अनुभव – यश गायकवाड
प्रसंग माझ्या वडिलांसोबत घडला होता जो साधारण 10 ते 11 वर्षांपूर्वीचा आहे. माझे बाबा तेव्हा पोलीस खात्यात होते. त्यांना बऱ्याचदा नाईट शिफ्ट मिळायची. त्या दिवशी पावणे दहा, दहा ला रात्री चे जेवण आटोपून ते आपल्या ड्युटी वर जायला निघाले. त्यांना एका मोठ्या बिल्डिंग ची ड्युटी होती. ती चेक करायची आणि मग तिथेच थांबायचे. त्यांच्या सोबत त्यांचा एक सहकारी मित्र सोबत होता. साधारण 12 च्या सुमारास त्यांनी संपूर्ण तपासणी करून लॉबी मध्ये बसायची व्यवस्था केली. काही वेळा नंतर ते डोळे मिटून पडून राहिले. साधारण 2 च्या सुमारास त्यांना खूप अस्वस्थ वाटू लागले म्हणून ते उठले. अस्वस्थ वाटण्याचे कारण म्हणजे त्यांना छातीवर भार असल्यासारखे वाटत होते. जणू काही त्यांच्या छातीवर कोणी बसले आहे. त्यांनी आपल्या सहकारी मित्राला हाक मारली. त्या मित्राने काय झाले विचारल्यावर बाबांनी काय वाटतेय ते सांगितले.
त्यावर तो म्हणाला कि कामाच्या तणावामूळे तसे जाणवत असेल, जास्त विचार नको करुस थोड्या वेळ झोप हवे तर.. बाबांनी झोपायचा प्रयत्न केला आणि त्यांना एकदम गाढ झोप लागली. सकाळ झाली तसे त्यांना खूप थकल्या सारखे आणि शरीरात त्राण नसल्यासारखे जाणवू लागले. ते कसे बसे घरी आले. आल्या आल्या सगळा प्रसंग आजीला सांगितला. आजीने काळजी पोटी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा तिला कळले कि बाबा तापाने फण फणत आहेत. माझ्या आजी ला अश्या गोष्टी पटकन जाणवायच्या. तरीही आधी डॉक्टरांना दाखवून पहिले पण त्यांचा ताप काही कमी होत नव्हता. काही दिवस झाले पण ताप कमी होण्याची चिन्हे दिसत नव्हती. आणि या सगळ्यात बाबांची अवस्था खूप च खालावली होती. शेवटी आजी ने निर्णय घेतला.
तिने अजून वेळ न घालवता बाबांना बाहेरची बाधा बघणाऱ्या एका वयस्कर बाई कडे घेऊन गेली. बाबा तापामुळे खूप ग्लानीत होते म्हणून त्यांना काही कळले नाही. त्या वयस्कर बाई ने पाहता क्षणी च म्हंटले कि काल अमावस्या होती, हा घरी येताना एकटा नाही आलाय तर कोणाला घेऊन आलाय म्हणून हा तापाने फणफणतोय. त्या वयस्कर बाई ने उपाय सांगितला. एक लिंबू ओवाळून घ्या आणि सोबत दोन अगरबत्त्या घेऊन त्या जागेवर ठेऊन या. याची बाधा दूर होईल. पुढच्याच दिवशी बाबांचा ताप पूर्ण उतरला. ते एकदम ठणठणीत बरे झाले आणि नोकरीवर हजर ही झाले. त्या नंतर बाबांना आज तागायत कसलाही विचित्र अनुभव आला नाही.