विशाल नुकताच अहमदनगरमध्ये फायनान्स ऑफिसर म्हणून नोकरीला लागला होता. शिक्षण पूर्ण झाल्या नंतर चांगल्या पगाराची नोकरी लागल्या मूळे त्याला खूप आनंद झाला होता. बक्कळ पगार असल्यामुळे आयुष्यातले सगळे मार्ग त्याला सहज वाटू लागले होते. आणि तो त्याच्या आयुष्यातील हा नवा अध्याय सुरू करण्यास उत्सुक होता. जॉईनिंग लेटर हातात आलं, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवणं कठीण होतं. पहिल्या नोकरीचं स्वप्न पूर्ण झालं होतं. “शहरात राहायचं म्हणजे स्वप्नासारखं वाटतंय,” तो स्वतःशी बोलला. पण त्याच्या मनात थोडी काळजीही होती. नवीन शहर, नवीन नोकरी, आणि राहण्यासाठी जागा शोधायची समस्या – यामुळे त्याला कामाच्या पहिल्या दिवसाच्या आधीच ताण येऊ लागला. त्याने विचार केला, “सुरुवातीला स्वस्तात एखादी जागा मिळाली, तर चांगलं. पहिला पगार आला की चांगल्या ठिकाणी फ्लॅट घेईन.” काही दिवस शहरात भटकून, खूप लोकांशी विचारपूस करून त्याला शेवटी “अग्निश सोसायटी”बद्दल कळलं. “अग्निश सोसायटी” नाव कधीच ऐकलेलं नव्हतं, पण एका एजंटकडून मिळालेल्या माहितीनुसार, इथे एक फ्लॅट खूपच स्वस्त भाड्याने मिळत होता. विशालने ताबडतोब दिलेल्या नंबरवर फोन केला.

“हॅलो?”

फोनच्या दुसऱ्या बाजूला एक गडद, जड आवाज ऐकू आला.

“मी एका फ्लॅटसाठी कॉल करतोय. मला कळलं की ‘अग्निश सोसायटी’त फ्लॅट भाड्याने आहे?” विशालने विचारलं.

त्याच्या प्रश्नावर थोडा काळ शांतता होती. मग हळूहळू उत्तर आलं, “हो, फ्लॅट उपलब्ध आहे. तुम्ही पाहायला येऊ शकता.”

“भाडं किती आहे?” विशालने घाईघाईने विचारलं.

“फक्त ३,००० रुपये.”

इतकं ऐकताच विशालच्या चेहऱ्यावर आश्चर्यच दिसलं. शहरात स्वस्त फ्लॅट मिळणं म्हणजे चमत्कार होतं. विशालने लगेच होकार दिला आणि दुसऱ्या दिवशी फ्लॅट पाहायला जाण्याचं ठरवलं.

दुसऱ्या दिवशी विशाल लवकरच निघाला. सकाळची वेळ असूनही, सोसायटीच्या वाटेवर फारशी वर्दळ नव्हती. सोसायटी एका मोठ्या वसाहतीपासून दूर, झाडांनी वेढलेल्या एकट्या मैदानात वसली होती. मोठं लोखंडी गेट, त्यावर जाळी पडलेली, आणि सोसायटीच्या इमारतीचा गडद रंग – सगळं काही विचित्र वाटत होतं.

“शांत सोसायटी असावी,” विशाल स्वतःशी बोलला. त्याला सोसायटीच्या प्रवेशद्वारावर कोणीच दिसलं नाही. मात्र, एका बाकावर एक म्हातारी बसलेली दिसली, जी त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होती. विशाल तिला विचारायला गेला, “हीच ‘अग्निश सोसायटी’ ना?”

म्हातारी काहीच बोलली नाही. फक्त त्याच्याकडे बघत राहिली. शेवटी फ्लॅट पाहण्यासाठी विशालने एजंटला फोन केला. एका माणसाने येऊन त्याला तिसऱ्या मजल्यावरचा फ्लॅट दाखवला. फ्लॅट मोठा होता – दोन खोल्या, स्वयंपाकघर, आणि एक टेरेस. सगळं व्यवस्थित होतं, फक्त भिंतींवर हलक्याश्या काळसर छटा 

दिसत होत्या, धूर लागल्यावर उरलेल्या खुणा असतात अगदी तश्या..

“भिंतीवर हे काळपट डाग कसले आहेत?” विशालने विचारलं.

“आधीच्या भाडेकरूंनी गॅसचा उपयोग चुकीच्या पद्धतीने केला असेल. तुम्ही राहायला आलात की रंगवून घेऊ शकता,” एजंट म्हणाला.

फ्लॅटच्या किंमतीत आणि परिस्थितीत विशालला काही गडबड वाटली नाही. त्याने लगेच करार केला.

विशालने फ्लॅटमध्ये राहायला सुरुवात केली. पहिल्या काही दिवसांमध्येच त्याला सोसायटी खूपच शांत वाटली. दिवसभर ऑफिस आणि संध्याकाळी गच्चीवर फिरणं – हाच त्याचा दिनक्रम झाला. 

पहिल्या आठवड्यानंतर, विशालच्या लक्षात आलं की भिंतींवरचे ते काळपट डाग अधिकच गडद होऊ लागले आहेत पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. कधी कधी रात्री झोपताना हलकासा जळण्याचा वास यायचा, पण त्याला वाटलं की कदाचित गॅस लीकेज वैगरे असेल. त्याने स्वतःला समजावलं, “नवीन जागा आहे, सुरुवातीला त्रास होणारच.” पण मनात एक विचार सतत येत होता – या फ्लॅटचं भाडं इतकं कमी का आहे?

त्याने फ्लॅटला थोडा साजवायला घेतला. खिडकीच्या कडांवर फुलदाण्या ठेवल्या, नवीन पडदे लावले, आणि भिंतींवर स्वतःचे काही फोटो चिकटवले. त्याला वाटलं, “आता हा फ्लॅट खरोखर माझ घर आहे.”

परंतु, ज्या गोष्टी त्याला सुरुवातीला लहानसहान वाटल्या, त्या लवकरच विचित्र बनू लागल्या.

फ्लॅटमध्ये रहायला सुरुवात केल्यानंतर काहीच दिवसांत विशालला लक्षात आलं की संध्याकाळी सात वाजल्यानंतर सोसायटी अगदी निर्जन वाटायची. दिवसभर शेजाऱ्यांचे आवाज, मुलांचा खेळ, किंवा वाहनांची हालचाल ऐकू येत असे, पण सातनंतर सगळं अचानक शांत व्हायचं.

“शहरातली शांतता अशी असते?” विशाल विचारायचा. पण ही शांतता वेगळी वाटायची—जणू काही ती जिवंत होती.

गच्चीवर तो फिरायला गेला की त्याला सोसायटीच्या मैदानात काही लोक दिसायचे. पण हे लोक फार विचित्र होते. ते चालत राहायचे, कोणाशी बोलत नसे. “लोक आपल्या कामात व्यस्त असतील,” विशाल स्वतःला समजवायचा.

विशाल एके दिवशी ऑफिसमध्ये होता, जेव्हा त्याच्या एका सहकाऱ्याने त्याला विचारलं, “तू कुठे राहतोस?”

विशालने अभिमानाने सांगितलं, “अग्निश सोसायटी. तिथलं वातावरण खूप शांत आहे.”

हे ऐकून त्याचा सहकारी स्तब्ध झाला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती उमटली.

“अग्निश सोसायटी? तिथे तर काही वर्षांपूर्वी खूप भयानक घटना घडल्या होत्या. तुला माहिती नाही का?” सहकारी म्हणाला.

“घटना? कसल्या घटना?” विशालने गोंधळून विचारलं.

“तिथे सहा वर्षांपूर्वी मोठी आग लागली होती. सगळे रहिवासी जळून गेले होते. ती इमारत आता ओसाड आहे. तू तिथे कसा राहतोस?”

विशालला त्याच्या सहकाऱ्याची गोष्ट थोडी अतिशयोक्तीपूर्ण वाटली. 

“माझ्या इमारतीत लोक आहेत. मैदानात संध्याकाळी फिरताना मी त्यांना पाहतो. तू उगाच लोकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नकोस,” असं म्हणत त्याने विषय संपवला.

त्या रात्री, विशालने नेहमीप्रमाणे गच्चीवर जायचं ठरवलं. मैदानात त्याने पाहिलं की लोकं चालत होती, पण ते नेहमीप्रमाणे गप्प आणि शांत होते. त्यांची हालचाल पाहताना त्याला जाणवलं की हे लोक अगदी एका ठराविक वेगाने चालत आहेत. त्यांच्या सावल्याही अनियमित होत्या—कधी खूप लांब, कधी अगदी लहान.

विशाल काहीसा गोंधळला. गच्चीवरून परत येऊन त्याने झोपायचं ठरवलं. रात्री सुमारे दोनच्या सुमारास, त्याला अचानक झोपेतून जाग आली. बाहेरून हलकासा आवाज येत होता—जणू कोणी पाय घासत चालत होतं. आवाज थोडा वेळ ऐकू येत राहिला, मग थांबला.

विशालने दरवाजा उघडून पाहण्याचा प्रयत्न केला, पण बाहेर कोणीच नव्हतं. तो दरवाजा बंद करून झोपायचा प्रयत्न करत होता, तेव्हा त्याला खिडकीतून काहीतरी चमकताना दिसलं. तो उठून गेला आणि बाहेर पाहिलं, पण तिथे होता तो गडद अंधार..

दुसऱ्या दिवशी विशाल ऑफिसला गेला. कामावरून आल्यानंतर त्याला लक्षात आलं की भिंतींवर काही नवीन काळसर डाग पडले होते. डाग इतके स्पष्ट होते, जणू आग लागून त्याचा काळपट धूर भिंतीला लागला असावा. 

“मी जास्त विचार करतोय,” असं म्हणत विशालने त्या विचारांना झटकून टाकलं. पण रात्री झोपायच्या आधी पुन्हा तोच जळका वास येत असल्या सारखं भासू लागलं. पण त्या दिवशी त्याने दोन मित्रांना घरी बोलावले होते. 

विशालचे दोन मित्र, वैभव आणि फिरोज, त्याला भेटायला आले. त्यांनी विशालचा फ्लॅट पाहिला. स्वस्त आणि प्रशस्त जागा बघून ते दोघेही थोडे आश्चर्यचकित झाले.

“एवढ्या कमी भाड्यात अशी जागा मिळणं म्हणजे लॉटरी आहे,” वैभव म्हणाला.

“पण ही सोसायटी जरा जास्तच शांत नाही का? कुठेही माणसं दिसत नाहीत, आणि बाहेरून तर अगदी पडकी इमारत वाटते” फिरोजने विचारलं.

विशालने हसत त्यांना सांगितलं, “लोक आपापल्या कामात असतील. संध्याकाळी मैदानात फिरताना बघ कसे लोक भेटतात.”

त्या रात्री वैभव आणि फिरोज गच्चीवर गेले. मैदानात फिरणाऱ्या लोकांना पाहून ते थोडेसे अस्वस्थ झाले. “ही लोक अशी काय एकाच लयी मध्ये चालत आहेत.. वैभव तुला काही विचित्र वाटत नाहीये कां..?” फिरोज म्हणाला. पण वैभव आणि विशालने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं.

त्या रात्री विशालला अचानक पहाटे तीन वाजता जाग आली. कानावर एक विचित्र आवाज येत होता—जणू कोणी जोरजोरात रडत होतं. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं, पण त्याला कोणालाच दिसलं नाही. त्याने बेडरूम चा दरवाजा उघडला तसा आवाज अधिकच येऊ लागला. जणू शेजारी कोणाचं अकस्मात निधन झालं होतं आणि त्यामुळे त्या घरातलं कोणी तरी धाय मोकलून रडत होतं.

दरवाजा उघडून बाहेर पाऊल टाकताच त्याला समोरच्या फ्लॅटच्या दरवाजाजवळ एक काळसर आकृती बसलेली दिसली. तिचा चेहरा नव्हता, किंवा त्याला तो दिसत नव्हता. तिचं रडणं हृदय चिरून जाणारं होतं. विशाल घाबरून थिजून गेला. त्याच्या तोंडातून शब्दही निघत नव्हते. तो धड धडत्या काळजाने तो भयाण प्रकार पाहत होता. पण काही कळायच्या आत ती आकृती नाहीशी झाली आणि तो आवाज अचानक थांबला. विशाल परत आपल्या खोलीत पळत आला. खोलीत आल्यावर त्याला भिंतींवर असलेले ते काळे डाग अजून च गडद झालेले जाणवले जणू भिंती जिवंत झाल्या होत्या. विशालची झोप पूर्णपणे उडाली होती. आता त्याला जाणवलं की “अग्निश सोसायटी”त काहीतरी विचित्र घडतंय. त्याने ठरवलं की आता या गोष्टींचा मागोवा घ्यायचाच.

दुसऱ्या दिवशी ऑफिसं ला गेला पण त्याच कशातही लक्ष लागत नव्हत. तो लवकर घरी निघून आला. त्याने फ्लॅट नीट तपासायला सुरुवात केली. प्रत्येक कोपऱ्यात भिंतींवरचे काळे डाग वाढत चालले होते. एका ठिकाणी त्याला राख दिसली, जणू कोणी तिथे काहीतरी जाळलं होतं. “हे काय चाललंय?” तो स्वतःशीच पुटपुटला.

तो थेट शेजारी राहणाऱ्या एका माणसाकडे गेला. दारावर टकटक केल्यावर त्याला कोणीच उत्तर दिलं नाही. शेजाऱ्यांचं दार हलकंसं उघडं होतं, म्हणून त्याने ते आत ढकललं. आत गेल्यावर त्याला दिसलं की तो फ्लॅट पूर्णपणे रिकामा आहे. ना सामान ना कोणी व्यक्ती.. त्या फ्लॅट मधल्या भिंतींवर ही जळाल्याचे मोठे डाग होते, आणि जमिनीवर राख होती. आतल्या शांततेनं त्याच्या अंगावर काटा आला.

“माझे शेजारी कोठे आहेत?” विशाल घाबरून बाहेर पळाला. सोसायटीच्या गच्चीवर जाऊन खाली पाहिलं. खाली अजूनही लोक चालत होते—त्याच विचित्र पद्धतीने, कोणतीही हालचाल न करता, आपापल्या वर्तुळात. विशालने या सगळ्याला एका कोनातून बघायला सुरुवात केली. तो प्रचंड घाबरला होता. 

विशालने “अग्निश सोसायटी”च्या इतिहासाबद्दल इंटरनेटवर शोधायला सुरुवात केली. त्याला एका जुन्या वर्तमानपत्राची बातमी सापडली. या लेखात ६ वर्षांपूर्वीच्या आगीबद्दल सविस्तर वर्णन होतं.

“अग्निश सोसायटीतील प्रचंड आग: ५० लोकांचा मृत्यू”

या हेडलाइनने विशालची भुवई उंचावली. लेखात लिहिलं होतं की, एका फ्लॅटमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर आग पसरली होती. काही मिनिटांतच संपूर्ण इमारत जळून खाक झाली. जवळपासच्या लोकांनी मदतीचा प्रयत्न केला, पण त्यातलं कुणीही वाचू शकलं नाही.

विशालने अजून सखोल चौकशी केली आणि त्याला समजलं की या सोसायटी बद्दल बऱ्याच कथा प्रचलित आहेत. म्हणजे त्याचा सहकारी मित्र जे म्हणाला होता त्यात काहीतरी तथ्य होतं. त्या घटनेत मरण पावलेले रहिवासी अजूनही त्या सोसायटीत अडकून पडले आहेत, ज्यांना मुक्ती मिळाली नाहीये. 

विशालने ठरवलं की आता या जागेतून बाहेर पडायला हवं. त्याने झटपट फ्लॅट सोडण्याचं नियोजन केलं. पण एव्हाना खूप उशीर झाला होता.

सुमारे अकरा वाजले होते, तो त्याचं सामान गोळा करत होता. अचानक, त्याला फ्लॅटच्या आत जोरजोरात पावलांचे आवाज ऐकू येऊ लागले. त्याने भिंतीकडे पाहिलं, आणि त्याला दिसलं की जळलेल्या भिंतींवर मोठाल्या सावल्या उमटू लागल्या. सावल्यांमध्ये जळून खाक झालेल्या लोकांचे चेहेरे दिसत होते.

त्या सावल्यांमधून एक आकृती हळूहळू बाहेर आली आणि विशाल कडे पाहत म्हणाली “तू आम्हाला सोडून जाऊ शकत नाहीस,”. 

घाबरून विशाल दार उघडून पळण्याचा प्रयत्न करू लागला पण दार आपोआप बंद झालं. फ्लॅटमध्ये अचानक जळलेल्या गॅसचा वास पसरला. त्याच्या सभोवतालच्या भिंती जळायला लागल्या, आणि खोलीत आग पसरू लागली.

“मला बाहेर पडू द्या!” विशाल किंचाळत होता. पण तो हतबल होता. त्या आगीच्या ज्वाळांनी त्याला झपाटलं. जळणाऱ्या धुरामध्ये त्याला दिसलं की त्या काळपट सावल्यामध्ये असलेल्या मानवी चेहऱ्यांवर एक विकृत हास्य उमटू लागलं. काही वेळाने सगळं शांत झालं. अग्निश सोसायटी पुन्हा एकदा शांत झाली.

आजही “अग्निश सोसायटी” ओसाड आहे, पण ती जागा नवीन भाडेकरूंना आकर्षित करते. स्वस्त भाड्याचं आकर्षण असं काहीतरी असतं की लोक विचार न करता तिथे राहायला जातात. पण एकदा तिथे गेल्यावर त्यांचं परतणं कठीण होतं. जर तुम्हाला कधी अशी जागा स्वस्तात मिळत असल्याचं कळलं, तर नीट चौकशी करा. कदाचित, त्या जागेचा इतिहास तुमच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. 

Leave a Reply