हिमाचल प्रदेश हा निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग मानला जातो. बर्फाच्छादित पर्वत रांगा, शांत तलाव, आणि हिरवळ डोळ्यांना आणि आत्म्याला उभारी देतात. मात्र, हे निसर्गाचे नंदनवन एका वेगळ्या रूपात तुमच्या समोर उभ राहू शकत. ट्रेकिंग आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी हिमाचलला जात असाल तर जरा जपून. कारण कधी कधी अशा विचित्र घटनेचा सामना करावा लागू शकतो ज्याचा तुम्ही विचार ही केला नसेल. रात्रीचा काळोख, तो उंच डोंगरमाथा आणि वातावरणातील गूढता एका वेगळ्याच दुनियेची प्रचिती देते.. एका क्षणी हे ठिकाण निसर्गाचा आशीर्वाद वाटत, तर दुसऱ्या क्षणी ते भयाचे रूप धारण करत. काही वेळेस वास्तव आणि भ्रमाच्या सीमारेषा मिटल्या जातात. ही कथा केवळ अनुभवावर आधारित नाही, तर आपल्या मनाची भिती, सामर्थ्य, आणि निसर्गाच्या अज्ञात बाजूंचा वेध घेण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही देखील या रहस्यमय प्रवासात माझ्यासोबत याल, जिथे हिमाचलच्या अद्भुततेसोबत एक अदृश्य भय लपलेले आहे.

अनुभव – अथर्व सानप

मी राहायला नाशिक ला आहे. मागच्या वर्षी म्हणजे 2023 ला मी आणि माझे 6 मित्र आणि ड्राइव्हर दादा असे ऐकूण सात जण हिमाचल प्रदेशात रोड ट्रिप ला गेलो होतो. 21 नोव्हेंबर ला मस्त मोठी ट्रॅव्हलर गाडी करून निघालो. आमच्यातला एक जण त्याच्या कुटुंबासोबत थायलंड ला गेला होता आणि तो आम्हाला 25 नोव्हेंबर ला कसोल मध्ये भेटणार होता. आम्ही सगळे मित्र खूप उत्साही होतो कारण थंडीच्या दिवसात ट्रिप ला जायची मजा काही और च असते. संध्याकाळी 4:30 वाजता आम्ही कसोलवरून रिकॉन्ग पिओला जाण्यासाठी निघालो. हा 200 किमीचा घाटमय रस्ता होता. हिमाचल प्रदेशातील घाट म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचं भयावह सौंदर्य. वळणावळणाचे अरुंद रस्ते, एका बाजूला खोल दऱ्या आणि दुसऱ्या बाजूला उंचच उंच बरफाने आच्छादलेले डोंगर. रात्रीच्या अंधारात या घाटातील वातावरण अधिकच गूढ वाटतं होतं. गाडीच्या हेडलाईट्सने अचानक उंच झाडांमागे त्याच झाडांच्या सावल्यांचे आकार मनात धडकी भरवत होते.

घाटाच्या काही भागांत रस्ता इतका अरुंद होता की एका चुकीने गाडी खोल दरीत कोसळेल अशी भीती मनात घर करू लागली होती.. हिमाचलच्या घाटांचा हा थरार मनाचा ठाव घेऊ लागला होता. आमचा अंदाज होता की रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू. मात्र, घाटातील रस्त्यामुळे खूपच वेळ लागला. रात्री 9:30 वाजता आम्ही जलोरी पासच्या व्यू पॉईंट ला पोहोचलो. हा पॉईंट एका मोठ्या डोंगरावर चढून एका टोकावरचा स्टॉप आहे. आम्ही साईड ला आमची ट्रॅव्हलर पॅक केली. शेजारीच एक शिव मंदिर होते आणि त्याच्या पुढे एक छोटा नाश्त्यासाठी स्टॉल होता. काही वेळ विश्रांती घेण्यासाठी आम्ही तिथेच थांबून थोडा नाश्ता केला, मॅगी वैगरे खाल्ले. त्या थंडगार वातावरणात गरमा गरम मॅगी खाण्याची वेगळीच मजा येत होती. त्यात प्रवासासाठी निघताना आम्ही जेवून निघालो नव्हतो म्हणून भूक ही लागली होती. तिथे थांबण्याचा निर्णय योग्य ठरला होता. 

मी सहज चौफेर नजर फिरवली. आकाशात चंद्राच स्वरूप ही खूप सुंदर दिसत होतं, आम्ही बऱ्याच उंचावर होतो आणि त्यात त्या भागात अंधार असल्यामुळे आकाशातल्या चांदण्या स्पष्ट दिसत होत्या. या आधी मी असं आभाळ कधी पहिल्याच आठवत नव्हतं. प्रदूषण नसल्यामुळे असावं. त्या उंच ठिकाणावरून पलीकडील अज्ञात प्रदेशाकडे पाहताना अंगावर काटा येत होता.  डोंगरभागात उंचावर असल्यामुळे थंडीचा जोर खूप होता. ज्याची आम्हाला सवय नव्हती. तिथेच शेकोटी करून काही वेळ थांबलो. खूप मजा येत होती त्यामुळे तासभर तिथेच घालवला. पण पुढे जायचे होते, अजून 170 किलोमीटर चा पल्ला गाठायचा होता. पण तिथले लोक म्हणाले कि इतक्या रात्री निघून रिकॉन्ग पिओला पोहोचणे शक्य नाही. म्हणून आम्ही हॉटेल ची बुकिंग कॅन्सल केली आणि विचार केला कि हा घाट उतरून एखादे हॉटेल बघून रात्री इथेच थांबू आणि सकाळी काझा साठी लवकर निघू. आम्ही तिथून निघालो.

जसे घाट उतारायला सुरुवात केली तसे 5 मिनिट होतं माहित तर मित्रांनी टॉयलेट साठी गाडी थांबवायला सांगितली. चार जण खाली उतरले. सार्थक, आदित्य, सिद्धेश आणि पार्थ. ते रस्त्यापासून काही पावलं आत झाडीच्या भागात लघवी करायला गेले. एव्हाना पावणे अकरा झाले होते. मित्र जसे गाडीच्या दिशेने परत येऊ लागले तसे अचानक 2 जण आमच्या गाडीच्या दिशेने पायी चालत येत असल्यासारखे दिसले. त्यातल्या एकाने सार्थक ला आवाज दिला आणि त्याच्या शी काही तरी संवाद साधू लागला. पण तो त्याच्या पासून बराच लांब असल्याने काय बोलतोय ते कळत नव्हते. म्हणून तो गाडीच्या विरुद्ध दिशेने म्हणजे त्या अनोळखी व्यक्ती च्या दिशेने चालत जाऊ लागला. तितक्यात आदित्य ला चाहूल लागली कि काही तरी गडबड आहे. त्याने सार्थक ला हाक मारून बोलावले आणि इतर मित्रांना ताबड तोब गाडीत बसायला सांगीतले. 

मी गाडीच्या शेवटच्या सीट वर बसलो होतो. मला जास्त कल्पना नव्हती पण कळले कि आम्हा मित्रांशिवाय गाडी बाहेर कोणी तरी आले आहे. ते दोघ गाडी जवळ येण्या आधी सगळे मित्र आत आले आणि आदित्य ने गाडीचा दरवाजा लावून घेतला. तसे ते दोघे ही ड्रायव्हर दादाच्या साईड ला आले आणि दार ठोकू लागले. मी त्यांना पाहू लागलो कि ते काय करत आहेत. ते इंग्रजी भाषेत इतकच म्हणत होते “ Give me one person “. म्हणजे मला एक माणूस द्या. मी प्रसंगावधान राखून जोरात ओरडलो “अमोल भाऊ गाडी पळवा.. “ अमोल भाऊ ने लगेच गाडी ला स्टार्टर मारून तिथून गाडी काढली. आम्ही साधारण 5 ते 6 किलोमीटर पुढे आलो. बऱ्याच वेळे पासून एकही वाहन दिसले नव्हते. पण तितक्यात समोरून सेलेरिओ गाडी येताना दिसली. रस्ता खूप अरुंद होता सिंगल लेन त्यामुळे आमची गाडी थोडी रस्त्याच्या कडेला घ्यावी लागणार होती. अमोल भाऊ ने समोरच्या गाडीतल्या ड्रायव्हर ला आवाज दिला “भाई गाडी डालदो साईड से.. दबाकर निकल जायेगी..” पण तो तिथला स्थानिक हिमाचल चा ड्रायव्हर होता तो ऐकायला तयार च नाही.

त्याच म्हणणे होते कि आम्ही गाडी रिवर्स घेऊन जावी जिथपर्यंत रस्ता रुंद होतं नाही. त्यामुळे थोडा वादा वाद झाला. त्या गाडीत एक बाई बसली होती. आम्हाला भांडण वाढवायचे नव्हते म्हणून आम्ही आमची गाडी मागे घेतली आणि मगच तो सिलेरिओ वाला आम्हाला क्रॉस करून घाटात वरच्या दिशेने गेला. मी मागे वळून ती गाडी अंधारात गुडूप होई पर्यंत पाहत राहिलो. माहित नाही कां… झालेल्या भांडणामुळे गाडीतले वातावरण जरा बिघडले होते म्हणून जरा मूड ठीक करायला गाडीत गाणी वैगरे लावली आणि मजा मस्करी करू लागलो. आमच्यापैकी चार जण फोटोग्राफर आहोत त्यामुळे कॅमेरा वैगरे सोबतच घेऊन निघालो होतो. काही वेळ उलटला असेल. 20-25 किलोमीटर चा पल्ला आम्ही आरामात गाठला होता. आम्हाला पून्हा समोर एक गाडी दिसली. या वेळेस ती गाडी रस्त्याकडेला उभी होती. अमोल भाऊ ने गाडी स्लो केली कारण रस्ता अजूनही अरुंद होता कारण तिथून जाण्यासाठी पुन्हा कसरत करावी लागणार होती. 

आम्ही जसं जसे त्या गाडीच्या जवळ येऊ लागलो तसे आम्हाला कळले कि ती तिचं सिलेरिओ गाडी आहे जी आम्हाला तासा भरापूर्वी क्रॉस झाली होती. तोच ड्रायव्हर आणि गाडीत बसलेली तिच बाई. विचित्र गोष्ट म्हणजे आम्ही ज्या दिशेला जात होतो त्याच दिशेला ती गाडी उभी होती. तो ड्रायव्हर त्याची मान बाहेर काढून त्यांच्या दिशेने येणाऱ्या आमच्या गाडी कडेच पाहत होता. चेहऱ्यावर कसलेही भाव नाही, फक्त आमच्या कडे एका विचित्र नजरेने पाहत होता जणू काही काळ त्याच्यासाठी तिथेच थांबलाय. हा सगळा प्रकार पाहून आम्ही कोड्यात पडलो कारण आम्हाला काहीच सुचत नव्हतं. आम्ही सगळेच खूप घाबरलो होतो आणि अमोल भाऊ तर गाडी चालवत असला तरी अक्षरशः थरथरू लागला. त्याने त्या अरुंद रस्त्यावरून किंचित गाडी बाहेरच्या बाजूला घेतली आणि कशी बशी त्या कार च्या बाजूने घासून काढली.. नंतर जोरात बोलला “ आता सकाळ होई पर्यंत गाडी कुठेच थांबणार नाही.. “

आम्ही सगळे प्रचंड घाबरलो होतो कारण आता पर्यंत खूपदा ऐकलं होतं पण आज पहिल्यांदा असा भयानक प्रकार बघितला होता, अनुभवला होता. त्या घाटाच्या रस्त्याला दुसरा कोणताही रस्ता जोडत नव्हता. मग तासापूर्वी क्रॉस करून गेलेली गाडी पून्हा आमच्या समोर कशी येईल..? जरी आमच्या मागून आली असली तरी आम्हाला दिसली असती. प्रकार नक्की काय आहे हे कळतं नव्हतं. शेवटी पहाटे 3 च्या सुमारास एका मिलिटरी चेक बेस ला गाडी थांबवली कारण पुढे रस्त्याचे काम चालू होते. सर बोलले कि सकाळी 5 ला रस्ता उघडेल तो पर्यंत गाडी लावून आराम करा. तिथे काही वेळ निवांत झालो. घडलेल्या प्रकारबद्दल चौकशी करण्याचे धाडस झाले नाही. ते जे काही होतं त्यातून सुखरूप सुटू शकलो म्हणून देवाचे आभार मानले. पण घडलेल्या भयानक प्रकारामुळे पार्थ आणि सिद्धेश ला खूप ताप आला होता. 

Leave a Reply