अनुभव – यश वाघमारे

हा अनुभव माझ्या सुनील काकांना आला होता.. ते त्यांच्या काही मित्रांसोबत एका पार्टीसाठी धुळ्याला गेले होते. या भागातील रस्त्यावरील काही असामान्य गोष्टींबद्दल त्यांनी खूप ऐकलं होतं पण त्यांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. काका आणि त्याचे मित्र पार्टीसाठी धुळ्यात पोहोचले होते, पण तिथं पोहोचायला त्यांना खूप उशीर झाला होता. त्यामुळे पार्टी संपवून परत निघायची वेळ आली, तेव्हा त्याचे मित्र म्हणाले की, “रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून परतताना थोडं काळजी घे, कारण या रस्त्यावर अनेक विचित्र गोष्टी घडतात आणि बऱ्याच चोऱ्या-माऱ्यांचे प्रकारही घडले आहेत.” त्यामुळे रात्रभर जागून गाडी चालवताना काका आणि त्यांच्या मित्रांनी सावध राहण्याचा निर्णय घेतला. साधारण २:३० वाजता ते परतीच्या प्रवासाला निघाले. मित्राने इशारा दिला होता की, “रस्त्यामध्ये कुणीही दिसलं तरी गाडी थांबवू नकोस.” ते लक्षात ठेवून काका निघाले. रस्त्यात वर्दळ कमी होती, आणि वातावरणात एक प्रकारची शांतता होती. गाडी वेगाने जात असताना अचानक त्यांना गाडीच्या बाजूला एक बाई उभी असलेली दिसली.

काकांनी त्या बाईकडे पाहिलं, पण त्यांनी तिला न थांबता पुढे जाण्याचा निर्णय घेतला. ते त्या रस्त्यावरच्या असामान्य गोष्टींबद्दल ऐकून होते, त्यामुळे ते जास्त चौकशी करण्याच्या फंदात पडले नाहीत. गाडी थोडं पुढे गेल्यावर अचानक एक विचित्र आवाज येऊ लागला. काकांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर त्यांना गाडीच्या उजव्या बाजूला तीच बाई दिसली. भयानक गोष्ट म्हणजे, ती बाई एक झाडावर उलटी लटकत होती आणि तिची नखं झाडाच्या खोडावर घासत होती.. काकांनी गाडीच्या मागच्या सीटवर बसलेल्या त्यांच्या मित्राला विचारलं, “तुला ही बाई दिसतेय का?”

पण त्यांच्या मित्राने थोडंसं गोंधळून म्हणलं, “कुठली बाई? मला तर काहीच दिसत नाहीये.” काका खूप घाबरले, कारण त्यांनाच ती बाई दिसत होती आणि इतर कोणालाही काहीही दिसत नव्हतं. काकांनी त्या विचित्र प्रसंगातून सुटण्यासाठी गाडीचा वेग वाढवला, पण जेव्हा त्यांनी समोर पाहिलं तेव्हा तीच बाई रस्त्याच्या मधोमध उभी होती. तिचे केस विस्कटलेले होते आणि चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होतं. काकांनी पुन्हा मित्राला विचारलं की, “तुला ती बाई समोर दिसतेय का?” त्याच्या मित्राने पुन्हा नकार दिला आणि विचारलं, “तू असं का विचारतो आहेस? काय झालं कोण बाई दिसतेय तुला?” काकांना त्या बाईचं अस्तित्व जाणवत होतं. जशी गाडी त्या बाईच्या जवळ येऊ लागली तशी ती बाई जोरात किंचाळली आणि तिचा हात उंचावून काकांच्या दिशेने भिरकावला.

त्या प्रकराने अचानक गाडीवरच नियंत्रण सुटलं पण तरीही काकांनी कसे बसे सावरून पुन्हा नियंत्रण मिळवले. कारण काकांना ड्रायव्हिंग चा खूप अनुभव होता. त्यांनी गाडीवर नियंत्रण मिळवून पुन्हा वेग वाढवला, पण त्या वेगातही ती बाई अजून त्यांच्या मागेच होती. ती बाई जोरजोरात ओरडत होती, आणि तिचा तो किळसवाणा भयानक आवाज त्यांच्या कानठळ्या बसवत होता. अचानक एका जागेवर आल्यावर ती थांबली. काकांनी साईड मिररमध्ये पाहिलं, तर ती बाई आपल्या बोटांनी एक इशारा करत होती. तिच्या इशाऱ्यात एक विचित्र संदेश होता, जणू ती सांगत होती, “तू वाचलास, पण पुन्हा भेटलास तर..” काका घामाघूम झाले होते, पण ते तिच्यापासून दूर जात राहिले. रात्रभर गाडी चालवून अखेरीस ते पहाटे ७-८ च्या सुमारास घाट ओलांडून बाहेर पडले. ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप थकलेले होते. शरीरातील उर्जा आणि मनाची शांतता सर्व काही संपल्यासारखं वाटत होतं.

घरी पोहोचल्यावर त्यांना खूप ताप चढला. ताप एवढा वाढला होता की काही दिवसांनीच ते उठू शकले. घरी त्यांनी हा सगळा प्रसंग सांगितला. काका आजही त्या रात्रीच्या अनुभवाची आठवण काढतात आणि अंगावर काटा येतो.

Leave a Reply