अनुभव – श्रीकृष्ण गायकर

प्रसंग २०१०-११ सालचा आहे. तेव्हा शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे मी माझ्या गावी कोकणात गेलो होतो. गावी माझ्या वयाची बरीच मुलं असल्याने चांगली मैत्री झाली होती त्यामुळे खूप मजा यायची. त्या मुलांमध्ये माझे दोन खास मित्र होते भावेश आणि दिपेश. दोघं एकमेकांचे चुलत भाऊ. आम्ही सगळी गावातली पोरं रोज संध्याकाळी अगदी सूर्य मावळे पर्यंत क्रिकेट खेळायचो. आणि खेळून झाल्यावर गावाच्या विहिरीवर अंघोळीला जायचो. त्या दिवशी खेळून झाल्यावर आम्ही विहिरीवरून आंघोळ करून घर जायला निघालो. तितक्यात वाटेत भावेश ची मावशी भेटली. ती तिथेच दुसऱ्या वाडीत राहायची. तिच्या घरी सत्य नारायणाची पूजा होती म्हणून गावातल्या इतर लोकांप्रमाणे आम्हाला ही अमांत्रणाचे सांगायला आली होती. आम्ही घरी जाऊन मावशीकडे जायची तयारी करू लागलो. आमची तयारी होई पर्यंत सूर्य मावळला होता आणि हळु हळू अंधार पडायला सुरुवात केली होती. मावशी ज्या वाडीत राहायची ती वाडी साधारण २० मिनिटांच्या अंतरावर होती. त्या वाडी कडे जाणारा रस्ता तसा व्यवस्थित होता पण नेहमी निर्मनुष्य असायचा. त्या रस्त्यावर खूप चढ उतार आणि तितकीच वळण होती. आम्ही रमत गमत भावेशच्या मावशीच्या घरी पोहोचलो. लाऊड स्पीकर वर भक्ती गीते लावली होती. भटजी उशिरा आल्यामुळे पूजा पूर्ण व्हायला बराच उशीर झाला. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ थांबावे लागले. पूजा झाल्यावर नमस्कार वैगरे करून आणि प्रसाद घेऊन आम्ही निघायचे ठरवले.

पण मावशीने आम्हाला जेवणाचा आग्रह केला. पण उशीर होईल म्हणून आम्ही जेवायला थांबलो नाही. मावशीच्या घरातून बाहेर पडलो तेव्हा मिट्ट अंधार झाला होता. मावशी घरी सोडण्यासाठी एखाद्या रिक्षाची व्यवस्था करत होती पण ज्याला सांगणार तो नेमका भाडे घेऊन दुसऱ्या गावात वेळा होता आणि कधी परत येईल याचा अंदाज नव्हता. शेवटी आम्ही मावशीला म्हणालो की आम्ही जातो चालत. पण तरीही ती आम्हाला त्या वाटेने जाऊ देत नव्हती. मला कळले नाही ती इतकी काळजी का करतेय. तिने शेजारी एका मुलाला ही सांगितले की यांना बाईक ने सोडून ये पण त्याची बाईक नेमकी बिघडली होती. शेवटी आम्ही तसेच चालत निघालो. जस जसे आम्ही भावेशच्या मावशीच्या घरापासून दूर जाऊ लागलो तसतसे पुजेच्या ठिकाणी लावलेल्या स्पिकरचा आवाज कमी होत गेला. आणि आम्हाला त्या वाटेवरची जीवघेणी शांतता प्रकर्षाने जाणवू लागली. माझ्या उजव्या बाजूला दिपेश तर डाव्या बाजूला भावेश चालत होता. मी दोघांच्या खांद्यावर हात टाकून चालत होतो. वाट दोन्ही बाजूने झाडी झुडू पांनी आच्छादली असली तर चंद्र प्रकाश असल्यामुळे थोडाफार उजेड जाणवत होता आणि त्याच्याच प्रकाशात आम्ही चालत होतो. अधून मधून गर्द झाडी लागली की रात किड्यांचा कर्णकर्कश आवाज कानावर पडत होता. का कोण जाणे पण ती वाट आता खूपच भयावह वाटू लागली. मनात भीती घर करू लागली. चंद्र प्रकाश असल्यामुळे त्या मोठ्या वृक्षांचे आकारही भयानक भासत होते. 

एके क्षणी अचानक वाटले की रस्त्याकडेच्या झाडा मागून आपल्याला कोणी तरी डोकावून पाहतेय.. नुसत्या विचाराने अंगावरून शहारे उमटले. याची खात्री करण्यासाठी एक दोन वेळा मागे वळून पाहिले पण मिट्ट अंधाराशिवाय काहीच नजरेस पडले नाही. मनातील भिती घालवण्यासाठी मी माझ्या मोबाईल मध्ये मोठ्या आवाजात गाणी लावली. थोडे पुढे आल्यावर आम्हाला आमच्या समोरून एका माणसाच्या बोलण्याचा आवाज येऊ लागला. जस जसे आम्ही पावलं टाकत पुढे जाऊ लागलो तस तसे तो आवाज अधिकच स्पष्ट ऐकू येऊ लागला. तितक्यात समोरच्या अंधारातून हातात काठी घेतलेला एक जण अचानक आमच्या समोर आला. वाढलेली दाढी, विस्कटलेले केस, पांढऱ्या रंगाची लुंगी आणि हातात एक मोठी काठी.. तो आमच्या समोरच येऊन थांबला. त्याला असे अचानक समोर आलेले पाहून काही क्षणासाठी ह्रदयाचे ठोकेच थांबले. पण पुढच्या क्षणी लक्षात आले की ते आमच्याच वाडीतील तुकाराम बुवा होते. आम्ही त्यांना विचारले की तुम्ही कुठे जाताय या दिशेला..? तर ते म्हणाले की सत्य नारायणाच्या पुजे ला जातोय. आम्ही त्यांना वाडीच्या गेट पर्यंत सोडायची विनंती केली पण मला उशीर होतोय इतकं बोलून ते तिथून निघून गेले. मी जेव्हा मागे वळून पाहिले तेव्हा ते स्वतः बरोबरच बोलत चालले होते. स्वतःशीच बोलत होते की त्यांच्या आजूबाजूला कोणी होत हे काही कळले नाही. मनात विचार आला की ते समोर येण्याआधी ही त्यांच्या बोलण्याचा आवाज येत होता. म्हणजे कदाचित त्यांच्या सोबत कोणीतरी आहे जे त्यांना दिसतंय पण आम्हाला नाही. 

आम्ही चालण्याचा वेग वाढवला. एखादे वाहन वैगरे दिसते का ते पाहू लागलो. पण वाहन काय एक चीट पाखरुही त्या वाटेवरून जाताना दिसले नाही. आम्ही तसेच पुढे जात राहिलो. तितक्यात आम्हा तिघांनाही मागून कोणी तरी चालत येत असल्याची चाहूल जाणवू लागली. पण आता मात्र माझी मागे वळून पहायची हिम्मत नव्हती. एव्हाना चंद्र ही ढगा आड गेला होता त्यामुळे अंधार अजुन गडद भासू लागला. एकवेळ मनात विचार आला की जोरात पळत जाऊन घर गाठावे पण इथे धड वाटही नीट दिसत नव्हती. बराच वेळ चालल्या नंतर एका वळणावर एक चिंचेचे झाड दिसले. तितक्यात मला आठवले की या झाडाजवळ बऱ्याच लोकांना चित्र विचित्र अनुभव आले आहेत. आणि म्हणूनच मावशी आम्हाला या वाटेने असे पाठवत नव्हती. इतक्या वेळेपासून वाटणारी भीती आता वेगळेच रूप धारण करू लागली होती. फोन वर मोठ्या आवाजात गाणी सुरूच होती. पण जसे आम्ही त्या झाडाजवळ जाऊ लागलो तसे हळु हळू मोबाईल चा आवाज आपोआप कमी होऊ लागला. मला वाटले की मी चुकून मोबाईल च्या मागच्या बाजूला स्पीकर वर बोट ठेवलेय पण तसे अजिबात नव्हते. तो आवाज जसा कमी झाला तसे आमची चांगलीच तंतरली. मी त्या दोघांना एक शब्दही बोललो नाही. पण कदाचित त्यांना ही तेच जाणवत होत. तितक्यात मागून पुन्हा एक अनामिक चाहूल जाणवली. कोणी तरी होत आमच्या मागे. जे आमच्याच दिशेने सरपटत येत होत. तो विचित्र आवाज मी कधीच विसरू शकणार नाही. मागे वळून पाहण्याचा प्रश्नच नव्हता. 

पण आम्ही जागीच थांबलो आणि मित्र मागे वळून पाहणार तितक्यात समोरून आमच्याच वाडीतली काही मुलं बाईक वरून आली. आम्ही त्यांना हाक मारली तसे ते आमच्या कडे आले. काहीच न बोलता तिघही गाडीवर बसलो आणि थेट घरी निघून आलो. भावेश आणि दीपेशच्या घरचे आमचीच येण्याची वाट बघत होते. मी आमच्याबरोबर झालेला सर्व प्रकार भावेशच्या आजीला सांगितला तेव्हा आजीने सांगितले की त्या चिंचेच्या झाडाजवळून जाताना गावातील काही जणांना विचित्र भास झाले आहेत. बरं झालं तुम्ही त्या भागात थांबला नाहीत नाही तर अनर्थ झाला असता..

Leave a Reply