अनुभव – पत्या भाऊ चव्हाण

मी सातारा जिल्ह्यातील राहणारा, शिक्षणासाठी पाटणच्या महाविद्यालयात शिकत होतो. कॉलेजमधील मित्रांबरोबर मजा, गप्पा, आणि पार्ट्या करणे हे आमच्यासाठी नेहमीच उत्साहाचं कारण असे. एके दिवशी, मी, ऋषी, सुमीत, आणि रोहित यांसोबत ठरवलं की रात्रीच्या वेळेस एक छोटीशी पार्टी करायची आणि वेगळ्या ठिकाणी जायचं. ठिकाण ठरलं, जे पाटणच्या वर डोंगराळ भागात आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळेस  जाणं फारसं सुरक्षित मानलं जात नसे. पार्टीची तयारी झाली. संध्याकाळी सगळं सामान, जेवणासाठी लागणारे साहित्य, आणि काही आवश्यक वस्तू घेऊन आम्ही आठ वाजता ठरलेल्या जागेवर पोहोचलो. त्या रात्री अंगाला बोचणारी थंडी पसरली होती. त्यामुळे आमची पार्टी जोरदार होणार यात काही शंका नव्हती. गडद खाळोख आणि आसपासची शांतता अंगावर काटा आणणारी होती.

आम्ही आपापल्या कामाला लागलो – चिकन स्वच्छ करून, बिर्याणी बनवायला घेतली. सुमीत बिर्याणी करण्यात गुंतलेला असताना, मी, रोहित, आणि ऋषी ने थोडं जंगलात फिरून यायचं ठरवलं. कारण बिर्याणी व्हायला अजून वेळ लागणार होता. जंगलात गेल्यावर एक वेगळाच अनुभव येत होता. ती घनदाट झाडं, मधूनच ऐकू येणारे विचित्र आवाज अंगावर भीतीचा शिरशिरी आणत होते. तरीही, मित्रांबरोबर असल्यानं आम्ही निर्भयपणे पुढे चालत होतो. सुमारे तासभर भटकंती केल्यावर आम्ही ठरवलं की आता परत फिरू. परत आल्यावर बिर्याणी तयार झाली होती. आम्ही ती चविष्ट बिर्याणी खाल्ली, गप्पा मारल्या आणि रात्री उशिरा आणखी काहीतरी करण्याचा विचार करू लागलो. आमच्या एका मित्राला अचानक शिकार करण्याचा विचार सुचला. “कधीतरी जंगलात जाऊन ससे किंवा पक्षी पकडणं हा वेगळाच अनुभव असेल,” तो म्हणाला. त्या कल्पनेनं आम्ही सगळेच उत्साही झालो आणि जंगलात जायला निघालो. वेळ माहित नाही पण मध्य रात्र उलटून गेली असावी. 

आम्ही जंगलात आत जाऊ लागलो, सुमारे एक किलोमीटर चालल्यानंतर अचानक एक ससा दिसला. तो पकडण्यासाठी आम्ही सर्वजण वेगाने त्याच्या मागे धावू लागलो. ससा मात्र फार चपळ निघाला; त्याच्या मागे धावताना आम्ही कित्येक किलोमीटर आत गेलो, त्यात वेळेचंही भान राहिलं नाही. एका क्षणी ससा आमच्या नजरेआड झाला, आणि आम्ही सगळे थांबलो. त्याच वेळी आम्हाला जाणवलं की आजूबाजूचं वातावरण खूपच गडद आणि वेगळं वाटतंय. आम्हाला कळून चुकलं की आपण बहुतेक चकव्यात अडकलो आहोत.आमच्यापैकी एका मित्राने हातातल्या टॉर्चचा प्रकाश आजूबाजूला टाकला, पण झाडांच्या सावल्यांमुळे समोरचं काहीच नीट दिसत नव्हतं. आम्ही मागे फिरायला सुरुवात केली, पण वाट काही केल्या सापडेना. अशा अवस्थेत आमचं धैर्य खचू लागलं.

त्याचवेळी मागून एक विचित्र आवाज आला. आम्ही घाबरून मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. त्या अंधाऱ्या वातावरणात आवाजाचा स्रोत शोधणं अशक्य होतं. आमच्या मनात भितीने घरं केलं होतं. आम्ही पळत पळत पुढे जात राहिलो. कुठलीही दिशा माहित नसताना आम्ही फक्त जंगलातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो. दोन तासांनी, शेवटी आम्हाला एक ओळखीची वाट दिसली. आम्ही जीवाच्या आकांतानं त्या वाटेवर धावलो आणि कसेबसे गावाजवळच्या एका घरापर्यंत पोहोचलो. त्या घरातल्या माणसांनी आम्हाला पाणी दिलं, विचारपूस केली, पण आम्ही काहीच सांगू शकलो नाही. घरी परतल्यावर सगळ्यांना ताप भरला होता. आम्ही काही दिवस आजारी पडलो होतो. जंगलात जाणं, निसर्गाचा आनंद घेणं हे चांगलंच, पण निसर्गाच्या अज्ञात शक्तींचा आदर करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कधी कधी मानवाच्या मर्यादा ओळखून सुरक्षित अंतर राखणं हेच शहाणपण ठरतं.

Leave a Reply