कोकण, एका बाजूला सुंदर समुद्रकिनारे, हिरवाईने नटलेले डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अनाकलनीय रहस्य. कोकण ट्रिप या सिरिझ माधला हा सहावा एपिसोड आहे. या सिरीज मधले इतर एपिसोड तुम्हाला ऐकायचे असतील तर त्याची प्ले लिस्ट लिंक मी या व्हिडीओ च्या डिस्क्रीप्शन मध्ये दिली आहे. पण कथेला सुरुवात करण्या आधी महत्वाचे.  

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझा मित्र अजय आणि मी कोकणातील एका छोट्याशा गावात गेलो होतो.. गावात फारशी वर्दळ नव्हती, आणि रात्री च्या वेळी तर गाव नितांत शांत होऊन जात असे. गावातल्या लोकांनी आम्हाला सतत एकाच गोष्टीचा इशारा दिला होता – “रात्रीच्या वेळी नदीकाठी जाऊ नका.” ही गोष्ट ऐकून आमच्या मनात कुतूहल वाढले, कारण आम्ही कोणत्याही प्रकारच्या भुताखेतांच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हतो. आम्हाला वाटलं हे गावातल्या लोकांचं अतिशयोक्तीपूर्ण सांगणं असेल. गावातील लोक नदीच्या बाजूला जाण्यापासून दूर राहतात असं म्हणत. आणि काय तर म्हणे तिथे काहीतरी अदृश्य शक्ती आहे. आम्ही तरणी ताठी पोर अश्या गोष्टी कुठे ऐकणार होतो.

पहिल्या दिवशी आम्ही दिवसभर गावातली छोटी छोटी ठिकाणं फिरलो, स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आणि गावातील लोकांशी संवाद साधला. सगळं छान सुरू होतं, पण जसं जसे अंधार पडायला लागला तस तसे वातावरणात काहीतरी बदल जाणवू लागला. गावातील प्रत्येक घरात दिवे दिसू लागले आणि विशेष म्हणजे लोकांची वर्दळ ही एकदम कमी होऊ लागली. त्या दिवशी दिवसभर फिरून थकल्यामुळे आम्ही लवकर झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही गावातल्या एका मंदिरात गेलो, जे नदीच्या जवळ होतं. तिथे गेल्यावर तिथल्या पुजाऱ्याकडे आम्ही चौकशी केली. त्यांनी आम्हाला सांगितलं की गावातल्या लोकांना त्या नदीच्या काठी एक स्त्री दिसते., जी साधारणतः रात्रीच्या वेळी दिसते. ती स्त्री काळी साडी घालून नदीच्या बाजूला एकटीच बसलेली दिसते, डोकं खाली झुकलेलं आणि केस पाण्यात ओले झालेले असतात.. 

काही लोकांनी तर स्त्रीचं भयंकर हसू ही ऐकलं आहे. तर काहींनी तर दावा केला की त्या स्त्रीला पाहिल्यानंतर काही दिवसातच त्या माणसाचा दुर्दैवी मृत्यू होतो नाही तर ठार वेडा होता. गावात अशी 2-3 लोकं आहेत जी पूर्णपणे मानसिक संतुलन गमावून बसली आहे. त्यांनी सांगितलेल्या या गोष्टीने आमचं कुतूहल शिगेला पोहचलं. अजय आणि मी ठरवलं की आपण रात्रीच्या वेळी नदीकाठी जाऊन पाहूया. मग त्या रात्री आम्ही जेवण उरकलं आणि कसलाही आवाज न करता गावातून नदीकडे जाणारा मार्ग धरला. हवेत एक विचित्र गारवा पसरला होता, जणू काही सृष्टी स्वतःला या भयावह घटने पासून दूर ठेवत होती. नदीकाठी पोहोचल्यावर आमच्या समोर एकचं दृष्य होतं – अंधार आणि तेथील शांतता इतकी गडद आणि भयाण होती की त्यात घुसमट होऊ लागली. आम्ही काही वेळ त्या ठिकाणी थांबलो, पण काहीच दिसलं नाही.

अजयने मजेत म्हंटल, “अरे, काहीच भूत वगैरे नाहीये. गावातले लोक उगाच भिती दाखवतात.” पण त्याच क्षणी एक विचित्र आवाज ऐकू आला, जणू पाण्यातून काहीतरी बाहेर येतंय. आम्ही पाण्याकडे पाहिलं तर अचानक एखाद्या सावलीसारखं काहीतरी हलताना दिसलं. आधी वाटलं की पाणी वर येतंय, पण त्या सावलीने हळूहळू आकार घ्यायला सुरुवात केली. आम्ही दोघंही थक्क होऊन बघत राहिलो. ती आकृती हळूहळू स्पष्ट झाली, ती एक स्त्री होती. तिचे डोळे पाण्यातून लालसर चमकत होते, अंग काटेकोरपणे काळ्या साडीने झाकलेलं होतं. ती स्त्री आमच्याकडे एकटक बघत होती. अजय माझ्या शेजारी थरथरत उभा होता, त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. मला मात्र त्या क्षणी भयंकर गारठा जाणवू लागला. . 

ती स्त्री हळूहळू नदीकाठून आमच्याकडे येऊ लागली. तिचं चालणं वेगळंच होतं, जणू ती पाण्यात तरंगत होती. मला वाटलं की आपण तिथून पळून जावं, पण पाय हलत नव्हते. ती स्त्री जवळ येतच होती. तितक्यात अचानक ती थांबली आणि एक भयंकर किंकाळी फोडली. त्या आवाजाने माझं हृदय थांबल्यासारखं झालं. अजयने माझा हात पकडला आणि दोघेही तिथून वेगाने पळू लागलो. आम्ही मागे वळून पाहण्याचं धाडस देखील केलं नाही. आम्ही तिथल्या मंदिरार धाव घेतली. आम्हाला पुजारी भेटले, ते आमच्या चेहऱ्यावरची भीती पाहूनच सगळं समजून गेले. त्यांनी आम्हाला मंदिरात नेलं, मंत्रपठण केलं आणि आम्हाला ताबडतोब गाव सोडण्याचा सल्ला दिला. आम्ही दुसऱ्या दिवशीच ते गाव सोडलं. तेव्हापासून त्या घटनेबद्दल मी किंवा अजय कोणालाही काहीही सांगितलं नाही.

गावातून परत आल्यावर माझं आणि अजयचं जीवन कधीच पूर्वीसारखं राहिलं नाही. आमचं तिथून सहीसलामत सुटणं एका चमत्कारासारखं वाटत होतं. आम्ही गाव सोडलं तरी त्या रात्रीच्या घटनेच्या आठवणी सतत मनात घोळत राहिल्या. काही दिवसांनी अजयला विचित्र स्वप्नं येऊ लागली. त्याचं चेहरा हळूहळू काळवंडत गेला, डोळ्यांत एक भीती कायमची बसली होती. मला असं वाटलं की त्याच्यावर काहीतरी अनाकलनीय शक्तीचं सावट आहे. काहीतरी असं होतंय, ज्याचा परिणाम फक्त त्याच्या शरीरावर नाही, तर त्याच्या आत्म्यावर देखील होतोय. शेवटी एके दिवशी अजय मला फोन करून म्हणाला, “आपल्याला परत कोकणात त्या गावात जावं लागेल.” त्याच्या आवाजात एक वेगळा ठामपणा होता..

मी थोडा घाबरलो होतो, पण त्याची अवस्था पाहता त्याला मदत करणं आवश्यक होतं. आम्ही पुन्हा ते गाव गाठलं. यावेळी मात्र तिथे पोहोचल्यावर गावातील वातावरण अधिक भयाण जाणवले. गावातील लोकांच्या नजरा खूप काही सांगून जातं होत्या. जणू आमच्या बद्दल संपूर्ण गावात कळले होते. आम्ही पुजाऱ्याला भेटायला गेलो, कारण त्याच्याकडे या गोष्टीचं काही रहस्य सापडू शकेल अशी आशा होती. त्यांनी आमचं स्वागत तर केलं पण मनापासून नाही. त्यांनी विचारलं, “तुम्ही दोघं परत का आलात? या ठिकाणाहून दूर राहणं तुमच्यासाठी चांगलं होतं.” अजयने आपली अवस्था त्यांना सांगितली आणि त्यानंतर मात्र त्यांचा चेहरा गंभीर झाला. ते आम्हाला मंदिराच्या मागच्या खोलीत घेऊन गेले जिथे अनेक वर्षांपासून एक जुनी पण रहस्यमय गोष्ट लपलेली होती.

ते आम्हाला सांगू लागले “त्या स्त्रीचं नाव सती होता. ती या गावातीलच एक होती, पण तिचं आयुष्य  दुर्दैवी घटनांनी भरलेलं होतं. तिचा नवरा जहाजावर कामाला जात असे आणि महिन्यांपर्यंत घरी येत नसे. एके दिवशी सतीला कळलं की तिचा नवरा समुद्रातल्या एका मोठ्या वादळात बेपत्ता झाला आहे. ती दिवस-रात्र त्याची वाट पाहायची, नदीकाठावर बसून त्याच्या परत येण्याची आस लावली होती. पण तो कधीच परतला नाही.” “सतीच्या मनातलं दु:ख हळूहळू इतक टोकाला गेलं कि नैराश्याच्या गर्तेत जाऊन एका रात्री तिने नदीत उडी मारून आत्महत्या केली.

तिचं प्रेत कधीच सापडलं नाही, पण गावातल्या काहींनी तिचा आत्मा अजूनही नदीच्या बाजूला फिरताना दिसतो. ती अजूनही आपल्या नवऱ्याच्या परत येण्याची वाट पाहत नदीकाठीच आहे, आणि जो कुणी तिच्या वाटेत येतो, त्याला ती झापटते, स्वप्नात येउन त्रास देते. 

हा सगळा प्रकार ऐकून आमच्या अंगावर काटा आला. अजयची अवस्था आता अधिकच गंभीर होती कारण त्याला खरं कारण कळलं होत. ते पुजारी म्हणाले, “तुमचं वाचणं आता कठीण आहे. पण एकच मार्ग आहे. तुम्हाला सतीच्या आत्म्याला मुक्त करावं लागेल. तिच्या आत्म्याचं दु:ख शमवावं लागेल. आणि तसं करण्यात यशस्वी झालात तरच सतीचं भटकणं थांबेल.” आम्हाला हे सगळं अकल्पनीय वाटत होतं, पण आता मागे फिरणं शक्य नव्हतं. अजयचं जीवन धोक्यात होतं, आणि त्याचं सुटणं तिच्या आत्म्याला मुक्त करूनच शक्य होणार होत. आम्ही त्यांना उपाय विचारला त्यावर ते म्हणाले कि मी तर उपाय देऊ शकणार नाही पण मला एक जाणकार व्यक्ती माहित आहे जो तुम्हाला मार्ग दाखवू शकतो. त्यांनी आम्हाला एक पत्ता लिहून दिला आणि त्या व्यक्तीला लवकरात लवकर भेटायला सांगीतले. त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही त्या पत्त्यावर निघालो.

दोन गाव सोडून एका निर्जन ठिकाणी त्याच घरं होत. घर कसलं एक झोपडी होती फक्त. शेणाने सारवलेल्या भिंती, छत मोडकळीस आलेलं. आम्ही आत गेलो तर साधारण सत्तरी ओलांडलेला इसम ध्यान लावून बसला होता. डोळे बंद होते. आम्ही काही बोलणार तितक्यात तो बोलू लागला “बरं झालं लवकर आलात नाही तर ती तुमच्या मागावर च आहे, कोणत्याही क्षणी घात होऊ शकतो..” आम्ही गोंधळलो कारण त्या व्यक्तीने आम्हाला डोळे उघडून पहिले ही नव्हते. पण नंतर वाटले कि पुजारी आणि या व्यक्तीचे बोलणे झाले असावे. पण तरीही आम्हाला न पाहताच त्यांनी ओळखले होते. मी थेट विषयाला हात घातला आणि विचारले “ तुम्ही माझ्या मित्राचा जीव वाचवू शकता का.. तुमच्याकडे काही उपाय आहे का..?” त्यावर तो शांत झाला आणि काही मिनिट काहीच बोलला नाही. 

आम्ही दोघ ही त्याच्या बोलण्याची वाट पाहत होतो. तसे त्याने हळुवार पणे डोळे उघडले आणि आम्ही त्याला पाहतच राहिलो. तो व्यक्ती दृष्टीहीन होता कारण त्याला डोळेच नव्हते. तो आम्हाला उपाय सांगू लागला “ याच्या वरून सात वेळा नारळ फिरवून त्या नदी पात्रात सोडायचा, हे करताना मनात कसलेच विचार ठेवायचे नाहीत, कोणाशी बोलायचे नाही. हे रक्षायंत्र घ्या जे हा उपाय करताना तुमच्या जवळ ठेवायचं. उपाय झाला कि ते गाव सोडे पर्यंत घालून ठेवायचे आणि गावाची वेस ओलांडल्यावर नदीपात्र किंवा पाण्याचा ओहोळ दिसला कि त्यात वाहायच. सगळी बाधा कायमची दूर होईल.” उपाय ऐकून तो सोपा वाटत असला तरी पुढे काय वाढून ठेवलंय याची आम्हाला पुसटशी कल्पना ही नव्हती. त्यांनी काही मंत्र उच्चारून एक नारळ दिला जो मी अजय भोवती सात वेळा फिरवला आणि आम्ही दोघ ही पुन्हा त्या गावाच्या वाटेला लागलो. माझ्या जिवलग मित्रासाठी त्याच्या जिवासाठी मी काहीही करायला तयार होतो. पण थोडी का होईना मनात भीती ही होतीच.

अंधार गडद होऊ लागला होता आणि साधारण तास दीड तास प्रवास अजून करायचा होता. जेव्हा गावात पोहोचलो तेव्हा 9 वाजत आले होते. आम्ही कोणाशी काहीच न बोलता त्या नदीजवळ गेलो. अंधारात जास्त काही दिसत नसले तरी खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज कानावर पडू लागला. मी काही पावलं पुढे जाऊन खाली वाकलो आणि तो नारळ पाण्यात सोडून दिला. जसे मागे वळलो तसे झटकन पाण्यातून एक हात वर आला आणि माझा डावा पाय पकडला. भीती नं माझं सर्वांग शहाराल. ती पकड इतकी घट्ट होती कि मी जगाचा हलूही शकलो नाही. माझा तोल जाणार तेवढ्यात अजय ने येउन मला बाहेरच्या बाजूला खेचले. ज्या हाताने मला खेचले त्याच हाताला त्याने ते रक्षायंत्र बांधले होते. कदाचित त्याच्यामुळेच माझ्या पाया वरची पकड अचानक सुटली आणि आम्ही दोघ ही धावत तिथून लांब आलो. 

तिथून आम्ही थेट एस टी स्टॅन्ड गाठले, मिळेल एस टी पकडून त्या गावातून बाहेर आलो आणि जशी त्या गावाची वेस ओलांडली मी अजय ला ते रक्षायंत्र काढून हातात धरायला सांगितलं. वाटेत एक पाण्याचा ओहोळ लागला तिथे ते आम्ही टाकून दिलं. या नंतर अजय ला किंवा मला कसलाही त्रास झाला नाही. या प्रसंगाला आज बरीच वर्ष उलटली आहेत. या नंतर ही आम्ही कोकणात गेलो पण एक गोष्ट कायमची लक्षात ठेवली कि काही जागा, तिथल्या गोष्टीना मान द्यायला हवा. कारण नसताना उगाच एखाद्या गीष्टीच्या नादाला लागू नये नाही तर काय माहित तिथून येताना तुमच्या सोबत तुम्ही काय घेऊन याल. 

Leave a Reply