लेखिका – स्नेहा बस्तोडकर वाणी

“चल पटकन मूवी स्टार्ट होईल.”दूर्वा ओमकार चा हात ओढत म्हणाली. 

“अगं हो पण तू जरा सावकाश चाल. मघाशी त्या स्कॅनिंग मशीन मध्ये कशी धडपड लीस. आपण मुळात इतक्या लेट नाईट शोला यायलाच नको होत. गर्भसंस्कार पण काही असतं की नाही. भुताचे पिक्चर बघण्याचे कसले डोहाळे. ह्या आठवड्याची ड्यूडेट आहे आपण फक्त डॉक्टर विझीटसाठीच घरातून बाहेर पडायला हवं”

“तू खूप panic होतोस रे ओंकार काही नाही होत.. बघ बाळ सुद्धा एक्साईट होऊन पोटात उड्या मारतय” ओमकार ची गंमत करत दुर्वा हसत हसत म्हणाली.

ओमकार आणि दूर्वा यांचा सुखाचा संसार सुरू होता. लग्नाच्या पाच वर्षांनंतर त्यांच्या घरात पाळणा हलणार होता. ते दोघ आणि कुटुंबातले सर्वच खूप आनंदात होते. 

“चल मी पॉपकॉर्न घेऊन येतो” इंटरवल होताच ओंकार सीट वरून उठत म्हणाला.

“हो मी पण वॉशरूमला जाऊन येते. बसल्या बसल्या पायांना मुंग्या आल्यात”

पॉपकॉर्न घेऊन परत आल्यानंतरही ओंकारला दूर्वा काही जागेवर परत आलेली दिसली नाही. त्याने थोडा वेळ वाट पाहून तिला कॉल लावला.

“अगं कुठे आहेस? सगळे ओके आहे ना?”

“अरे हो. तिथे थोडं गुदमरायला होत होतं. म्हणून मी चालत परत घरी जाते य”

“अग तू मूर्ख आहेस का? इतक्या रात्री एकटी ते ही मला न सांगता? या अश्या अवस्थेत.. काही कळतंय का तुला..? जिथे असशिल तिथेच थांब मी येतोय”

“तू परत panic व्हायला लागलास. मी घराजवळ पोहोचली सुद्धा. आपल्या बिल्डिंगच्या मागेच उभी राहून बोलतेय. तू काळजी नको करू मूवी आटोपली की घरी ये”

“मरू दे ती मूवी.. मी येतोय आत्ताच..” एव्हाना तो बाहेर पडला होता. 

दुर्वाने ओंकारला काळजी नको करू असे म्हटले तर खरे पण तिला खूपच अस्वस्थ वाटत होतं. ती तिथेच एका झाडाखाली जरा वेळ थांबली. समोरच्या स्ट्रीट लाईट कडे पाहत ती दीर्घ श्वास घेऊ लागली. अचानक तो लाईट लूक लुकू लागला. वातावरण एकदमच पालटले. डिसेंबरचा महिना असूनही तिला दरदरून घाम फुटायला लागला. वाऱ्याची एक थंडगार झुळूक आली. त्या झाडाची सुकलेली पाने आणि जमिनीवरची धूळ, माती त्या वाऱ्यामध्ये गोल होत वर उडू लागली. या सगळ्यात दूर्वाला अचानक चक्कर येऊ लागली. तो स्ट्रीट लाईट लुकलुकून जोराचा आवाज करत फुटला.. आणि तिथे मिट्ट काळोख पसरला. दूर्वा एक हात पोटावर आणि दुसऱ्या हाताने झाडाला धरून स्वतःला कशीबशी सावरत उभी राहिली. तेवढ्यात दुरून लालसर प्रकाश येत असल्या सारखा भासू लागला. त्या प्रकाशाकडे पाहता पाहता ती अचानक भोवळ येऊन जमिनीवर कोसळली.

डोळे उघडले तेव्हा ती हॉस्पिटलच्या रूम मध्ये होती. लहान बाळाच्या रडायचा आवाज तिच्या कानावर पडला. आवाजाच्या दिशेने पाहिले तर तिच्या उजव्या बाजूला तिची आई हातात बाळाला घेऊन उभी होती. बाळाला सुखरूप पाहून तिच्या गालावरून एक छोटासा आनंदाश्रू ओघळला. तिच्या कपाळावरून हात फिरवत ओंकार म्हणाला “कसं वाटतंय आता?”

तिन्ही नुसती मान डोलावून मंद स्मितहास्य केले.

“वेडी मुलगी. पाच मिनिटात घरी पोहोचणार होतीस कुठे पोहोचलो बघ”

“बंद करा आता रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर एकट हिंडण. आई बाबा झाला आहात आता जबाबदार पण व्हा” दुर्वाची आई म्हणाली.

“हो न आई सगळं ठीक आहे ना आता मग सोड ते सगळं. पण बाळ एवढं रडतं का आहे?”

“आता याची सवय करून घ्या. काहीच दिवसात बाळाच्या रडण्यावरून त्याला काय होतंय ते समजायला लागेल तुला”

बघता बघता ते काही दिवस काही महिन्यात बदलले पण बाळाचं उठ सूट रडण्याचे कारण काही दुर्वाला समजत नव्हतं. सदानकदा रडतच असायचं. काही नवं खेळणं बघून, बाहेर फेरफटका मारायला नेऊन कुठल्याच वस्तूंनी बाळ आनंदी व्हायचं नाही. त्यांनी खूपदा डॉक्टरचाही सल्ला घेऊन पाहिला पण डॉक्टरांनी त्यांना “बाळ वर्षाच होईल तोवर सगळं नीट होईल” असेच आश्वासन दिले.आणि दोघांनीही डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे बघू असा विचार केला. बाळ वर्षाच होऊ लागलं तस त्याच रडणं बरंच कमी झालं होतं पण तरीही बाळ कधीच हसताना दिसायचं नाही, आनंदी दिसायचं नाही. 

असं म्हणतात की घरात लहान बाळ आलं की सारं वातावरण खुलून उठतं, आनंदी होतं पण ओमकार आणि दुर्वा च्या आयुष्यात काही वेगळेच घडत होतं. एका मागोमाग एक त्यांच्या घरात वाईट घटना घडू लागल्या. बाळाच्या बारशाच्या दिवशी मोठा हार्ट अटॅक येऊन दुर्वाची आई वारली. काहीच काळात ओंकारचे बाबा वारले. बारशाचा सागर संगीत सोहळा न करता त्यांनी घरातल्या घरातच विधी आटपून बाळाचे नाव प्रथम असे ठेवले. प्रथमच्या पहिल्या वाढदिवसाच्या काहीच दिवसांपूर्वी ले ऑफ मध्ये ओमकारची नोकरी गेली. त्यांच्यावर येणारी एका मागोमाग एक दुःख काही संपायचं नावच घेत नव्हती. 

“आयुष्यात मधकाहीच नीट चाललं नाहीये रे ओंकार. गेल्या वर्षभरात किती साऱ्या वाईट गोष्टी आपल्याबरोबर घडल्या.” “मला तर प्रथमचीही काळजी वाटते. त्याचे कुठलेच milestones अचीव होत नाहीयेत. ऐव्हा ना तो त्याच्या वयाच्या इतर लहान मुलांसारखा घरात धुडू धुडू धावायला हवा होता पण तो अजून रांगत ही नाहीये.” “ओमकार..  अरे मी गेल्या काही दिवसांपासून विचार करत होती की तुला सांगते पण मग मला वाटलं की तू माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. मला ना गेल्या वर्षभरात अनेकदा एक विचित्र स्वप्न येतं. आपला प्रथम बेडवर झोपलेला असतो आणि रूमच्या…” दूर्वाच वाक्य संपण्याच्या आत त्यांना त्यांच्या दाराबाहेर एका छोट्या कुत्र्याच्या पिल्लाचा रडायचा आवाज आला. त्यांनी दार उघडून त्याला घरात घेतले. प्रथम त्याला पाहून पहिल्यांदा खुदखुदून हसला. आणि त्याला हसताना पाहून ओमकार आणि दुर्वालाही खूप आनंद झाला. त्यांनी रात्री त्या पिल्लाला घरातच झोपू दिले. प्रथम लाही त्याच्या रूममध्ये झोपवून ते दोघे त्यांच्या बेडरूम मध्ये झोपायला गेले.

“अगं तू तुझं स्वप्न सांगत होतीस ना तेव्हा”

“जाऊदे त्या वाईट वस्तू आजचा दिवस थोडा छान जातो असं वाटतंय तो तसाच असू देऊयात”

एवढ्यात त्यांना एखादी जड वस्तू पडायचा आवाज आला आणि ते पिल्लू केविलवाण ओरडलं. ते दोघेही बाहेरच्या खोलीत पळत पळत गेले पण तिथले दृश्य बघून क्षणभर दोघांनाही काही समजेना असे झाले. ते पिल्लू दाराजवळ त्याला जिथे ठेवले होते तिथेच होते पण त्याच्यावर त्यांचं shoe rack पडलं होतं. काही कळेपर्यंत ते पिल्लू त्याच ठिकाणी कळवळून मेल. पण त्याहून धक्कादायक गोष्ट काही वेगळीच होती. त्या पिल्लाच्या बाजूला जमिनीवर प्रथम बसला होता आणि त्या पिल्लाच्या मृत शरीराला बघून खुदखुदून हसत होता. अजून रांगता ही न येणारा प्रथम त्याच्या बेडरूम मधून बाहेर येऊन इथे हॉलमध्ये कसा आला हे त्यांना उमगलच नाही. 

गेले काही महिने प्रथम रोज रात्री तीन वाजता उठून जोरजोरात रडायचा पण त्या रात्री तो निवांत झोपला.

त्या पुढचे काही दिवस त्यांच आयुष्य थोडं सुरळीत सुरू झालं. ओंकारला पुन्हा नोकरी लागली आणि प्रथमही काहीच दिवस रांगुन आता चालूही लागला होता. पण प्रथमचे रात्री तीन वाजता उठून रडायचे मात्र परत सुरू झाले होते.

एके दिवशी संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर ओंकार किचनमध्ये दुर्वा सोबत चहा पीत बसला होता. एवढ्यात त्यांना बाहेरच्या दाराचे लॉक उघडायचा आवाज आला. दोघांनीही बाहेर धावत जाऊन पाहिलं तर तिथे बसलेला प्रथम तिथे नव्हता. आणि दार उघड होतं. ते पटकन त्यांच्या समोरच्या घराचं दार उघडं पाहत तिथे गेले.

“वहिनी प्रथम इथे आला का?” दुर्वाने घरभर नजर फिरवत काळजीने विचारले.

“.. माहित नाही मी गॅलरीमध्ये होते”

एवढ्यात स्वयंपाक घरात कसला सा आवाज आला. ते तिघही पटकन स्वयंपाक घरात पळाले आणि समोरचे दृश्य पाहून दूर्वाला मळमळून उलटीच झाली.

समोर प्रथम पिशवीत ठेवलेलं कच्चे मटण खात बसला होता. ओमकारने त्याला पटकन उचलून स्वतःच्या घरी नेलं पण तो जोरजोरात आदळ आपट करून रडू लागला.

त्या रात्री त्यांनी त्याला कसबस करून शांत करून झोपवल.

“हे सगळं काय आहे ओमकार. आपल्या प्रथम वर कोणी चेटूक वगैरे केलं आहे का?”

“दूर्वा मी खूप दिवसांपासून विचार करत होतो तुला सांगू की नाही. प्रथम चा जन्म झाला तेव्हापासून मला अनेकदा किंवा जवळजवळ रोजच एक स्वप्न येत. की रात्री प्रथम त्याच्या खोलीत झोपला आहे आणि खोलीच्या कोपऱ्यात अंधारात एक काळे कपडे…”

” काळे कपडे घातलेली बाई त्याच्याकडे बघत उभी आहे” दूर्वा त्याचं वाक्य पूर्ण करत म्हणाली.

“मी हेच स्वप्न काही महिन्या आधी तुला सांगायचा प्रयत्न करत होते”

“हे एकच स्वप्न आपल्या दोघांना येत आहे याचाच अर्थ की हे स्वप्न नाही हे काही वेगळंच आहे. मला प्रथम ची काळजी वाटते आहे”

“आपण त्याला आपल्या सोबत ह्याच खोलीत झोपवायला हवं.”असं म्हणून दोघेही रात्रीच्या शांततेत उठून दबक्या पावलांनी प्रथमच्या खोली जवळ गेले.

हळूच दार उघडून पाहिले तर प्रथम त्याच्या बेडवर बसलेला होता आणि रूमच्या दुसऱ्या कोपऱ्याकडे पाहून हळू आवाजात हसत होता. लहान मुलांना कधी कधी अगदीच पडदा हलताना पाहून सुद्धा हसू येऊ शकतं पण त्याच्या चेहऱ्यावरचे हाव भाव एखाद्या लहान मुलासारखे नव्हते. 

ओमकार ने पटकन रूमच्या आत जाऊन त्या कोपऱ्यात पाहिले तर तिथे खरंच कोणी तरी उभ होत. एक काळपट आकृती.. तो दचकून दोन पावलं मागे झाला आणि त्यांनी रूमचा लाईट चालू केला तसे ती आकृती तिथून नाहीशी झाली. दुर्वाने पटकन आपल्या बाळाच्या काळजीने त्याच्याजवळ जाऊन त्याला उचलू पाहिल पण प्रथम ने अत्यंत ताकदीने तिला दूर लोटलं आणि ती मागे जाऊन भिंतीवर आपटली. ते पाहून त्यांनी विचित्र हास्य केलं ज्यात फक्त त्याचा नाही तर एक वेगळाच घोगरा आवाजही होता. ओंकार आणि दूर्वा दोघेही तो प्रकार पाहून जागच्या जागी स्थब्ध झाले होते. ती रात्र दोघांनी तशीच त्या खोलीत बसून काढली आणि प्रथमने तिथेच बसून त्या दोघांवर आपली नजर रोखून ठेवली होती.

सकाळ झाली तेव्हा समोरच्या घरातल्या वहिनी त्यांच्या इथे आल्या. बेल वाजल्यामुळे नाईलाजाने दुर्वा त्या खोलीतून निघून दार उघडायला गेली. भिंतीवर आपटल्यामुळे तिच्या पायाला इजा झाली होती त्यामुळे ती किंचित लंगडून चालत होती.

“सगळं बरं आहे ना दूर्वा. प्रथम बरा आहे ना”

“हो ठीक आहे सगळं” स्वतःचं रडू आवरत दुर्वाने म्हटले. पण प्रथमच नाव कानावर पडताच तिच्या पायाच्या जखमेतून रक्ताची ओघळ वाहू लागली. वहिनींची नजर त्यावर पडली

“तुझ्या गालांवरचे सुकलेल्या अश्रूंचे ओघळ आणि ही पायातून लागलेली रक्ताची धार काही वेगळेच सांगते आहे. तुला खरं सांगू तर मी एक सायकिक आहे. इतरांपेक्षा ह्या नकारात्मक शक्तींची मला पटकन जाणीव होते. घराच्या बाहेर ये मला तुला काही सांगायचे आहे”

दूर्वा ने सांगितल्याप्रमाणे पटकन घराबाहेर येऊन पाठीमागे दार बंद केलं. तिला असंही स्वतःसमोर दुसरा कुठलाच पर्याय दिसत नसल्याने ती कुठल्या ही उपाया साठी तयार होती.

“प्रथम वर कोणती तरी काळी सावली आहे. मला नेहमी त्याच्या अवती भोवती काळा ऑरा दिसतो. आणि हे काल च्या घटने च नाही आहे. मी त्याला पहिल्यांदा पहिल तेव्हा पासून हे असच आहे. पण ह्या वस्तूंवर कोणी पटकन विश्वास ठेवत नाही म्हणून मी समोरून कधी हे सांगायचा प्रयत्न नाही केला. पण काल जे घडलं ते काही साधे सूधे नव्हते.”

“वहिनी माझ्या बाळावर कोणी चेटूक केल आहे का?”

“नाही. हे त्याच्या पेक्षा भयंकर आहे. त्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या टाकून त्याला प्यायला दे आणि तो झोपला की आपल्या बिल्डिंगच्या मागच्या पिंपळाच्या झाडा जवळ त्याला घेऊन ये”

“अहो.. काय बोलताय वहिनी लहान बाळ आहे ते.. त्याला मी झोपेच्या गोळ्या कश्या….”

“लहान बाळ नाही आहे ते.. त्या शरीराला झोपवाव लागेल तेव्हा त्या काळ्या शक्ती ची ताकद सुप्त अवस्थेत असेल आणि तेव्हाच तुम्ही त्याला तिथं पर्यंत आणु शकाल”

वहिनींनी सांगितलेले सारेच आणि काल रात्रीपासून घडलेल्या साऱ्या घटना दुर्वाच्या विचारशक्तीच्या पलीकडल्या होत्या त्यामुळे तिने जास्ती कुठलाच विचार न करता त्यांनी सांगितल्याप्रमाणे केले.

“वहिनी तुम्ही आम्हाला इथे अशाप्रकारे का बोलावले आहे?”ओमकार ने विचारले

“हे सारे इथूनच सुरू झाले आहे. ह्या ठिकाणी अनेक वाईट शक्तींचा वास आहे. मी ह्या रस्त्यावरून येणे आवर्जून टाळते. इथून कधी यावेच लागले तर इथे आल्यानंतर मला माझ्या शरीरातला त्राण कोणी ओढून घेतल्यासारखा वाटतो. पण आज त्या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाहीये”

“एक मिनिट इथून सुरू झालंय म्हणजे?”

“मला नेमकं नाही सांगता येणार पण ह्या शक्तीचा उगम हेच ठिकाण आहे. दूर्वा प्रथम चा जन्म झाल्यानंतर ह्या ठिकाणाहून त्याला सोबत घेऊन येत असताना तुला काही विचित्र अनुभव आला आहे का. ज्याच्या नंतर अचानक त्याच्या वागण्यामध्ये काही फरक जाणवला असेल” हे सगळं सांगत सांगत वहिनींनी त्या झाडा जवळ प्रथम ला एका लाल कापडावर झोपवल आणि भोवती पिवळ्या राईचे वर्तुळ बनवले. स्वतः जवळ आणलेला अंगारा प्रथमच्या कपाळावर लावला. कपाळाला अंगाऱ्याचा स्पर्श होताच झोपेतच प्रथमचे पूर्ण शरीर शहारले. त्याचे शरीर सुप्त अवस्थेत असूनही त्याच्या आतून एक वेगळाच गुर्गुरण्याचा आवाज येऊ लागला. त्याची छाती जोर जोरात वर खाली होऊ लागली. त्याचे पोट ही आतल्या आत पिळवटले जाऊ लागले.

“वहिनी त्याला काय होतंय?” दूर्वा ने कळवळून विचारले

“तुला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दे त्या शिवाय मला त्याला बाहेर काढणं अवघड होईल”

“त्याचा जन्म नंतर नाही पण त्याचा जन्म झाला त्या रात्री मी ह्याच ठिकाणी येऊन बेशुद्ध पडली होते. त्या आधी मला खूप विचित्र अनुभव आले होते पण तेव्हा ह्याचा जन्म झाला नव्हता.”

“तेव्हाच तू आणि तुझ्या पोटात असलेला प्रथम दोघेही सगळ्यात संवेदनाक्षम होतात. हा साधा सुधा काळ्या जादूचा प्रकार नाहीये. आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडली वाईट ताकद आहे तुमच्या बाळाच्या शरीरात. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक चांगल्या ऊर्जेला ओढून हे स्वतःची ताकद वाढवत आलंय. ह्या शरीरात आता तुमच्या बाळाचा जीव बाकी ही आहे की नाही माहीत नाही” एवढं म्हणून त्यांनी ओमकार आणि दूर्वाच्या भोवती उदी चे वर्तुळ बनवले आणि त्यांना काही ही झाले तरी वर्तुळाच्या बाहेर न येण्याची ताकीद दिली.

प्रथमच्या शरीरातून येणारा तो अमानवी आवाज आता अजून तीव्र झाला होता. दिवसाची वेळ असूनही आभाळात मळभ भरून आल्याने फारच अंधारले होते. जोराचा वारा सुटू लागला होता.

ह्या साऱ्या कडे दुर्लक्ष करून वाहिनीने प्रथमच्या तळ पायावर आपला अंगठा ठेऊन मंत्रोपचार सुरू केला.अचानक प्रथम चे शरीर हळू हळू करता हवेत उडू लागले. ओमकार आणि दुर्वाला त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. वाहिनीने डोळे उघडुन पाहिले तर त्यांना काळे कपडे घातलेली एक जक्खड म्हातारी प्रथमच्या केसांना धरून त्या वर्तुळाच्या बाहेर ओढायचा प्रयत्न करत होती. आणि याच कारणामुळे त्याचे शरीर हवेत उडल्या सारखे भासत होते. त्यांनी प्रथम च्या तळ पायावरचा अंगठा न सरकवता दुसऱ्या हाताच्या मुठी मध्ये उदी भरून त्या बाईवर उडवली आणि ती लांब फेकली गेली. ह्याच बरोबर प्रथमच शरीर ही पुन्हा जमिनी वर आदळले. वाहिनीने मंत्रोपचार न थांबवता स्वतः जवळच्या लाल दोऱ्याने प्रथमच्या केसांभोवती गाठ मारली आणि त्या वरचे केस कापून टाकले. ते कापलेले केस त्यांनी त्या झाडा खाली खड्डा खोदून प्रथम ला झोपवलेल्या लाल कपड्यात गुंडाळून दाटून दिले. हे होता क्षणी ते मळभ ही अचानक नाहीसे झाले. वेगानी वाहणारा वारा ही क्षणार्धात थांबला. प्रथम चे दिसणे ही अचानक बदलले होते. एका वर्षाचे बाळ असूनही त्याचा डोळ्या खाली काळी वर्तुळ दिसू लागली आणि शरीर यष्टी ही अगदीच बारीक दिसू लागली.

“हे काय झालंय माझ्या बाळाला. हा असा का दिसतोय. प्रथम…प्रथम?” दूर्वा बेचैन होऊन हाका मारू लागली

” काळजी करू नकोस. त्याच्या जन्माच्या ही आधी पासून त्याचा शरीराला एका वाईट शक्तीनी काबीज केले होते. त्याचीच सर्वात जास्त ऊर्जा ओढून ती वाईट आत्मा जगत होती. काही काळ जाईल ह्याला पुन्हा व्यवस्थित व्हायला. त्याला आत्ता तुमचीच सगळ्यात जास्त गरज आहे. दूर्वा त्याला जवळ घे “

दूर्वा ने पळत येऊन त्याला आपल्या कुशीत घेतलं. प्रथम ने ही हळूच डोळे उघडले आणि एक छोटेसे स्मित हास्य केले पहिल्यांदा त्याने आपल्या तोंडून आई म्हंटल होत.. 

Leave a Reply