या सगळ्याची सुरुवात झाली जवळपास 20 वर्षांपूर्वी.. 2004 किंवा 2005 मध्ये. बऱ्याच गावात काही विशिष्ट जागा अश्या असतात ज्या शापित मानल्या जातात. माझ्या गावातही एक जागा होती. तिथे सहसा कोणी जातं नसे. रात्रीच्या वेळी काय पण भर दिवसा ही तिथे कोणीच फिरकायचे नाही. मी अगदी लहान असल्या पासून त्या जागे बद्दल ऐकत आलो होतो. खूप वेळा आजी आजोबांकडून ओरडा ही खाल्ला होता. कारण खेळता खेळता चुकून त्या भागात गेलो होतो.. गावाच्या वेशी बाहेर एका मुख्य रस्त्याच्या कडेला ती जागा आहे. तिथून लहान मुलं वैगरे गायब झाली आहेत. नुकताच काही महिन्यापूर्वी माझ्या मित्राचा लहान भाऊ तिथून बेपत्ता झाला होता. 7-8 दिवसांनंतर सापडला. कुठे होता, काय करत होता हे विचारले तर काहीच आठवत नव्हते त्याला. ज्या दिवशी सापडला त्या दिवशी शून्यात गेल्या सारखा बसून राहिला होता. नंतर बोलायला लागल्यावर ही त्याच्या सोबत नक्की काय घडले ते त्याने आज पर्यंत सांगितले नाही. मला फक्त एवढे माहित आहे कि त्या जागेवर अजूनही खूप उतारे ठेवले जातात. माझ्या कुटुंबाची गोष्ट याच रस्त्याकडेने सुरु होते.
त्या रात्री आम्ही भाड्याने गाडी करून गावी परतत होतो. मध्य रात्र उलटून गेली होती. साधारण दीड पावणे दोन वाजले असावेत. आई रात्रीचा प्रवास नको म्हणत होती पण वडिलांना सकाळी कामावर जायचे होते म्हणून आम्ही सगळेच घाई गडबडीत घरी यायला निघालो होतो. गाडीत मी, माझी लहान बहीण, आई बाबा आणि ड्राइव्हार होता. जसे आम्ही त्या जागेवर आलो आमची गाडी अचानक गचके खात बंद पडली. वडिलांनी ड्रायव्हर ला विचारले तर तो म्हणाला कि बोनेट उघडून पाहावे लागेल. पण वडील पटकन म्हणाले “ खाली उतरू नकोस.. राहू दे.. “ पण ड्रायव्हर त्यांना सांगू लागला कि काय झाले ते बघावे तर लागेलच असे किती वेळ बसून राहणार इथे.. गाडीचे इंजिन गरम झाले असेल, थंड झाले कि गाडी होईल सुरु असे काही तरी सांगून बाबा त्याला खाली उतरण्यापासून रोखू लागले..
पण त्यांचे बोलणे डावलून तो खाली उतरला. समोर जाऊन त्याने बोनेट उघडले आणि काय बिघाड झाला ते पाहू लागला. आई, मी आणि बाबा खरं तर घाबरलो होतो कारण होत ती जागा. माझी बहीण गाढ झोपली होती. त्या भागात खूप अंधार होता त्यामुळे आजु बाजूचा परिसर ही नीट दिसत नव्हता. हवेत एक विशिष्ट प्रकारचा गारवा होता. बराच वेळ झाला तो ड्रायव्हर आला नाही म्हणून बाबांनी त्याला हाक दिली “ कळले ला काही..? का बंद पडलीये गाडी.. “ पण त्याचा काहीच प्रतिसाद आला नाही. त्यांनी पुन्हा विचारले पण समोरून त्याचे उत्तर आले नाही. बाबांनी माझ्या कडे आणि आई कडे पहिले आणि म्हणाले “ मी उतरून बघतो.. “ तसे आई ने झटकन बाबांचा हात पकडला आणि त्यांना थांबवले आणि मान हलवून न जाण्याचा इशारा केला. त्यांनाही गाडीतून खाली उतरायची अजिबात इच्छा नव्हती पण नाईलाज होता. त्यांनी गाडीचा दरवाजा उघडून खाली पाय ठेवला आणि तो नेमका एका उत्ताऱ्या वर पडला. ते एकदम दचकले आणि झटकन बाजूला झाले.
बोनेट समोर येउन पहिले तर ड्रायव्हर कुठे ही दिसत नव्हता. त्यांनी बऱ्याच हाका मारल्या पण तो कुठे निघून गेला होता माहित नाही. ते पुन्हा आत येउन बसले आणि म्हणाले “ हा ड्राइव्हर कुठे निघून गेलाय काय माहित..? “ आम्ही बराच वेळ तसेच बसून राहिलो. 15 मिनिट झाली, अर्धा तास झाला, एक तास व्हायला आला. आता मात्र आई बाबांनी ठरवले कि गाडीतून उतरून पायी चालत जायचे. तसेही गावाच्या वेशी पर्यंत आलो होतो. इथून पुढे पाऊण तासाचा रस्ता होता. उतरताना माझे लक्ष खाली रस्त्यावर गेले आणि बरेच उतारे ठेवलेले दिसले. तितक्यात वडिलांच्या पायाकडे लक्ष गेले आणि मी त्यांना विचारले “बाबा तुम्ही चुकून या उताऱ्यावर पाय ठेवलात का..? तुमच्या पायाला भात वैगरे लागला आहे.. “ हे ऐकून माझे आई बाबा दोघे ही एकदम घाबरले. बाबांना माहित होत पण आई घाबरून त्यांच्याकडे पाहू लागली. त्यांनी बहिणीला, मला आणि आई ला जवळ घेतले आणि म्हणाले कि आता इथून पुढे कोणी काहीच बोलायचे नाही आणि सरळ चालत जायचे.
बाबांनी त्यांच्या कडची छोटी सेल ची बॅटरी काढली आणि त्याच्या प्रकाशात आम्ही चालायला सुरुवात केली. त्या भागात गडद धुके पसरले होते. म्हणजे खूप कमी अंतरावर च दिसत होत. आम्ही सगळेच घाबरलो आहोत हे वेगळे सांगायची गरज नव्हती. ना रात किड्यांचा आवाज होता ना हेलकावे घेणाऱ्या झाडांच्या फाद्यांचा. होती ती फक्त वातावरणात पसरलेली स्मशान शांतता आणि त्यात होणारा आमच्या पावलांचा आवाज. एव्हाना गाडी पासून खूप अंतर पुढे चालत आलो होतो. तितक्यात समोरून सर्रकन काही तरी निघून गेलं. आमची पावलं जागीच खिळली. रस्त्याच्या डाव्या बाजुहून उजव्या बाजूला काही तरी निघून गेलं होत. प्राणी नक्कीच नव्हता कारण जे काही होत ते उंचीला सहा सव्वा सहा फूट जाणवलं. आणि इतका कोणताच उंच प्राणी आमच्या भागात नाही. मला हळू हळू वाटू लागले कि आजूबाजूचा अंधार वाढत चालला आहे. त्या लहान बॅटरीचा प्रकाश तो अंधार चिरू शकत नाहीये.
तितक्यात आई जोरात ओरडली “ अहो.. इथे मागे कोणी तरी आहे.. कोणी तरी माझ्या खांद्यावर हात ठेवला होता.. मला थंडगार स्पर्श जाणवला.. “ मी किंवा बाबा काही बोलणार तितक्यात माझ्या बहिणीला चक्कर आणि तिचा तोल गेला. मी झटकन पुढे जाऊन तिला खाली पडण्यापासून वाचवले. तिला उठवण्याचा प्रयत्न केला, तोंडावर पाणी मारले पण तिला शुद्ध नव्हती. आई, बाबा आणि मी आता खूप घाबरलो होतो कारण काहीच विशेष कारण नसताना ती बेशुद्ध झाली होती. बाबांनी तिला उचलले आणि आम्ही गावाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. अर्ध्या पाऊण तासांच्या पायपिटिनंतर आम्ही घरी पोहोचलो. बहिणीला अजूनही शुद्ध आली नव्हती म्हणून आम्ही सगळेच चिंतेत होतो. इतक्या रात्री तपासायला डॉक्टर येणार नाही म्हणून सकाळपर्यंत थांबलो. सकाळी बाबा डॉक्टरांना बोलवायला जाणार इतक्यात बहिणीला शुद्ध आली. ती वेदनेने रडू लागली आणि आम्ही सगळेच काय झाले ते विचारू लागलो.
तिने पाठीकडे इशारा करत रडायला सुरुवात केली. आई ने पहिले तर पाठीवर नखाने ओरबाडल्याच्या एक नाही तर असंख्य खुणा होत्या. तिने घातलेल्या ड्रेस मुळे ते आम्हाला कोणालाही लक्षात आले नाही. आई ते पाहून रडू लागली आणि काही तरी बोलू लागली कि हे त्या चांडाळणीने केलय, तिथेच गाडी बंद पडायची होती आपली, आता ती आपल्या पोरीला जगू देणार नाही.. मी गोंधळात पडलो कि आई नक्की कोणाबद्दल बोलतेय. तिच्या पाठीवरच्या जखमा धुवून मलमपट्टी करण्यात आली. मी मात्र काय घडले कसे घडले याचाच विचार करत राहिलो. दुपार झाली, आम्ही जेवायला बसलो. तसे त्या ड्रायव्हर चा विषय निघाला, बाबा म्हणाले कि पैसे घ्यायला येईल च तेव्हा विचारू.. आमचे बोलणे सुरु असतानाच माझी बहीण अचानक जोर जोरात हसू लागली. पुढ्यातले ताट उचलून भिरकावून दिले. आणि जोरात जाऊन भिंतीवर डोकं आपटू लागली.
मी आणि बाबांनी जाऊन तिला भिंतीपासून दूर केले पण तिच्यात इतकी ताकत संचारली होती कि ती आम्हा दोघांना सावरत नव्हती. हा सगळा प्रकार मी पहिल्यांदा च अनुभवत होतो. आम्ही कसाबसा तिला सावरून पलंगावर बसवलं. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं, जणू काही ती आम्हाला ओळखतच नव्हती. आईला काय करावं कळेना. तिच्या तोंडून अजूनही तेच शब्द निघत होते – “चांडाळणीने हे केलंय, आता ती पोरीचा जीव घेणार.” बाबांनी तिला शांत बसवण्याचा प्रयत्न केला, पण आईच्या चेहऱ्यावरची भीती वाढतच चालली होती. तेवढ्यात अचानक दरवाजावर टकटक झाली. दरवाजा उघडला तर बाहेर तोच ड्रायव्हर उभा होता. त्याचा चेहरा खूपच गंभीर होता. बाबांनी त्याला विचारलं, “काय झालं होतं नेमकं?” तो काही वेळ काही बोललाच नाही, फक्त खाली मान घालून उभा राहिला.
मग हळूहळू तो म्हणाला, “साहेब, त्या रस्त्यावर आम्ही ज्या जागी थांबलो होतो, तिथे काही वर्षांपूर्वी एक मोठा अपघात झाला होता. एका मुलीचा त्या जागी मृत्यू झाला होता, आणि लोक सांगतात की तिचा आत्मा अजूनही तिथे भटकतो. कधी कधी ती लोकांना त्रास देते, झपाटते.. मी जेव्हा गाडीतून खाली उतरलो तेव्हा मला माझ्या नावाने हाक ऐकू आली आणि मी त्या दिशेने आपोआप चालत जाऊ लागलो..” हे ऐकून आईचा चेहरा अजूनच पांढरा झाला. बाबा त्याचे बोलणे मध्येच तोडत म्हणाले “कसल्या फालतू गोष्टी सांगतोस! तुझे पैसे घे आणि निघ इथून..” तो ड्रायव्हर ही काही न बोलता निघून गेला. पण माझ्या मनात शंका निर्माण झाली होती. हे सगळं योगायोग नक्कीच नव्हतं. त्यानंतरच्या रात्री, सगळं घर शांत होतं, पण आमच्या मनात मात्र एक विचित्र बेचैनी होती. माझा मित्र मला भेटायला आला होता म्हणून त्याला निरोप देऊन घरात येत असताना मला जाणवले कि एक मानवसदृश्य आकृती बहिणीच्या खोलीतल्या खिडकीत उभी आहे.
आई बाबा पैकी कोणीच नव्हते कारण ती आकृती तब्बल सहा साडे सहा फूट उंच होती. एका क्षणात मला रात्रीचा प्रसंग आठवला आणि अंगावर सर्रकन काटा येउन गेला. मी घरात आलो पण या बद्दल कोणाला काहीच सांगितले नाही कारण मला आई बाबांना हे सांगून अजून भीती दाखवायची नव्हती. त्या मध्यरात्री अचानक माझी बहीण पुन्हा किंचाळत उठली. ती बेडवरून उभी राहून जोरजोरात काहीतरी बोलत होती, पण तिचा आवाज पूर्णपणे बदलला होता. एका किळसवाण्या घोगऱ्या आवाजात ती म्हणाली “ घेऊन जाणार मी हिला.. ही मला आवडली आहे.. “ मी, आई-बाबा खूप घाबरलो होतो. आम्हाला कळेना काय करावं. तेवढ्यात आईने अचानक एक उपाय सुचवला. ती म्हणाली, “आपण गावातल्या एका जुन्या महाराजांकडे जाऊया, ते आपल्याला मदत करू शकतील.” त्याच क्षणी आम्ही निर्णय घेतला की त्या महाराजांकडे जाऊन या विचित्र प्रकारातून बाहेर पडायचा प्रयत्न करावा.
ती रात्र खूपच भयंकर होती. माझ्या बहिणीने संपूर्ण रात्र झोप घेतली नाही, तिचं वागणं असामान्य होतं. कधी ती स्वतःशीच बोलत होती तर कधी ती कोपऱ्यात बसून भिंतीकडे एकटक पाहत होती. आई-बाबांनी कसबस तिला शांत ठेवलं, पण सगळ्यांच्या मनावर मोठं दडपण आलं होतं. सकाळ झाली. आम्ही महाराजांकडे जायचं ठरवलं. आईने तिला काहीतरी ओवाळलं. एव्हाना बाबांनी गावातल्या एका व्यक्तीला सांगून दुसरे वाहन आणले होते. आम्ही सगळे गावाच्या बाहेर असलेल्या एका जुन्या आश्रमाकडे जायला निघालो. तिथे पोहोचल्यावर वातावरण अजूनच गंभीर वाटू लागलं. आश्रमाच्या आवारात पाऊल ठेवताच एक विचित्र शांतता जाणवली, पण त्याचबरोबर अंगावर काटा येईल अशी थंडगार झुळूक स्पर्शून गेली. आम्ही तिला घेऊन आत गेलो, तिथे महाराज एका गादीवर ध्यानस्थ बसलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा गंभीरपणा होता. आईने महाराजांना सगळी कहाणी सांगितली. त्यांनी नीट ऐकून घेतलं आणि डोळे मिटून काहीतरी मंत्र जपत राहिले.
मग हळूहळू ते म्हणाले, “तुमच्या मुलीवर एक दुष्ट आत्म्याचा प्रभाव आहे. ती आत्मा अपघातात मृत झालेल्या एका मुलीची आहे. तिच्या मृत्यूनंतर तिच्या आत्म्याला शांती मिळाली नाही, आणि आता ती तुमच्या मुलीच्या शरीरात आहे आणि तिला नरक यातना देतेय”. हे ऐकून सगळ्यांचं काळीज धडधडू लागलं. मग महाराजांनी आम्हाला काही उपाय सांगितले. ते म्हणाले, “तुमच्या मुलीला तिच्या मूळ ठिकाणी परत न्यायला हवं. त्या ठिकाणी एक विधी करावा लागेल, ज्याने आत्म्याला शांती मिळेल. त्यानंतरच तिचं त्रास देणं थांबेल.” महाराजांनी आम्हाला त्या जागी नेण्यासाठी आवश्यक असलेलं सामान दिलं आणि सावधगिरीने तिथे जाऊन काय करायचं ते समजावलं. आम्ही आता जड मनाने आणि भितीने भारावून, ते सगळं करायला तयार झालो. महाराजांनी दिलेल्या वस्तू घेतल्या, आणि त्यांनी सांगितलेल्या विधीचं बारीकसारीक मार्गदर्शन मनात कोरून आम्ही तिथून निघालो.
आई, बाबा, आणि मी – सगळेच चिंतेत होतो. माझी बहीण मात्र अगदी शांतपणे बसली होती, जणू काही तिला काहीच कळत नव्हतं. ज्याठिकाणी अपघात झाला होता, ती जागा पुन्हा आठवली तरी अंगावर शहारे येत होते. आम्ही तिथे पोहोचलो, तशी माझ्या बहिणीची अवस्था बदलायला लागली. तिचा चेहरा वेगळा दिसू लागला, डोळे मोठे झाले होते, आणि तिचा श्वास जोरात चालू होता. आई तिला घट्ट धरून बसली, पण तिचा विरोध वाढत चालला होता. नंतर बाबांनी तिला धरून ठेवलं, आणि मी महाराजांनी सांगितलेलं विधी सुरू करण्यासाठी तयारी केली. माझ्या हातात महाराजांनी दिलेला तांब्या होता, त्यात पाणी, काही औषधी आणि काही पवित्र वस्तू टाकलेल्या होत्या. महाराजांनी सांगितलं होतं की त्या ठिकाणी त्या पाण्याचा अभिषेक करावा लागेल आणि मंत्र म्हणावे लागतील. आम्ही पवित्र पाण्याचा पहिला थेंब त्या जागेवर टाकताच, माझी बहीण जोरात ओरडली, जणू काही तीव्र वेदना होत आहेत, अशीच ती ओरडत राहिली.
तेवढ्यात अचानक वातावरणात एक बदल जाणवला.. आम्हाला समजत नव्हतं की नक्की काय घडतंय, पण मी जोरात मंत्र म्हणत राहिलो आणि एका क्षणाला माझी बहीण जमिनीवर कोसळली, तिच्या चेहऱ्यावरून अश्रू ओघळत होते. ती शांत झाली होती. आम्ही घाबरून तिच्याकडे पाहिलं, ती आता शांतपणे डोळे मिटून पडली होती. तोच, एका स्त्रीचा मंद आवाज ऐकू आला, “माझी चूक नव्हती… मला मरायचं नव्हतं… पण आता मला शांती मिळाली आहे.” हा आवाज त्या ठिकाणीच विरून गेला. आम्ही एकमेकांकडे पाहिलं. एका विचित्र वातावरणातून बाहेर पडल्यासारखं वाटत होतं. माझी बहीण आता पूर्ण शांत होती, तिच्या चेहऱ्यावरची वेदनादायी छाया अदृश्य झाली होती. आम्ही तिला गाडीत बसवलं, आणि घराकडे निघालो. त्या दिवसानंतर तिच्या वागणुकीतला बदल स्पष्ट दिसत होता. ती हळूहळू सामान्य झाली, जणू काही त्या दिवशीचं काहीही तिला आठवत नव्हतं. आईने मात्र त्या विधीच्या परिणामासाठी महाराजांना धन्यवाद दिले.
तेव्हा आम्हाला समजलं की कधी कधी आपल्याला दिसणारं जग हा फक्त वर वरच आहे, आणि त्याखाली काही गोष्टी अशा असतात, ज्याचं आकलन आपल्या कल्पना शक्ती पलीकडे असतं. आता सगळं नीट सुरु आहे, पण त्या घटनांनी आमचं आयुष्य आणि गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकला.