अनुभव – प्रसन्न सोनावणे

माझं नाव प्रसन्न. मी नाशिकचा राहणारा आहे. हा अनुभव मला काही वर्षांपूर्वी आला होता. आमच्या भागात एक जुनं हॉटेल आहे, जे अनेक वर्षांपासून बंद आहे. तिथं लोकं भूतं असल्याच्या अफवा नेहमीच पसरवत असतात. पण मला तशा गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता. माझा मित्र ज्याला आम्ही बब्ल्या या टोपण नावाने हाक मारायचो त्याला अशा गोष्टींबद्दल खूप उत्सुकता होती. त्यानं एकदा मला आणि आमच्या इतर मित्रांना, म्हणजे सदा आणि आकाशला, बोलावलं आणि म्हणाला, “चला, त्या हॉटेलला भेट देऊ.. बऱ्याच दिवसांपासून ऐकतोय.. एकदा जाऊन बघूच काय आहे ते.. आणि एकदाचा सोक्ष मोक्ष लावून टाकू…” आम्ही दोन दिवसांनी रात्री तिथं, जायचे ठरवले. त्या दिवशी आम्ही चौघं जमलो. हातात टॉर्च आणि जरा हिम्मत करून, रात्री बरोबर ११ वाजता त्या जुन्या हॉटेल कडे जायला निघालो.. हॉटेलच्या बाहेर पार्किंग साठी जागा होती, तिथे गाडी लावून आम्ही आत शिरलो. आजूबाजूला सगळीकडे गडद काळोख आणि अस्वस्थ करणारी शांतता पसरली होती.

हॉटेल च बांधकाम खूप जून होतं. बऱ्याच वर्षांपासून बंद पडलं होतं. भिंतींचा रंग ही फिका पडला होता. पायाखाली धूळ, माती पसरली होती. आम्ही हळूहळू पायऱ्या चढून वर गेलो आणि काऊंटरजवळ पोहोचलो. तिथं अचानक मला माझाच आवाज ऐकू आला, “बब्ल्या, सदा, मला वाचवा!” मी सुन्न झालो. माझ्या आवाजात तो आवाज कुठून आला? बब्ल्यानं लगेच विचारलं, “प्रसन्न, तू बोललास का?” मी घाबरत म्हणालो, “नाही.” मग सदा म्हणाला, “आकाश, हे काय चाललंय?” आकाशनंही गोंधळून नकारार्थी मान हलवली. तो आवाज अगदी माझ्यासारखा होता. जणू काही मीच बोलतोय. भास नक्कीच नव्हता कारण मीच नाही तर चौघानीही तो आवाज स्पष्ट ऐकला होता. त्या प्रकाराने आम्ही इतके घाबरलो कि पळत पार्किंगच्या दिशेनं खाली जायला निघालो. पण जसं पायऱ्या उतरलो, तसंच पुन्हा काऊंटरसमोर आलो!.. पुन्हा खाली जायचा जिना उतरू लागलो पण पुन्हा समोर तेच काउंटर.. जणू काही आम्ही त्या एका मजल्यावरून बाहेर पडूच शकत नव्हतो. त्या जागेने किंवा त्या जागेत जे काही होतं त्यानं आम्हाला जणू जखडून ठेवलं होतं. 

आम्ही 8 ते 10 वेळा खालचा जिना धरून धावत राहिलो पण राहून एकाच ठिकाणी परतत होतो. आम्ही प्रचंड घाबरलो होतो पण इतक थकायला झालं होतं कि इच्छा नसतानाही मी धाप लागून काही सेकंद थांबलो. पण तोच आवाज पुन्हा आला आणि माझं सर्वांग शहरालं. “माझ्या आवाजातला तो कोण आहे?” या विचाराने डोकं सुन्न झालं होतं. आम्ही ठरवलं की आता जे काही आहे, त्याचा सामना करायचा. आम्ही आवाजाचा मागोवा घेत कॉरिडॉरकडे निघालो. त्या दिशेला बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता पण तरीही तो आवाज कुठून आला हे शोधायला आम्ही आत गेलो. जसं जसे आम्ही त्या दिशेला जातं होतो तसे तो आवाज पुन्हा येऊ लागला. माझाच आवाज.. पण त्या आवाजात एक अनामिक भीती जाणवत होती. जणू मीच अडकलोय, शरीरातला टत्राण संपलाय आणि मदतीसाठी माझ्या मित्रांना जिवाच्या एकांताने हाका देतोय. पण तिथं पोहोचताच आवाज बंद झाला. त्या शांततेनं आमचा जीव अजूनच टांगणीला लागला होता.

काही कळते ना कळते तोच एका लहान मुलीचा गाण्याचा आवाज आला, “A, B, C, D…” त्या आवाजानं आमचं लक्ष पुढे गेलं आणि मित्राच्या हातातल्या बॅटरीची दिशा नकळत त्या दिशेला वळली… तिथल्या एका कोपऱ्यात एक लहान मुलगी बसली होती, ती अंधाऱ्या कोपऱ्यातून आमच्या कडे पाहत होती.. तिचे डोळे अगदी काळपट दिसत होते, चेहऱ्यावर वेगळच हसू होतं. आम्ही मागे वळून पळण्याचा प्रयत्न केला, पण ती मुलगी पुन्हा समोर दिसली. आता मात्र आमची पावलं जागीच खिळली. ती शांतपणे म्हणाली, “माझे आई-वडील कुठे आहेत?” आम्ही कुणीही बोलण्याचं धाडस केलं नाही. तेव्हा ती रडू लागली आणि रागात ओरडली, “तुम्हीच त्यांना मारलंत!” तिच्या त्या वाक्यानं आम्ही हादरलो. काही कळायच्या आत ती अचानक आमच्या दिशेने धावून आली. आम्ही प्रचंड घाबरून पळत सुटलो. ती आम्हाला पाठलाग करत होती. तिचा आवाज आता एका मुलीच्या आवाजातून बदलून अतिशय भरडा आणि किळसवाणा झाला होता “मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही!” 

आम्ही जिथे मार्ग मिळेल तिथे धावत सुटलो. कोणी तरी म्हणाल कि फायर एक्झिटचा रस्ता असेल म्हणून तो शोधू लागलो. तेवढ्यात एका वेगळ्या आणि शांत आवाजानं सांगितलं, “बाळांनो, फायर एक्झिट किचनच्या बाजूला आहे. लवकर जा, पण मागे वळून पाहू नका.” आम्ही ते ऐकून धावत किचनकडे गेलो. सुदैवाने आम्हाला त्या बाजूला फायर एक्झिट चा रस्ता दिसला तसे आम्ही तिथून बाहेर पडलो. आमची गाडी घेऊन थेट घरी निघून आलो. त्या आवाजानं आम्हाला वाचवलं. मात्र, तो आवाज कोणाचा होता? आणि त्याने आम्हाला मार्ग दाखवून का वाचवलं याच उत्तर आम्हाला कधीच मिळालं नाही. त्या हॉटेलमध्ये घडलेलं प्रकरण कधीच विसरू शकत नाही. ती लहान मुलगी, तिचे काळपट डोळे, तिचं ते ओरडणं… हे सगळं अजूनही आठवलं की अंगावर काटा येतो. तो अनुभव आम्हाला कायमचं शिकवून गेला की विषाची परीक्षा घ्यायची नसते, काय माहित तुमच्यासाठी अनोळखी जागी काय वाढून ठेवलय. या प्रसंगांनंतर मानतर आम्हा मित्रांनी त्या हॉटेलच्या वाटेला जायचं सोडलं. आजही ते हॉटेल बंद आहे, तसच.. त्याच भयाण आणि भकास अवस्थेत.. 

Leave a Reply