अनुभव – चैतन्य तुपे
हा अनुभव माझ्या आजोबांचा आहे, जो त्यांना बऱ्याच वर्षांपूर्वी आला होता. आमच्या गावातल्या एक प्रसिद्ध भैरव यात्रेचा काळ होता. आम्ही मूळचे सांगलीचे, पण आता पिंपरीत राहतो. मात्र, दरवर्षी भैरवाची यात्रा असली की आजोबा त्या यात्रेला न चुकता हजेरी लावतात. हाच प्रवास त्यांच्या जीवनात एका भयानक अनुभवाची आठवण करून देणारा आहे. आमच्या गावाजवळच असलेल्या भैरवाच्या मंदिरात दरवर्षी यात्रा भरते. या यात्रेला सकाळीच निघावं लागतं, कारण मंदिराचा डोंगर मोठा आणि खडतर आहे. सकाळीच दाटून आलेला धुके आणि मंदिराच्या परिसरातली शांतता ही अनुभवण्यासारखी असते. यंदा देखील, नेहमीप्रमाणे आजोबा सकाळी लवकरच उठले आणि प्रवासाला निघाले. पिंपरीहून सांगलीपर्यंतचा प्रवास करून ते तासगावहून पठारवाडीच्या भैरवाच्या डोंगराच्या दिशेने निघाले.
तासगावच्या बस स्थानकावरून उतरल्यावर आजोबांनी एका जीपचालकाला विचारलं की भैरवाच्या यात्रेला जायचंय किती भाडे घ्याल.. पण त्या जीपचालकाने त्यांना इशारा केला की संध्याकाळी 5 नंतर त्या डोंगरावर जाणं सुरक्षित नाही. हे ऐकताच आजोबा थोडेसे गोंधळले, आणि त्यांनी कारण विचारलं. जीपचालकाने खुलासा केला की, “संध्याकाळी 5 नंतर त्या जागेच रूप पालटत. तिथे चित्र विचित्र अनुभव येतात. आणि त्यात आज अमावस्या आहे. या काळात आम्ही भाडे घेऊन जात नाही. मला माफ करा. आजोबांच्या मनात या गोष्टीचं गांभीर्य आलं, पण यात्रेला निघाल्यामुळे ते मागे फिरू शकले नाहीत. म्हणून ते एकटेच पायपीट करत मंदिराच्या दिशेने निघाले.
डोंगराचा रस्ता मोठा आणि कठीण होता. पायवाटेवरून चालत चालत त्यांना खूप वेळ लागला. जसा वेळ पुढे जात होता, तसतसा अंधारही पसरायला लागला. एकटं चालताना वाटेवर कुणीच नव्हतं, आणि संध्याकाळचं वातावरण अधिकच भयाण झालं होतं. अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर त्यांना एका ठिकाणी एक शेकोटी पेटवलेली दिसली.आजोबांनी विचार केला कि, या अंधारात इथे एकट कोण बसल असेल? हा विचार करून ते जवळ गेलं. शेकोटीच्या उजेडात त्यांनी पाहिलं की एक व्यक्ती शेकोटीजवळ बसून काहीतरी करत आहे. शेकोटी मध्ये टाकलेली लाकडं एकदम सुकलेली असावीत कारण तडतडण्याचा आवाज खूप तीव्र जाणवत होता. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता आणि त्याच्याकडे पाहून आजोबांच्या अंगावर काटा आला. त्या व्यक्तीला आजोबांची चाहूल लागताच तो थोडा वळला आणि म्हणाला, “या पावना, या, बसा.” हे ऐकताच आजोबा थोडे विचारात पडले, कारण त्या व्यक्तीच्या बोलण्यात एक प्रकारचा अजबपणा होता.
आजोबांनी त्याच्या बोलण्यावर जास्त विचार न करता त्याच्या शेजारी थोडं लांब बसायचं ठरवलं. तो माणूस पुन्हा बोलला, “तुमच्याकडे तंबाखू आहे का?” आजोबा खिशात हात घालून तंबाखू काढण्यासाठी पाहू लागले. तेव्हा त्यांचं लक्ष त्या माणसाच्या पायांकडे गेलं, आणि अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्याचे दोन्ही पाय शेकोटी जवळ नव्हते तर शेकोटीच्या आगीत आत भाजत होते. तो तडतडण्याचा आवाज त्याच्या पायाच्या हाडांचा होता. एखाद्या सुकलेल्या झाडाची फांदी जळावी तसे त्याचे पाय पेटून जळत होते. अशा परिस्थितीत काय करावं हे त्यांना समजेना, पण त्यांना आठवलं की खिशात एक देवाचा अंगारा आहे. त्यांनी वेळ नं घालवता तो अंगारा ते जे काही होतं त्याच्या अंगावर टाकला. ताबडतोब त्या माणसाच्या डोळ्यात बदल दिसायला लागला. तो अचानक जोरात ओरडत उठला आणि अंधारात पळत दिसेनासा झाला..
हा सगळा भयानक प्रकार पाहून अंगावर काटा आला होता, पण त्यांनी मनात धीर एकवटला. हात जोडून देवाचा नामस्मरण करत मंदिराच्या दिशेने पळायला सुरुवात केली.डोंगर चढत असताना त्यांना आता प्रत्येक सावली भयानक वाटत होती, पण शेवटी काही वेळाने ते मंदिराजवळ पोहोचले. मंदिराचं वातावरण एकदम पवित्र आणि सुरक्षित वाटलं, जणू काही देवाने त्यांचं संरक्षण केलं होतं. अखेर, भैरवाच्या मंदिरात पोहोचल्यावर आजोबांनी शांतपणे देवाचं दर्शन घेतलं. त्यांना अजूनही धडधडतं होतं, पण त्यांना जाणवलं की त्यांची देवावरची श्रद्धा होती त्यामुळेच संकटातून ते सुखरूप बाहेर पडले होते. देवाचं दर्शन घेऊन त्यांनी अंगारा पुन्हा खिशात ठेवला आणि शांतपणे बसून काही काळ मंदिरात घालवला.
तेव्हापासून आजोबा जेव्हा जेव्हा यात्रेला निघतात, तेव्हा अंगारा सोबत ठेवतात. ते सांगतात की या असामान्य अनुभवामुळे त्यांच्यात एक विश्वास निर्माण झाला की या अघोरी शक्तींना सामोरं जाण्यासाठी आपली श्रद्धा आणि देवावरचा विश्वास मजबूत असावा. हा अनुभव आम्हा सर्वांसाठी एक मोठा धडा ठरला. गावाकडची यात्रा, तीथं येणाऱ्या असामान्य शक्तींचा प्रभाव, आणि देवाच्या अंगाऱ्याच्या चमत्कारिक शक्तीवरचा विश्वास या सगळ्याने आमच्या मनात भीती आणि श्रद्धा एकत्र निर्माण केली. अशा अनुभवांतून एक गोष्ट समजते – की काही वेळा, आपल्याला केवळ आपल्या श्रद्धेचा आणि देवाच्या आशीर्वादाचा आधार असतो.