आम्ही 4 मित्र मी, अमोल, विनय, आणि सुरज – एकमेकांचे घट्ट मित्र होतो. शाळेपासूनच आम्ही एकमेकांच्या सोबत होतो, आणि आमची मैत्री वर्षानुवर्षे घट्ट होत गेली. आम्हाला प्रवास करायला प्रचंड आवडायचं त्यामुळे वेळ मिळाला कि लगेच नवीन ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन व्हायचा. यावेळी आम्ही एका दूरच्या गडावर रात्रभराचा प्रवास करायचं ठरवलं होतं, जिथे फार कमी लोक जायचे. आमचा हा प्रवास नेहमीसारखाच मस्ती, हशा आणि गप्पांमधून सुरू झाला. अमोल गाडी चालवत होता, मी गुगल मॅप उघडून रस्ता पाहत होतो, तर सुरज आणि विनय मागच्या सीटवर आरामात आडवेळ पडले होते. गडावरच्या या प्रवासाची योजना गेल्या काही महिन्यांपासून सुरु होती, आणि शेवटी हा दिवस उजाडला होता. गडाचा रस्ता काहीसा बिकट आणि दाट जंगलातून जाणारा होता, पण आम्हा चौघानाही याचा उत्साहच जरा जास्त होता. प्रवासाची वेळ रात्रीची होती, कारण गडावर रात्री जाण्यात एक वेगळाच थरार वाटायचा.
सुरुवातीला सगळं एकदम मजेत चाललं होतं. गाडीत आमच्या आवडत्या गाण्यांची प्ले लिस्ट चालू होती. सुरजच्या हातात नेहमीसारखी एक नवी गोष्ट होती – एक कॅमेरा, ज्यात तो या प्रवासाचे फोटो आणि व्हिडिओ घेत होता. “ही ट्रिप तर आपली कायम लक्षात राहील,” तो मोठ्याने बोलला. मी मात्र एकदम शांत झालो होतो कारण त्या जंगलातल्या जुन्या, भयानक गोष्टी मला आठवू लागल्या. जणू मी इथे आधी येउन गेलोय. अचानक या आठवणी कश्या आल्या हेच मला समजत नव्हत. लहानपणी इथे येण्याचा प्रश्नच नव्हता. आठवण्याऱ्या गोष्टीही अगदी ताज्या असल्यासारख्या वाटत होत्या. फरक फक्त एवढाच होता कि त्या आठवणीमध्ये माझ्या सोबत असणारे मित्र कोणी वेगळेच होते.
मी अमोल आणि सुरुज ला म्हणालो कि मला कस तरी वाटतेय, एक अनामिक भीती जाणवतेय. पण मित्रांनी मला हसण्यावारी नेलं. “काय रे फट्टू, इतकं घाबरायचं नाही. आम्ही आहोत ना सोबत,”. रात्र जसजशी गडद होत गेली, तसतसं आम्ही जंगलाच्या जवळ येऊ लागलो. रस्ता अरुंद होत होता, आणि झाडं दाट होऊन गाडीच्या दोन्ही बाजूंनी वाकली होती. एका विशिष्ट वळणावर आल्यावर अचानक गाडीला झटका बसला आणि ती थांबली. मी पटकन विचारले “अरे, काय झालं?” अमोलने गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, पण काहीच फायदा झाला नाही. जंगलात एक विचित्र शांतता पसरली होती, जी आधी आम्ही कधीच अनुभवली नव्हती. वातावरणात काहीतरी अस्वस्थ करणारं होतं, पण नेमकं काय ते कळत नव्हतं. “आपण बाहेर जाऊन पाहू का? कदाचित एखादा दगड किंवा लाकडाचा ओंडका गाडी पुढे आला असावा,” विनयने सुचवलं. सगळे गाडीतून उतरले. घनदाट झाडं, ठेचाळणारा रस्ता, आणि अंधारामुळे जंगल अजूनच भयावह वाटत होतं.
सुरज हळूहळू आजूबाजूला बघत होता, आणि त्याला ही जाणवत होतं की इथे काहीतरी वेगळं आहे. तो कॅमेराचा फ्लॅश लावून फोटो घ्यायला लागला, पण प्रत्येक फ्लॅशमधून काहीतरी अज्ञात उलगडतंय असं त्याला वाटत होतं. काही क्षणात, त्या ठिकाणी काहीतरी भयानक घडणार असल्याची चाहूल लागली, पण अजून त्याचं स्वरूप अस्पष्ट होतं. गाडी बंद पडल्यावर आम्ही चौघे ही गोंधळले होतो. अमोलने पुन्हा एकदा गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, पण गाडीने काहीच प्रतिसाद दिला नाही. गाडीत अंधार दाटून आला होता, आणि जंगलाच्या बाहेरून फक्त झाडांची कुजबुज ऐकू येत होती. मी गाडीच्या बाहेर येऊन इंजिन तपासण्याचा प्रयत्न केला पण बिघाड झाल्याचे एक ही चिन्ह कुठे दिसत नव्हते.
“कदाचित आपल्याला इथेच रात्री थांबावं लागेल,” सुरजने विचार केला, त्याच्या आवाजात हलकीशी भीती होती. मात्र, त्याच्या डोळ्यात अजूनही ते साहस दिसत होतं.
“नाही रे, काहीतरी उपाय करू. आपण इथं थांबणं सुरक्षित नाही,” अमोल थोडा तणावात होता. पण त्याच वेळी, मी मात्र जवळच्या झाडांवर नजर ठेवून होतो, कारण मला सतत असं वाटत होत कि ही जागा ओळखीची आहे आणि त्या झाडामागून आम्हाला कोणी तरी लपून पाहतय.
“तुम्हाला काहीतरी विचित्र वाटतंय का?” मी प्रश्न केला.
“विचित्र?” अमोलने माझ्याकडे पाहिलं.
“हो. मला जणू कुणीतरी आपल्याला बघतंय असं वाटतंय. काहीतरी या झाडांमध्ये लपलेलं आहे,” माझी भीती वाढत चालली होती.
अचानक सुरजच्या कॅमेऱ्याचा फ्लॅश चालू झाला. तो जंगलातल्या एकेक झाडाचे फोटो काढत होता, जणू काही शोधत होता. “हो विनय काहीतरी वेगळं आहे इथे,” तो बोलला.. तितक्यात माझ्या तोंडून नकळत एक वाक्य बाहेर पडलं “माझ्या आठवणी जाग्या होतायत. हे ठिकाण मला ओळखीचं वाटतंय.”
अमोल ने विचारले “तुला कशाबद्दल बोलायचंय?”
मी अगदी गूढ नजरेने जंगलाकडे पाहिलं आणि म्हणालो “मला असं वाटतंय की मी या जागी पूर्वी आलो होतो. काहीतरी भयंकर घडलं होतं इथे, आणि ते आता पुन्हा घडणार आहे.. माझ्या मागच्या जन्मात… मी इथेच मेलो होतो.”
हे ऐकताच ते तिघे ही हादरले. मला ही कळतं नव्हतं मी काय बोलतोय पण जणू आपसूक ते माझ्या तोंडून बाहेर पडत होत.
“मागचा जन्म? काय बोलतोस तू?” सुरज ने घाबरत विचारलं.
तेवढ्यात माझा चेहरा बदलायला लागला आणि मी बोलू लागलो “होय, मी इथेच मेलो होतो… 25 वर्षांपूर्वी.. आणि या जंगलातल्या जखीणीने माझा जीव घेतला होता.. तिचं जखीण आता या क्षणाला समोरच्या झाडामागे उभी राहून आपल्याला पाहतेय…” सुरज ने झटकन कॅमेरा फ्लॅश त्या दिशेला फिरवला. तर त्या गडद अंधारात झाडाच्या खोडावर एक हाताचा पंजा दिसला आणि त्याच सोबत तिचे हिरवट डोळे चमकून गेले. ते तिघे ही घाबरून काही पावलं मागे सरकले. आज पर्यंत ज्या गोष्टी फक्त ऐकल्या होत्या त्या आता आम्ही सगळेच प्रत्यक्ष अनुभवत होतो. अमोल ने मला पकडून गाडीत बसवलं आणि आम्ही सगळे त्या भागातून सुसाट वेगात निघालो. गाडी प्रचंड वेगाने रस्त्यावरून धावत होती, आणि आमच्यापैकी कुणीही मागे वळून पाहण्याची हिम्मत करत नव्हतं. गाडीच्या आतल वातावरण संपूर्ण भयाने व्यापलेलं होतं. सगळ्यांचेच चेहरे घामाने ओले झाले होते, आणि श्वासांची लय ही बिघडली होती. आम्ही बरेच अंतर पार करून पुढे आलो होतो म्हणून अमोल ने गाडीचा वेग कमी केला आणि ती एका ओसाड रस्त्याच्या कडेला थांबवली.
“आपण आता सुरक्षित आहोत ना?” सुरजने भेदरलेल्या आवाजात विचारलं. त्याचे हात अजूनही कॅमेऱ्याच्या फ्लॅशवर होते, जणू काही ते एकमेव अस्त्र होतं ज्यावर त्याला आता विश्वास होता.
मी गडबडलेल्या अवस्थेत म्हणालो, “ती जखीण सोडत नाही इतकं सहज. हे जंगल तिचं आहे आणि आपण तिच्या सापळ्यात अडकलो आहोत. जसं मी 5 वर्षांपूर्वी अडकलो होतो…”
“काय बोलतोयस तू?” अमोल चिडलेल्या स्वरात म्हणाला. “हे सगळं काय आहे? तू मेलास? मग आता इथे कसा आहेस?”
माझ्या डोळ्यांत काही क्षणांसाठी जुन्या आठवणींनी तुफान उभं केलं. “होय,” मी हळू आवाजात म्हणालो, “मी मेलो होतो. जखीणने माझा आत्मा या जंगलात कैद करून ठेवला होता. गेले 25 वर्षं मी इथंच भटकत होतो, कारण ती मला जाऊ देत नव्हती. पण एके दिवशी एक सिद्ध पुरुष आला आणि त्याने मला तिच्या तावडीतून सोडवले. आणि माझा पुनर्जन्म झाला… पण ती जाखीण आता माझ्या सोबत तुम्हाला ही सोडणार नाही.. कारण तिच्या तावडीतून सुटणे शक्य नाही. तीला मिळालेली संधी ती सोडत नाही. पण मला त्या सिद्ध पुरुषाने सांगितलेल्या काही गोष्टी अजूनही लक्षात आहेत.
जणू त्या माझ्या शरीरात कोरल्या गेल्या आहेत, या जन्मात ही मला त्या पूर्णपणे ज्ञात आहेत. काही दैवी मंत्र जे आपल्याला तिच्या तवाडीतून सोडवू शकतात. पण या साठी तिचा चेहरा दिसणं आवश्यक आहे. कारण असं म्हणतात कि जखीण नेहमी आपला चेहरा अंधारात ठेवते कधी दिसू देत नाही. तिच्या शक्तिवर मात करायची असेल तर आपल्याला तिचा चेहरा दिसायला हवा. हे सगळे ऐकल्यावर ते तिघे ही धड धडत्या काळजाने माझ्या कडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यांवर फक्त भितीचं सावट नव्हतं, तर आश्चर्य ही होत. गाडीच्या बाहेरचा अंधार जणू आतल्या परिस्थितीला परावर्तित करत होता.
“पण आपण तिचा सामना करायला हवा.. असे पळून जाऊन काहीच उपयोग नाही. कारण तिच्या मर्जी शिवाय आपण या जंगलातून कधीही बाहेर पडू शकणार नाही. अमोलने घड्याळाकडे पाहिलं आणि मान हलवत म्हणाला, “माझं मन अजूनही या सगळ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. पण गेल्या काही वेळात घडलेल्या गोष्टी अनुभवून तुझं बोलणं खोटंही वाटत नाही.”
आम्ही गाडीच्या बाहेर पडलो आणि कॅमेऱ्याचा फ्लॅश तयार ठेवला. तेवढ्यात एक जोरात वाऱ्याची झुळूक आली, आणि त्या झुळुकेसोबत एक विचित्र आवाज कानांवर आदळला – जणू ती जखीण आम्हाला डीवचत होती .
“तुम्ही तयार आहात का?” मी त्यांना सावध करत विचारलं. अमोलने निर्धाराने मान हलवली आणि सुरजने कॅमेऱ्याचा फ्लॅश उजळवला. आम्ही सर्व त्या अंधाराच्या दिशेने पावलं टाकली, जणू काही त्या जखीणीच्या सामर्थ्याचा सामना करण्यासाठी तयार झालो होतो. ता आम्ही सर्व त्या अज्ञात भितीच्या साम्राज्यात पाऊल ठेवत होतो, त्या जखीणीच्या भयाण जगात प्रवेश करत होतो.
“आपल्याला तिचा चेहरा दिसायला हवा,” मी परत एकदा मित्रांना सावध करत म्हटलं. “कॅमेऱ्याचा फ्लॅश तयार ठेवा, आणि सावध राहा.”
गाडीच्या बाहेर येताच जंगलातील वातावरण आणखीनच घनदाट आणि भयंकर वाटू लागलं. झाडांच्या फांद्यांमधून येणारा वाऱ्याचा आवाज जणू काही भयानक कुजबुज होती. सगळं वातावरण जखीणीच्या सावटाने व्यापलं होतं. सुरजने कॅमेरा कसून धरला, अमोल आणि विनयही भितीने थरथरत, पण निर्धाराने त्याच्या बाजूने उभे होते. अचानक वाऱ्याचा एक जोरदार झोत आला, आणि त्या झोतासोबत एक विचित्र, किंचाळणारा आवाज कानांवर आला. “ती इथेच आहे!” मी ओरडलो.
सुरजने कॅमेराचा फ्लॅश लावला आणि त्याच वेळी, समोरच्या झाडाच्या मागे एका विचित्र, हिरवट चमकणाऱ्या डोळ्यांची जाखीण दिसली. त्या झळाळत्या डोळ्यांमधून जखीणीची ताकद जाणवत होती. “ती तिथे आहे!” विनय घाबरून ओरडला.
माझ्या मनात दैवी मंत्रांचे शब्द स्पष्ट झाले. “तयार राहा,” मी आवाजात ठामपणा आणत म्हटलं. जखीण आता त्यांच्या समोर पूर्ण रूपात उभी राहिली होती – तिचा चेहरा अतिशय भयाण, केस विस्कटलेले, डोळे प्रचंड क्रोधाने भरलेले होते.
“आता तिला सामोरे जायची वेळ आली आहे,” मी विचार केला. आम्ही सर्वांनी कॅमेऱ्याचा फ्लॅश एकाच वेळी तिच्याकडे केला, आणि माझ्या ओठांवर दैवी मंत्र सुरु झाले.
त्या मंत्राचा प्रभाव जाणवताच जखीणीच्या चेहऱ्यावर वेदनांचे चिन्ह दिसायला लागले. ती किंचाळू लागली, वेदनेने तडफडू लागली. त्या क्षणाला वाटलं की आम्ही तिच्यावर मात करू शकतो, पण अजूनही तिची शक्ति कमी होत नव्हती. तिच्या किंचाळण्याने हृदय धड धडत होत. पण शेवटी, मंत्राची ताकद वाढत गेली. जखीण हळूहळू कमजोर होत गेली, तिचं शरीर अंधारात विलीन होऊ लागलं, तिचा चेहरा क्षणोक्षणी अस्पष्ट होत गेला. काही क्षणांमध्येच ती पूर्णपणे नाहीशी झाली आणि त्याच सोबत सगळं वातावरण शांत झालं.
आम्ही सगळेच थकलेलो, घामाने निथळलो होतो. सुरजने कॅमेरा खाली ठेवला, आणि त्या भयाण शक्तीपासून मुक्त झाल्याची भावना सगळ्यांच्या चेहऱ्यावर होती.
“आपण तिला हरवलं,” अमोल हळू आवाजात म्हणाला, अजूनही त्याच्या आवाजात थरथर होती.
“हो,” मी उत्तर दिलं. तेव्हा आम्ही सगळे पुन्हा गाडीत जाऊन बसलो होतो. पहाट झाली होती, पक्षांचा किलबिलाट कानावर पडू लागला. दूर कुठून तरी मंदिरातून घंटानाद ऐकू येत होता. प्रसन्न वाटत होत कारण आम्ही एका भयाण प्रसंगातून सुखरूप पणे बाहेर पडलो होतो. गडावर जाण्याचा बेत बाजूलाच राहिला. आम्ही मनोमन देवाचे आभार मानून घरची वाट धरली. पुनर्जन्म वैगरे या गोष्टींवर मला ही विश्वास नव्हता पण स्वतःचा पुनर्जन्म आठवल्यावर एक गोष्ट कळली कि या सृष्टीला, सजीवाला निर्माण करणारा तो खूप श्रेष्ठ आहे.