अनुभव – भार्गव धवडे

लहानपणी गावी जाणं म्हणजे निसर्गाच्या कुशीत रमणं, सुट्ट्यांचा आनंद लुटणं आणि जुन्या गोष्टी ऐकणं. माझं गाव, चिपळूणपासून २० किमी आत, निसर्गरम्य परिसरात वसलं होतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही नेहमीच तिथे जायचो. गावातलं आमचं घर खाडीच्या जवळच होतं. आजूबाजूला झाडं आणि मागच्या बाजूला खाडी असल्यानं ते ठिकाण जरा रहस्यमय वाटायचं. त्या वर्षी उन्हाळ्यात, अमावस्येच्या रात्री मी आणि माझे आई-वडील गावी होतो. घर मोठं आणि थोडं जुनं होतं. रात्रीची वेळ, खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज, आणि सर्वत्र पसरलेला अंधार – या सगळ्यामुळे वातावरण फार भेसूर वाटत होतं. साधारणत: दोन-तीन वाजले असतील. झोपेतून अचानक एक विचित्र आवाज मला ऐकू आला – “छन छन छन…” एखाद्या घुंगरांच्या आवाजासारखा. आई-वडील आधीच जागे झाले होते. मला जाग आली तेव्हा मीही तो आवाज ऐकू लागलो.

पहिल्यांदा वाटलं की कोणीतरी बाहेरून जात असेल. पण नंतर जाणवले कि तो आवाज आमच्या घराभोवती फिरत होता – जणू कोणी घुंगरू बांधून आमच्या घराला चक्कर मारत होतं. त्या आवाजाने मला खूप भीती वाटू लागली. मी घाबरून आईला विचारलं, “आई, हा आवाज कसला आहे?” ती म्हणाली, “काही नाही, झोप तू.” पण तिच्या आवाजातही भीती होती. बाबा मात्र त्या आवाजाचं कारण शोधत होते किंवा ते कारण त्यांना सापडले होते. त्यांनी घरातल्या देवघरात जाऊन पूजा सुरू केली. मी आईला घट्ट बिलगून बसलो होतो. त्याचवेळी, अचानक वरच्या छतावरून आवाज यायला सुरुवात झाली. जणू कोणी जड वस्तू छतावर फेकत होतं.. कदाचित नाही. कोणीतरी वर चालत होतं बहुतेक. सगळ्यांचीच धडकी भरली. बाबा जोरात स्तोत्र म्हणत होते. त्या आवाजाने वातावरणात एक प्रकारची थरथर जाणवत होती.

सकाळी पाच वाजेपर्यंत बाबा पूजा करत होते. आता मात्र कुठल्याही विचित्र आवाजाचा मागमूस नव्हता. आवाज अचानक गायब झाला होता. सकाळ होताच आम्ही घराच्या मागच्या बाजूला असलेल्या दाराजवळ पाहायला गेलो. तिथं जे दृश्य आम्हाला दिसलं, त्याने आम्ही थक्क झालो. मागच्या दाराजवळ दोन कावळे मरून पडले होते. आई-वडीलही गांभीर्याने विचार करत होते की, काल रात्रीच्या घुंगरूच्या आवाजाचा आणि या काळव्यांचा काहीतरी संबंध असावा. त्या दिवसाच्या सकाळी आमच्या शेजाऱ्यांशी बोलताना, मी काही गोष्टी लपूनच ऐकल्या. शेजाऱ्यांच्या मते, आमचं घर ज्या जागेवर बांधलं गेलं होतं, ती जागा पूर्वी एका साधूच्या तपासाठी प्रसिद्ध होती. त्या साधूच्या मृत्यूनंतर तिथे एक विचित्र अस्तित्व भासू लागलं होतं. कोणीतरी तिथं राहायला गेलं की, काहीतरी विचित्र घटना घडायचं. शेजारी सांगत होते की, “ती जागा शुभ नाही.

तिथे अनेक लोकांनी अनाकलनीय अनुभव घेतलेत. रात्रीच्या वेळी घुंगरांचे आवाज, छतावर चालण्याचा आवाज, आणि अचानक घडणाऱ्या विचित्र घटना – या सगळ्यामुळे त्या जागेला ‘भुताटकीचं ठिकाण’ म्हटलं जाऊ लागलं.” त्या रात्रीच्या अनुभवानंतर आम्ही त्या घरात राहणं थांबवलं. माझ्या आई-वडिलांनी लगेचच निर्णय घेतला की, ते घर तोडून टाकायचं. काही दिवसांतच कामगार बोलावून घर पाडण्यात आलं. आज त्या ठिकाणी फक्त मोकळी जमीन आहे, पण तरीही स्थानिक लोक तिथे जाणं टाळतात. रात्रीच्या वेळी कोणालाही तिथं जायचं धाडस होत नाही. आम्हीही त्या जागेबद्दल कधीच कुठे बोलत नाही, पण ती रात्र आणि तो आवाज अजूनही माझ्या आठवणींमध्ये जिवंत आहेत. कधी कधी काही जागा आपल्यासाठी नाहीत हे ओळखणे महत्वाचे असते., तिथे वावरत असलेल्या अज्ञात शक्तींशी आपली गाठ पडणं आपल्याला महागात पडू शकतं. 

Leave a Reply