अनुभव – रोहन मिराजकार
हा अनुभव मला 3 वर्षापूर्वी आला होता, मी कोल्हापुरात एका गावात राहतो तिथून 3-4 कीलो मीटर वर एक पेठवडगाव नामक शहर आहे. तस शहर छोटंसं आहे पण पंचक्रोशतील एक मोठी बाजापेठ आहे. त्यादिवशी मित्राच्या वाढदिवसानिमित्त मी वडगाव ला माझ्या स्प्लेंडर बाईक वरून एकटाच निघालो होतो. जाऊन मित्राची भेट घेऊन त्याला शुभेच्या दिल्या. आमचा मोठा ग्रूप होता त्यामुळे आम्ही सगळ्यांचे वाढदिवस तसे एकत्र येऊन साजरे करत. त्याही दिवशी आम्ही मित्राचा वाढदिवस जोरात साजरा केला. वाढदिवस आटोपून सगळे आपआपल्या घरी निघाले मी माझ्या गावातून एकटाच आलेलो. नेमके माझ्या गावचे मित्र त्यादिवशी सोबत नव्हते. तसा वडगांव मधून माझ्या घरचा रस्ता अवघ्या 10 मिनिटांवर आहे पण त्यादिवशी ची ती 10 मिनिट अशी होती कि नुसता विचार जरी केला तरी अंगावर सरसरून काटा येतो. मी बाईक घेऊन घरच्या वाटेला लागलेलो. वडगांव ची वेस ओलांडली की एक कॉर्नर लागतो. तिथे एक पेट्रोल पंप आहे पण तो पंप सतत बंद पडत राहतो.
अनेक जणांनी त्याला चालवण्याचा प्रयत्न केला आहे पण परिणाम तोच. काहीतरी घडत आणि तो पंप बंद पडतो, अगदी त्याच पंपासमोर आई तुकाई देवी च छोट मंदिर आहे आणि रस्ताच्या दोन्हीं बाजूंनी जांभळाची 7-8 महाकाय अशी झाडे आहेत. त्यामुळेच ती जागा पंचक्रोशीत जांभळी नावाने प्रसिद्ध आहे. त्या दिवशी माझ्या सोबत जे घडणार होतं ते खूप च विचित्र पण तितकच भयानक असणार होतं. मी जांभळी जवळ आल्यानंतर मला अचानक खूप अस्वस्थ वाटू लागलं आणि नेमक त्याच वेळी वडगांव च्या लाईट्स गेल्या. स्ट्रीट लाईट अचानक बंद झाले त्यामुळे रस्त्यावर गडद अंधार पसरला. साहजिक च माझ्या बाईक च्या हेडलाईट चा प्रकाश होता पण तो ठराविक भागात अंधाराला चिरून जात होता. समोरचा रस्ता जणू एखाद्या अजगराच्या जबड्यासारख्या वाटत होता जो जणू एखाद्याला गिळकृत करेल कि काय. मला वाटू लागले कि सावधगिरी बाळगायला हवी जणू आई तुकाई मला सावध करत होती. मी मंदिरासमोर येताच मंदिराच्या दरवाज्यातून दिसणाऱ्या तुकाई देवी च नामस्मरण करून पाया पडल्या आणि पुढे निघालो..
जांभळी क्रॉस केली आणि तिथून पुढच्या २ ते ३ मिनटात जे घडलं ते अजून हि मला स्पष्ट आठवतय, जे मी कधीही विसरू ही नाही शकणार. अंगाला थंडगार वारा लागत होता. वातावरणात एक वेगळाच गारवा पसरला होता. रस्ता निर्जन झालेला, जांभळी च्या थोडसे पुढे आलेलो तोच मला अचानक जाणवलं कि मी माझ्या बाईकवर एकटा नाहीये कारण गाडी साधारण पणे चालवायला आधीपेक्षा जड वाटू लागली जसं डबल सीट बसल्यावर वाटत. पण मी बाईक रस्त्यात कुठे ही थांबवली नव्हती. नुसत्या विचाराने अंगावर सर्रकन काटा आला. कदाचित मला भास होतं असावा असे ही वाटले. पण तो भास च आहे हे स्वतःलाच सिद्ध करण्यासाठी मान थोडी वळवून मागे पाहिलं आणि काळजाचा ठोकाच चुकला. खरं तर मी अजून पूर्ण मागे वळून पाहिलं ही नव्हतं कारण माझ्या डाव्या खांद्यावर एक पांढरा शुभ्र आणि बरफासारखा थंड गार हात सारकला. तो हात अलगद आला असला तरीही तो स्पर्श मी कधी ही विसरू शकणार नाही. माझ्या मनात धडकी भरली.
भीतीच्या सावटा खाली असतानाच मी माझी मान अगदी काही औशात मागे वळवली आणि जे काही पाहिलं त्यानं माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी पाहिलं एक पांढरा शुभ्र चेहरा माझ्या मागे बसून अगदी माझ्याकडेच पाहतोय. ते दृष्य पाहून माझ्या हृदयाचे ठोके इतके वाढले कि माझ्या कानापर्यंत ते मला जाणवू लागले. अंगाला झोंबणारा थंडगार वारा जणू मला गोठवून टाकु लागला. माझ्या सोबत हे काय घडतंय, मी स्वप्न तर पाहत नाहीये ना मला काहीही कळतं नव्हतं. एखाद्या यंत्र मानवासारखा सुन्न झालो होतो.. मी नकळत ऍक्सीलरेटर वरची मूठ फिरवली आणि गाडीचा वेग वाढवत सुसाट घराच्या दिशेने निघालो. काही मिनिटांनंतर मला माहित ही नव्हतं कि मागे जे कोणी बसले आहे ते अजूनही आहे कि नाही. कारण एव्हाना हे सगळं आता मला माझ्या समजण्या पलीकडे गेलं होतं. मी घरी पोहोचे पर्यंत एकदाही मागे वळून पाहायचं धाडस केलं नाही. ३ ते ४ मिनिटांत घराजवळ आलो, जसे घर समोर दिसू लागले तसे थोडा दिलासा मिळू लागला.
घरी पोहोचल्यावर पाहिले २० मिनट मी अगदी निशब्द होऊन शांत बसून राहिलो. पण त्यानंतर घरचे विचारू लागले काय झालं मग मी भानावर येऊ लागलो. जे घडलेलं ते सांगण्याची हिम्मत माझ्यात नव्हती घरच्यांना म्हणून उद्या सांगेन असे बोलून मी झोपायला गेलो. सुरुवातीला झोपेचा थांग पत्ता नव्हता मग तुकाई देवी च नामस्मरण करु लागलो आणि थोड्या वेळानं मला झोप लागली. सकाळी उठल्यावर सर्व प्रकार घरी सांगितला. नंतर मला कळलं कि त्या भागात एका बाईच्या आत्म्याचा फेरा आहे. तीच भूत रात्री अपरात्री तिथं फिरत असत. बऱ्याच वर्षांपूर्वी तिच्या सासरच्या लोकांनी संशय आल्यामुळे रागाच्या भरात गळा दाबून ठार मारले होते आणि नंतर आत्महत्या आहे असे दाखवले होते. तेव्हापासून तिचं भूत त्या भागात फिरतय असं म्हणतात. खरं तर भुतं कधी वाहनावर येत नाहीत, बसत नाहीत असं मी ऐकलं होतं पण मला आलेला अनुभव पूर्णपणे वेगळा आणि भयानक होता. त्या प्रसंगांनंतर मी जेव्हा कधी तिथून जातो तेव्हा तुकाई चे दर्शन घेऊन मगच पुढे जातो. त्या रात्री माझ्या सोबत जे काही घडलं ते सत्य होतं कि माझा फक्त भास होता हे माहित नाही पण तो प्रसंग माझ्या मनात एक कायमची जागा करून राहिला आहे जो मी सहजा सहजी विसरू शकणार नाही.