हा अनुभव मला लॉक डाऊन मध्ये आला होता. आम्ही सगळे शिमगोत्सव साठी गावाला गेलो होतो. पण नंतर लॉक डाऊन लागल्यामुळे गावालाच थांबावे लागले. आता गावाला राहणं कोणाला नाही आवडणार. त्यात इतके दिवस गावाला राहायचं म्हणजे खूप धमाल. सुरुवाती चे काही महिने असेच गेले. नंतर पावसाच दिवस सुरू झाले. त्या दिवसात खेकडे पकडायला खूप मजा यायची कारण कोकणात पहिल्या पावसानंतर खेकडे आपली पिल्लं सोडायला बिळातून बाहेर येतात. त्यामुळे खेकडे पकडायला सोपे जाते. अश्याच एके दिवशी आम्हा मित्रांचा बेत ठरला की खेकडे पकडायला जायचं. दिवस ठरला, आम्ही सगळे मित्र एकत्र जमलो पण त्यातले बहुतेक मित्र टाळा टाळ करू लागले कारण पाऊस सुरू झाला की शेतीच्या कामांना सुरुवात होते. त्यामुळे बऱ्याच मित्रांना दिवसा वेळ मिळत नव्हता.

वाट पाहून उपयोग नव्हता कारण पावसाच्या सुरुवातीला च खेकडे मिळतात नंतर मग त्यांची संख्या कमी होत जाते. म्हणून मग सगळ्यांनी ठरवले की दिवसा शेतीची कामे आटोपून रात्री खेकडे पकडायला जायचं. या विचारावर सगळ्यांचं लगेच एकमत झालं. त्या रात्री जेवण वैगरे आटोपून ८ वाजता निघायचं ठरलं. आणि ११ वाजायच्या आत घरी यायचं. माझे गावातले मित्र या आधी पण रात्री अपरात्री फिरले होते पण मी मित्र पावसाळ्याच्या दिवसात पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळे तशी उत्सुकता तर खूप होती. मी तयारी केली. त्या दिवशी पावसाचा जोर खूप होता. सकाळपासून सतत मुसळधार पाऊस पडत होता आणि त्यामुळे त्या रात्री गावात नेमकी लाईट गेली होती. आता रात्री निघायचं म्हंटले तर कमीत कमी बॅटरी तर हवीच. म्हणून काही ना काही शक्कल लढवून आम्ही दोन बॅटरी चा बंदोबस्त केला. मोबाईल पावसात भिजून खराब होतील म्हणून घरीच ठेवले. तसे ही ३ तासात परतायचे नक्की झाले होते त्यामुळे मोबाईल कोणीच घेतला नाही. 

आप आपल्या घरात कळवून ठरेलेल्या वेळी आम्ही सगळे मित्र पारावर जमलो. आम्ही एकूण चार जण होतो म्हणजे मी, मिलिंद, केदार आणि राकेश. सोबत २ बॅटऱ्या घेतल्या होत्या ज्या फार फार तर २ तास चालतील इतकंच चार्जिंग असावं कारण दिवसभर लाईट नव्हती त्यामुळे त्या आधीच अर्ध्या वापरून झाल्या होत्या. जास्त वेळ टिकतील की नाही याची खात्री नसल्यामुळे गावाच्या वेशी बाहेर जायचे नाही असं ठरलं. मुख्य वाट धरली तो पर्यंत पावसाचा जोर आधी पेक्षा मंदावला होता. सकाळी सुंदर दिसणारं आमचं गाव रात्री मात्र निराळचं दिसत होत. चालता चालता वाटेत आमच्या ग्राम देवतेचे मंदिर लागले. आम्ही लांबूनच नमस्कार करून पुढील वाट धरली. जंगल पट्टीचा परिसर. घनदाट झाडी आणि मोठे वृक्ष. जात असताना च आम्ही एक ठिकाण ठरवले की वहाळावर जायचे आणि गप्पा मारत मारत कधी तिथे येऊन पोहोचलो कळलेच नाही.

वहाळ म्हणजे नदिसारखा दिसणारा पाण्याचा एक स्रोत. अश्या ठिकाणी खेकड्यांची पैदास खूप होते. आता एकाच ठिकाणी खेकडे पकडण्या पेक्षा वेग वेगळ्या दिशेला शोधलेले बरे पडेल असा विचार करून आम्ही २ गट केले. एका गटात मी आणि राकेश तर दुसऱ्या गटात मिलिंद आणि केदार. दोन बॅटऱ्या होत्या त्यामुळे प्रश्न नव्हता. आम्ही वेगळ्या दिशेला जाऊन खेकडे पकडायला सुरुवात केली. बराच वेळ उलटून गेला आणि आम्हाला वेळेचे भानच राहिले नाही. मी आणि राकेश ने बरेच खेकडे पकडले होते. आता बॅटरी ही लूक लूक करू लागली होती म्हणून आम्ही घरी परतायचं ठरवल. जाताना मिलिंद आणि केदार ला आवाज दिला. पण त्यांचा काहीच प्रतिसाद आला नाही. मी राकेश ला म्हणालो की यांची मस्करी सुरू झाली परत, हे काय सुधारणार नाहीत लवकर. तसे आम्ही पुन्हा हाका मारल्या पण तरीही कसलाच प्रतिसाद नाही. आम्ही त्या ठिकाण हून त्यांना शोधत च निघालो. पुन्हा जंगलातून वाट काढत जाऊ लागलो. अधून मधून त्यांच्या नावाने हाक मारत होतो. 

तितक्यात समोरून कोणी तरी आवाज देत आहे असे वाटले. आवाज लांबूनच येत होता पण तो नक्की कोणाचा आहे ते समजत नव्हते. मिलिंद आणि केदार चा नक्कीच नव्हता हे आम्ही लगेच ओळखले. तरीही आम्ही त्या आवाजाचा दिशेने चालू लागलो. तो आवाज हळु हळु स्पष्ट होऊ लागला. पायपीट करत आम्ही आवाजाच्या ठिकाणी येऊन पोहोचलो पण तेथे कोणीच नव्हते. आम्ही थोडे गांगरलो आणि काही कळायच्या आत तसाच आवाज दुसरी कडून यायला लागला. आम्ही दोघं ही थोडे दचकलो आणि एकमेकांकडे पाहू लागलो. कारण तो आवाज आम्ही ज्या दिशेने आलो होतो त्याच दिशेहून येत होता. आता आवाज इकडून येत होता अचानक तिथून कसा येतोय असा विचार करत आम्ही पुन्हा त्या आवाजाचा पाठलाग करू लागलो. आधीच गडद अंधार त्यात बॅटरी चार्जिंग कुठल्या वेळी संपेल याचा काहीच पत्ता नव्हता.

चालता चालता समजलच नाही आम्ही कुठे आलोय ते. ज्या गोष्टी चा आधार होता तोच गेला. ते दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ना तसे काहीसे झाले. म्हणजे आमच्या कडची बॅटरी संपली. आता काय करायचं. चोहो बाजूंना मिट्ट काळोख त्यात आम्ही दोघं च जण. पावसाचा जोर कमी झाला असला तर रीप रिप सुरूच होती. मोबाईल ही घरी ठेऊन आलो होतो त्यामुळे कोणाला फोन करून मदत मागायची ही सोय नव्हती. आता काय करायचं असा विचार करू लागलो. तितक्यात राकेश म्हणाला की आपण आलो तिथेच जाऊ, मला ती वाट लक्षात आहे. त्याच्या सांगण्या वरून आम्ही पुन्हा त्या दिशेने निघालो. पावसाच्या सरींच्या आवाजा सोबत रातकिडे आणि बेडकांचे डुर डूरणे ही स्पष्ट ऐकू येत होते. वातावरण अगदीच गूढ होत चाललं होत. त्या काळोखात आम्हाला वाटच समजत नव्हती की आम्ही नक्की कोणत्या दिशेला चाललोय. वेळेचा नेमका अंदाज नाही पण तरीही साधारण अर्धा तास तरी आम्ही त्या जंगलातच चालत होतो. काहीच कळायला मार्ग नव्हत काय आता काय करायचं. तितक्यात अचानक आमच्या समोर काही अंतरावर एक टॉर्च पेटलेली दिसली. 

मिट्ट काळोख असल्यामुळे तो प्रकाश अगदी सहज दिसत होता. मी राकेश ला खुणावत सांगितले की ते बघ समोर तिथे बॅटरी चा उजेड दिसतोय. ते दोघं इथेच असतील चल. आम्ही त्या दिशेने चालत गेलो पण तिथे गेल्यावर कळले की तिथे दुसरेच कोणी तरी उभे आहे. एक अनोळखी व्यक्ती. आमच्याच उंचीचा पण थोडा हाडकुळा, कुरळे केस. त्या हलक्याश्या प्रकाशात दिसले की त्याच्या पायाला जखम झाली आहे. आवाज भरीव वाटत होता कारण बहुतेक हाच बऱ्याच वेळा पासून आम्हाला आवाज देत होता. कदाचित तो ही खेकडे पकडायला आला असावा असा आम्ही अंदाज बांधला. मी जवळ जात लगेच विचारले ” कोण आहेस तू..? नाव काय ?”  त्यावर तो म्हणाला ” म्हादू” . फक्त एकच शब्द, त्याचे नाव. आवाज इतका भरीव की ऐकून जरा वेगळेच वाटले. तो आमच्या गावातला नसावा कारण आमच्या गावात म्हादू नावाचा एकही व्यक्ती नव्हता. आमचं गाव तस लहान असल्यामुळे सगळ्यांशी ओळख होती. मी त्याला विचारले ” म्हादू तू गा गावचा आहेस का..? ”

त्याने फक्त होकारार्थी मान डोलावली आणि म्हणाला ” तुम्हाला ओळखतो मी.. ” आता मात्र दोघं ही जरा गोंधळात पडलो. आम्ही त्याला पहिल्यांदा पाहिले होते पण तो मात्र आम्हाला नावानिशी ओळखत होता. पण नंतर वाटलं की कदाचित बाजूच्या गावातला असावा. मी त्याला विचारले ” म्हा दू ही जागा नक्की कुठली आहे.. इथून मुख्य रस्त्यावर कसं जायचं.? ” त्याने काहीही न बोलता फक्त हाताने इशारा केला. आम्ही त्याला विचारले ” तू येतोय का सोबत ?” त्यावर त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि आम्हाला सांगितलेल्या विरुद्ध दिशेला चालायला सुरुवात केली. मला त्याचे वागणे विचित्र च नाही पण थोडे से गूढ ही वाटले. काही वेळाच्या पायपी टी नंतर आम्ही एका मोकळ्या जागेत आले. जणू छोटेसे मैदान असेल. जागा ओळखीची वाटत नव्हती. पण समोरचे दृश्य पाहिले आणि जणू भीती ने धडकीच भरली. तो म्हादू पुन्हा त्याच मैदानात टॉर्च घेऊन उभा दिसला. 

एके क्षणी वाटले की हा तोच आहे की दुसरच कोणी तरी..  मी राकेश ला म्हणालो ही तर तीच व्यक्ती आहे ना जी थोड्या वेळापर्वी आपल्या दिसली होती. पण ती तर वेगळ्या वाटेने निघाली होती मग ती व्यक्ती इथे कशी. मी लांबूनच त्याला पाहत होतो. राकेश मात्र माझे बोलणे टाळून म्हणाला ” चल पटकन.. आपण इथून निघायला पाहिजे.. मला वाटतंय की इथून मुख्य रस्ता जास्त लांब नसेल..” त्याचे म्हणणे ऐकून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुढे निघालो. मी मात्र गोंधळात पडलो होतो नक्की घडतंय काय आपल्या सोबत..  म्हणून मी त्या व्यक्तीकडे तिरकी नजर टाकली तर ती पुन्हा इशारा करून दाखवत होती की या दिशेने जा. त्या मिट्ट अंधारात हातात बॅटरी धरल्यामुळे पडणाऱ्या प्रकाशात फक्त त्याची आकृती दिसत होती, एखाद्या जिवंत पुतळ्यासारखी. मी पुरता घाबरलो होतो, कदाचित मला कळले होते की हा किती भयानक प्रकार आहे पण त्यावर मला विश्वास ठेवायचा नव्हता.

जीव मुठीत घेऊन आम्ही पटापट चालू लागलो. एव्हाना खूप उशीर झाला असावा असे भासू लागले. ११.३० किंवा १२ होऊन गेले असावेत. आम्ही गावाच्या वेशी पासून थोडे बाहेर आलो होतो. राकेश म्हणाला की इथून आपण अर्ध्या तासात पोहोचू गावात. मी होकार देतच राकेश सोबत घडलेल्या प्रकारा बद्दल चर्चा करू लागलो, तो नक्की कोण होता आणि आपल्याला कसे ओळखत होता ते विचारू लागलो. अवघे ५ ते १० मिनिट झाली असावीत आणि तितक्यात एक भयानक आवाज ऐकू आला.. वाचवा.. वाचवा.. कोणी तरी कण्हत होत, ओरडत होत, विनवणी करत होत. आधीच घाबरलो होतो आणि त्यात अचानक आवाज आल्यामुळे आम्ही प्रचंड घाबरलो. हाकामारी, चकवा की अजुन काही.. नुसत्या विचाराने अंगावर शहारे उमटून गेले. आता मात्र आम्ही दोघं ही घाबरून पळू लागलो. राकेश म्हणाला ” काही झाले तरी पाठी मागे वळून बघू नकोस. ” जीवाच्या आकांताने दोघं ही धावत सुटलो. धावता धावता मला रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली मिलिंद थांबलेला दिसला. 

मी त्याच्याकडे बघतच त्याला जोरात हाक दिली. त्याने एकदम दचकून आमच्याकडे पाहिलं आणि जोरात ओरडुन विचारले ” अरे तुम्ही धावताय का..? ” मी त्याला मागे पाहण्याचा इशारा केला आणि त्याला सावध केले. त्याने झटकन मागे वळून पाहिले पण आमच्या मागे कोणीच नव्हते. तसे तो पुन्हा म्हणाला ” असे मागे कोणीच नाहीये..” या वेळी मी आणि राकेश आम्ही दोघांनीही एकत्र मागे वळून पाहिले, आमच्या मागे कोणीही नव्हत. फक्त भास होता..? मग तो भयानक आवाज..? आम्ही पुन्हा मिलिंद कडे धावत आलो आणि विचारले ” तू एकटाच कसा काय.. केदार कुठे आहे..? ” त्यावर तो म्हणाला ” तो तुम्हाला शोधायला गेलाय. तुम्ही हाका मारत होता ना काही वेळा पूर्वी, आम्ही तुमचा आवाज ऐकला. इतकचं नाही तर आम्ही प्रतिसाद देत होतो पण तरीही तुमच्या हाका सूरूच होत्या जणू तुम्हाला आमचा आवाज च ऐकू येत नसावा.

केदार म्हणाला की तुम्ही दोघं जण भेटलात तर मग थेट आपल्या ग्राम देवतेच्या मंदिराजवळ जाऊन थांबा मी तिकडेच येईन. मिलिंद च बोलण ऐकून आम्ही तिघेही मंदिराच्या दिशेने चालू लागलो. मिलिंद आमच्या मागे चालत होता. थोडा शांतच होता. चालता चालता त्याला घडलेला प्रसंग सांगितला पण ते ऐकून तो काही बोलायलाच नाही. कदाचित त्याचं लक्ष नसाव म्हणून मी त्याला हाक देत पुन्हा विचारले. पण तो फक्त हो म्हणत आमच्या मागे चालत होता. बघता बघता आम्ही मंदिरा जवळ आलो आणि समोर चे दृश्य पाहून पायाखालची जमीन च सरकली. मिलिंद आणि केदार दोघं ही आमची वाट पाहत मंदिरापाशी उभे होते. मी आणि राकेश पुरते घाबरलो आणि एकमेकांकडे पाहू लागलो. मिलिंद इथे कसा..? तो तर आपल्या सोबत चालत होता ना..? धड धडत्या काळजाने आम्ही दोघांनी पाठी वळून पहिले तर तिकडे मिलिंद नव्हता. आम्ही धावतच मंदिरा पाशी गेलो आणि मिलिंद ला विचारलं ” अरे तू इकडे..? तर तो म्हणाला ” मग कुठे असणार मी.. आपण 2 गट केले आठवतंय ना..” अरे पण तू तर आमच्या सोबतच चालत होतास ना मग केदार सोबत इथे कसा काय आलास ??

आम्ही सुरुवाती पासून चा सगळा प्रसंग प्रत्येक घटना त्या दोघांना सांगितली. त्यांना वाटल आम्ही मस्करी करतोय किंवा घाबरवण्यासाठी बोलतोय.. ते आमची वेड्यांमध्ये मोजणी करत हसू लागले. निघता निघता देवांना नमस्कार करून घराकडे निघालो तर आम्हाला तीच व्यक्ती टॉर्च घेऊन मंदिरा पासून थोड्याच अंतरावर दिसली. या वेळी केदार आणि मिलिंद ही पुरते घाबरले. पुन्हा एकदा त्या व्यक्तीने तसाच इशारा केला. आम्ही सगळे जण इतके घाबरलो की धावत धावत आप आपल्या घरी गेलो. घरी येताच माझे आजोबा मला ओरडायला लागले. ते माझी वाट पाहत जागे होते. त्यांना खूप काळजी वाटू लागली होती की १ वाजायला आला तरी आपला नातू घरी कसा नाही परतला. घरात आल्या आल्या ते मला खूप ओरडले की इतका वेळ लागतो का यायला. त्यांनी मला सक्त ताकीद दिली की या पुढे रात्री च कुठेच जायचं नाही. मी आधीच घाबरलो होतो त्यामुळे आजोबांना न काही सांगता झोपलो. शेवटी चूक ही आमची होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा चार ही मित्र भेटलो आणि त्याच विषयावर काही माहिती मिळते का ते बघू लागलो. आमच्याच गावात नाही पण आजू बाजूच्या गावात ही चौकशी केली पण त्या नावाची कोणी व्यक्ती मुळात अस्तित्वातच नव्हती. ती व्यक्ती कोण होती याच गूढ अगदी आज तागायात आम्हाला उलगडल नाहीये. 

Leave a Reply