तो दिवस आठवतोय ज्या दिवशी मी पहिल्यांदा त्या वाड्याच्या जवळ गेलो. माझ्या लहानपणापासूनच त्या जुन्या, उध्वस्त वाड्याची गोष्ट ऐकत आलो होतो. गावातले लोक नेहमी सांगायचे की तो वाडा शापित आहे, तिथे गेल्यावर लोकांना भयानक आणि चित्र विचित्र अनुभव येतात, काहींनी तर तिथे भुते पाहिल्याचा दावा केला होता. मला या गोष्टींवर विश्वास नव्हता. मला नेहमीच असं वाटायचं की लोक उगाच या जागेला भयाण रूप देत आहेत आणि मुळात तिथे काहीच नाही. पण एक दिवस असंच काहीतरी घडलं ज्यामुळे माझी जिज्ञासा जागी झाली. एका संध्याकाळी गावातल्या एका माणसाने सांगितलं की त्याने वाड्याजवळून जाताना एक विचित्र आकृती पाहिली. त्याचा चेहरा फिक्का झाला होता, आणि त्याच्या डोळ्यांत भीती स्पष्ट दिसत होती. “तू विश्वास ठेव किंवा नाही, तिथे काहीतरी आहे!” तो म्हणाला. हे ऐकल्यावर मला त्या जागेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची तीव्र इच्छा झाली.
मी ठरवलं की रात्रीच तिथे जाऊन बघायचं. संध्याकाळी मी वाड्याकडे निघालो. आभाळ भरून आलं होत. गडगडाट सुरु झाला होता आणि कोणत्याही क्षणी मुसळधार पावसाला सुरुवात होईल अस्वस्थ वाटत होते. मी तिथे पोहोचल्यावर वाड्याचं दृश्य थोडं भयाण वाटलं. ती जागा पूर्णपणे उध्वस्त झाली होती. भिंती पडल्या होत्या, आणि छप्परही जवळपास गायब झालं होतं. तरीही वाड्याच्या भोवतालच्या वातावरणात काहीतरी विचित्र जाणवत होतं. शांतता इतकी जड होती की ती मला आतून चिरडत होती. मी वाड्याच्या दाराजवळ पोहोचलो. दाराची उंची अजूनही तशीच होती, पण त्यावर जळमटं आलेली होती, आणि ते हात लावताच चरचरू लागलं. मी मनातली भीती बाजूला ठेवत आत पाऊल टाकलं. आत प्रवेश करताच एक विचित्र थंडी जाणवली. बाहेर च वातावरण पूर्ण वेगळं आणि इथलं वातावरण थंड होतं. मी टॉर्चचा प्रकाश पुढे टाकत हळूहळू चालत होतो.
पहिला हॉल मोठा आणि रिकामा होता. जमिनीवर धूळ साचली होती, जणू कित्येक वर्षांपासून कोणाचंच पाऊल इथे पडलं नव्हतं. पण अचानक मला एक विचित्र आवाज ऐकू आला. पाठीमागे वळून पाहिलं, तर काहीच नव्हतं. हृदयाची धडधड वाढली होती. मी स्वतःला शांत करायचा प्रयत्न केला आणि पुढे चालत राहिलो. वाड्यातल्या जुन्या जिन्यावरून वरच्या मजल्याकडे जाणं हे आव्हानात्मक होतं कारण प्रत्येक पाऊल उचलताच ते चरचरू लागत होतं.
वर पोहोचल्यावर मला एका खोलीतून कुजबुजल्याचा आवाज ऐकू आला. मी जवळ जाताच आवाज अचानक थांबला. खोलीत प्रवेश करताच मला अंगावर काटा येईल असं दृश्य दिसलं. एका कोपऱ्यात, धुळीच्या थराखाली झाकलेला एक जुना आरसा होता, पण त्यात माझ्या प्रतिमेऐवजी काहीतरी वेगळं दिसत होतं. एक धूसर आकृती, अगदी अस्पष्ट, जणू काही ती दुसऱ्या जगातून मला बघत आहे असं वाटत होतं. माझा श्वास रोखला गेला, मी पटकन मागे वळलो आणि खोलीतून बाहेर पडलो. माझं मन गोंधळलेलं होतं. काय पाहिलं मी? खरंच काहीतरी होतं का, की फक्त माझ्या मनाचे खेळ होते? मी परत जाण्याचा विचार करत होतो, पण मला वाटलं की अजून खोल्यांत जाऊन बघायला हवं. कदाचित याचं काहीतरी स्पष्टीकरण असावं. मी आणखी एका खोलीत प्रवेश केला. या खोलीतलं वातावरण वेगळंच होतं. एक विचित्र थंड हवा माझ्या अंगावर आली. खोलीत जुनी, मोडकळीस आलेली फर्निचर होती, आणि एका टेबलावर धूळ साचलेली होती. या सगळ्या गोष्टी न्याहाळात असतानाच एका कोपऱ्यात काहीतरी हलल्याचं मला जाणवलं. मी टॉर्चची दिशा तिकडे वळवली, पण काहीच दिसलं नाही. मात्र वातावरणातली ती घनता वाढत चालली होती. मला जणू काहीतरी भयंकर गोष्ट जवळ येत आहे असं जाणवलं.
माझं हृदय वेगाने धडकू लागलं. अचानक, मागून एक थंडगार स्पर्श जाणवला. मी वळून पाहिलं, पण तिथे कोणाचाही मागमूस नव्हता. त्या क्षणाला मी अक्षरशः भीती ने थरथरू लागलो. आता माझ्या लक्षात आलं की गावातले लोक जे सांगत होते ते खोटं नव्हतं. या वाड्यात काहीतरी अमानवीय शक्ती आहे, जी मला जाणवू लागली होती. मी घाईघाईने पायऱ्या उतरू लागलो. प्रत्येक पाऊल उचलताच, असं वाटत होतं की कुणीतरी माझ्या पाठीमागे येतंय. त्या खोली पासून मुख्य दारा पर्यंत चा प्रवास मला तासा सारखा वाटू लागला. अखेर मी मुख्य दारापाशी पोहोचलो, आणि जिवाच्या आकांताने बाहेर पळालो. बाहेर पडल्यावर मी एक क्षण थांबलो, श्वास घ्यायचा प्रयत्न करू लागलो कारण मला धाप लागली होती.. आकाश अजूनही भरलेलं होत. पण आता त्यात विजा चमकत होत्या. मला वाटलं की मी वाड्याच्या बाहेर आहे, पण त्या वाड्याचं भयानक अस्तित्व माझ्या आत डोकं वर काढत होतं.
पाय लटपटत असतानाही मी घराकडे धाव घेतली. त्या रात्रीनंतर मला झोप येणं कठीण झालं. प्रत्येक क्षणी मला वाड्यातल्या त्या भयाण क्षणांची आठवण होत होती. मी जे काही पाहिलं होतं ते खोटं नव्हतं, आणि आता माझ्या मनात एकच प्रश्न होता – त्या वाड्यातली ती शक्ती नक्की काय होती? ती केवळ कल्पना होती की खरोखरच काहीतरी अमानवीय अस्तित्व? गावात परत आल्यावर मी गावकऱ्यांना पुन्हा काहीही विचारलं नाही. मी त्या रात्रीचा अनुभव कुणालाही सांगितला नाही. मला माहीत होतं की ते मला म्हणतील – “आम्ही तुला आधीच सावध केलं होतं.” पण माझं मन त्या वाड्याच्या रहस्यात अडकून पडलं होतं. ती जागा आता माझ्या स्वप्नांमध्ये यायला लागली होती. प्रत्येक रात्री मला तोच आवाज ऐकू येत होता, तेच स्पर्श जाणवत होते. आणि एके दिवशी मी ठरवलं, त्या वाड्याचं सत्य शोधायचं. पण या वेळेला मी एकटा जाणार नव्हतो.
त्या भयाण रात्रीनंतर काही दिवस गेले होते, पण माझं मन अजूनही त्या वाड्याच्या आठवणींनी झाकोळलं होतं. जरी मी त्या ठिकाणाहून पळून आलो असलो, तरी मनातून मी अजूनही तिथेच अडकलो होतो. प्रत्येक रात्री मला तोच वाडा, तीच अंधारमय खोली आणि त्या विचित्र कुजबुजण्याचे आवाज ऐकू येत होते. तेच स्वप्न, स्वप्नात मी पुन्हा पुन्हा त्या आरशासमोर उभा राहतो, आणि त्यात दिसणारी धूसर आकृती माझ्यावर टक लावून बघत असते. मी जागा होईपर्यंत त्या आकृतीचे डोळे माझ्या आत्म्याला छेदत राहतात. पुन्हा पुन्हा तेच स्वप्न. जणू त्या आरश्यातली धूसर आकृती मला, माझ्या आत्म्याला आतून पोखरत चालली होती. झोपेतून उठताना माझं संपूर्ण शरीर घामाने निथळलेलं असायचं. आता मला कळलं होतं कि त्या वाड्यात काहीतरी असं आहे ज्याचं गूढ उलगडणं माझ्या पलीकडचं आहे.
पण माझा धीर अजून सुटला नव्हता—माझं मन मला सतत तिथे परत जाण्याची आज्ञा देत होतं. पुन्हा मी ठरवलं की या वेळी मी एकटाच जाणार नाही. मी माझा मित्र विशालला बोलावलं. विशाल हा माझ्या शाळेपासूनचा मित्र होता, तो नेहमीच उत्सुक असायचा आणि कशाला ही घाबरत नव्हता. मी त्याला सर्व गोष्ट सांगितली. त्याला आधी विश्वास बसला नाही, पण माझ्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव पाहून त्याला समजलं की काहीतरी भयानक घडलेलं आहे. “तू म्हणतोस ते खरं असेल, तर आपण नक्की जाऊ,” विशाल म्हणाला, “पण यावेळी आपण थोडी तयारी करून जाऊया. टॉर्च, काही धूप किंवा माळ, आणि आपल्याला हवं असल्यास गावच्या काही अनुभवी लोकांना बरोबर घेऊन जाऊ शकतो.” माझं मन आता निर्धाराने भरलेलं होतं. आम्ही दुसऱ्या दिवशी रात्रीचं जायचं ठरवलं. ही वेळ पूर्वीपेक्षा वेगळी असणार होती, आणि कदाचित या वेळी आम्ही त्या वाड्याच्या रहस्याचा उलगडा करू शकणार होतो.
रात्रीची वेळ झाली, आणि आम्ही त्या भयाण वाड्याकडे निघालो. विशालने काही धूप, एक माळ, आणि एक धातूचं तावीज घेतलं होतं, ज्याबद्दल तो म्हणाला की ते वाईट शक्तींपासून वाचवेल. मी त्याला फारसं काही विचारलं नाही, कारण आता माझं मन या गोष्टींचं सत्य जाणून घेण्यावरच केंद्रित होतं. वाड्याजवळ पोहोचल्यावर तोच भयानक थंडावा जाणवला. आभाळ पुन्हा काळवंडलं होतं, जणू काही त्याही अंधाराने या जागेच्या शापित असण्याला मान्यता दिली होती. या वेळी विशाल आणि मी दोघंही टॉर्च हातात धरून, काळजीपूर्वक आत प्रवेश केला. विशालने धूप पेटवलं, आणि वातावरणात एक विचित्र सुवास दरवळू लागला. “या वेळी आपण सगळं नीट पाहून, काय खरं आहे ते जाणून घेऊ,” विशाल म्हणाला. त्याचं धैर्य मला काही प्रमाणात आधार देत होतं. आम्ही हॉलमधून पार होत, त्याच जुन्या जिन्यावर पाय ठेवला. चरचरण्याचा आवाज पुन्हा ऐकू आला, पण या वेळी आम्ही दोघांनीही त्याची पर्वा केली नाही. वरच्या मजल्यावर पोहोचल्यावर, मला परत तीच कुजबुज ऐकू आली.
विशालने ताबडतोब टॉर्च त्या दिशेने फिरवली, पण काहीच दिसलं नाही. “इथे नक्कीच काहीतरी आहे,” तो पुटपुटला. त्याच्या आवाजात पहिल्यांदा एक अस्वस्थता जाणवली. आम्ही हळूहळू त्या खोलीकडे चालत होतो जिथे मी ती विचित्र आकृती पाहिली होती. विशालने धूपाच्या धुराचे वर्तुळ त्या खोलीच्या दारासमोर तयार केले. आम्ही दोघंही खोलीत शिरलो. आतलं वातावरण जड झालं होतं. टॉर्चच्या प्रकाशात पुन्हा तो आरसा दिसला—जुना, धुळीनं भरलेला, कदाचित आत काहीतरी विचित्र लपलेलं होतं. “तू या आरशाबद्दल बोलला होतास ना?” विशालने विचारलं. मी होकारार्थी मान हलवली. “चला, बघूया काय होतं ते,” तो म्हणाला आणि आरशाच्या समोर उभा राहिला.
काही क्षण काहीही घडलं नाही, पण अचानक आरशात एक हलचाल झाली. विशाल आणि मी दोघांनीही टॉर्चचा प्रकाश आरशावर केंद्रित केला, आणि आम्हाला तीच आकृती पुन्हा दिसली—ही आकृती या वेळी आणखी स्पष्ट होती. तिचे डोळे काळे, गडद आणि भयानक होते. ती आरशातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असल्यासारखी दिसत होती. विशालने धूपाचं वर्तुळ आरशासमोर धरलं, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. “आपल्याला इथून बाहेर पळायला हवं,” तो घाबरून म्हणाला. आता आम्हा दोघांनाही त्या आकृतीच्या अस्तित्वाचा ठामपणे विश्वास बसला होता. आम्ही मागे वळलो आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण खोलीचं दार अचानकच बंद झालं. आतलं वातावरण जड होऊ लागलं आणि आम्हाला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. आकृती आता आरशात स्पष्टपणे दिसू लागली होती, आणि ती आरशातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. आमचं हृदय धडधडत होतं, आणि आम्ही परत खोल खोलीच्या दारावर जोरजोरात धक्का मारू लागलो.
विशालने तावीज धरलं, आणि काहीतरी बोलू लागला. त्या क्षणी अचानकच दार उघडलं, आणि आम्ही दोघंही बाहेर पडलो. जिना उतरतानाच आम्हाला कुठून तरी मोठा आवाज ऐकू आला—जणू काही ती आकृती आमच्या मागावर असावी. आम्ही एकदाचं वाड्याच्या बाहेर पोहोचलो. विशालचा चेहरा फिक्का पडला होता, आणि माझं अंग शेकत होतं. आम्ही दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं, आणि काही न बोलताच आम्ही गावाकडे पळालो. त्या रात्री नंतर आम्ही दोघंही त्या वाड्याच्या जवळ जाण्याचं धाडस कधीच केलं नाही. गावातल्या लोकांना काहीही सांगितलं नाही. पण आम्हाला माहीत होतं—तो वाडा खरंच शापित आहे. आता, त्या वाड्याचा विचार जरी आला तरी अंगावर काटा येतो. आणि दर रात्री, जरी मी झोपायचा प्रयत्न केला, तरी मला असं वाटतं की ती आकृती अजूनही मला शोधत आहे… त्या शापित वाड्याच्या आरशातून.