अनुभव – शर्विल झोरे

४ सप्टेंबर माझ्या आयुष्यातला नेहमी सारखा दिवस. कोल्हापूर ला माझे स्वतःचे घर आहे. आम्ही फर्स्ट फ्लोअर वर राहायचो आणि माझ्या काकांनी ग्राउंड फ्लोअर वरचे घर एका म्हाताऱ्या बाईला आणि तिच्या मुलाला राहायला दिले होते. तो मुलगा नेहमी दारू पिऊन यायचा. लॉक डाऊन मध्ये सतत टिव्ही पाहून आणि मोबाईल वर गेम खेळून खूप कंटाळलो होतो म्हणून त्या दिवशी दुपारी मी टेरेस वर आलो. मी सहज तिथे फेऱ्या मारत होतो आणि तितक्यात मला कसलासा आवाज आला. तसा मी धीट आहे पण त्या दिवशी मी एक हॉरर सिनेमा पाहिला होता त्यामुळे डोक्यात नको नको ते विचार येऊ लागले. तितक्यात झपकन कोणी तरी समोर आले, ती माझी बहिण होती आणि मला मुद्दामून घाबरवायला विचित्र आवाज करत होती. मला घाबरलेले पाहून ती जोरात हसू लागली. मी तिला विचारले तू कधी आलीस.. सांगितले ही नाही मला.. ती म्हणाली की काही दिवस आमचे ऑनलाईन लेक्चर होणार नाहीयेत म्हणून मी आले. आम्ही काही वेळ टेरेस वर गप्पा मारून मग खाली आलो.

आम्ही खाली येऊन काही वेळ असाच टाईमपास केला, खेळलो. तितक्यात आम्हाला दरवाजा वाजवण्याचा आवाज आला. खालच्या मजल्यावर माझी काकू तिचा दरवाजा वाजवत होती. तिच्या बरोबर माझा भाऊ ही होता. ती म्हातारी बाई कुठे तरी बाहेर गेली होती आणि नेहमी प्रमाणे तिचा दारुडा मुलगा घरात येऊन झोपला होता. साहजिक च शुद्धीत नसावा म्हणून ती बराच वेळ दार वाजवत होती. तिने दरवाजा ढकलला सुद्धा जेणेकरून आत असलेल्या त्या मुलाला कळावे पण काहीच उपयोग झाला नाही. खूप प्रयत्न केल्यानंतर ती खिडकीजवळ गेली. तिला वाटले की खिडकी उघडुन हाक मारली तर तो उठेल. तसे माझा भाऊ मागच्या बाजूने गेला आणि खिडकी उघडली. समोरचे दृश्य पाहून तो प्रचंड घाबरला. त्या मुलाने गळफास घेतला होता. तो जोरात ओरडला. संध्याकाळचे ७ वाजले होते. आमच्या कॉलनी मधले सगळे लोक जमा झाले. पोलिसांना बोलवण्यात आले, त्यांनी सगळी तपासणी केली आणि नंतर रुग्णवाहिकेतून त्याचे प्रेत पोस्ट मोर्टेम साठी घेऊन गेले.

ते पावसाळ्यातला दिवस होते, बाहेर मुसळधार पाऊस, विजा पडत होत्या. मी हॉरर सिनेमा पाहिला होता. त्यात नुकताच घडलेली घटना. त्या रात्री मला खूप विचित्र चाहूल जाणवू लागली. कसले तरी विचित्र आवाज येत होते. मी उठलो आणि पाहिले तर बहुतेक माझ्या घरच्यांना ही तसेच जाणवत होते. सगळ्यांना एकच भास होणे शक्य नव्हते. आम्ही एका ओळखीच्या पूजाऱ्याला घराची शांती करायला सांगितली. त्याने दुसऱ्या दिवशी घरी येऊन सगळे पाहिले आणि म्हणाला की शक्यतो रात्री ११ नंतर बाहेर पडू नका. पुढचे काही दिवस आम्ही घरातले सगळे एकत्र एकाच खोलीत झोपलो. त्या दिवशी पुजारी घरी येणार होता. आम्ही नेहमी प्रमाणे सगळे सकाळी आप आपल्या कामाला गेलो. संध्याकाळी लवकर सगळे घरी आलो. बराच उशीर झाला तरी तो पुजारी आला नाही म्हणून आम्ही त्याला फोन केला. ती म्हणाला की माझी स्कूटर स्टार्ट होत नाहीये त्यामुळे तो येऊ शकणार नाही. आम्ही ठीक आहे म्हणून फोन ठेऊन दिला. फोन ठेवतांना त्याने पुन्हा एकदा बजावून सांगितले की रात्री ११ नंतर कोणीही घरा बाहेर पडू नका. 

आम्ही सगळी दारं, खिडक्या नीट बंद करून घेतल्या आणि झोपलो. पण कोणाला ही त्या रात्री झोप लागत नव्हती. मला ही खूप अस्वस्थ वाटत होत. तितक्यात दार ठोकण्याचा आवाज आला. आम्ही सगळे घाबरलो कारण ११ वाजून गेले होते. वडील म्हणाले की काहीही झाले दार उघडायचे नाही. हळु हळु दारावर थाप देण्याचा आवाज वाढू लागला. आम्ही सगळेच खूप घाबरलो होतो. दुसरे कोणी असते तर आम्हाला आवाज दिला असता किंवा फोन केला असता पण तसे झाले नाही. सगळ्यांना कळून चुकले होते की बाहेर नक्की कोण आहे. सगळे देवाचे नाव घेऊ लागले. काही वेळानंतर बाहेरून एक वेगळाच रडण्याचा, ओरडण्याचा आवाज येऊ लागला. माझे वडील आम्हाला धीर देत शांत करू लागले. पहाटे ३ वाजे पर्यंत हा प्रकार असाच चालू होता आणि नंतर अचानक सगळे काही शांत झाले. बहुतेक बाहेर जे काही होते ते निघून गेले होते. आजी ने आम्हा सगळ्यांना बाळूमामा देवाचा भंडारा लावला. 

दुसऱ्या दिवशी सकाळी च ते पुजारी आले आणि त्यांनी घराची शांती केली. ते म्हणाले की हा असा शांत होणार नाही, याच्या जन्म स्थानी तुम्हाला मांस म्हणजे मटण ठेऊन यावे लागेल. लगेच सगळी चौकशी केली तेव्हा कळले की त्यांचे जुने घर तिथून २० किलोमिटर अंतरावर आहे. माझे काका ही तेव्हा आले होते. त्यांनी संध्याकाळी हॉटेल मध्ये जाऊन मटण पार्सल घेतले आणि त्याच्या जुन्या घरी जाऊन ते ठेऊन आले. वेळ ही तीच होती ७ वाजता ची. त्या नंतर मात्र आम्हाला घरात कसलेही अनुभव आले नाहीत.

Leave a Reply