अनुभव – प्रतिक दीचवळकर

मी स्वतः एक ट्रेकर आहे आणि सतत फिरतीवर असतो. मी, माझे मित्र प्रथमेश, कल्पेश आणि प्रफुल आम्ही नेहमी ट्रेकिंग ला जात असतो. साधारण 2 वर्षांपूर्वीचा हा विचित्र आणि चित्तथरारक अनुभव आहे जेव्हा आम्ही नाणेघाटात ट्रेकिंग ला गेलो होतो.

जून महिन्याचा शेवटचा आठवडा होता. सकाळी ट्रेकिंग ला सुरुवात केली आणि साधारण दुपारी 1 वाजता आम्ही टॉप ला येऊन पोहोचलो. भरपूर फिरलो, फोटो वैगरे काढले, जेवण उरकली. या सगळ्यात जवळपास 3 वाजले. नाणेघाट च्या मागच्या बाजूला जीवधन गड आहे. गड चढायचा की नाही हे मात्र आम्ही अजिबात ठरवून आलो नव्हतो. पण अचानक आम्ही तिथे ट्रेकिंग ला जाण्याचा निर्णय घेतला. अधून मधून पाऊस असल्यामुळे आम्ही निघायला उशीर केला. आणि तिथून साधारण 8 वाजता आम्ही नाणेघाटावरील गावात आलो.

सगळ्यांना खूप भूक लागणे साहजिक होते म्हणून आम्ही घरगुती जेवणाची ऑर्डर दिली. जेवणं उरकेपर्यंत 10.30 झाले आणि आम्ही उतरायला सुरुवात केली. दगडी पायऱ्या संपल्या आणि जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली. आम्ही घड्याळ, मोबाईल वैगरे बागेत ठेवले. शेवटची वेळ पहिली ती 11.30

आता पुढचा प्रवास खरच खडतर होता. रात्रीची वेळ आणि जंगल पार करायचे होते. त्यात भर म्हणून मुसळधार पाऊस. थोडे चालल्यावर आम्हाला लक्षात आले की आम्ही रस्ता चुकलोय. पाऊस असल्यामुळे आम्ही मोबाईल चा फ्लॅश ही वापरू शकत नव्हतो. मागे वळून पाहिले तर नाणेघाट ही ढगाआड दिसेनासा झाला होता. जंगलातून वाट काढण्या व्यतिरिक्त दुसरा काही पर्याय नव्हता म्हणून आम्ही रस्ता शोधत चालत राहिलो. विजांचा कडकडाट आणि वाऱ्यामुळे झाडांची सळसळ वाढली होती.

काही अंतर चालल्यानंतर आम्हाला एक ओढा लागला. त्याला फार पाणी नव्हते, आम्ही त्याच्या कडेने चालू लागलो. पुढे एक छोटेसे तळे दिसले आणि आश्चर्य म्हणजे त्या तळ्याचे पाणी काळसर वाटत होते. आम्ही थांबायचा प्रश्नच उधभवत नव्ह्ता त्यामुळे आम्ही न थांबता चालत राहिलो. अचानक प्रथमेश ला एक विचित्र आवाज ऐकू आला. त्यांनी आम्हा सगळ्यांना विचारले पण आम्हाला तो आवाज ऐकू आला नाही म्हणून आम्ही त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जात राहिलो. 

पण काही पावलं चालल्या नंतर प्रथमेश अचानक थांबला आणि म्हणाला “मला काही तरी दिसलं तिथे”.. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून असे वाटत होते की तो प्रचंड घाबरला आहे. तितक्यात आम्ही सुद्धा एक विचित्र आवाज ऐकला आणि मी अगदी खात्रीने सांगू शकतो की तो आवाज मनुष्याचा किंवा एखादया प्राण्याचा नक्कीच नव्हता.आता मात्र ती भीती अनुभवायची वेळ आमची होती. प्रथमेश फक्त एकच वाक्य बोलत होता “पुढे चालत रहा, अजिबात थांबू नका”..

बराच वेळ झाला होता आम्ही सतत चालत होतो, वेळेचे भान राहिले नव्हते. पावसाचा जोर खूप च वाढला होता. इतक्यात एक विचित्र गोष्ट आमच्या लक्षात आली आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली. बऱ्याच वेळा पूर्वी आम्हाला ज्या ठिकाणी तो आवाज आला होता त्याच ठिकाणी आम्ही पुन्हा आलो होतो. तोच ओढ्याजवळचा तलाव. फरक इतकाच की आम्ही आता ओढ्याच्या दुसऱ्या बाजूला येऊन पोहोचलो होतो. काहीच सुचत नव्हते. कारण आम्ही तो ओढा ओलांडलाच नव्हता आणि तरीही आम्ही त्या ओढ्याच्या दुसऱ्या बाजूला उभे होतो.

आता मात्र सगळ्यांचे भान हरपले होते. सगळे कल्पना शक्तीच्या पालिकडचे घडत होते. आम्ही सगळे वाट काढत जोरात चालु लागलो. त्या जागेपासून काही अंतर चालल्यावर माझा मित्र प्रफुल अचानक खाली बसला आणि म्हणाला “तुम्ही जा.. मी येत नाहीये”.. आम्ही सगळेच दचकलो, एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागलो. त्याला आमच्या पैकी एकाने विचारले “का रे.. काय झाले? येणार का नाही’. प्रफुल म्हणाला “मी येणार नाही माझे पाय दुखत आहेत”. हे कारण कोणाला ही न पटण्यासारखे होते. कारण प्रफुल हा एक मुरलेला ट्रेकर, नेहमी उत्साही आणि सगळ्यात पुढे असायचा. आणि या अश्या प्रसंगी असे बोलणे न पटण्यासारखे होते. आम्ही ओळखले की हा काही साधा प्रकार नाही. मी प्रफुल ची बॅग उचलली, कल्पेश ने त्याचा हात धरून त्याला उठवले आणि आम्ही काहीही न बोलता पुन्हा चालू लागलो.

आता दाट जंगलाचा भाग संपला होता. थोडं लांबच दृष्टीस पडत होत पण पाऊस काय कमी व्हायचे नाव घेत नव्हता. आम्हा सर्वांची चीड चीड खूपच वाढली होती. कोणी कोणाचे ऐकत नव्हते आणि एकमेकाला दोष देत होते. काही वेळाने आम्ही रस्त्यावर येऊन पोहोचलो आणि सुटकेचा निश्वास सोडला. पावसाचा जोर कमी झाला होता म्हणून आम्ही बागेतून मोबाईल काढले आणि वेळ पहिली तर पहाटेचे 4.30 होत आले होते. आम्ही रस्त्याच्या कडेला बस ची वाट पाहत थांबलो पण प्रथमेश अजूनही त्याच विचित्र मनस्थितीत होता. त्याचे वागणे अतिशय गूढ वाटत होते. 

त्या घटने नंतर तब्बल 4 दिवस तो तापाने फणफणत होता. जेव्हा त्याने तोंड उघडले तेव्हा कळले की त्याने एक विचित्र अमानवीय आकृती पहिली होती. या सगळ्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नव्हता पण आलेला अनुभव अतिशय भयानक होता. आणि देवाच्या कृपेमुळे आम्ही यातून सुखरूप बाहेर पडू शकलो. या घटनेनंतर मी नाईट ट्रेकिंग करणे शक्यतो टाळतो. एक आवर्जून सांगावेसे वाटते की घडलेल्या प्रकारानंतर भुताटकी वैगरे नाही पण देवावरचा विश्वास खूपच वाढला. 

Leave a Reply