अनुभव – श्रीकांत बडगे

प्रसंग तेव्हाचा आहे जेव्हा मी हॉस्टेल मध्ये राहत होतो. माझ्या सोबत रूम शेअर करणारे काही मित्र ही होते. हॉस्टेल च्या खालच्या मजल्यावर आजी आजोबा असे दोघेच राहायचे. त्यांना मूल नव्हती त्यामुळे हॉस्टेल मधल्या सगळ्या मुलांसोबत आपले मन रमवायचे. त्या आजोबांची आणि माझी चांगली गट्टी जमली होती. खूप माया करायचे माझ्यावर. इतकेच नाही तर वयातले अंतर जाणवू नये म्हणून कधी मला चिडवायचे, माझी मजा घ्यायचे तर कधी मस्करी करायचे. सगळे अगदी सुरळीत सुरू होत. मी रूम वर एकटा असल्याचे त्यांना कळले की ते मला त्यांच्या रूम वर चहा घ्यायला बोलवायचे, गप्पा गोष्टी करायचे. एके दिवशी रूम वर झोपलेलो असताना पहाटे बाहेर धावपळ ऐकू आली. नक्कीच काही तरी विपरीत झाले असणार असे समजून मी उठून बाहेर आलो. तेव्हा त्या आजोबांच्या रूम समोर खूप गर्दी झाली होती. पहाटे ५ च्या सुमारास हार्ट अटॅक आल्याने झोपेतच त्यांचा मृत्यू झाला होता. मला अजूनही आठवतेय २०१८ सालचा डिसेंबर महिना होता. बरेच दिवस आमच्या इथे शांतता होती. सगळेच त्यांच्या जाण्याने अस्वस्थ झाले होते. कारण सगळ्यांसोबत त्यांचे बोलणे व्हायचे. असे अचानक निघून जाणे आम्हा सगळ्यांसाठी खूप धक्कादायक होते. 

एक दीड वर्ष उलटले असेल. लॉक डाऊन सुरू झाले होते. पण लॉक डाऊन लागण्याआधी ती आजी कुठे तरी दुसरी कडे राहायला गेली. त्यामुळे त्या रूम ला कुलूप लावलेले असायचे. एके दिवशी मी आणि माझे काही मित्र त्यांच्या दारात बसूनच गप्पा मारत होतो. राहायला आलेल्या नवीन मित्रांना सांगत होतो की या घरात एक आजी आजोबा राहायचे. स्वभावाने खूप चांगले होते. सगळ्यांशी नीट बोलायचे, विचारपूस करायचे वैगरे.. काही दिवसांनी इ पास मिळाल्याने सगळी मुलं आप आपल्या घरी निघून गेली. मी आणि तिथले मालक सोडून संपूर्ण बिल्डिंग मध्ये दुसरे कोणीही नव्हते. या आधी अशी संपूर्ण बिल्डिंग कधीच रिकामी झालेली मी पाहिली नव्हती. पण लॉक डाऊन च्या काळात आपण बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा अनुभवल्या त्यातली ही एक. मी माझ्या रूम मध्ये नेहमी प्रमाणे शांत झोपलो होतो. मी नेहमी खाली जमिनीवर सतरंजी टाकून झोपायचो. तितक्यात कसल्याश्या आवाजाने मला जाग आली. २ वाजत आले होते. मला तो आवाज कळायला थोडा वेळ लागला. कोणी तरी चालत असल्याचं वाटलं कारण मी खाली जमिनीवर झोपलो असल्यामुळे मला त्या पावलांचा हलकासा कंप जाणवला. मी एका कुशीवर झोपलो होतो. डोळ्यांवर खूप झोप होती म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष करून तसाच पडून राहिलो. काही वेळ उलटला असेल. 

कोणीतरी माझ्या कंबरेवर हात ठेवला असे जाणवले. पण झोप इतकी अनावर झाली होती की कळत नव्हत खरंच कोणी आहे की मी स्वप्न पाहतोय. काही मिनिटांनी ती पकड मला घट्ट जाणवू लागली. एके क्षणी वाटले की मला भास होतोय आणि माझी पाठ अकडली आहे, म्हणजे शरीरात ल्या वातामुळे माझी पाठ भरून आली असेल. पण तसे नव्हते. कारण ती पकड हळु हळू करत घट्ट होत चालली होती. माझा श्वास कमी पडू लागला. आता मात्र मला जाणवलं की हे स्वप्न नाही हे खरंच घडतंय. आधीच रूम मध्ये ऐकटा असल्यामुळे मला मागे वळून बघायची हिम्मत होती नव्हती. आणि तसे जरी करायचा विचार केला तरी कुशीवर असल्यामुळे आणि ती पकड खूप घट्ट झाल्या मुळे मला वळता ही येणार नव्हतं. मी घामानं ओलाचिंब झालो. आता एकच मार्ग होता, मी मनातल्या मनात देवाचे नाव घेणे सुरू केले आणि बघता बघता अवघ्या ३० सेकंदात अचानक ती पकड जाणवणे बंद झाले. जे काही होत ते गेलं होत बहुतेक. मी देवाचे नाव घेत राहिलो. जवळपास अर्ध्या तासानंतर मी माझी कुस बदलली. सकाळी जाग आली तसे घडलेला प्रसंग आठवला. जे काही काल रात्री रूम मध्ये आल होत ते नक्की कोण होते, आजोबा की अजुन कोणी..? की हा फक्त माझा भास होता..?

Leave a Reply