पितृपक्ष सुरु झाला होता. असं म्हणतात कि या विशिष्ट कालावधीत अमानवीय शक्तींचा वावर वाढलेला असतो आणि त्यांच्यावर कुठलीही बंधनं नसतात. याची प्रचिती माझ्या वडिलांना आली. अनुभव आहे 20 सप्टेंबर 2024 चा म्हणजे अवघ्या 2-3 महिन्यांपूर्वीचा. मी कोकणातील असून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एका गावात राहते. आमच्या गावा पासून 7 किलोमीटर वर एक शहर आहे जिथे आवश्यक वस्तू, भाजीपाला आणायला गावातील लोक जात असतात. गावापासून शहरा पर्यंतच्या रस्त्यात बरीच गावं लागतात. माझे वडील एमआयडीसी भागात एका खाजगी कंपनी मध्ये कामाला आहेत. त्यांना वेगवेगळ्या शिफ्ट असतात. कधी दिवसाची शिफ्ट, कधी दुपारची तर कधी रात्रीची शिफ्ट. त्या दिवशी दुपारची शिफ्ट होती पण जाताना ते सांगून गेले कि आज मी लवकर घरी येईन. आणि जेवण बनवू नका, येताना मी नॉन व्हेज पार्सल घेऊन येईन. सोबत थोडा खाऊ ही घेऊन येईन.

कातरवेळी ७ च्या सुमारास त्यांनी घरी फोन करून सांगितलं कि मी कंपनी मधून निघालो आहे, ८ किंवा ८:३० च्या दरम्यान घरी पोहोचेन. आम्ही सगळे त्यांची वाट पाहत बसलो होतो. पण ८:३० चे ९ झाले आणि ९ चे ९.३० तरी वडील अजून घरी आले नव्हते. फोन करून पहिला तर तो ही बंद लागत होता. आम्हाला सगळ्यांनाच आता काळजी वाटू लागली होती. मी त्यांच्या कंपनी मध्ये ही फोन करून विचारपूस केली तर त्यांचे सहकारी म्हणाले कि ते कधीच इथून निघाले आहेत, साधारण 2 तासांपूर्वी.. काय कराव काही सुचत नव्हतं. त्यांची वाट पाहण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. साधारण पावणे दहा च्या सुमारास त्यांच्या मोटारसायकल चा आवाज आला. मी धावातच त्यांना बघायला घरा बाहेर आले. त्यांची अवस्था पाहून आम्ही सगळेच घाबरलो. कारण त्यांच्या हाता पायाला खूप लागलं होतं. मोटारसायकल चा पुढचा लाईट, साईड मीरर सगळं तुटलं होतं. आम्ही त्यांना घरात आणलं.

मी पटकन आत धावत जाऊन पाणी घेऊन आले. थोडा वेळ ते शांत बसले पण तोवर आमच्या प्रश्नांचा भडीमार सुरु झाला. त्यांनी आम्हाला सगळं विचारू दील आणि नंतर ते एक दीर्घ श्वास घेऊन बोलू लागले. कंपनी मधून निघून मी साधारण सव्वा आठ ला आपल्या गावाजवळ पोहोचलो होतो पण अचानक मोटारसायकल बंद पडली. स्टार्टर देऊन सुरु होत नव्हती म्हणून किक मारत राहिलो. काही वेळाच्या प्रयत्नानंतर मोटारसायकल सुरु झाली आणि मी पुढे निघालो. पण १० मिनिटांनी पुन्हा त्याच जागेवर येऊन थांबलो. मी गोंधळलो. पुन्हा मोटारसायकल सुरु केली आणि गावाच्या दिशेने निघालो. पण पुन्हा त्याच जागी येऊन थांबलो. हाच प्रकार ४-५ वेळा घडला. पण नंतर एका वेळेला अचानक एक म्हैस धावत आली आणि तिचे शिंग मोटार सायकल च्या हॅन्डल मध्ये अडकलं आणि तुटलंहि. तोल जाऊन मी फरफटत गेलो आणि मोटार सायकल पासून लांब फेकलो गेलो. मागे वळून पहिले तर ती म्हैस कुठे हि दिसत नव्हती. तीच तुटून पडलेलं शिंग हि रस्त्यावर दिसत नव्हतं.

मी फरफटत गेलो असलो तरी सुद्धा मला जास्त दुखापत झाली नाही. पण हात पायाला बऱ्यापैकी खरचटलं होत. या सगळ्यात फोन खिशातून खाली पडून फुटला आणि बंद झाला. ज्या पिशवी मध्ये जेवण आणि इतर खाऊ होता ती पिशवी देखील दुसऱ्या बाजूला पडून त्यातल जेवण रस्त्यावर सांडल. मी उठून बाईक च्या दिशेने चालू लागलो. पिशवी जवळ च इतर खाऊ पडला होता पण जे मांसाहारी पदार्थ सांडले होते त्यांच्या खुणा ही कुठे दिसल्या नाहीत. जणू कोणी तिथून ते अगदी सहज खाऊन टाकले असावेत किंवा घेऊन गेलं असावं. मी पुन्हा मोटारसायकल सुरु केली आणि मला लागलेला चकवा हि सुटला. वडिलांचे बोलणे ऐकून आम्ही सगळेच प्रचंड घाबरलो होतो. कारण वडील ज्या भाग बद्दल बोलत होते, जिथे त्यांची मोटार सायकल बंद पडली होती त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी अपघात होत असतात. 

होणारे अपघात खूप भयानक असतात जिथे अपघातातील माणसं एकतर जागच्या जागी प्राण सोडतात किंवा हॉस्पिटल मधे नेई पर्यंत त्यांची प्राणज्योत मालवते. दैव बलवत्तर आणि आजी आजोबांचा आशीर्वाद, त्यांची पुण्याई म्हणून वडील त्या जागेवरून कमीतकमी दुखापत घेऊन सुखरूप घरा पर्यंत येऊ शकले. पितृपक्षाच्या कालावधीत अमानवीय शक्तींना अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळते. वडिलांकडे खाण्याचे पदार्थ असून चकवा लागून ही ते त्यांनी तिथे न ठेवल्यास जी कुठली अमानवीय शक्ती होती तीने म्हंशीच रूप घेउन किंवा तसा भ्रम निर्माण करून तिला जे पाहिजे होत ते घेतल आणि ते मिळाल्यावर वडिलांना लागलेला चकवा ही सुटला .

Leave a Reply