काही प्रसंग इतके भयाण असतात कि आपल्याला आयुष्य भराची शिकवण देऊन जातात. असाच हा एक भयाण अनुभव..

ही माझ्या कुटुंबाने अनुभवलेली घटना आहे, जी आजही आठवली की अंगावर काटा उभा राहतो. काही गोष्टी अशा असतात, ज्या समजावून घेता येत नाहीत किंवा विसरता येत नाहीत. ही गोष्ट ही अशीच आहे. त्या दिवशी आमचं छोटंसं सहलस्वप्न एका भयानक वास्तवात परिवर्तित झालं, ज्यामुळे आम्ही कायमच्या भीतीच्या सावटाखाली राहायला लागलो. बरीच वर्ष उलटली आहेत घटनेला पण अजूनही सगळं काही अगदी डोळ्यांसमोर आहे. आम्ही सर्वजण रोजच्या जीवनाच्या धावपळीला काही काळ बाजूला ठेवून एका छोट्या हिल स्टेशनवर सुट्टीसाठी जायचं ठरवलं होतं. बाबा, आई, माझी धाकटी बहीण काव्या, आणि मी – आमचं छोटंसं कुटुंब. बाबा एका मोठ्या कंपनीत व्यवस्थापक होते आणि त्यांचा वेळ कायम कामातच जात असे. आई गृहिणी असून आमचं घर व्यवस्थित सांभाळत असे, आणि काव्या अजून शाळेत होती.

सुट्टीच्या निमित्ताने आम्ही सर्वजण खूप उत्साहित होतो.  एका प्रसिद्ध रिसॉर्टचं बुकिंग आम्ही आधीच केलं होतं. हे रिसॉर्ट जंगलाच्या भागात म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं होतं. तेथील शांतता आणि एकांत आमच्यासाठी परिपूर्ण ठरेल असं वाटत होतं. 2 दिवसांचा बेत आखला होता. शुक्रवारी लवकर निघून रात्री तिथे पोहोचायचे आणि मग 2 दिवस तिथे काढायचे. शनिवारी जवळपास च्या जागा पाहायच्या आणि मस्त मजा करायची. आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो, तेव्हा खरोखरच तिथल्या शांततेने आमच्या मनावर सकारात्मक प्रभाव टाकला. तिथले थंडगार वारे, निसर्गाच्या कुशीत वसलेलं वातावरण, आणि पाहता पाहता क्षितिजापर्यंत दिसणारी हिरवाई – सगळं स्वप्नवत वाटत होतं. आम्ही सहलीचा निर्णय योग्य ठरला होता म्हणून आम्ही सगळेच खूप खुश होतो. 

रिसॉर्टमध्ये पोहोचल्यावर व्यवस्थापकाने आमचं स्वागत केलं. रिसॉर्ट फार मोठं नव्हतं, पण खूप छान आणि नीटनेटकं होतं. व्यवस्थापक खूपच नम्र होता आणि त्याने आम्हाला हसतमुखाने रिसॉर्टची माहिती दिली. आमच्या खोलीत पोहोचल्यानंतर आम्ही सगळेच खूप उत्साहित होतो. बाबा म्हणाले, “आज संध्याकाळी बाहेर फिरायला जाऊ या.” आम्ही आनंदाने तयारीला लागलो. त्यानंतर रिसॉर्टच्या व्यवस्थापकाने आम्हाला एक विचित्र सूचना दिली, “कृपया सूर्यास्तानंतर जंगलाच्या दिशेने जाऊ नका.. तो परिसर निर्मनुष्य असतो..” आम्हाला ही सूचना फारशी महत्त्वाची वाटली नाही. मला वाटले कि जंगली प्राण्यांची भीती असेल पण या भागात तसे मी काही ऐकले नव्हते. बाबांना विचारले तर ते म्हणाले कि काही नाही.. आपण उशिरा येऊ आणि याला जागे राहावे लागेल म्हणून याने सांगितले असेल.

संध्याकाळी, सूर्य मावळतीला जात असताना आम्ही रिसॉर्टच्या आजूबाजूला फेरफटका मारायला निघालो. काव्या अतिशय आनंदी होती आणि झाडांमध्ये लपलेल्या पक्ष्यांना पाहून ती उड्या मारत होती. वातावरण खूपच प्रसन्न होतं. त्या वेळी आमच्याकडे रोल वाला कॅमेरा होता ज्यात वडील फोटो काढत होते. मी सुद्धा आजूबाजूचा परिसर न्याहाळात होतो. पण त्या शांततेत एक विचित्र आवाज आलटून-पालटून ऐकू येत होता, जणू काही एखादं कुजकं सुकलेलं झाड वाऱ्यामुळे हलत आहे. त्याच्या जीर्ण झालेल्या फानंद्या चा आवाज कानावर पडत होता. आम्ही चालत रिसॉर्ट पासून खूप लांब आलो होतो. आणि आता दाट जंगलाचा भाग सुरु झाला होता असे वाटत होते. कारण वातावरण ही वेगळेच भासत होते. आवाज होता तो फक्त झाडांच्या सळसळण्याचा. या व्यतिरिक्त एक भयाण शांतता जाणवत होती. 

त्या भागात पोहोचल्यानंतर बाबा थांबले. “इथून पुढं नको जाऊया,” त्यांनी सुचवलं. पण आम्हाला कुतूहल होतं, म्हणून मी म्हणालो कि अजून थोडं उदबे चालत जाऊया, खूप शांत वाटतंय अगदी निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं. तसे आम्ही थोडं पुढं गेलो. वातावरणाला हळूहळू एक गूढ रंग चढू लागला होता. आता मला ही थोडं अस्वस्थ वाटू लागलं होतं. सूर्य मावळतीला जाऊन बराच वेळ उलटून गेला होता आणि त्यात मोठ्या आणि उंच झाडांमुळे अंधार अधिकच जाणवू लागला होता. जसजसा अंधार वाढत होता तसतशी माझ्या मनात एक प्रकारची अनामिक भीती निर्माण होतं होती. निर्माण झाली. बाबा आणि काव्या समोर चालत होते, आणि मी आणि आई मागे होतो. तितक्यात आजूबाजूच्या झाडांतून काहीतरी हलल्याचा आवाज झाला. आम्ही सर्व थांबलो. बाबा सावध होऊन आजूबाजूला पाहू लागले, पण काही दिसलं नाही.

आता मात्र आम्ही तिथून मागे फिरायचे ठरवले. आलो त्या वाटेने पुन्हा पायापीट सुरु झाली. तितक्यात काव्याला मागून कसला तरी आवाज आला म्हणून तिने मागे वळून पहिले आणि तिचा चेहरा फिका पडला. ती कापऱ्या आवाजात म्हणाली “मागे बघा! कोणी तरी उभं आहे!” आम्ही सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. झाडांच्या सावल्यांमध्ये एक आकृती उभी दिसली. मला कळायला वेळ लागला कि ती हळूहळू आमच्याकडे सरकत आहे. जशी ती आकृती पुढे आली, आम्हाला स्पष्ट दिसलं – ती एक मानव सदृश्य आकृती होती, पण सगळ्यात भयानक म्हणजे तिचं डोकं नव्हतं! शरीर संपूर्ण होतं, हात, पाय व्यवस्थित दिसत होते, पण मानेवर डोकं नव्हतं. त्या क्षणी, आम्ही थरारून गेलो. माझ्या आईने भितीने किंचाळत मागे सरकण्याचा प्रयत्न केला, पण ती कोसळली. बाबांनी आणि मी तिला कसे बसे सावरले. मी मात्र शून्यात गेल्या सारखा एक टक पाहत होतो.

बाबांनी माझा आणि काव्याचा हात धरला आणि जोरात मागे खेचले. आम्ही सगळे मागे वळून धावत सुटलो. पण त्या शिरविरहित आकृतीच्या पावलांचे आवाज आमच्या पाठीमागून ऐकू येत होते. आई आणि काव्या भीतीने ओरडू लागल्या, रडू लागल्या. त्या जंगलातल्या झाडांमधून आमचा आवाज प्रतिध्वनीत होत होता. तितक्यात आईच्या चपलेची एक पट्टी तुटली आणि ती खाली पडली. ते जे काही होतं ते आमच्या जवळ आलं होतं. पण एका झटक्यात बाबांनी तिला उचललं आणि आम्ही धावत राहिलो. ते जेव्हा जवळ आलं होतं तेव्हा कुजलेल्या मांसाचा उग्र वास येत होता. आश्चर्य म्हणजे आम्ही पळताना अजूनच तीव्र होत चालला होता. काव्या रडत होती, “दादा हे काय आहे” मी तिला धीर दिला, पण माझं मनही घाबरून गेलं होतं. रिसॉर्टचं अंगण दिसताच आम्हाला हायसं वाटलं. तिथं पोहोचल्यावर व्यवस्थापकाने आमच्या दिशेने बॅटरी फिरवली तसे आम्ही त्या दिशेने धावत आलो. त्याच्या हातात काही तरी होतं.

मी मागे वळून पाहिलं तर त्या प्रकाशात ती आकृती अचानक अदृश्य झाली. आम्ही सगळे थरथरत होतो, घामाने निथळत होतो. आमच्या डोळ्यात भीती दाटलेली होती. रिसॉर्टच्या व्यवस्थापकाने आमचं सांत्वन केलं. आम्हाला आत घेऊन गेला, पाणी वैगरे दिले. शांत झाल्यावर काही वेळाने तो बोलू लागला. सर मी तुम्हाला म्हणालो होतो कि सूर्यास्ता नंतर जंगलात जाऊ नका, त्यात तुमच्या सोबत तुमचं कुटुंब आहे म्हणून काळजी पोटी म्हणालो. तुमच्या मागे ते जे काही येत होतं ते मान काप्याच भूत होतं जे इथल्या भागातल्या अनेक लोकांना दिसत, त्यांचा पाठलाग करत. साधारण 20 वर्षांपूर्वी जंगलात एका माणसाचा खून झाला होता. त्याचे डोके दगडाने ठेचून त्याला ठार मारलं होतं. ओळख पटू नये म्हणून त्याच शरीर जंगलाच्या वेशीवर आणून टाकलं होतं. तो प्रकार इतका क्रूर होता कि त्याच्या आत्म्याला अजूनही शांती मिळाली नाही. म्हणून त्याचा आत्मा शिरविरहित अवस्थेत तिथे फिरतो. 

व्यवस्थापकाच्या सांगण्यानुसार, त्या जंगलात असलेल्या अनेक लोकांनी त्याला पाहिलं होतं, पण तो फक्त पाठलाग करून घाबरवतो, नुकसान करत नाही. हा सगळा भयानक प्रकार आम्ही पहिल्यांदाच ऐकला आणि अनुभवला होता. ती रात्र ना आम्ही जेवलो ना झोपलो. संपूर्ण रात्र तशीच जागून काढली. रात्रभर आम्ही एका खोलीत एकत्र बसलो होतो. सकाळ होताच आम्ही तिथून निघण्याचा निर्णय घेतला. बाबा म्हणाले, “हे आपलं ठिकाण नाही. इथून लवकर बाहेर पडलं पाहिजे.”  त्या घटनेला आता बरीच वर्षं लोटली आहेत, पण आजही ती रात्र आणि ते मानकाप्या च भूत माझ्या मनात जिवंत आहे. काही गोष्टी दिसतात तितक्या साध्या नसतात. त्या जंगलाने आणि त्या रिसॉर्टने आम्हाला एक गोष्ट शिकवली – काही वेळा शांततेच्याही मागे गूढ सत्य लपलेलं असू शकत.. 

Leave a Reply