अनुभव – स्वप्नील बहुतुले
अनुभव 2009 च्या शिमग्यातील आहे, जो अजूनही माझ्या आणि माझ्या मित्रांच्या मनात ठसला आहे. शिमग्याची रात्र होती, ठिकाण होतं माझं गाव. त्या रात्री आम्ही काही मित्र शिमग्याच्या उत्सवात रमून खेळायला बाहेर पडलो होतो. रात्रीचे 2:30 वाजले होते, आणि सगळीकडे अंधार पसरला होता. आमच्या समूहात आम्ही बरेच मित्र होतो. शिमग्याच्या वातावरणात खेळायला एक वेगळाच आनंद असतो, त्यामुळे आम्ही रात्रीच्या त्या गूढ अंधारात लपाछपी खेळायला सुरूवात केली. मी खेळातल्या उत्साहात गावातल्या एका जुन्या घराच्या मागे लपलो होतो. ते घर खूप जुने होते, आणि त्याच्या जवळच एक छोट, मोडकळीस आलेल बाथरूम होत. त्या भागात काही अंतरावर असलेल्या स्ट्रीट लाईट चा मंद प्रकाश पडला होता. अंधारात मला त्या बाथरूम च्या बाजूला कुणीतरी उभं असल्याचं आढळलं. मला वाटलं की, आमच्यापैकीच कोणी मित्र असेल, म्हणून मी दोन-तीन वेळा आवाज दिला, पण मला काही उत्तर मिळालं नाही.
काही वेळानंतर ते जे कोणी होतं ते माझ्या दिशेने पूढे सरकले म्हणून मी घाबरून तिथून पळ काढला. कारण मला हा प्रकार थोडा विचित्र च वाटला. इतर मुलांना भेटून म्हटलं, “चला, आता हा खेळ बंद करूया. खूप उशीर झालाय, आपण आता घरी जाऊ.” सर्वांनी मान डोलावली आणि आम्ही सगळे आपापल्या घरी परतलो. दुसऱ्या दिवशी मी माझ्या मित्राला, सनीला भेटलो. त्याला काल रात्रीचं सगळं सांगितलं आणि म्हटलं, “आपण रात्री उशीरापर्यंत खेळायला नको.” सनीने मान्य केलं, पण त्याने एक गोष्ट सांगितली जी ऐकून मी थोडासा अस्वस्थ झालो. सनी म्हणाला, “आपल्या गावात माझ्या घरा शेजारची बाई मला नेहमी त्रास देते, ओरडत असते, शिव्या देत असते. तिला चांगलाच धडा शिकवायचा आहे. आपण रात्री बरोबर 12 वाजता तिच्या दारावर जोरात दगड मारू आणि पळून जाऊ. म्हणजे तिला कळेल..” मला ते ऐकून थोडं विचित्र वाटलं, पण त्या रात्रीचा विचार मनात ठेवून मी म्हणालो, “ठीक आहे, आपण रात्री तिथं पाहूया पण 12 पर्यंत च त्याहून जास्त थांबायचं नाही”.
त्या रात्री मी आणि सनी, तिच्या घरासमोर जाऊन समोरच्या झाडामागे जाऊन लपून राहिलो. गावातले लोक अजूनही जागे होते, त्यामुळे काही करता येईना. बराच वेळ सगळे शांत होण्याची वाट पाहिली पण कोणी ना कोणी त्या भागातून चालत जात होतं. शेवटी, कंटाळून मी सनीला म्हटलं, “चल, आता झोपायला जाऊ. काही करू शकणार नाही.” त्यावर तो म्हणाला कि तू जा पूढे, मी येतो काही वेळातच.. त्याचा निरोप घेऊन मी घरी निघून आलो. सनीही थोड्याच वेळात झोपला असेल असं मला वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी, मी सनीच्या घरी गेलो, तिथे त्याची आई रडत बसली होती. तिने मला सांगितलं की, सनी अचानक खूप आजारी पडलाय आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. सनी चे बाबा आणि भाऊ त्याला हॉस्पिटल ला घेऊन गेलेत. हे ऐकताच मी हादरलो. कालपर्यंत ठणठणीत असलेला सनी अचानक आजारी कसा पडला याचा विचार करुन मला काळजी वाटू लागली. मी कसे बसे हॉस्पिटल ला जायचा बंदोबस्त केला.
रात्री सनीची भेट झाली, त्याची अवस्था गंभीर होती. त्याला हलताही येत नव्हतं. पण तो बोलू शकत होता. मी त्याला विचारलं की, “तू अचानक कसा आजारी पडलास?” सनीनं एका गूढ आवाजात सांगितलं की, “तू झोपल्यावर, मी साधारण रात्री 1 च्या सुमारास तिच्या दारावर दगड मारायला हात उचलला तेवढ्यात माझं लक्ष त्या घराच्या शेजारच्या पडक्या पायरीकडे गेलं. तिथ कोणी तरी उभ होतं. स्ट्रीट लाईट अगदी जवळ असल्यामुळे मला ते स्पष्ट दिसलं. स्वप्नील ते जे काही होतं त्याला चेहराच नव्हता. नाक, डोळे, ओठ काहीच नही. एक सपाट चेहरा.. मला फक्त बघूनच भीतीने घाम फुटला. मला वाटत की तो ‘नाथू’ होता.” नाथू हे नाव ऐकून मी घाबरलो. आमच्या गावात एक कथा प्रचलित होती की, नाथू नावाचा माणूस वर्षानुवर्षं गावातच राहत होता, आणि अचानक त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्याबद्दल असं म्हटलं जायचं की तो गावातील काही पडक्या ठिकाणी दिसतो. सनीनं सांगितलेलं वर्णन अगदी तसंच होतं.
मी सनीला विचारलं, “तू त्याला कसं ओळखलं?” त्यावर सनीने सांगितलं, “त्याचा चेहरा नसला तरी त्याच्या शरीराची ठेवण आणि चालण्याची पद्धत नाथूसारखीच होती.” तो प्रसंग ऐकून माझा अंगावर काटा आला. त्यानंतर तो भयानक प्रकार पाहून धडधडत्या काळजाने तिथून पळून आला. त्या रात्रीनंतर सनीने गप्प बसण्याचं ठरवलं, पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला ताप चढला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. सनीची अवस्था पाहून मी घाबरलो आणि आता हा अनुभव आमच्यासाठी एका शापाप्रमाणे होता. मला त्याच्या बोलण्यात एक भयंकर सत्य जाणवत होतं, आणि ते म्हणजे आमच्या गावात नाथूसारख्या आत्म्याचं अस्तित्व अजूनही होतं.
शिमग्याच्या त्या रात्री आमच्यासाठी एकच धडा होता – काही ठिकाणी आपण अशा शक्तींना आव्हान देणं टाळायला हवं मग ते नकळत का होईना. सनीला काही दिवस लागले पूर्ण बरा होण्यासाठी. पण त्या घटनेनंतर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आम्ही कोणत्याही पडक्या जागी किंवा गूढ ठिकाणी रात्रीच्या वेळेस जायचं नाही. त्या शिमग्याच्या रात्रीचे अनुभव अजूनही आमच्या आठवणीत ताजे आहेत, आणि आम्हाला आठवण करून देतात की काही वेळा आपण ज्या गोष्टींना गमतीने घेतो, त्या खऱ्या असू शकतात. त्या घटनेनंतर शिमग्याची रात्र आमच्यासाठी एक स्मरणीय अनुभव ठरली.