रंदनवाडी हे गाव अत्यंत साधं, शांत, पण गूढ वातावरणाने वेढलेलं गाव. गावकऱ्यांच्या रोजच्या जीवनात फारसा बदल नव्हता; शेती, गुरं-ढोरं, आणि सणवार यात ते रमलेले असत. संपूर्ण जग बदलले असले तरीही हे गाव मात्र अजूनही मागासलेले होते. या गावाबाबत एक गोष्ट सर्वत्र प्रचलित होती.. दरवर्षी गावदेवीच्या जत्रे नंतर 7 दिवसांनी या गावात रात्री ‘भूतांची यात्रा’ भरते. ही यात्रा गावा नजीकच्या जंगलात भरत असल्याचा समज होता. त्या रात्री संपूर्ण गाव एका स्मशान शांततेत गढून जाई. गावकरी स्वतःला घरात कोंडून घेत आणि खिडक्या-दारे बंद करत. या यात्रेचं स्वरूप काय, हे कोणीही प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं, पण गावकऱ्यांचा ठाम विश्वास होता की, जो कोणी त्या रात्री बाहेर पडतो, तो परत येत नाही किंवा परत आल्यास पूर्णतः बदललेला असतो. गावातील वयोवृद्धांनी सांगितलेल्या पुराणकथेप्रमाणे, शेकडो वर्षांपूर्वी करंजवाडीच्या जंगलात एक प्राचीन मंदिर होतं.

या मंदिरात देवता नव्हती; तिथे अज्ञात शक्ती वास करत असे. या शक्तीचा स्वभाव क्रूर आणि भयावह होता. तिला आवर घालण्यासाठी त्या काळातील विद्वान पुजार्‍यांनी ती मंदिरातच बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्या शक्तीने त्यांचा संहार केला. त्यानंतर गावकऱ्यांनी त्या जंगलात जाणं बंद केलं. ते मंदिर ही असे सहसा कोणाला दिसत नाही. त्या शक्तीला शांत ठेवण्यासाठी दरवर्षीच्या एका विशिष्ट रात्री भूतांची यात्रा भरते. पण या सगळ्या ऐकीव कथा आहेत कि या मध्ये काही सत्य ही आहे हे मात्र कोणालाही ठाऊक नव्हतं. ज्यांना बऱ्यापैकी माहित होतं ते आता हयात नाहीत आणि जी शेवटची पिढी गावात आहे त्यांनाही तुटपुंजी माहिती आहे. माझा मित्र अर्जुन याच गावातला पण लहानपणी त्याच कुटुंब शहरात स्थायिक झालं होतं. त्याच्या गावाबद्दल मी त्याच्या कडून च ऐकलं होतं आणि त्यामुळेच मला अतिशय कुतूहल निर्माण झालं होतं. 

आताच्या पिढीतला तरुण मी. त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी खूप आकर्षित करायच्या. तंत्रज्ञानाच्या पालीकडे ही एखाद जग असेल का, जर असेल तर ते कसे असेल याची उत्सुकता लागून राहायची. आणि अर्जुन च्या गावात कदाचित याच उत्तर मिळणार होतं. चांगली आठवडाभराची सुट्टी घेऊन मी त्याच्या गावी जायचे ठरवले. अर्जुन ला मात्र या गोष्टीच अजिबात गांभीर्य नव्हतं. त्याच्या मते या सगळ्या भाकड कथा होत्या. कधी हा विषय काढला कि तो म्हणायचा “गावातली लोकं कधी सुधारणार नाहीत.. “ असो.. माझे गावात येण्या मागचे कारण होते ती भूतांची यात्रा.. जर खरंच या भाकड कथा असतील तर अर्जुन च म्हणणं अगदी बरोबर आणि जर नसतील तर..? तर मला नक्की त्या जगाबद्दल वेगळी माहिती मिळेल. मी ज्या दिवशी गावात आलो तेव्हा गावदेवीची जत्रा होऊन 4 दिवस उलटले होते. म्हणजे मला 3 दिवस थांबावे लागणार होते.

या तीन दिवसांत गावात फिरून अजून काही माहिती मिळते का? जसे मी विचारायला सुरुवात केली तसे गावकऱ्यांनी मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. एक वृद्ध व्यक्ती म्हणाला कि “आम्ही तुला रोखणार नाही, पण जर तू गेलास आणि परत आला नाहीस, तर आम्ही तुला शोधायला येणार नाही.. जर का काहीही घडलं तर त्याची जबाबदारी तुझीच असेल!” पण मनाशी केलेला निर्धार, त्या यात्रे बद्दल ची उत्सुकता माझा निर्णय बदलू शकणार नव्हती. गावातल्या बहुतांश घरातुन एक ना एक व्यक्ती त्या यात्रेच्या आहारी जाऊन बेपत्ता झाली होती.. किमान 8-10 लोकांचे भिंतीवर टांगलेले फोटो मी पहिले होते. बघता बघता ती रात्र आली. वातावरण अधिकच गडद आणि भयावह झालं होतं. गावातील घरांमध्ये दिवे मालवले गेले होते. गावातले वातावरण अगदी शांत झालं होतं. ना कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ना साधी रात किड्यांची किर किर.. जणू ते ही भीती च्या सावटाखाली गेले होते. पण मी मनाची तयारी केली आणि बाहेर पडलो. एका हातात एक मोठी टॉर्च तर दुसऱ्या हातात सुरक्षेसाठी एक मोठा सूरा. 

नक्की मार्ग माहित नव्हता पण हो एक गोष्ट माहित होती कि जंगलाच्या दिशेने आत चालत जायचे. माझी पायापीट सुरु झाली. काही वेळानंतर मला लक्षात आले कि वातावरणात गारवा प्रचंड वाढला आहे. इतका कि मला सहन होईनासा झालाय. सुदैवाने माझ्या खिशात लाईटर होते, मी पटापट सुकलेली लाकडं गोळा केली आणि लाईटर पेटवले. एक एक करत 5-6 सुकलेल्या काड्या ठेवत मी शेकोटी पेटवली. बसून हात आणि पाय शेकून घेतले तेव्हा कुठे थोडं बरं वाटल. 10-15 मिनिट तिथेच बसून राहिलो आणि नंतर उठून पुढे चालायला सुरुवात केली. त्या भागात साचलेल्या सुकेलेल्या पानांवर पाय ठेवताच होणारा आवाज त्या शांत वातावरणात घुमत होता. पुढे खरंच काही अनुभवायला मिळेल का कि अर्जुन ने सांगितलेल्या प्रमाणे या भाकड कथा असतील आणि माझ्या हाती काहीच लागणार नाही असे विचार सतत मनात घोळत होते. एव्हाना मी तीन ते चार केलोमीटर आत चालत आलो होतो त्यामुळे थोडं दमायला झालं होतं.

तितक्यात अचानक मला एक मोठं मोकळ मैदान दिसलं. जंगलाच्या मधोमध असणं हे थोडं आश्चर्यकरक होतं. मी त्या दिशेने चालत जाऊन त्या मोकळ्या मैदानात जसं पाऊल टाकलं तसं सोसाट्याचा वारा सुटला. त्याच सोबत आभाळ दाटून आलं. पण मी पुढे चालत राहिलो. त्या मैदानाच्या मध्यभागी चौथऱ्यासारखी एक जागा होती, ज्याभोवती अज्ञात प्रतीकं कोरलेली होती. मी बॅटरीच्या प्रकाशात ती प्रतिकं पाहू लागलो. चित्र विचित्र आकृत्या, त्याखाली काही अक्षर जी वेगळ्याच लिपीत कोरली गेली होती. तितक्यात जोरात वीज चमकली आणि माझे लक्ष समोर गेले. त्या चौथऱ्याच्या मागे एक प्राचीन मंदिर उभं होतं. हेच ते मंदिर ज्या बद्दल मी ऐकलं होतं. मी कसलाही विचार न करता मंदिराच्या दिशेने पाऊल टाकलं. माझ्या प्रत्येक पावलांबरोबर वातावरणात होतं असलेला बदल मला जाणवू लागला. इतक्या वेळे पासून एकटा चालत असलेला मी.. आता माझ्या सोबत एक दोन नव्हे तर बऱ्याच मानव सदृश्य सावल्या चालू लागल्या. 

इतक्या वर्षांपासून मनाशी बाळगलेलं स्वप्न सत्यात उतरल होतं. त्यामुळे भीती, मी करत असलेल्या कृत्याचे परिणाम याचा पुसटसा विचार ही मनात आला नव्हता. त्या सावल्या आता माझ्या कानात काही तरी सांगू पाहत होत्या. पण मला काहीच उमगत नव्हतं. मी त्या मंदिराच्या द्वारापाशी येउन पोहोचलो आणि दारावर हात ठेवला. तसे दार आत लोटले गेले आणि आवाज घुमला. आत पाहिलं तर संपूर्ण जाळोख्यांनी भरलं होतं. ती बाजूला सारत मी आत शिरलो. बॅटरीचा प्रकाश थेट समोर मारला तर दिसले कि समोरच्या चौथऱ्यावर जिथे सहसा मूर्ती असते तिथे मूर्ती नव्हती. तितक्यात घुमाटा च्या दिशेने काही तरी सरपटण्याचा आवाज आला. तसे बॅटरी झटकन त्या दिशेला वळवून मी वर पाहिलं. तिथे जे दिसलं तसलं काही मी आज पर्यंत कधीच पाहिलं नव्हतं. ना मानव म्हणता येईल ना प्राणी.. एखाद्या हिनस्र श्वापदा प्रमाणे केसाळलेला चेहरा, माणसा सारखे हात आणि पाय पण हातांना अगदी तीक्ष्ण नख.

जशी वाघाला असतात तशी, ज्याच्या एका वाराने भक्षाची चिरफाड करतील. इतक्या वेळेपासून कुतूहलाच्या गर्तेत बुडालेला मी एका झटक्यात बाहेर आलो आणि भानावर आलो. कुठे आलोय मी.. ही तिच अज्ञात शक्ती.. माझी पावलं भीती ने नकळत मागे पडू लागली. कारण ती शक्ती ते जे काही होतं ते कोणत्याही क्षणी माझ्या अंगावर झेप घेऊन माझा फडशा पडेल असे वाटत होते. या सगळ्या विचारात असताना माझ्या सोबत असलेल्या वायुरूपी आकृत्यांनी आता स्थायूरूप घेतलं होतं. मी त्यांच्या चेहऱ्यांकडे पहिले आणि भीतीने माझे हातपाय च गळून गेले. ही त्यांचीच भूत होतं जे गावातून बेपत्ता झाले होते आणि ज्यांचे हार घातलेले फोटो गावातल्या घरात पाहिले होते. चेहऱ्यावर कसलेही भाव नाही. जणू ते त्या अदृश्य शक्तीच्या प्रभावाखाली आहेत. त्यांनी मला घेरायला सुरुवात केली आणि हळू हळू मला भोवळ येऊ लागली आणि माझी शुद्ध हरपली. 

एका विचित्र आवाजाने मला जाग आली. जाग येताच दोन्ही खांद्यातून तीव्र कळ आली. समोरचे दृष्य खूप धूसर दिसत होते त्यामुळे नक्की काय होतय, माझ्या सोबत काय घडतंय हे मला कळतं नव्हतं. पण हळू हळू दृष्य स्पष्ट होऊ लागलं. तिचं भूत मशाली घेऊन पुढे चालत होती. माझ्या दोन्ही खांद्यात सळई सारखे तीक्ष्ण हत्यार घालून मला उंचावर लटकावले होते. ते एका वेगळ्याच आवाजात ओरडत होते, वाद्य वाजवत होते. ती भूतांची यात्रा होती ज्यात माझा बळी जाणार होता असे मला वाटू लागले. आणि माझी भीती खरी ठरली. ती भूतांची यात्रा मला त्या मैदानाच्या मधोमध असलेल्या चौथऱ्यावर घेऊन आली आणि जोरात फेकलं. ती सगळी भूत जोर जोरात ओरडू लागली, वाद्यांचा आवाजही वाढला. तसे त्या भूतांच्या मागून आलेल्या त्या अमानवीय शक्तीने माझ्यावर झेप घेतली आणि…

Leave a Reply