने पांढरा पडला होता. पुर्ण चेहरा आणि अंग घामाने चिंब झालेले. माझी ही भयानक अवस्था पाहून आईने मला जवळ घेतले आणि विचारू लागली, ” काय गं, काय झालं ? अशी का किंचाळलीस ? घाम का आलाय ?” यापैकी एकाही प्रश्नाच उत्तर देण्याच्या अवस्थेत मी नव्हते. 

मी आज जे पाहील होत. ते मलाच काय इतर कुणालाच कधी पाहायला लागु नये. माझ्या आईने मला जवळ घेतले आणि मी ही अत्यंत घाबरलेल्या स्थितीत तीला बिलगुन झोपले. आणि मग रात्री एकदाही डोळे न उघडताच झोपी गेले. थेट सकाळीच जागी झाले. मला फणफणुन ताप आला होता. माझी अवस्था पाहून मला आजीन विचारले. “काल संध्याकाळी कुठे गेला होतात खेळायला ?” त्यावर नेहाने सांगितले, “जुन्या विहीरी जवळ”. घरातले सगळे आमच्याकडे पाहू लागले. जुनी विहीर.. वस्तीपासून बरीच लांब होती आणि विहीरीच्या शेजारी एक भल मोठ चिंचेच झाड. तिकडे रात्रीच काय दिवसाही जायला कुणी नको म्हणेल अशी ती जागा. आणि आम्ही काल त्याच झाडाच्या चिंचा काढायला संध्याकाळी गेलो होतो. वेळ होती आमावस्या सुरू होण्याची. आजीने हा सगळा प्रकार ओळखला. तिने माझ्या अंगावरून नारळ आणि लाल रंगाच्या छोट्या गाठोडीत काहीतरी उतरवल आणि बाबांकडे दिल आणि सांगितल अंधार पडायच्या आधी त्याच जुन्या विहीरीकडच्या चिंचेखाली फेकून या. आम्हा सर्वाना ताकीद दिली गेली की त्या भागात या पुढे चुकूनही फिरकायच नाही. मी आजही गावी गेले तरी चिंचेच झाड आणि विहीरीच नाव काढताच अंगाचा थरकाप उडतो.

Leave a Reply