गोष्ट जवळपास ३ वर्षांपूर्वीची आहे. इंजिनियरिंग ची चार वर्ष कशी संपली काही कळलेच नाही. आमच्या फेअरवेल चा दिवस आला होता. दिवसा कॉलेज मध्ये फंक्शन होत. त्यामुळे खूप धमाल केली. पुन्हा कॉलेज चे दिवस येणार नाहीत म्हणून कुठेतरी थोडस वाईट ही वाटत होत. संपूर्ण क्लास होता एकत्र. सगळे सुरळीत पार पडले. रात्री आमच्या ग्रुप ची वेगळी फेअरवेल पार्टी ठरली होती. माझा ग्रुप खूप मोठा होता, जवळपास १६ जणांचा. त्यामुळे आम्ही एक बंगला आधीच बुक करून ठेवला होता. कॉलेज मध्ये फंक्शन आटोपून घरी गेलो. पण कधी एकदा आपल्या ग्रुप ला भेटतो असे झाले होते. कारण पुन्हा असा योग लवकर येईल की नाही हे माहीत नव्हत. रात्री ८ ला त्या बंगल्यावर जमायचे असा बेत आखला होता. घरा पासून तो बंगला तसा लांब असला तरी मला काही काळजी नव्हती कारण मी माझी बाईक घेऊन जाणार होतो. आणि माझे इतर मित्र ही त्यांची बाईक, फोर व्हीलर वैगरे घेऊन येणार होते. संध्याकाळी जरा लवकरच मी निघालो आणि ८ च्या सुमारास बंगल्यावर पोहोचलो. तो बंगला अगदी समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ होता होता. त्यामुळे अंधार असला आणि काही दिसत जरी नसले तरीही समुद्राच्या लाटांचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता. रात्री सगळ्यांनी खूप मजा केली. गाणी लाऊन नाचलो, गेम्स खेळलो. बार्बेक्यू पार्टी, ड्रिंक्स वैगरे अगदी जोमात चालू होत.

एंजॉय करता करता कधी रात्रीचे अडीच वाजले काही कळलेच नाही. 

एव्हाना सगळे बरेच थकले होते आणि वेळ पाहता हळु हळू एक एक जण आत झोपायला जाऊ लागला. पण आम्हा ६ जणांना म्हणजे मी, सौरभ, साहिल, आशिष, जतिन आणि अक्षय ला काही केल्या झोप येत नव्हती. उशीर झाल्यामुळे वॉचमन ने येऊन आम्हाला गाणी बंद करायची विनंती केली. कारण आजू बाजूला ही तसेच बंगले, घरे होती. त्यामुळे मग आम्ही ६ जणांनी समुद्र किनाऱ्यावर जायचे ठरवले. रात्री ३ वाजता आम्ही बाईक घेऊन समुद्राच्या रस्त्याला लागलो. अवघ्या काही मिनिटात आम्ही तिथे पोहोचलो. बाईक थोड्या अलीकडे एका मोठ्या झाडाखाली पार्क केल्या. चालत थोडे आत गेलो आणि एका मोठ्या खडकावर बसून समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत बसलो. त्या शांत वातावरणात लाटांचा आवाज एक वेगळाच दिलासा देत होता. अक्षय साहीलच्या मांडीवर डोकं ठेऊन पडला होता. तितक्यात साहिल ला मस्ती सुचली. त्याने खिशातून लायटर काढून पेटवले आणि हळूच अक्षय च्या कानाजवळ नेले. त्याला चटका लागता लागता राहिला म्हणून साहिल ला बजावत म्हणाला ” मला चटका लागला असता, असे नको करुस परत..” पण तरीही साहिल ला मस्ती खूप होती म्हणून त्याने पुन्हा लायटर पेटवून त्याच्या कानाजवळ नेले. तसे अक्षय ला काय झाले माहीत नाही तो उठला आणि मोठ्याने ओरडू लागला. साहिल ला शिव्या देऊ लागला. आम्हाला काही कळलंच नाही इतकं काय झालं. कारण अक्षय शांत स्वभावाचा होता, कोणाच्या अध्यात मध्यात नाही. कधी कोणाशी वरच्या आवाजात बोलणे नाही.

त्याचे असे रूप आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो. आमच्यातल्या एक दोघांनी त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही केल्या शांत होईना. आता तर तो साहिल लाच नाही तर आम्हा सगळ्यांना शिव्या देऊ लागला, सर्वांवर ओरडू लागला. तो माझ्या सोबत बंगल्यावरून इथे समुद्रावर बाईक ने आला होता त्यामुळे मला जोरात ओरडून म्हणाला ” तू येतोय का आता..? मला नाही थांबायचे इथे..” तो मला तिथून जायला सांगत होता. मी त्याला थोडावेळ थांबायला सांगितले तर तो अजुन चिडला आणि सांगू लागला ” तुला नाय यायचे ना,  मला चावी दे , मी जातो.. ” मला काही सुचत नव्हत. मी उठून बाईक वर बसलो तसा तो माझ्या मागे येऊन बसला. आम्ही दोघं बंगल्याकडे निघालो. अंतर २-३ मिनिटांचे होते पण तेव्हा ही त्याचे ओरडणे, शिव्या देणे थांबतच नव्हते. मला खूप विचित्र वाटू लागले म्हणून मी बाईक दुसऱ्या एका ठिकाणी नेली. तिथे नेऊन बाईक थांबवली आणि माझ्या कडची पाण्याची बाटली देत म्हणालो ” शांत हो.. हे पाणी पी.. आणि चीड चीड जरा कमी कर.. काय झालं इतकं चिडायला?” पण त्याचे बडबडणे आता काही वेगळेच वाटू लागले. त्याला काही विचारले तर त्याचे उत्तर ही तो देत नव्हता. शेवटी मी त्याला बंगल्यावर घेऊन जाऊ लागलो. जाताना वाटेत मित्र भेटले. त्यात साहिल पुन्हा दिसला तसे अक्षय अजुन संतापला. या वेळी काही तरी अभद्र बोलू लागला जे ऐकून आम्ही सगळेच घाबरलो. मी लगेच त्याला बंगल्यावर नेले. तिथे गेल्यावर ती घरी जायचा हट्ट करू लागला. 

येताना ताच्या फोर व्हीलर मधून ३-४ मित्रांसोबत आला होता. एव्हाना ते गाढ झोपून गेले होते. मी त्यांना कसे तरी उठवले आणि अक्षय सोबत घरी जायला सांगितले. अक्षय आता खूप जोरात ओरडत होता, विव्हळत होता. आणि आजूबाजूच्या बंगल्यातून लोक बाहेर येऊन पाहू लागली की नक्की काय झालंय. ते ही खूप घाबरले होते म्हणून जास्त काही न विचारता त्यांनी लगेच गाडी काढली आणि त्याला कसे तरी गाडीत बसवून निघाले. आम्ही कोणीच कोणाशी काही बोलत नव्हतो. फक्त सुन्न नजरेने एकमेकांकडे पाहत होतो. डोळ्यांवर प्रचंड झोप होती म्हणून सरळ आत झोपायला गेलो. तितक्यात सौरभ चा फोन वाजला. अक्षय ला घेऊन जे ३-४ जण घरी निघाले होते त्यांच्यापैकी एकाचा फोन आलेला, तो रडतच सांगत होता. त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यांना निघून जेमतेम १०-१५ मिनिट झाले असतील आणि असे काही घडेल याची कोणालाच कल्पना नव्हती. ती बातमी ऐकून आमची झोप उडाली. पटापट बाईक काढल्या आणि त्या रस्त्याने जोरात निघालो. एकाचे ओठ फुटले होते तर दुसऱ्याला हाताला जबर मुका मार लागला होता. त्यांच्यापैकी एकाचा म्हणजे अवधूत चा तर हात मोडला होता. पण अक्षय.. गेल्या अर्ध्या पाऊण तासा पासून आरडा ओरडा करून शिव्या देणारा अक्षय मात्र अक्षरशः शांत झाला होता. आम्ही त्यांना गाडीतून बाहेर काढताना तो साहिल ला पकडुन रडू लागला. त्याला असेल पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं. नंतर पोलीस केस झाली, हॉस्पिटल झाले. आम्हाला ती रात्री कशी निघून गेली कळलेच नाही. 

त्या रात्री अक्षय ला काय झालं होत त्याचा उलगडा आम्हाला जवळपास २ वर्षांनी झाला. एकदाच असाच विषय निघाला होता तेव्हा मी ही गोष्ट माझा मित्राला सांगितली. तेव्हा त्या जागे बद्दल मला मित्राने जे सांगितले ते ऐकून मला धक्काच बसला. त्याने मला एक प्रश्न विचारला ” तुम्ही ज्या समुद्र किनारी रात्री बसायला गेला होतात, तिथे एक मोठे वडाचे झाड बघितले असेल ना..? ” मी होकारार्थी मान हलवली कारण आम्ही आमच्या बाईक त्याच झाडाजवळ पार्क केल्या होत्या. त्यावर तो पुढे सांगू लागला. ” त्या झाडाजवळ च्या भागात एका वाईट शक्तीचा वास आहे असे म्हणतात, जी झपाटाते. तुम्ही चुकीच्या वेळी तिथे गेलात आणि म्हणून तुझ्या मित्राला झपाटले. त्यांचं वाईट केलं आणि मगच त्याला सोडलं. नाही तर अश्या शक्ती सहजा सहजी कोणाला सोडत नाहीत.. त्याचे असे बोलणं ऐकल्यावर मी कानाला खडा लावला आणि असे रात्री अपरात्री अनोळखी जागेवर जाण्याचे धाडस केले नाही. 

Leave a Reply