अनुभव – समर्थ रायकर
गोष्ट माझ्या आजोबांची आहे. ते लहान असताना त्यांच्या गावात राहायचे. त्या काळी भूत, आत्मा यांचा खूप वास असायचा त्या गावात. खर सांगायचं तर अगदी आजही कधी गावात गेलो तर रात्री अपरात्री विचित्र भास होतात. आजोबांचे संपूर्ण कुटुंब म्हणजे त्यांचे चुलत काका वैगरे सगळे तिथेच राहायचे. आजोबा सोनाराचे काम शिकायला शहरात जायचे.
हा अनुभव त्यांना गणेश विसर्जनाच्या दिवशी जेव्हा ते घरी परतत होते तेव्हा आला होता. तेव्हा ते अवघे १७-१८ वर्षांचे असावेत. गावी दार वर्षी आमच्या घरी गणपती बसवायचे. सगळी भावंडं एकत्र यायची आणि अगदी उत्साहात गणेशोत्सव साजरा करायचे. आजोबा शहरात काम शिकायला आल्यामुळे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी त्यांच्या भावा सोबत येणार होते. तो ही जवळच्या गावात च रहायचा. त्यांना त्या दिवशी सावकाराकडून सगळे काम आटोपून निघायला बराच उशीर झाला. त्यामुळे एस टी ने गावात पोहोचेपर्यंत त्यांना रात्रीचे साडे दहा झाले. गावातल्या बस स्टँड वर ते उतरले. रात्र झाल्यामुळे वाहन मिळणार नव्हते म्हणून ते घराकडे चालत च निघाले. आमचे घर तिथून जवळपास ३ किलोमिटर अंतरावर होते.
त्या काळी वस्ती अगदी तुरळक, त्यात खेडेगाव त्यामुळे इतक्या रात्री कोणीही नसायचे. निर्मनुष्य रस्त्यावर आजोबा आणि त्यांचा भाऊ चालत निघाले. गावकऱ्यांकडून ऐकलेल्या भुतांच्या गोष्टी आठवू लागल्या तसे हळु हळु मनात भीती घर करू लागली. त्यांनी चालण्याचा वेग वाढवला. तितक्यात त्यांना रस्त्याच्या दुसऱ्या कडेला त्यांच्या सोबत एक बाई चालताना दिसली. त्यांनी नीट पाहिल्यावर कळले की ती त्यांच्याच गावातली आहे. त्यांना जरा हायसे वाटले. घरी गावात जाईपर्यंत कोणाची तरी सोबत झाली. साधारण वयाची साठी ओलांडलेली बाई होती. तिचे नाव हम्मी होते. त्यांना आठवले की जेव्हा ते गाय चरायला न्यायचे तेव्हा ती त्यांना वाटेत भेटायची आणि त्यांच्या शी बोलत बसायची. घरची चौकशी करायची. त्यांनी तिला हाक दिली “माऊशी इतक्या उशिरा येताय.. कुठे बाहेरगावी गेला होता का..?” तिने मात्र साधे पाहिले ही नाही. म्हणून त्यांनी पुन्हा विचारले. तरीही तेच. ती बाई आपल्याच धुंदीत चालत होती. आजोबा गप गुमान रस्त्याने चालत राहिले. त्यांचे घर येण्याआधी त्यांचे शेत लागायचे.
जसे ते शेता जवळ पोहोचले ती बाई रस्ता बदलून कुठे तरी अंधारात निघून गेली. विचित्र गोष्ट म्हणजे ती एका क्षणार्धात अंधारात गुडूप झाली. त्यांना वाटले की काही काम असेल म्हणून गेली असेल दुसऱ्या वाटेने. त्यांनी दुर्लक्ष केलं आणि ते चालत घरी आले. रात्र झाल्यामुळे जास्त कोणाशी काही न बोलता ते झोपून गेले. पुढचे २ दिवस गणेशोत्सव थाटात पार पडला. तिसऱ्या दिवशी त्यांनी वडिलांना त्या रात्रीचा प्रकार सांगितला. आई त्यांचे बोलणे ऐकत होती. ती पटकन म्हणाली “हमी कशी भेटेल तुला.. ती २ महिन्यांपूर्वी ओढ्या कडे मासे पकडताना पाण्यात वाहून गेली.. दुसऱ्या दिवशी पलीकडच्या गावात तिचे प्रेत सापडले..” आई चे हे वाक्य ऐकून त्यांना धक्का बसला आणि भीती ने जागीच बेशुद्ध झाले. पुढचे काही दिवस त्यांनी अंथरूण धरले होते. पण त्यांना एक गोष्ट जाणवली की तिने आपल्याला काहीच केले नाही. ती हयात असताना ही काळजी करायची, घरच्यांची विचारपूस करायची. बहुतेक ती त्यांना घरापर्यंत सुखरुप सोडायला आली होती.