खेडेगावात ऐकल्या जाणाऱ्या दंतकथा तुम्ही नक्कीच ऐकल्या असतील. हा अनुभव ऐकल्यानंतर त्या कथांची सुरुवात कुठून आणि कशी होते हे मात्र तुम्हाला नक्कीच कळेल.

अनुभव – मंथन पाटील

गोष्ट खूप वर्षांपूर्वीची आहे. मी एका छोट्या गावातल्या प्राथमिक शाळेत शिक्षक होतो. त्याच शाळेत माझ्यासोबत आणखी ५ सह शिक्षक होते. सगळ्यांची लग्न झालेली आणि त्यांच्यात मी एकटाच बॅचलर होतो. त्यातले बहुतेक शिक्षक तिथेच गावात भाड्याने घर घेऊन राहत होते. आणि त्याच प्रमाणे शाळेजवळ माझे एक लहान घर होते जे मी भाड्यावर घेतले होते. घर म्हणजे एक छोटीशी खोली. तसेही एकट्याला राहायला कितीशी जागा लागते. शाळेच्या आजूबाजूला शेतं आणि झाडी होती. मोजकी वस्ती असलेले गाव. गावापासून शाळा अगदी हाकेच्या अंतरावर होती. त्या काळी गावात वीज नसायची. त्यामुळे अंधार पडला की खोलीत कंदील लावुन सगळे काम करावे लागायचे. मी स्वयंपाक स्वतःच करत असे. माझ्या बद्दल शाळेत आणि गावात नेहमीच चर्चा होत असे की मी एकटा कसा काय राहतो, वेळ कसा घालवतो वैगरे. मला त्याचे काही नवल वाटायचे नाही. एकदा एक मित्र म्हणाला की उद्यापासून मी आणि काही मित्र जेवण आटोपल्यावर तुझ्याकडे येऊ. थोड्या गप्पा गोष्टी करू म्हणजे तुझा वेळ जाईल. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सगळी मित्र मंडळी रात्री १० ला घरी आली. एकूण ५ जण होते. बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या. नंतर नंतर एका मित्राने आणलेले पत्ते बाहेर काढले. 

मग काय..? कंदिलाच्या मंद प्रकाशात पत्त्यांचा खेळ रंगला. चांगले दीड दोन तास आम्ही सगळे पत्ते खेळत बसलो होतो. खोलीची दार खिडक्या बंद होत्या म्हणून काही वेळाने उकडू लागले. तसे मी उठून सगळ्या खिडक्या उघडल्या आणि हवेचा एक झोत आत शिरला. थंड नसला तरी अश्या वेळी साधा वारा ही मन सुखावून जातो. सगळे पुन्हा पत्ते खेळण्यात व्यस्त झाले. खेळता खेळता एकाने खिशातून विडी चं पाकीट आणि माचिस काढली. आणि एक विडी काढून पेटवली. तसे इतर मित्र म्हणू लागले “एकटाच ओढणार आहेस का..?” तसे त्याने अजुन ४ विड्या काढून प्रत्येकाला दिल्या. त्या काळी खेडेगावात विडी ओढण हे काही आश्चर्य वाटण्या जोग नव्हत. काही वेळा नंतर एक मित्र म्हणाला “अरे मला पण द्या.. तुम्ही सगळ्यांनी घेतली ना विडी..” आम्ही सगळेच हसलो आणि म्हणालो “गंमत करतोय का आमची, तू आत्ताच तर हातात विडी घेतलीस..” त्यावर तो सांगू लागला “अरे मला कुठे दिली..”. बहुतेक तो मस्करी करत असावा असा विचार करून आम्ही त्याच्या कडे दुर्लक्ष केलं आणि विषय हसण्यावर नेला. तो ही पत्ते खेळण्यात इतका मग्न झाला होता की त्याने पुन्हा विडी साठी विचारले नाही. रात्री दीड दोन च्या सुमारास आप आपल्या घरी गेले. 

त्यांना हा चांगलाच विरंगुळा मिळाला होता. दुसऱ्या दिवशी ते सगळे मित्र पुन्हा माझ्या घरी आले. आदल्या रात्री प्रमाणे गप्पा गोष्टी झाल्यावर पुन्हा पत्ते खेळू लागले. आज मात्र २ वाजून गेले तरीही त्यांची मैफिल चांगलीच रंगली होती. कंदिलाचा प्रकाश ही अगदी मंद झाला होता. त्यामुळे नीटसे काही दिसत नव्हते. खोलीत बऱ्यापैकी अंधार झाला होता. पुन्हा मित्राने विडी काढली. तसे इतर मित्र ही मागू लागले. मी मात्र नीट लक्ष देऊन होतो. त्याने तिघांना तर विड्या दिल्या. चौथा मित्र पत्ते वाटण्यात मग्न होता तरीही त्याला विडी घे म्हणत विचारले. तितक्यात त्याच्या मागून अंधारातून एक हात पुढे आला आणि विडी घेतली. मी झटकन उठून उभा राहिलो. काळीज भीतीनं धड धडू लागलं. मागच्या अंधारात नक्की काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करू लागलो. तितक्यात मित्र म्हणाले “काय रे जागेवरून का उठलास..?” त्यांना काही सांगण्याआधी मी बाजूचा कंदील हातात घेऊन झटकन त्या दिशेने वळवला. पण तिथे कोणीही दिसल नाही. मी खूप घाबरलो होतो पण मित्रांना काहीच सांगितले नाही. वाटले की असे घाबरलेले पाहून ते माझी टर उडवतील. 

या प्रसंगाला ४ ते ५ दिवस उलटले. सहाव्या दिवशी शाळेत मी त्यांना हा सगळा प्रकार सांगून टाकला. पण आश्चर्य वाटण्याऐवजी ते म्हणाले की हो आम्हाला माहीत आहे. कारण गावातल्या लोकांकडून आम्ही ऐकले आहे की एका शिक्षकाने वयक्तिक कारणामुळे विष प्राशन करून आत्महत्या केली होती, त्याची आत्मा शाळेभोवती फिरते. कदाचित तोच आला असेल काल रात्री. ते इतके सहज बोलून गेले की मलाच कसे तरी वाटले. त्यांना या गोष्टीचे काहीच अप्रूप किंवा भीती वाटत नव्हती. ते म्हणाले की आज रात्री तो आला की आपण त्याला विचारू कोण आहेस, इथे का आला आहेस वैगरे. मी त्यांना काहीच बोललो नाही कारण माझ्यासाठी हा सगळा प्रकार खूप भयानक होता. मला आश्चर्य वाटत होत की त्यांना काहीच कसे वाटत नाही. त्या रात्री सगळे मित्र पुन्हा माझ्या घरी आले. रात्र झाली, गाव निद्रेच्या आहारी निघून गेलं. आम्ही कसली चाहूल लागते का ते पाहत होतो. काही वेळ उलटला असेल. तितक्यात हळूच दार लोटण्याचा आवाज आला आणि आम्ही स्तब्ध झालो. माझ्या अंगावर शहारे येत होते. तो बहुतेक आत घरात आला होता. पण आमच्यापैकी कोणालाही दिसत नव्हता. 

आमच्यातले कोणी काही विचारणार इतक्यात एका मित्राने खिशात आणलेली टॉर्च चोहो बाजूंनी फिरवली. एका क्षणासाठी तो नजरेस पडला पण पुढच्या क्षणी कुठेतरी दिसेनासा झाला. माझ्या अंगावर भीती ने काटाच येऊन गेला. पांढरे धोतर आणि चेहऱ्यावर चेचकांच्या खुणा होत्या. आता मात्र सगळे खूप घाबरले होते. त्यांना सुरुवातीला हा मस्करी चा विषय वाटला पण जेव्हा तो डोळ्यांदेखत दिसेनासा झाला तेव्हा त्यांना या गोष्टीचे गांभीर्य कळले. की हा प्रकार दिसतो त्याहून भयानक आहे. एक मित्र म्हणाला “आपण काय पाहिले ते जाऊन गावकऱ्यांना सांगू..” पण नंतर विचार केला की मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. आम्हीच असे म्हणू लागलो तर गावातले लोक मुलांना शाळेतही पाठवणार नाहीत. कारण माझे ते लहानसे घर शाळेला अगदी लागूनच होते. तितक्यात दुसरा एक जण म्हणाला “तो विडी ओढायला तर येत नसेल रोज..?” कारण त्याने २ वेळा विडी साठी हात पुढे केला होता. त्या नंतर काही दिवस आम्ही एकत्र जमलो नाही पण त्या रात्री पासून आमच्यातले कोणी तरी एक विडी, माचिस आणि पत्ते ठेवू लागलो. माहीत नाही त्याला या गोष्टींमध्ये रस होता की नाही ते. आणि त्याने आम्हाला कसलीच इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला नव्हता. काही दिवसांनी गावकऱ्यांनी विचारपूस केली तेव्हा न राहवून आम्ही तो प्रकार त्यांना सांगितला. तेव्हा पासून आजही गावातले लोक आठवड्यातून एकदा विडी, माचिस आणि पत्ते त्या घराच्या बाहेर ठेवतात. त्यामुळेच की काय आज पर्यंत त्याने कोणाला त्रास दिल्याचे किंवा पुन्हा दिसल्याचे ऐकिवात नाही. 

Leave a Reply