अनुभव – लाईक कालसेकर

ही घटना साधारण 14-15 वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा मी रत्नागिरी कोकण पट्ट्यात उक्षी या गावात राहायचो. माझे शिक्षण मराठी शाळेतच झाले. रोज शाळेतून घरी आल्यावर सोहेल नावाच्या मित्राच्या घरी खेळायला जायचो. सुट्टी असली की मी पूर्ण दिवस त्याच्याच घरी असायचो. त्याच्या घरी त्याचा मामा हैदर ही असायचा. खूप हुशार होता, पण इलेक्ट्रिकल इंजिनियर असूनही नोकरी न मिळाल्यामुळे बेकार होता. नेहमी काही न काही करत राहायचा. इथे तिथे फिरून एखादी इलेक्ट्रिक वस्तू आणायचा आणि नव-नवीन प्रयोग करून काही तरी छान बनवत राहायचा.

रोज रात्री 9 ला तो नमाज पडण्यासाठी मस्जिद मध्ये जात असे. त्या दिवशी ही तो न चुकता मस्जिद मध्ये गेला. नमाज पडून झाल्यावर तिथेच थोडा वेळ थांबला. आपण हुशार असूनही आपल्याला नोकरी मिळत नाही याचा विचार करत होता. नकळतपणे त्याचे लक्ष समोरच्या एक कपाटातल्या लाल पुस्तकावर गेले. कोणालाही न विचारता ते पुस्तक घेऊन तो घरी परतला. त्याने पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि त्यात इतका गढून गेला की कधी मध्यरात्र उलटली हे त्याला कळलंच नाही. त्या पुस्तकात चित्र-विचित्र गोष्टी लिहिल्या होत्या. त्यात लिहिले होते की “जो कोणी हे पुस्तक वाचेल आणि या मध्ये लिहिलेल्या प्रमाणे करेल त्याचे संपूर्ण आयुष्य बदलेल. जिन्न त्याचे गुलाम बनतील..” जिन्न म्हणजे एक अशी शक्ती जी कोणत्याही मानवाला दिसत नाही, ती अदृश्य स्वरूपात वावरते. फक्त त्याच व्यक्तीला दिसते जिची ती गुलाम आहे. ती शक्ती काहीही करू शकते पण मृत्युला थांबवू शकत नाही.

तो हे वाचत होता आणि पुस्तकाचे प्रत्येक पान पलटताना त्याच्या अंगावर शहारा येत होता.  पुस्तकातल्या सुचनेत लिहिले होते की रात्री 1 वाजता मस्जिदीच्या मध्यभागी जाऊन एक वर्तुळ काढून त्यात बसायचे आणि या पुस्तकातील मंत्र जोरात वाचावे. मंत्र वाचताना काहीही झाले तरी मध्ये अजिबात थांबायचे नाही. जर थांबलात तर त्या व्यक्तीचे आयुष्य पूर्णपणे बरबाद होईल किंवा त्याला जागच्या जागीच मृत्यू येईल. 

हैदर ने पुस्तकात वाचल्याप्रमाणे करायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी नमाज पडून झाल्यावर तो तिथेच थांबला. तो कुठे आहे, काय करणार आहे याबद्दल घरच्यांना ही त्याने काहीच कल्पना दिली नव्हती. ठरल्याप्रमाणे रात्री एक वर्तुळ काढून त्यात ते पुस्तक घेऊन बसला आणि जोरात मंत्र वाचायला सुरुवात केली. इतक्या रात्री त्याच्याशिवाय तिथे कोणीही नव्हते. त्याचे जोरात मंत्र उच्चारणे चालू झाले तसे त्याच्या आजूबाजूचे वातावरण बदलू लागले. त्याला त्याच्या डोळ्यासमोर आपल्या आई वडील भाऊ बहिणीवर अत्याचार होताना दिसू लागले. काही नराधम त्यांना मारून त्यांचे हाल करत होते. ते दृश्य अतिशय भयानक आणि हृदय पिळवटून टाकणारे होते कारण एक एक करून संपूर्ण कुटुंबीयांचा मृत्यू डोळ्यासमोर होत असताना तो पाहत होता. त्यांच्या वेदनेनेने ऐकू येणाऱ्या कर्णकर्कश्य किंचाळ्या ऐकून तो प्रचंड घाबरला. त्याने मंत्र वाचणे थांबवले आणि तो ढसा ढसा रडू लागला. पुढच्या क्षणी त्याच्या आजूबाजूचे वातावरण पूर्वव्रत झाले तसे त्याने उठून घराकडे धाव घेतली. तो रडत होता आणि त्याचा जीव अगदी कंठाशी आला होता तरीही तो धावत च राहिला. 

इथे घरी त्याला शोधण्यासाठी सगळ्यांची धावपळ सुरू होती. तो कसाबसा घरी पोहोचला. त्याला सगळे विचारात होते की तू कुठे होतास, काय झालं? पण तो मात्र काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने बोलण्यासाठी तोंड उघडले तशी त्याची शुद्ध हरपली आणि तो जागच्या जागीच बेशुद्ध पडला. त्याला भयंकर ताप भरला होता. घरच्यांनी डॉक्टर ला बोलवून त्याच्यावर उपचार केले. तब्बल एक दिवसानंतर त्याला शुद्ध आली. पण त्याच्या तब्येतीत कणभर ही सुधारणा नव्हती. त्याने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना कळले होते की हैदर ने नको ते संकट स्वतःहून आपल्यावर ओढवून घेतले आहे. आणि आता यातून त्याची सुटका कधीच होणार नाही. 

दिवस उलटत होते तशी त्याची प्रकृती ढासळत जात होती. तो नेहमी घाबरलेल्या अवस्थेत असायचा. कोणी त्याच्याशी बोलायला गेले की त्याला कंप सुटून घाम यायचा, तो घाबरून थरथरायला लागायचा. कित्येक दरगाह, बाबा केले तेव्हा कुठे त्या शक्ती पासून हैदर ला वाचवता आले. तो आजही जिवंत आहे पण पूर्णपणे मनोबल गमावून बसला आहे. त्याला कोणत्याही भावना नाहीत, सुख दुःख काहीच जाणवत नाही. सगळीकडे भटकत फिरत असतो. कोणाचेही ऐकत नाही, फक्त पायी फिरत राहतो.

काही महिन्यांपूर्वी आम्ही मित्राच्या लग्नासाठी गावी गेलो होतो. तेव्हा माझा मित्र सोहेल ने अचानक गाडी थांबवायला संगीतली आणि म्हणाला की “माझा मामा”. मी त्याला ओळखलेच नाही, पण त्याने आम्हा सगळ्याना एका क्षणात नावानिशी ओळखले. त्याची अवस्था पाहून खूप वाईट वाटले. एका हुशार मुलाचे आयुष्य एका वेडापाई बरबाद झाले. आजही कधी सोहेल चा फोन येतो तेव्हा त्याचा विषय निघतो आणि त्या वाईट आठवणी जाग्या होतात…

Leave a Reply