अनुभव – सम्राट गोरे

नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या होत्या. दर वर्षी उन्हाळ्यातच माझ्या आईच्या गावची जत्रा असायची. आईच गाव एक छोटेसे खेडे गाव आहे. सुट्ट्या लागल्या की मामा सोबत त्याच्या गाडीने आम्ही गावी जायचो. दर वर्षी आमचे हे ठरलेले असायचे. अगदी न चुकता. त्या वर्षी ही आम्ही रात्री जेवण वैगरे आटोपले आणि ९.३० च्या दरम्यान प्रवास सुरू केला. आम्ही नेहमी रात्रीच निघायचो कारण रहदारी जास्त नसते आणि उन्हाचा त्रास ही अगदी कमी होतो. आणि तस बघायला गेले तर रात्रीच्या प्रवासाची मजा निराळीच असते. मामा कडे ७ सिटर मोठी गाडी होती. माझा मामा, मामी त्यांच्या दोन मुली. आणि माझे कुटुंब माझे आई वडील आणि माझी छोटी बहिण. असे सगळे आम्ही गाडीत होतो. शहराचा परिसर मागे पडला आणि तासा भारत आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. प्रवास खूप लांबचा नव्हता. जवळपास ४-५ तासांचा असेल त्यामुळे मध्ये कुठे थांबण्याचा प्रश्न नव्हता. दोन अडीच च्या सुमारास आम्ही मुख्य रस्ता सोडून गावाच्या रस्त्याला लागलो. तिथून गाव जवळपास १०-१२ किलोमिटर वर होते. माझा मामा गाडी चालवत होता आणि त्याला सोबत म्हणून मी त्याच्या सोबत गप्पा करत होतो. नेमकी वेळ पाहिली नव्हती पण एव्हाना रात्री चे ३ वाजत आले असावे. काही अंतर पार केल्या नंतर मामा ने गाडी थांबवली कारण पुढे रस्त्याचे काम चालू आहे असे वाटले. पत्र्याचे डांबरी पिंप वाटेतच असल्यामुळे गाडी तिथून काढता येणार नव्हती.

त्यात इतक्या रात्री कोणी कामगार असणे शक्य नव्हते. खास करून तिथे शेतातून जाणारा कोणताही तात्पुरता रस्ता बनवला नव्हता, ना दुसऱ्या रस्त्याकडे जाण्यासाठी एखादा फलक लावला होता. आता इथून पुढे जायचे कसे हाच विचार करत असताना एका दुचाकी चा आवाज कानावर पडला. मी मागे वळून पाहिले तर एक व्यक्ती दुचाकी वरून येताना दिसला. तो जसा आमच्या जवळ आला तसे माझ्या मामा ने त्याला विचारले की पुढे रस्त्याचे काम काढले आहे तर दुसरा पर्यायी रस्ता आहे का, तसा एखादा फलक ही दिसत नाहीये. त्यावर तो माणूस हसतच म्हणाला की फलक कुठे तरी पडला असेल, चला मी तुम्हाला रस्ता दाखवतो. आमच्या कडे दुसरा मार्ग नसल्याने मामाने त्याच्या सोबत जाण्याचे ठरवले. मामा त्या माणसाच्या दुचाकी मागे गाडी घेऊ लागला. त्याने त्या रस्त्यापासून आतल्या भागात असलेल्या एका पाय वाटेवर गाडी घेतली. फोर व्हीलर जेमतेम जाईल इतकीच वाट होती ती. त्यातही अधून मधून बाजूची खुरटी झाडी चिरडत आमची गाडी पुढे जाऊ लागली. साधारण 1 किलोमीटर आलो असू. माझे आणि मामा चे लक्ष ही समोरच होते. आणि तेव्हा जे काही घडले ते कल्पना शक्तीच्या पलीकडचे होते. आमच्या गाडीची हेडलाईट त्या दुचाकी वर पडत होती. पण बघता बघता आमच्या डोळ्यांदेखत ती दुचाकी आणि तो माणुस दिसेनासा झाला. आमच्या समोरून अक्षरशः तो अंधारात कुठे तरी गुडूप होऊन गेला. मामा ने घाबरून करकचून ब्रेक मारला. आणि एक जीवघेणी शांतता पसरली.

मी चौफेर नजर फिरवली आणि जाणवले की तो परिसर निर्मनुष्य आहे. कुठे या माणसाच्या नादी लागून इथे आलो असे वाटले. पण तितक्यात गाडीच्या मागच्या काचेतून लक्ष गेलं. टेल लाईट च्या लालसर प्रकाशात जाणवले की रस्त्याच्या बाजूला एक विहीर आहे. त्यामुळे मी अजून निरखून पाहू लागलो. पडकी विहीर वाटत होती कारण त्यावर झाडी वाढली होती म्हणजे ती वापरत असेल असे मुळीच वाटत नव्हतं. अचानक मला जाणवलं की त्या विहिरीवर कोणी तरी बसलय. एक काळसर आकृती. अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. भीती ने काळीज जोर जोरात धड धडू लागले. मला कळून चुकले की हा काही वेगळाच प्रकार आहे. मी पटकन माझ्या मामाला गाडी तेथून काढायला सांगितली. त्याला ही माझ्या हाव भावावरून कळले म्हणून त्याने जास्त काही न विचारता पटकन गाडी काढली. काही अंतर पार केल्यावर आम्हाला एक फलक दिसला, त्यावर आमच्या गावचे नाव दिसले आणि आम्ही त्या रस्त्याला लागलो.  पुढच्या वीस मीनटात आमच्या गावात पोहचलो. दुसऱ्या दिवशी घरी चर्चा सुरू होती तेव्हा चुलत मामा म्हणाला की त्या रस्त्यावर चकवा लागतो आणि त्यात काल अमावस्या होती. तुम्ही त्या भागातून वेळेत निघालात म्हणून सुटलात नाही तर काही अनर्थ नक्कीच झाला असता..

Leave a Reply