अनुभव – हर्षल परदेशी
साधारणपणे हा अनुभव 2023 चा आहे म्हणजे मागच्या वर्षीचा. माझे बारावी बोर्डाचे पेपर नुकताच संपले होते आणि म्हणून मी एकदम निवांत झालो होतो. परीक्षे नंतर चा संपूर्ण आठवडा मस्त मजा केली पण नंतर घरचे बोलू लागले कि सगळी सुट्टी अशी वाया नको घालवूस, सकाळी उठून व्यायाम कार, रनिंग वैगरे करायला जा, तब्येत कमव. त्यांचं ऐकून मी ठरवले कि घरचे इतक सांगत आहेत तर आपण त्यांचं ऐकायला हवं. म्हणून मी माझ्या मामे भावाला विचारले कि तू रोज सकाळी माझ्या सोबत व्यायाम करायnला मैदानात येशील कां, तसे ही मी एकटाच आहे. तो लगेच तयार झाला. अगदी दुसऱ्या दिवशी पहाटे 4 लाच मी उठलो. 15-20 मिनिटांत फ्रेश झालो आणि घरा बाहेर पडलो. साडे चार च्या दरम्यान घरा बाहेर पडल्यामुळे सगळी कडे अजूनही अंधार होता. मी माझी सायकल काढली आणि माझ्या मामे भावाला बोलवायला त्याच्या घरी जायला निघालो. त्याच घर २ कॉलनी सोडून होतं म्हणजे इतक लांब नव्हत.
त्याला घेऊन आम्ही घरापासून साधारण तीन साडे तीन किलोमीटर वर असलेल्या मैदानावर जायला निघालो. 5 वाजायच्या आधीच आम्ही मैदानात पोहोचलो. त्या मैदानाच्या बाजूला एक मोठा लाईट होता त्यामुळे बऱ्यापैकी उजेड पडायचा. साधारण तासभर आम्ही व्यायाम केला. रनिंग, पुश अप्स, सूर्य नमस्कार वैगरे. तो पहिला दिवस अगदी छान गेला त्यामुळे हा आमचा दिनक्रम झाला. साधारण अर्धा एक महिना आम्ही नियमित पहाटे उठून व्यायामाला जायचो, सगळे काही नीट सुरु होते पण एक दिवस असा आला कि त्यानं सगळं काही बदलून टाकल. त्या वर्षी लावकरच पावसाला सुरुवात झाली होती त्यामुळे रात्री जोरदार पाऊस पडून गेला होता. दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे आम्ही मैदानावर जाण्यासाठी निघालो तेव्हा पहाटेचे साडे तीन पावणे चार झाले होते. एरवी पेक्षा लवकरच उठून आलो होतो. थंडीचा जोर जास्तच जाणवत होता कारण आदल्या रात्री पाऊस पडून गेला होता म्हणून असेल कदाचित.
मैदानाजवळ पोहोचलो तेव्हा दिसले कि गेट बंद आहे. गेल्या महिना भारत हे पहिल्यांदाच झालं होतं. आपण लवकर आलो आहोत आणि कदाचित रात्री पाऊस पडला म्हणून गेट उघडलं नसेल असं वाटलं. पहाटे उठून 3-4 किलोमीटर सायकल चालवून आलो असल्यामुळे माघारी फिरून घारी जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. काय करायचं असा विचार करत असताना भावाला दिसले कि गेट खालच्या बाजूने तुटला आहे त्यामुळे खालून आत जाण्यासाठी बऱ्यापैकी जागा आहे. म्हणून तो म्हणाला कि गेट खालून जाऊ. तो आत गेला आणि त्याच्या पाठोपाठ मी ही गेलो. आज मात्र मैदानात अंधार पसरला होता त्यात दाट धुक साचल होतं. एरवी सुरु असणारा लाईट आज मात्र बंद होता. पुन्हा वाटल कि काळ रात्रीच्या मुसळधार पावसामुळे बंद पडला असावा. इतक्या पहाटे आल्यामुळे मैदानावर आमच्या दोघांशिवाय दुसरे कोणीही नव्हते. मोबाईल फ्लॅश लाईट सुरु करून आम्ही रनिंग करायला सुरुवात केली, साधारण ४ ते ५ राउंड मारून झाले होते तितक्यात अचानक पावसाला सुरुवात झाली. मी भावाला बोललो कि थोडं थांबू पण तो म्हणाला कि पावसात भिजून काही होतं नाही, रनिंग सुरु ठेव.
त्यामुळे मी न थांबता त्याच्या सोबत रनिंग करत राहिलो. पाचवा किंवा सहावा राउंड सुरु असताना मला मैदानाच्या एका कोपऱ्यात दोन जण उभे दिसले. अंधार असल्यामुळे नक्की कोण उभ आहे हे पाहणं जवळजवळ अशक्य होतं कारण ते आमच्या पासून काही अंतर लांब उभे होते. आणि तिथपर्यंत मोबाईल फ्लॅश लाईट चा प्रकाश पोहोचण शक्य नव्हतं. मला सुरुवातीला वाटले कि हे दोघ ही आमच्या सारखेच रनिंग वैगरे करायला आले असतील म्हणून मी दुर्लक्ष केलं. आठ ते दहा राउंड मारून झाल्यावर आम्ही थांबलो. माझे लक्ष मैदानाच्या त्याच एका कोपऱ्यात लागून राहील होतं. ते दोघ ही जणू आमच्याकडे पाहत असल्या सारखं जाणवलं. माझा भाऊ म्हणाला कि वेळ वाया घालवू नको व्यायाम करायला सुरुवात कर. म्हणून मी पुश अप्स, सूर्य नमस्कार करायला सुरुवात केली. अधून मधून त्यांच्याकडे लक्ष जातं होतं पण ते मात्र एखाद्या निर्जीव पुतळ्यासारखे तिथेच उभे राहून आमच्याकडे एकटक पाहत असल्यासारखं जाणवत होतं.
हळू हळू उजाडायला सुरुवात झाली तसे मी भावाला म्हणालो, थांब मी आलो 2 मिनिटात. इतक म्हणून मी त्यांच्या दिशेने चालायला सुरुवात केली. तितक्यात मैदानाच्या बाजूला असलेला मोठा लाईट फट्ट असा आवाज करत चालू झाला आणि त्या अचानक आलेल्या आवाजामुळे अवघ्या सेकंदासाठी माझं लक्ष तिथं गेलं. पुढच्या क्षणी मी समोर पाहिलं तर त्या मैदानातल्या कोपऱ्यात कोणीही नव्हत. माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. कारण मैदानाच्या दोन्ही बाजूला तारेच कंपाउंड होतं, तिथून जाण्यासाठी मार्ग नव्हता. मग ते दोघ जे कोणी होते ते गेले कुठे. अवघ्या एका सेकंदासाठी माझी नजर हटली आणि ते दोघ ही कुठे तरी गुडूप होऊन गेले. मी धावत भावा जवळ आलो आणि त्याला सांगू लागलो पण त्यावर तो जे म्हणाला ते ऐकून माझ्या भीतीत अजून भर पडली. तो म्हणाला कि पहाटे आल्यापासून आपल्या दोघांशिवाय मैदानात कोणीही नव्हते.
म्हणजे ते दोघ फक्त मलाच दिसत होते. तरीही माझी भीती खोटी ठरवण्यासाठी मी आणि भावाने संपूर्ण मैदान आणि आजू बाजूचा परिसर पालथा घातला. पण त्या भागात आम्हा दोघांव्यतिरिक्त आम्हाला कोणीही नजरेस पडले नाही. मी नक्की काय पाहिलं हा विचार करून डोकं सुन्न झालं होतं. आम्ही घरी जायला निघालो पण तो भयानक प्रकार सतत डोळ्यांसमोर येत होता. घारी येउन आईला सगळे सांगितले त्यावर ती चिडून बोलू लागली.. “ तुला माहित आहे कां आज काय आहे..” मी नकारार्थी मान हलवली. त्यावर ती म्हणाली “ आज पहाटे अमावस्या सुरु झाली आहे.. तुम्हाला आजच इतक्या लवकर जायची दुरबुद्धी कशी काय सुचली.. “. आई चे ते वाक्य ऐकून माझी वाचाच बसली. त्या दिवशी आम्हा दोघांनाही खूप ताप आला होता. माझ्या आईने देव्हाऱ्यात असलेला अंगारा आणला आणि लावला तेव्हा काही वेळाने थोड बरं वाटल… हा असा भयानक प्रसंग मी माझ्या उभ्या आयुष्यात कधीही अनुभवला नव्हता. या प्रसंगा नंतर मी त्या मैदानात जाणं कायमच बंद केलं.