अनुभव – रोशन जोशी

हि घटना 2010 – 2011 च्या दरम्यान कोकणातील माझ्या गावात घडली होती. मी पाचवी किंवा सहावी मध्ये होतो कदाचित. मे महिन्याच्या सुट्टीचा कालावधी संपत आला होता. सुट्टी संपण्या अगोदर काही तरी वेगळे, रोमांचक असे करण्याचे आम्ही मित्रांनी ठरवले. आमच्या वाडी जवळच एक लहानसे जंगल होते. वाडी म्हणजे कोकणातील गावामध्ये एकाच आडनावाच्या, एकाच समाजाच्या लोकांची वस्ती त्याला वाडी म्हणतात. त्या जंगलाच्या पलिकडे एक छोटासा डोंगर होता. आम्ही सर्वांनी त्या जंगलातील वाटेने डोंगराच्या माथ्यावर जायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी 5 वाजता आम्ही पाच ते सहा मित्र एकत्र जमलो व डोंगराच्या दिशेने चालायला लागलो. गप्पा मस्ती करत आम्ही कधी जंगलात पोहोचलो आम्हालाच कळले नाही. आम्हां सर्वांना डोंगराच्या माथ्यावर पोहचण्याची उत्सुकता लागली होती.

कारण आम्ही कधीही डोंगरावरील परिसर पाहिला नव्हता. लहान असल्यामुळे घरचे तिथे जाऊ द्यायचे नाहीत. कारण तो भाग तितकासा सुरक्षित नाही. पण या वेळेस आम्ही बरेच मित्र सोबत होतो त्यामुळे काळजी करण्याचे कारण नव्हते. चालता चालता आम्ही एका जागी पोहचलो. तिथे झाडे जरा जास्तच घनदाट होती. आम्ही जेथे होतो तेथून आमच्या समोरच काही अंतरावर कोकणातील पायरी नावाचे झाड होते. त्या झाडाकडे बघूनच कोणालाही भीती वाटेल असे होते. मोठ मोठ्या घनदाट फांद्या, रुंद गोलाकार खोड व त्या खोडाला विळखा घातलेल्या जाडजुड वेली. बघूनच अक्राळ विक्राळ वाटत होते आणि एक वेगळीच भीती घालत होते. त्या झाडाच्या खोडाला जमीनीलगतच एक पोकळ जागा होती.

आता ते झाड डोंगर माथ्याला जाण्याच्या वाटेत होते. दुसरी कडून जायचे म्हंटले तर वाट नव्हतीच, मोठी दगड आणि एकदम चढण.. कोणत्या आधाराशिवाय तिथून जाणे शकत नव्हते. त्यामुळे त्या झाडा जवळून जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता. आम्ही त्या झाडाच्या जवळ जाताच अचानक आजूबाजूला अंधार पसरला. वातावरणात वेगळीच उदासिनता पसरली. विचित्र असे आवाज येवू लागले. आम्ही सर्वजण प्रचंड घाबरलो. आम्हाला त्या झाडाव्यतिरिक्त काहिच दिसत नव्हतं. आम्ही घाबरुन त्या झाडाकडे बघत होतो, तेवढ्यात त्या झाडाच्या पोकळीतून मानवआकृती सावली बाहेर येताना दिसली आणि ते पाहून काळजात एकदम धस् झालं. आम्हाला काहिच सुचेना. ती सावली हळूहळू आमच्या जवळ येऊ लागली.

आम्ही जीवाच्या आकांताने धावण्याचा आणि त्या झाडापासून लांब जाण्याचा प्रयत्न करू लागलो. अंग घामाने ओलेचिंब झाले होते. कोणाचीही मागे वळून बघण्याची हिंमत होत नव्हती. भरपूर प्रयत्न करुन आम्ही त्या झाडापासून बरेच लांब आलो. कदाचित जाताना जेवढे अंतर लागले त्याच्या दुप्पट अंतर आम्ही कापले असावे झाडापासून दूर जायला. आम्ही झाडापासून लांब येताच वातावरण पूर्ववत झाले. ते विचित्र आवाज यायचे एकाएकी बंद झाले, अंधार नाहिसा झाला आणि मागून एकदाच विचित्र स्वरात कानठळ्या बसवणारा आवाज आला… आम्ही धावतच जेथून निघालो होतो तेथे आलो. सर्वच प्रंचड घाबरलो होतो. थोड्या वेळापूर्वी काय झाल होत हे आम्हालाच कळले नाही.

पण भास नव्हता तो जे काहि होत ते डोळ्यांनी बघितले होते, आम्ही सर्वांनी अनुभवले होते. हि गोष्ट कोणालाही सांगायची नाहि असे ठरवून आम्ही घरी गेलो आणि पुन्हा कधी तिथे जाण्याचा विचारही केला नाही.

Leave a Reply