अनुभव – गौरव चव्हाण

गोष्ट २०१८ ची आहे. मी उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या चुलत भावाकडे काही दिवस राहायला गेलो होतो. त्यांचा २ बी एच के फ्लॅट होता. आम्ही ५ जण होतो मी, माझा भाऊ, चुलत बहीण आणि काका काकू. उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे मी खूप उकडत होत. त्यामुळे मी आणि माझ्या भावाने ठरवले की आपण आज गच्ची वर झोपायला जाऊ. जेवण आटोपल्यावर अंथरूण घेऊन आम्ही गच्ची वर गेलो. तेव्हा साधारण ११ वाजले असतील. भावाचा फोन घेऊन मी गेम खेळत बसलो. काही वेळानंतर मला कंटाळा आला म्हणून मी त्याला म्हणालो की मी जरा शतपावली करतो. त्याने ठीक आहे म्हंटले. बिल्डिंग मोठी असल्याने गच्चीवर फिरण्यासाठी बरीच जागा होती. मी काही पावले चालत गेलो. तसे समोर लक्ष गेले. तिथे कोणीतरी उभे होते. मला वाटले की माझ्यासारखेच कोणी तरी तिथे शतपावली करायला आले असेल म्हणून मी दुर्लक्ष केलं. मी दोन तीन फेऱ्या मारल्या तसे ते जे कोणी होत ते तसेच उभे असल्याचे जाणवले. 

मी ज्या भागात फिरत होतो त्या मध्ये आणि समोरच्या विंग च्या गच्ची मध्ये बरेच अंतर होते. आणि त्या मध्ये गॅप होता, बहुतेक तिथे जायला मार्ग नव्हता. तरीही मी थोडे पुढे जाऊन पाहिले पण बराच अंधार असल्यामुळे तिथे उभ असलेल्या व्यक्तीचा चेहरा काही दिसला नाही. मी भावाकडे आलो तर तो मोबाईल मध्ये गुंग झाला होता. मी त्याचा मोबाईल घेतला आणि म्हणालो “अरे त्या समोरच्या विंग वर कोणी तरी उभे आहे कधी पासून बघ ना जरा..” तसे तो जरा हसतच म्हणाला “त्या विंग चा वर येण्याचा दरवाजा खूप वर्षांपासून बंद आहे. तिथं कोणी राहत नाही.. त्यामुळे कोणी वर येण्याचा प्रश्न च येत नाही.. तुला भास झाला असेल..” मी त्याचे बोलणे ऐकून स्वतःलाच समजावले की अंधारात मला तसे जाणवले असेल पण कोणी नसेल तिथे. मी भावा शेजारी बसलो आणि गप्पा मारू लागलो. मस्त वारा सुटला होता. पण तरीही मला एक वेगळाच अस्वस्थपणा जाणवत होता. खरे तर ही जाणीव सांगू शकत नाही पण कसलीशी अनामिक भीती वाटत होती. 

गप्पा मारता मारता वेळ कसा निघून गेला कळलेच नाही. रात्री चा पाऊण वाजला होता. मला फार झोप आली होती म्हणून आम्ही अंथरूण टाकले आणि अंगावर पांघरूण घेऊन झोपून गेलो. बऱ्याच वेळानंतर मला अचानक जाग आली. मी बाजूला पहिले तर भाऊ गाढ झोपेत होता. मला खूप घाम आला होता. मी उठून उभा राहीलो आणि माझी नजर पुन्हा समोर गेली. समोर कोणी तरी उभे असल्याचे पाहून काळजात अगदी धस झाले. कारण एव्हाना ३ तास झाले असतील. ते जे कोणी होत ते अगदी तसच, त्याच ठिकाणी कसलीही हालचाल न करता उभ होत. मला काही कळलेच नाही आणि माझी पावले नकळत त्या दिशेला वळली. मी जस जसे त्या दिशेने चालू लागलो तसे समोर जे कोणी होत ते हळु हळू माझ्या दिशेने पुढे सरकू लागले. मला पहायचं होत की नक्की कोण आहे. मी अगदी कठड्याजवळ येऊन उभा राहिलो. आमच्यात अवघ्या काही फुटांचे अंतर असेल. तसे हळु हळू समोर ची व्यक्ती ही त्या विंग च्याच कठड्याजवळ येऊन उभी राहिली आणि माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला. 

ती एक बाई होती. चेहरा नीट दिसत नव्हता कारण लांबसडक केस तिच्या चेहऱ्यावर पसरले होते. थोड्या फार उजेडात मी नीट पाहिले तेव्हा कळले की तिच्या अंगावर बऱ्याच जखमा आहेत. त्या केसांमधून फक्त तिचा एक रक्तालळलेला डोळा दिसला आणि ते भयाण दृश्य पाहून माझे हात पाय थर थर कापू लागले. भावाला हाक मारायचा खूप प्रयत्न करत होतो पण माझ्या तोंडातून शब्द च फुटत नव्हता. तितक्यात कानावर एक वाक्य पडले ” ये माझ्या जवळ.. घाबरु नकोस..”. आतामात्र मी संपूर्ण ताकदीनिशी तिथून उलट फिरलो आणि भावाकडे धावत आलो. त्याला उठवून मी सांगू लागलो. माझी अवस्था पाहून त्याने मला विचारले की काय झालेय. मी काही न बोलता त्या दिशेला बोट दाखवले. भावाने तिथे पाहिले तसे ती बाई हळु हळू मागे सरकत अंधारात कुठे तरी दिसेनाशी झाली. आम्ही दोघेही घाबरून धावत खाली आलो. सगळे झोपले असल्यामुळे आम्ही कोणाला उठवले नाही. दोघेही हॉल मध्येच झोपलो. मला तर त्या रात्री झोपही लागली नाही. 

सकाळी उठून पाहिले काकू ला घडलेला सगळा प्रसंग सांगितला. त्यावर तिचे एक वाक्य ऐकून मी पुरता हादरलो. ती म्हणाली “तुला पण दिसली का..?” मी फक्त हो म्हणालो. तसे ती सांगू लागली.. त्या बाई ला तिच्या नवऱ्याने मारून तिथेच टाकले होते, आणि तो पळून गेला होता. त्या नंतर मात्र बिल्डिंग मधल्या बऱ्याच लोकांना दिसू लागली. ती तिथेच गच्ची वर दिसते आणि मदतीसाठी बोलावते. कधी कधी रात्री ओरडण्याचे आवाज येतात. काकू चे असे सगळे बोलणे ऐकून मी सुन्न च झालो होतो. त्या नंतर मी त्यांच्याकडे कधीच राहायला जास्त जात नाही. 

Leave a Reply