आमच्या गावी दर वर्षी गुढी पाडव्याला मोठा उत्सव असतो, पालखी निघते. दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही आम्ही सगळे गावाला जाणार होतो. आई बाबा २ दिवसा आधी निघून गेले. तिथे मदत होईल आणि गावातल्या घरी साफ सफाई ही करता येईल या उद्देशाने. मला मात्र या वेळेस हवी तशी सुट्टी मिळाली नव्हती म्हणून मी नंतर जायचे ठरवले. माझ्या गावातला एक मित्र आदित्य ही माझ्याच भागात राहतो. तो ही अधून मधून बाईक ने गावाला जात असतो म्हणून मी त्याला फोन करून विचारले की तू गावाला कधी जाणार आहेस. तसे तो म्हणाला की माझ्या ही सुट्टी चे वांदे झालेत, मी आदल्या दिवशी ऑफिस चे काम आटोपून रात्री बाईक घेऊन निघणार आहे, तू येत असशील तर चल म्हणजे मला ही सोबत होईल. तसे मी म्हणालो ठीक आहे मी ही येतो..

गावाला निघणार होतो त्या दिवशी त्याला दुपारीच फोन करून पुन्हा विचारून घेतले तसे तो म्हणाला की हो माझे जाणे पक्के आहे तू काम आटोपून माझ्या घरी ये म्हणजे आपण तिथूनच सोबत निघू. त्या दिवशी संध्याकाळी ऑफिस मधून जरा लवकरच निघालो पण माझ्या घरून त्याच्या घरी जायला जरा उशीर च झाला. साधारण ११ ला आम्ही प्रवास सुरू केला. निघताना पेट्रोल वैगरे भरले. रात्री ट्रॅफिक लागणार नव्हती त्यामुळे गावाला जायला ३-४ तास लागतील असा अंदाज बांधला होता. आणि दोन अडीच तासानंतर मध्ये थांबून एक ब्रेक घेऊ अस विचार केला. उशिरा का होईना पण गावाला जाता येणार होते म्हणून जरा खूष च होतो. तसे तर खूप रात्र झाली होती पण आमचे नशीब चांगले म्हणून आम्हाला एक चहाची टपरी चालू असलेली दिसली. मी आदित्य ला सांगून गाडी त्या टपरी कडे वळवली. साधारण २ तासांचे अंतर पार केले होते. रस्त्यांची अवस्था पाहता बाईक वरून आल्यामुळे आम्हा दोघांची पाठ चांगलीच भरून आली होती. १०-१५ मिनिटांची विश्रांती घेणे खूप आवश्यक होते. टपरीवर थांबून चहा वैगरे प्यायलो आणि पुढचा प्रवास करायला सुरुवात केली. 

आमच्या गप्पा सुरू होत्या. गावाला पोहोचायला जवळपास दीड तास बाकी होता आणि तितक्यात आमची बाईक बंद पडली. दीड पावणे दोन वाजले असतील. आता या वेळेस कोणाकडून मदत मिळेल असे वाटत नव्हते. त्यात आमची बाईक जिथे बंद पडली होती तो रस्ता अगदी निर्मनुष्य होता. मोबाईल फ्लॅश चालू करून त्या प्रकाशा त आमचे बाईक ला किक मारणे चालू होते पण बाईक चालू होईल असे वाटत नव्हते. माझे प्रयत्न करून झाल्यावर मी आदित्य ला म्हणालो “बघ रे जरा काय झालेय ते.. बाईक गरम झाली असेल तर थोडी कुल डाऊन होऊ दे”. इतकं बोलून मी काही पावले चालत जाऊन आजूबाजूला कोणी दिसतेय का ते पाहत होतो जेणेकरून मदत मागता येईल. पण त्या परिसरात वस्ती दिसत नव्हती. दोन्ही बाजूला गर्द झाडी आणि मध्ये सामसूम झालेला निर्मनुष्य रस्ता तेवढाच काय तो दिसत होता. रस्त्याकडे ला स्ट्रीट लाईट स् ही नव्हते. सोबतीला होता तो रातकिड्यांचा किर्र आवाज. बराच वेळ वाट पाहिली पण एकही वाहन दिसले नाही. शेवटी मी माझ्या गावातल्या मित्राला फोन लावला आणि बाईक बंद पडल्याचे सांगितले. अंदाज घेऊन पत्ता ही सांगितला. तसे त्या मित्राने येतो मी असे सांगून फोन ठेऊन दिला. 

मोबाईल खिशात ठेऊन मी आदित्य कडे यायला वळलो तितक्यात रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला कोणी तरी उभे असल्याचे जाणवले तसे आदित्य ने मोबाईल चा फ्लॅश तिथे वळवला. तिथे कोणीही दिसले नाही. पण पुढच्या क्षणी माझे शर्ट अचानक मागून खेचले गेले आणि मी एकदम दचकलो. त्या रस्त्यावर आमच्या दोघांशिवाय कोणीही नव्हते. आता मात्र मी खरंच घाबरलो आणि आदित्य ला म्हणालो की तू किक मारत रहा.. गाडी होईल सुरु.. आपल्याला लवकरात लवकर इथून बाहेर पडायला हवे. त्याला माझ्या आवाजातली भीती जाणवली असावी बहुतेक. तसे अगदी जीव तोडून त्याने ४-५ किक सलग मारल्या आणि एकदाची गाडी चालू झाली. क्षणाचाही विलंब न करता आम्ही तिथून निघालो. अर्धा एक किलोमीटर पुढे आलो असू.. मला जाणवू लागले की आमच्या बाईक मागून कोणी तरी धावत येतेय. ती जाणीव मनात धडकी भरवत होती.

माझी चांगलीच तंतरली. मागे वळून पाहण्याची हिम्मत होत नव्हती म्हणून मी आदित्य ला म्हणालो की साईड मिरर मध्ये बघ जरा मागे कोणी आहे का.. मला असे वाटते य की आपल्या बाईक मागे कोणी तरी लागलेय. तो ही जरा दचकला. त्याने मिरर मध्ये पाहिले पण मागे इतका अंधार होता की त्याला काही दिसले नाही तसे तो म्हणाला की मागे काही दिसत तर नाहीये. तू लक्ष देऊ नकोस कदाचित तुला भास झाला असेल. माझ्या मनात नको नको ते विचार येत होते. मी गप्पच होतो. काही वेळानंतर पुन्हा मला जाणवू लागले की मागून कोणी तरी धावत येतय. ती चाहूल मला प्रकर्षाने जाणवू लागली. मी मांडीवर धरलेली बॅग मध्ये घेतली आणि मागे वळून पाहू लागलो. मागचे दृश्य पाहून माझ्या अंगावर सरसरून काटा आला. भीतीने अंग थरथरू लागले. एक मुंडकं नसलेली बाई आमच्या मागे अगदी बाईक च्याच वेगात धावत येत होती. काय पाहतोय तेच कळत नव्हते. 

मी आदित्य ला सांगायचा प्रयत्न करत होतो पण भीतीने माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. मी त्याच्या खांद्यावर हात मारत त्याला सांगण्याचा प्रयत्न करू लागलो. तितक्यात आदित्य मला धीर देत म्हणाला “आजिबात मागे वळून पाहू नकोस.. माझी शप्पत आहे तुला.. डोळे बंद कर..” बहुतेक आदित्य ने ही ते पाहिले होते पण त्याच्या इतके धाडस माझ्यात नक्कीच नव्हते. मी डोळे बंद करून घेतले. पुढचे १०-१५ मिनिट फक्त गाडीचा आवाज आणि अंगाला लागणारा वारा तेवढेच काय ते जाणवत होते. तितक्यात मला एका दुसऱ्या बाईक चा आवाज ऐकू आला म्हणून मी डोळे उघडले. माझा गावातला मित्र आम्हाला घ्यायला आला होता. त्याला पाहून माझा जीवात जीव आला. पुढच्या अर्ध्या तासात आम्ही गावात पोहोचलो. मी कोणाला काहीच बोललो नाही आणि सरळ झोपून गेलो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघांनी त्याच मित्राला घडलेला प्रकार सांगितला. आदित्य म्हणाला की जेव्हा आपल्याला जाणवले की रस्त्याच्या कडेला कोणी तरी उभे आहे तेव्हा तिथे कोणी दिसले नाही पण त्याच्या पुढच्या क्षणी मला तुझ्या मागे एक पांढरट आकृती उभी दिसली. तुला काही बोलणार तितक्यात तू मागे सरकलास आणि मला म्हणालास की किक मारत रहा. खर तर तुला सांगणार होतो पण तेव्हा आपल्याला तिथून निघणे खूप गरजेचे होते म्हणून देवाचे नाव घेऊन मी किक मारत राहिलो आणि एकदाची बाईक सुरू झाली. आदित्य चे बोलणे ऐकून मी विचार करत च होतो तितक्यात गावातला तो मित्र म्हणाला “साधारण १० वर्षांपूर्वी एका बाईला तिथे मारून टाकले होते. तिची ओळख पटू नये म्हणून तिचे मुंडके छाटून नेले होते. तेव्हा पासून त्या भागात ती बाई दिसते असे तिथले लोक म्हणतात. मी कधी अनुभवले नाहीये पण गावातले लोक म्हणतात की ती रात्री अपरात्री गाड्यांचा पाठलाग करते आणि त्यांचा अपघात होतो. तुमचे नशीब चांगले म्हणून तुम्ही वाचलात. 

Leave a Reply