लेखक – विनीत गायकवाड

सुहास माझ्या जुन्या कंपनीतला सहकारी होता. एक दिवस कंपनीतली वीज गेली आणि सगळीकडे काम थांबले. बातमी अशी मिळाली की कुठेतरी खूप मोठा अपघात झाला होता आणि अख्ख्या परिसरामधल्या कंपनींना दोन दिवस वीज पुरवठा होणार नव्हता. मग दुसरं काही विशेष काम हातात नसल्यामुळे मी आणि माझे दहा बारा सहकारी दिवसभर कंपनीतच गप्पा मारत बसलो.

इकडतिकडच्या गप्पा चालू असतानाच कुणी तरी ‘भूत’ या विषयावर गोष्टी सांगायला सुरुवात केली आणि मग सगळ्यांनाच हुरूप आला. प्रत्येक जण आपण अनुभवलेल्या किंवा ऐकलेल्या भुताच्या गोष्टी सांगू लागला.

सगळ्यांचं बोलणं झाल्यावर सर्वजण सुहासकडे पाहू लागले. सुहासने काहीतरी आठवण्याचा प्रयत्न केल्यासारखे डोके खाजवले आणि नाकातोंडातून दम टाकत बोलू लागला.

“तुम्हाला माहित आहे ना मी मराठवाड्याचा आहे ते. आमचे मूळ गाव ही तिकडेच आहे. माझे वडील यांना पाच भाऊ आणि त्यामुळे गावातल्या वाड्याला ही पाच खोल्यांची रास. शेती सर्व भाऊ एकत्र करत होते पण वाटे मात्र पाच व्हायचे. मी लहान असताना वडील पुण्याला आले. इथं येताच त्यांनी धंदा टाकला आणि सगळे सुरळीत चालले म्हणून इथेच स्थानिक झाले. माझे वडिल तसे नेहमी गावाला जायचे पण मी सहावीला होतो जेव्हा गावाला पहिल्यांदा गेल्याचे मला आठवते. वडिलांनी त्यांच्या हिस्स्याची शेती काकांना करायला दिली आणि गावातल्या वाड्याचे काही काम निघाले होते म्हणून त्याच्यासाठी आई वडील गावाला आले आणि त्यांच्या सोबत मी पण आलो.

ठरल्याप्रमाणे माझे वडील भावंडात सर्वात लहान असल्यामुळे वाड्यातली शेवटची खोली त्यांचीच होती पण आम्ही गेलो तेव्हा तिकडे काही तरी काम चालू होते. ते काम काय आहे हे माझ्या नीट लक्षात आले नाही पण रोज सकाळी गडी माणसं येऊन खोलीच्या आत खोदकाम करायचे आणि दुपारनंतर खोली कुलुपाने बंद करून निघून जायचे.

तात्पुरतं आम्ही माझ्या सर्वात मोठ्या काकांच्या खोलीत डेरा मांडला होता. मी आणि माझे दोन चुलत भाऊ एकाच वयाचे होतो. आम्ही दिवसभर वाड्यात धिंगाणा घालायचो पण आम्हा सर्वांना वाड्याच्या शेवटच्या खोलीत जायची परवानगी नव्हती. तिथे काम चालू आहे आणि खोलीची भिंत पडेल अशी सक्त ताकीद दिल्यामुळे तिथे आमच्यापैकी कोणीच जात नव्हतं. कोणी मुद्दाम गेलंच तर आत मध्ये काम करणारे गडी माणसे जोरात त्याच्यावर खेकसायचे. माझ्या लक्षात असे आले की माझी आई आणि वाड्यातल्या इतर बायका ही त्या खोलीपाशी जात नव्हत्या. खोलीचं गूढ माझ्या मनात होतं पण आपलाच वाडा म्हटल्यावर आज नाही तर उद्या काम संपेल तेव्हा बघूच की.. असं वाटायचं. मग अशाच एका दुपारी आम्ही मुलं रानात फिरायला गेलो. बोलता बोलता माझा एक चुलत भाऊ म्हणाला की शेवटच्या खोलीतून कुणाचा तरी बोलण्याचा आवाज येतो म्हणूनच खोली बंद आहे आणि त्याच्याचमुळे तिकडे खोदकाम चालू आहे.

त्याच्या या बोलण्यावर माझा काही विश्वास बसेना. त्याने कधी ऐकले हे बोलणे हे विचारताच त्याचा चेहरा किंचितसा गंभीर झाला. तो सांगू लागला.. परवा रात्री मला तहान लागली होती म्हणून मी पाणी प्यायला उठलो होतो. त्या खोली जवळून जात असताना मला आवाज ऐकू येऊ लागला..  मी येऊ का..? ,मी येऊ का..?  आवाज ओळखीचा नव्हता आणि जेव्हा मला जाणवले की तो आवाज बंद खोलीच्या आतून येतोय तेव्हा मी काहीच उत्तर न देता तिथून धूम ठोकली. घाबरून मी आपल्या गोधडीत घुसून झोपून गेलो.. मला कळले नाही की मी झोपेत होतो म्हणून मला भास झाला की खरंच तो आवाज तिथून येत होता. पण जेव्हा काल रात्री मी उठलो तेव्हा मला पुन्हा तोच आवाज आला.. मी आता अगदी खात्री ने सांगू शकतो की त्या शेवटच्या खोलीत काही तरी गडबड आहे. त्याचे बोलणे ऐकून माझी उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली. त्याला तिकडं जाऊन ते कोड उलगडण्याचं धाडस त्याला झालं नाही. शिवाय त्याने याच्यातले आपल्या आईला देखील काही सांगितले नव्हते. मी विचार करू लागलो आणि हळु हळू त्याच्या बोलण्यावर मला आता विश्वास बसू लागला पण मी स्वतः ते अनुभवले नव्हते म्हणून थोडी शंका अजून ही होती.

त्याच रात्री सगळे झोपल्यावर मी हळूच माझ्या पलंगावरून उठून त्या शेवटच्या खोलीकडे चोर पावलाने गेलो. खोलीच्या दाराला बाहेरून कुलूप होतेच पण खिडक्याही दोरीने बाहेरून घट्ट बंद केल्या होत्या. दाराचे समजू शकतो पण खिडक्या बांधून ठेवण्याचे कारण मला कळले नाही. मी हळूच चालत दारापाशी गेलो आणि त्या खोलीच्या दाराला माझा कान लावला. मी अतिशय उत्कंठेने काही तरी ऐकण्याची वाट पाहत होतो पण मला काहीच ऐकू आले नाही. काही क्षण लोटले असतील. मी पुन्हा माझ्या खोलीकडे जायला वळलो इतक्यात दारामागून आवाज आला, मी येऊ का? हे ऐकताच माझ्या छातीत धस्स झाले. माझे पाय तिथेच थांबले. मी काहीच उत्तर नाही दिले तसे पुन्हा एकदा आवाज आला. मी येऊ का? इतक्यात माझ्या नावाने कोण तरी खूप जोरात ओरडले. शरीरातलं सर्व रक्त गोठल्यासारखे मला झालं. समोर बघतो तर माझे काका उभे होते. त्यांच्या आवाजाने वाड्यातले बाकीचे ही आपापल्या खोलीतून धावत बाहेर आले.

“काय करत होतास इकडे?”, काका चांगलेच भडकलेले होते.

आई आणि बाबा ही चमकल्यासारखे माझ्याकडे बघत होते.

“काही नाही..मी पाणी प्यायला उठलो होतो..तर इथून आवाज आला म्हणून आलो..”, घाबरून मी ही खोटे बोललो.

“तुला सांगत होतो ना.. वहिनीला आणि याला काम संपेपर्यंत आणू नकोस म्हणून”, काका माझ्या वडिलांकडे वळून म्हणाले.

माझे वडील खाली मान घालून उभे होते.

“उद्याच्या उद्या नेऊन घाल यांना परत..”, काकांनी फर्मान सुनावला.

सगळेजण पुन्हा एकदा आपापल्या खोलीत गेले. खोलीकडे वळताना मी माझ्या चुलत भावाकडे पाहिले. माझ्या मनातली भीती त्याच्या चेहऱ्यावर ही दिसत होती. खोलीत आल्यावर आईने मला दोन चार सणकून दिल्या आणि शेवटच्या खोलीकडे जायचे नाही म्हणून सांगितले होते याची पुनः एकदा आठवण करून दिली.

माझे वडील मला काही बोलले नाही पण त्यांच्याकडे बघायची माझी हिम्मतच झाली नाही.

दुसऱ्यादिवशी पहाटेच्या गाडीने मी आणि आई परत आमच्या घरी आलो. माझे वडील मात्र मागेच राहिले.

माझ्या मनात अजून ते गुपित घर करून होतं पण कुणालाच काही विचारायची सोय नव्हती.

अशीच दिवस, आठवडे, महिने आणि वर्षे उलटली. मग एक दिवस असाच गावाकडचा विषय निघाला तेव्हा आई ने मला सांगितले की त्या शेवटच्या खोलीत आमच्या खानदानीतल्या पूर्वजांपैकी कुणी एकाने धन गाडून ठेवले होते. इतके वर्ष ते शांत होतं पण एकाएकी ते धन रात्र झाली की आवाज द्यायचं. असं म्हणतात की ते धन जमिनीतून एका कळशीत वर यायचं पण ती कळशी उचलायला गेलं तर पुनः खाली जायचं. त्याला कदाचित बळी हवा होता. वाड्यात ही बातमी पसरताच गडी माणसं लावून ते गुप्त धन उकरून गावातल्या मंदिरात दान करायचं असं घरातल्या पुरुष मंडळीने ठरवले. तसे प्रयत्न ही खूप झाले पण कुणाला काही केल्या ते धन घ्यायला जमेना म्हणून शेवटी खोलीत पूजा हवन करून खोली कायमची बंद केली. तेव्हा पासून तो आवाज ही शांत झाला.

माझ्या मनातले इतक्या वर्षांपासून असलेले कोड आता सुटले होते पण आईने सगळे सांगितले असले तरी देखील आजपर्यंत तिने मला परत गावी जाऊ दिले नाही.”

सुहासने आपला अनुभव सांगून त्याच्या शेजारी ठेवलेली पाण्याची बाटली उचलली आणि कंपनीतल्या घडाळ्याचे टोल पडताच आम्ही सगळेजण किंचितसे दचकलो आणि जागेवरून उठून आपआपल्या घरी जायला निघालो.

Leave a Reply