दिवाळीचा सण आपल्या आयुष्यात आनंद, प्रकाश आणि एकत्र येण्याचं प्रतीक आहे. मात्र, प्रत्येकासाठी हा सण गोड आठवणी देणारा नसतो. काहींसाठी तो भयानक आठवणीचा ही ठरतो. तर असाच हा एक भयाण अनुभव..

अनुभव – हेमंत

मी पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात शिकत होतो. आणि दर वर्षी दिवाळीची सुट्टी गावाकडे आजोळी साजरी करायला जायचो.. माझं गाव एक खेडेगाव होतं. हे खेडं, रायगड जिल्ह्यातलं. ज्याला मोठा इतिहास लाभला आहे. या गावात अजूनही मातीची घरं आहेत, पिढ्यापासून राहणारे लोकं आहेत. दिवाळीचं वातावरण तयार झालं होतं. सर्वत्र दिव्यांची रोषणाई, रांगोळ्यांची सजावट, फटाके, फराळ यांचं सुंदर दृश्य होतं. माझ्या आजोळीही दिवाळीची विशेष तयारी सुरू होती. फराळ बनवणं, घरातली स्वच्छता, देवाची पूजा हे सगळं पारंपरिक पद्धतीने चालू होतं. गावातल्या लोकांचं एकत्र येणं आणि गप्पागोष्टींचं वातावरण अगदी मोहक असायचं. मला या सणाचं वेगळेपण लहानपणापासून आवडायचं, पण यावेळी माझ्या मनात एक प्रकारचा उत्साह होता. कारण माझ्या मित्रांनी ठरवलं होतं की यावेळी दिवाळीच्या रात्री काहीतरी रोमांचक करायचं. माझ्या आजोळीकडील गावातल्या लोकांनी मला अनेकदा ‘चकवा’ आणि ‘हाकामारी’ या भयानक प्रकाराच्या गोष्टी सांगितल्या होत्या.

सुरुवातीला असं वाटायचं की या गोष्टी फक्त भाकडं कथा असाव्यात पण वयोवृद्ध लोकांचं म्हणणं वेगळं होतं. त्यांनी सांगितलं की या गावात, विशेषतः पडक्या देवळाच्या आसपास, रात्रीच्या वेळी कोणीही एकटं जाऊ नये. कारण त्या ठिकाणी अनेक वेळा चकवा लागतो आणि हाका ऐकू येउन लोकांची दिशाभूल होते. दिवाळीची संध्याकाळ होती. आम्हा मित्रांनी आज रात्री गावीच्या एका माळावर जाण्याचं ठरवलं, जिथं दिवसा सुंदर शेतं पण रात्री ती जागा एक भयाण रूप धारण करते. त्या भागात एका बाजूला पडकं देऊळ आहे. गावकरी म्हणायचे की हे देऊळ खूप वर्षांपूर्वीच्या काळात बांधलं गेलं होतं. इथं एकदा मोठं युद्धही झालं होतं, आणि अनेक वीर इथं मरण पावले होते. त्यांच्या आत्म्यांचा अशांतपणा या परिसरात अजूनही जाणवतो. विशेषतः या पडक्या देवळाच्या परिसरात रात्रीच्या वेळी एक गूढ वातावरण बनत.. त्या परिसरात गेल्यावर भयानक अनुभव येतात..

संध्याकाळी सगळे मित्र एकत्र आले, आणि आम्ही गावाबाहेरच्या त्या रस्त्यावर जायला निघालो.. जसं जसं आम्ही देवळाच्या दिशेनं जाऊ लागलो तसतसं आम्हाला त्या वातावरणात एक वेगळीच शांतता जाणवू लागली. अंधार पडत चालला होता, आणि दिवे किंवा मशाली सोबत घेऊन जाणं आम्हाला थोडं जड वाटत होतं, पण एका उत्साहात आम्ही सगळे च निघालो होतो. गावातील या शांत रस्त्यावरची हवा थोडी गार होती, आणि त्या थंडगार वाऱ्यामुळे अंगावर काटा येत होता. रस्त्यावरून चालत असताना, आम्हाला काळजी वाटू लागली. कारण त्या शांततेतही एक प्रकारच गूढ दडलय असं सतत वाटत होतं. आम्ही एकूण सहा जण होतो. आणि अगदी लहानपणापासून, प्रत्येकाने काही ना काही अघोरी किंवा रहस्यमय किस्से ऐकले होते. आम्हाला माहीत होतं की हा रस्ता नेहमी जसा सुरक्षित वाटतो, तसा रात्री वाटत नाही. पण सत्य त्याहून ही भयंकर वाटत होतं.

जेव्हा आम्ही त्या पडक्या देवळाच्या जवळ पोहोचलो, तेव्हा वातावरण आणखी गडद झालं. अंधार असल्यामुळे आम्हाला सगळा परिसर अस्पष्ट दिसत होता. देवळाची पडलेली भिंत, पडलेली शिळा, आणि मातीने भरलेली जागा असं सगळं दृश्य चंद्रप्रकाशात दिसत होतं.. त्या देवळाच्या आसपास काही झाडं होती, ज्याची सावली आणखी गूढता वाढवत होती. आम्ही त्या देवळाच्या आवारात थोडं थांबलो. आमच्या पैकी एकाने मजेतच म्हटलं, “इथं असलाच चकवा तर तो आज लागू देत.” ते ऐकून सगळे हसले, पण त्या हसण्यात कुठे तरी एक भीती सुद्धा दडली होती. त्या माळावरची हवा वेगळीच वाटत होती. अचानक कसलासा आवाज आला आम्ही मागे वळून पाहिलं तर एका झाडाच्या मागे एक अस्पष्ट सावली दिसली. जी लहान मुलासारखी दिसत होती. इतक्या रात्री अश्या ठिकाणी कोणत्याही लहान मुलाचे येणे शक्य नव्हते. 

आम्ही पुन्हा नीट निरखून पाहिलं, पण पुढच्या क्षणी ती सावली नाहीशी झाली. पण हे बघून घाबरण्याऐवजी आमची उत्सुकता शिगेला पोहोचली. तितक्यात माझ्या कानावर एक हळुवार हाक ऐकू आली.. हेमंत.. मी दचकून मागे वळून पहिले तर सोबतचे मित्र तिथंच होते, आणि कोणाच्याही तोंडातून हाक ऐकू आल्याचं जाणवत नव्हतं. मी विचार केला की, मीच ऐकण्यात काहीतरी गफलत केली असावी, पण पुन्हा त्याच आवाजात हाक ऐकू आली. यावेळी तो आवाज थोडा दूरवरून आला होता, आणि मला वाटलं की तो आवाज माझ्या आजोबांसारखा आहे. मी आश्चर्याने पाहत राहिलो कारण मला समजत नव्हतं की माझ्या आजोबांचा आवाज तिथे कसा ऐकू येईल? कारण त्यांना जाऊन आता वर्ष उलटून गेलंय. मी नकळतपणे त्या आवाजाच्या दिशेने चालू लागलो. माझे मित्र मला अडवू लागले पण त्या हाकेमुळे मी इतका आकर्षित झालो होतो कि त्यांचे मला अडवणे काहीच उपयोगाचे नव्हते. रात्रीच्या त्या भयाण वातावरणात, माझं मन संभ्रमित झालं होतं.

चंद्रप्रकाशाचं म्लान प्रतिबिंबं अंधारात हरवत चाललं होतं. जणू त्या आवाजात माझ्या मनावर पकड घेणारी अदृश्य शक्ती होती. मला असं वाटू लागलं कि माझ्या आजोबांचं अस्तित्व तिथं आहे आणि ते मला काहीतरी सांगू इच्छित आहेत. मला एक प्रकारची दिशाभूल जाणवू लागली. मी मागे वळून पाहिलं तर माझे मित्र ही दिसेनासे झाले होते. अरे.. हे सगळे कुठे गेले. मी स्वतःशीच पुट पुटलो.. मी आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागलो आणि मला जाणवले कि आपण वाट चुकलो आहोत. मी चालायला सुरुवात केली पण तो परिसर अनोळखी वाटत होता. तितक्यात मला लक्षात आलं.. “ चकवा “ या वाटेवर चकवा लागतो.. चकवा, जो मनाचा ताबा घेऊन दिशाभूल करून त्याचं नियंत्रण घेतो, अशी लोकांची जुनी आख्यायिका होती. मला पूर्णपणे गोंधळायला झालं होतं. त्यात माझ्या सोबत असलेले मित्र कुठे निघून गेले माहित नाही. मी भीतीने थरथरू लागलो होतो कारण मला वाटत होतो कि मी इथून पुन्हा कधीच बाहेर पडणार नाही. 

मी उरली सुरली हिम्मत एकवटून मित्रांना शोधण्याचा प्रयत्न सुरु केला. मला  अजूनही माझं नाव घेतलेली हाक ऐकू येत होती.. काही वेळाने माझे मित्र माझ्या नावाने हाक मारत असतानाही, मला वाटू लागलं की हे माझे मित्र नव्हे तर ती अदृश्य शक्ती वेगवेगळ्या आवाजात माझे नाव घेतय. त्या भयानक हाकांमुळे आणि दिशाभुलीमुळे माझ्या मनावर भीतीचा पगडा अधिक गडद होऊ लागला. माझ्या कानावर अजूनही फक्त वेगवेगळ्या दिशेतून येणाऱ्या हाका ऐकू येत होत्या. हाकामारी ही गावातल्या लोकांच्या मते आत्म्याची एक प्रकारची खेळी असते, ज्यामध्ये आत्मा एका माणसाचं नाव पुन्हा पुन्हा घेऊन त्याला अडकवतो. प्रत्येक वेळी आवाज एका नव्या दिशेतून येई, जणू काही मला चकवा आणि हाकामारी एकत्रितपणे दिशाभूल करत होते. माझ्या मनात नको नको ते विचार येऊ लागले.. कदाचित मी पुन्हा कधीच बाहेर येणार नाही? त्या हाकांमध्ये एक गूढ, अस्वस्थ करणारा सुर होता, जणू काही एखाद्या अदृश्य असणाऱ्या अस्तित्वाने मला खेचून आणलं होतं.

या सगळ्यात भर पडली ती एका विचित्र आवाजाने. माझ्या बाजूला असणाऱ्या एका झूडूपातून कसलीशी सळसळ ऐकू आली आणि पुढच्या क्षणी मागून झपकन काही तरी गेल्या सारखे जाणवले. एक गडद मानावसदृश्य आकृती. मी तिथून धावत सुटलो पण अडखळून तिथेच पडलो. मला माझ्या पायावर घट्ट पकड जाणवू लागली. मी प्रचंड घाबरलो होतो कारण मला ती पकड जाणवत असली तरीही मला कोणीच दिसत नव्हतं. माझ्या शरीरात आता त्राण उरला नव्हता. ती रात्र प्रत्येक क्षणाला अजूनच भयाण रूप धारण करत होती. कुठे मित्रांचे ऐकले आणि इथे आलो, उद्याचा दिवस पाहणे माझ्या नशिबात नही असे वाटू लागले. मी पूर्णपणे त्या अदृश्य शक्तीच्या तावडीत सापडलो. तितक्यात दुरून मित्रांचा आवाज ऐकू आला, त्या दिशेला पाहिल्यावर माझे मित्र धावत येताना दिसले. त्याच सोबत माझ्या पायावरची पकड अचानक नाहीशी झाली. मी उठून त्यांच्या दिशेने धावू लागलो. त्यांना मी जाऊन मिठीच मारली. ते ही मला सुखरूप पाहून मनोमन सुखावले. पण ती रात्र आम्हाला अजून काय दाखवणार आहे याची आम्हाला कल्पनाही नव्हती. 

“आपण इथून लवकरात लवकर निघायले हवे” मी मित्रांना म्हणालो. त्यातला एक म्हणाला “ अरे पण तू आमच्या डोळ्यांदेखत कुठे गायब झाला होतास.. “ त्यावर मी सांगीतले “ ते मी नंतर सांगेन.. या जागी अतृप्त आत्म्याचा वास आहे.. जर आपण इथून लवकरात लवकर बाहेर पडलो नाही तर आपण उद्याचा दिवस पाहू शकणार नाही. काय कराव इथून कस बाहेर पडावं काहीच कळतं नव्हतं कारण आम्ही ज्या भागात होतो तो आम्हाला पूर्ण अनोळखी वाटत होता. तितक्यात मला दूर कुठून तरी एक प्रकाश दिसला. बहुतेक कंदीलाचा होता. मी पटकन म्हणालो “ते बघा कोणी तरी आहे तिथे.. आपण मदत मागू शकतो..” आम्ही सगळेच त्या दिशेने चालू लागलो. काही अंतर चालल्या नंतर मला जाणवले कि आम्ही जितके त्या दिव्याच्या प्रकाशाजवळ जाण्याचा प्रयत्न करतोय तितका तो प्रकाश आमच्या पासून दूर जातोय.

भरीस भर म्हणून आजू बाजूने हसण्याचा आवाज येत होता. जो कधी डाव्या बाजूने येई तर कधी उजव्या बाजूने. पण दिसत मात्र काहीच नव्हते. या सगळ्या गदारोळात तो दिवाच काय ती साथ होती आणि कुठे तरी वाटल कि त्यावर विश्वास ठेवावा, कदाचित आपल्याला वाट दाखवत असेल. मी सगळ्यात पुढे चालत होतो आणि माझे मित्र माझ्या मागे. तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणी तरी हात ठेवला आणि मी पाहायला मागे वळलो. माझे पाच ही मित्र माझ्या पासून लांब चालत होते मग तो हात. माझ सर्वांग भीती ने शहारलं. मित्रांना मी सांगितले त्यावर एक जण म्हणाला “ हे सगळे भास आहेत, आपल्याला इथेच अडकवण्यासाठी, दुर्लक्ष करा, हिम्मत ठेवा आणि पुढे चालत राहा.. “ मित्राचे बोलणे सगळ्यानाच पटले. आम्ही एकही शब्द नं बोलता त्या दिव्याच्या प्रकाशाच्या मागे चालत राहिलो. 

काही वेळा नंतर तो प्रकाश एके ठिकाणी येउन अचानक लुप्त झाला. आम्ही बाजूला पहिले तर त्या पडक्या मंदिरा जवळ येउन पोहोचलो होतो. त्या प्रकाषाने आम्हाला मार्ग दाखवला होता. काही मिनिटात सूर्याची किरणे त्या मंदिराच्या कळसावर पडू लागली तसे जाणवले कि सकाळ झाली आहे. त्या भयाण रात्रीत बऱ्याच अतृप्त आत्म्यानी मला आणि माझ्या मित्रांना त्रास दिला पण कदाचित एका आत्म्याने आम्हाला या भयानक प्रकारातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. शेवटी विजय खऱ्याचा होतो हेच सिद्ध झाले. एक चांगली सकारात्मक शक्ती कित्येक वाईट शक्तीवर भारी पडली. या एका प्रसंगाने माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकला. आता दिवाळीचा सण म्हणजे फक्त फटाके, फराळ किंवा आनंद यांचं स्वरूप राहिलं नव्हतं, तर त्या रात्रीने मला आयुष्यातील वेगळं दर्शन घडवलं होतं. हा अनुभव माझ्या मनात एक कायमस्वरूपी शिकवण म्हणून राहिला आहे जो कदाचित माझ्या उभ्या आयुष्यात मी कधी ही विसरू शकणार नाही. 

Leave a Reply