अनुभव – अशोक कुरुंद

ही गोष्ट त्या काळातील आहे, जेव्हा मी चौदा वर्षांचा होतो. उन्हाळ्याची सुट्टी होती, आणि सुट्ट्या म्हटलं की मावशीकडे जाणं आलंच. मी मावशीकडे पोहोचल्यानंतर माझे मावसभाऊ विकी आणि करण यांच्यासोबत भरपूर खेळायचो. आम्ही दिवसभर मस्ती करायचो, गप्पा मारायचो, आणि आमच्या आजीने सांगितलेल्या गोष्टी ऐकायचो. मावशीचं घर गावात होतं, एका शाळेच्या शेजारी. त्या शाळेच्या मागे मोठा वनविभाग होता, जो अंधार पडायला लागल्या नंतर सामसूम होऊन जायचा. आजी नेहमी त्या जागे बद्दल बद्दल काही ना काही सांगायची – “त्या झाडांमध्ये भूतं असतात,” किंवा “रात्री त्या जंगलातून मोठमोठाले आवाज येतात.” हे सगळं ऐकून आम्ही थोडं घाबरायचो, पण तेवढंच कुतूहलही वाटायचं. एके दिवशी दुपारी चारच्या सुमारास आम्ही तिघे भाऊ शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळायला गेलो. खेळण्याचा नादात वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही.

सूर्य मावळला होता, आणि रात्र झाल्याचं लक्षात आलं. संध्याकाळी मैदानात फारशी वर्दळ नव्हती, म्हणून खेळ आटोपून आम्ही मैदानातच गप्पा मारत बसलो. तेवढ्यात मला जाणवलं की शाळेमागच्या जंगलात काहीतरी हालचाल होत आहे. मी विकी आणि करणला विचारलं, “काही आवाज ऐकतोय का तुम्हाला?” पण त्यांनी दुर्लक्ष केलं. आणि मग अचानक, एक विचित्र हसण्याचा आवाज आला. जो ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. मी घाबरून तिथून उठण्याचा प्रयत्न केला पण माझं शरीर सुन्न झालं, जणू कुठल्याशा अज्ञात शक्तीनं मला पकडून ठेवलं होतं. “विकी!” मी घाबरून ओरडलो, पण आवाज माझ्या घशातून बाहेरच पडला नाही.. विकीने माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि माझी अवस्था पाहून त्यानं मला खांद्याला धरून उठवलं.

“चल लवकर, इथून निघूया!” तो म्हणाला. करणही आमच्यासोबत पळत सुटला. त्या रात्री मी घरी पोहोचलो, पण मन अजूनही घाबरलेलं होतं. सतत वाटत होतं कि हे सगळं इतक्यावर थांबणार नाही. आणि तसच घडलं. आईने विचारलं, “काय झालं? एवढा गप्प का?” मी काही बोललो नाही. मनातली भीती घेऊन झोपायचा प्रयत्न केला, पण झोप काही लागली नाही. रात्री तीनच्या सुमारास, अचानक घराच्या बाहेर दाराची कडी वाजायला लागली. “ठक… ठक… ठक…” माझ्या कानावर आवाज पडताच मी जागा झालो. त्या आवाजासोबतच पुन्हा तोच हसण्याचा भयानक आवाज ऐकू आला. मी पांघरूणात अंग ओढून घेतलं. मला असं वाटत होतं की तो आवाज मला बाहेर बोलवतोय. जणू काही तो आवाज माझं मन आणि शरीर काबीज करू पाहत होता. देवाचं नाव घेत मी शांत राहण्याचा प्रयत्न केला. पाच-दहा मिनिटं अशीच गेली. पण तो आवाज थांबायचं नाव घेत नव्हता.

तब्बल एक तास, बाहेर दाराची कडी वाजत होती आणि त्या सोबत त्या हसण्याचा आवाज घुमत होता. बघता बघता सकाळ झाली.. मी रात्रीच्या अनुभवामुळे खूपच घाबरलो होतो. झोपेच्या अभावामुळे मी अशक्त वाटत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मावशीला आणि घरातल्यांना सांगितलं की, “रात्री बाहेर कोणीतरी होतं. कडी वाजत होती, आणि आवाजही येत होता.” त्यावर घरातले सगळे हसले. “कुठे काही नाही,” मावशी म्हणाली. ” पण माझ्या मावसभाऊंना माझ्या चेहऱ्यावरची भीती दिसत होती. विकी म्हणाला, “मी पण ऐकलं होतं, पण मी काही बोललो नाही.” त्या घटनेनंतर मला दोन दिवस ताप आला होता. मी शारीरिकदृष्ट्या अशक्त झालो होतो, पण मानसिक त्रास त्याहून जास्त होता. शेवटी, आम्ही ठरवलं की त्या भागात पुन्हा कधीच जायचं नाही. ती हसण्याचा आवाज आणि रात्रीचा भयानक अनुभव माझ्या मनात कायमचा कोरला गेला.

Leave a Reply