अनुभव – प्रतिक सरपे 

हा प्रसंग काही वर्षांपूर्वी माझ्यासोबत घडला होता. शाळेला सुट्टी लागली कि मे महिन्यात मी माझ्या गावी कोकणात जायचो. माझं गावातलं घरं खूप मोठं होतं. आजूबाजू ची घरं बऱ्याच अंतरावर होती म्हणजे एकमेकांना लागून नव्हती. माझ्या सोबत माझी आजी, मावशी आणि मामा असायचा. गावात माझे मित्र होते त्यामुळे दिवसभर त्यांच्या सोबत खेळायचो आणि अंधार पडायच्या आत घारी यायचो. आजीने मला तसे बाजावून ठेवले होते. त्यामुळे लवकरच घरी यायचो. संध्याकाळ चा नाश्ता आटपून मी आजी सोबत च वेळ घालवत असे. त्यावेळी गावात लोड शेडींग होत असे. रोज रात्री 8 ते 9 असे तासाभरासाठी वीज जात असे. त्यावेळी मी, आजी आणि मावशी एकत्र बसून गप्पा करायचो. 9 वाजता वीज आली कि जेवण उरकून लवकर झोपून जायचो. हा आमचा रोजचा दिनक्रम असायचा. मामा कामा निमित्त बाहेरगावी जायचा आणि त्याला घरी यायला नेहमी उशीर व्हायचा. तो दिवस मला अजून ही आठवतोय जेव्हा या सगळ्याला सुरुवात झाली.

त्या रात्री आम्ही जेवण आटोपून झोपायची तयारी केली होती. आजी आणि मावशी झोपायला गेल्या. मामा अजूनही घरी आला नव्हता. मी ही अंथरुणात पडलो आणि माझा जवळपास डोळा लागला होता. तितक्यात अचानक माझ्या कानाजवळ कसलीशी हालचाल जाणवली. मला वेळ माहित नाही पण 10 वाजत आले असावेत. आवाज होता तो फक्त भिंतीवर लावलेल्या घडळ्याच्या सेकंद काट्याचा. तितक्यात मला पैंजणांचा आवाज येऊ लागला जणू घरात कोणी चालत होतं. पण आजी आणि मावशी तर माझ्या बाजूलाच झोपल्या होत्या मग तो आवाज.. आवाज कुठून येतोय हे पाहायला मी उठलो तर आवाज ऐकाएकी बंद झाला. त्यात मला थोडं आश्चर्य वाटल कि आवाजाने मला जाग आली पण आजी आणि मावशीला नाही. तरीही मी खोलीत चौफेर नजर फिरवली पण मला कोणीही दिसलं नाही. आमचं घरं खूप मोठं असल्यामुळे मला दुसऱ्या खोल्यांमध्ये जाण्याची हिम्मत होतं नव्हती. कोण असेल हा विचार करत असतानाच दारावर थाप ऐकू आली. 

मी घड्याळ्यात वेळ पाहिली तर रात्री चे 11 वाजले होते. मी उठून दबक्या पावलांनी दाराजवळ जाऊ लागलो तसे मामा ने बाहेरून आवाज दिला “ मी आहे दार उघड.. “ तसा मी सुटकेचा निश्वास सोडला. मामाचा आवाज ऐकून मी लगेच दार उघडले. मामा आत आला तसे मी पुन्हा माझ्या जागेवर आंथरुणात येऊन झोपलो. ही गोष्ट मी कोणालाच सांगितली नाही कारण मला वाटलं कि माझ्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ, नाश्ता वैगरे करून मी घराबाहेर पडलो. मित्रांसोबत खेळत असताना माझं मनच लागत नव्हतं. सतत रात्रीचा प्रसंग आठवत होता. पैजणांचा आवाज आला कुठून..? आणि तो आवाज आजही ऐकू आला तर..? त्या दिवाशी संध्याकाळी अंधार पडायला सुरुवात होण्या आधीच मी घरी आलो. नेहमी सारखी वीज गेली आणि मी मोबाईल वर गाणी ऐकत बसलो होतो. आजी आणि मावशी जेवण बनवत होते. वीज आल्यावर आम्ही जेवण उरकलं आणि झोपायची तयारी करू लागलो.

आज मात्र मला झोप लागेल याची काही खात्री नव्हती. आणि ज्याची भीती होती तेच घडायला सुरुवात झालं. जसे आजी आणि मावशी झोपून गेल्या तसे पुन्हा मला पैंजणांचा आवाज ऐकू येऊ लागला. जसं कि आमच्या घरात कोणी तरी चालतंय. कोब्यावर पावलांचा आवाज येऊ लागला. तो आवाज अगदी स्पष्ट होता. आता मात्र मी घाबरून माझ्या डोक्यावरून चादर ओढून घेतली होती. तो आवाज माझ्या डाव्या बाजूने हळू हळू माझ्या जवळ आला आणि डोक्याच्या वर येउन थांबला. त्या रात्री खरी भीती काय असते हे मी अनुभवत होतो. तितक्यात दार वाजले आणि तो आवाज एकदम बंद झाला. दार वाजल्याच्या आवाजाने मावशीही उठली. आम्ही दोघ ही दाराजवळ गेलो आणि तसे मामा ने हाक दिली “ मी आहे दार उघडा.. “ मी दार उघडले, मामा आत आला आणि मी त्याला म्हणालो कि उद्या पासून असे उशिरा येणं थांबाव, सगळ्यांची झोप खराब होते. उद्या पण उशीर झाला तर मी दरवाजाच उघडणार नाही. मी पुन्हा अंथरुणात येउन पडलो. 

पण मला काही केल्या झोप च येत नव्हती. तो पैंजणांचा आवाज सतत माझ्या कानात घुमत होता. मी घामाने ओला चिंब झालो होतो. माझं अंग ही तापत चाललं होतं पण मला त्याच भान नव्हतं. मी डोळे बंद करून पडून राहिलो. पहाटे कधी तरी मला झोप लागली. सकाळी 9 वाजून गेले तरी मी गाढ झोपेत होतो. तसे आजी माझ्या जवळ आली आणि कपाळावरून हात फिरवत म्हणाली “ काय झालं.. आज उशिरा पर्यंत झोपला आहेस.. बर वाटत नाहीये कां..? “ माझं अंग थोडं गरम होतं ते आजीने ओळखल. पण मी आजीला म्हणालो “मी बरा आहे ग.. मामा काल रात्री पण उशिरा आला त्यामुळे झोप मोड झाली आणि नंतर मग पहाटे पर्यंत मला झोप च लागली नाही म्हणून अजून पर्यंत झोपून होतो. त्यावर आजी म्हणाली “ आज पण मामा उशिरा आला तर दाराच उघडू नकोस.. राहू दे त्याला बाहेरच.. “ मी हसतच आजी ला हो म्हणालो. माझी आजी पण मस्करी करण्यात मागे नव्हती. उठून अंघोळ केली, नाश्ता केला आणि बाहेर पडलो. खेळत असताना माझ्या विनय नावाच्या मित्राला विचारले “ विन्या तू इकडेच गावी असतोस नेहमी तर आपल्या भागात कुठे भुताटकी चा प्रकार आहे का? तुला काही माहिती आहे कां..? “

मी त्याला असा प्रश्न केल्या नंतर तो खूप जोर जोरात हसू लागला. मला त्याच असं हसणं अजिबात आवडलं नाही, त्याचा खूप राग आला म्हणून मी तिकडून घारी आलो. संध्याकाळचे 5 वाजले होते. मामा तयारी करून घराबाहेर पडत होता. मी त्याला म्हणालो कि आजही उशिरा आलास तर आजी ने सांगितले दार उघडायचे नाही. तो माझ्याकडे पाहून हसला आणि त्याच्या कामाला निघून गेला. मी लवकर घारी आलो होतो म्हणून मावशीला घर कामात मदत करत होतो. त्याच दरम्यान माझ्या डोक्यात विचार आला कि 2 दिवसांपासून घडत असलेला प्रकार मावशीला सांगावा कां..? पण टी हे ऐकून काय म्हणेल काय विचार करेल याची मला कल्पना नव्हती. म्हणून तो विचार मी तिथेच झटकून टाकला. रात्रीच जेवण आटोपलं तरी सुद्धा मामा अजून आला नव्हता. जस जसा वेळ पुढे सरकत होता माझ्या मनातली भीती अजून गडद होतं चालली होती. राहून राहून वाटत होतं कि आज काही तरी घडणार आहे. 

आजी आणि मावशी झोपून गेल्या. मी मात्र घरातल्या प्रत्येक लहान सहान आवाजावर लक्ष केंद्रित करून होतो. जरा कसली चाहूल जाणवली कि भीतीने अंगावर शहारे उमटायचे. भिंतीवरच्या घड्याळ्याच्या काट्याचे ठोके आता जणू शरीरावर घाव घालत असल्यासारखे वाटू लागले. आणि पुन्हा एकदा पावलांचा आवाज येऊ लागला. ते जे काही होतं ते आज पुन्हा माझ्या बाजूला फेऱ्या मारत होतं. पण अवघी काही मिनिट होतं नाहीत दार वाजलं आणि मामाने आवाज दिला. उठून दरवाज्यापर्यंत जायची ही माझी हिम्मत नव्हती म्हणून मी तसाच पडून राहिलो. पण मामाच्या हाकांनी आजीची झोपमोड झाली आणि तिने मला सांगितलं कि मामा आलाय दार उघड पटकन जाऊन. तसे मी जाऊन दार उघडले. जसे मामा आत शिरला तसे दार बंद करण्या आधी मला घरासमोरच्या कठड्यावर कोणी तरी बसलेलं दिसलं. मी काही क्षण तसाच स्तब्ध झालो, हृदयाची धड धड वाढली. कारण समोरच्या कठड्यावर एक बाई सदृश्य आकृती बसली होती.

स्ट्रीट लाईट चा हलकासा प्रकाश तिच्यावर पडत होता. लांबसडक केस जे तिच्या चेहऱ्यावर पसरले होते. आणि त्या पसरलेल्या केसांमधून चमकत होता तो एक रक्ताळलेला डोळा. ते भयाण दृष्य पाहून माझी बोबडीच वळली. तोंडातून शब्द फुटेनासे झाले. मी थर थरत्या हातांनी दार बंद केलं, आत आलो आणि अंथरुणात येउन पडलो. संपूर्ण अंगात कापर भरलं होतं. मी संपूर्ण अंगावर चादर घेतली. मला जाणवू लागल कि पैंजणांचा आवाज हळू हळू माझ्या जवळ येतोय. काही अंतरावर आल्यावर तो आवाज थांबला आणि अचानक जोरात ते माझ्या दिशेने धावत आलं. काही कळणार तितक्यात आजी उठली आणि एक मोठी काठी घेऊन त्या आवाजाच्या दिशेने गेली. थेट जाऊन घराचे दार उघडले आणि जोर जोरात शिव्या देऊ लागली. बाहेर ते जे काही होतं ते दूर जात असल्यासारखा आवाज मी अगदी स्पष्ट ऐकला होता. हे सगळं भयानक दृष्य मी अंथरुणात बसून च पाहत होतो. काही वेळा नंतर आजी घरात आली माझ्या बाजूला येउन झोपली. त्या नंतर रात्री तो आवाज पुन्हा आला नाही. 

मी दुसऱ्याच दिवशी मुबंई ला यायला निघालो. पण निघताना मी एकदाही आजीला या प्रकारा बद्दल विचारले नाही कि कोणाला सांगितलं ही नाही. पण मला नेहमी प्रश्न पडतात. ती बाई कोण होती..? ती अशी थेट घरात कशी यायची..?  माझ्या आजू बाजूला फेऱ्या का मारायची..? तिला काही पाहिजे होतं कां? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजी ला या सगळ्या प्रकाराबद्दल अगोदर पासून कल्पना होती कां? हे सगळे प्रश्न मला आजही अनुत्तरित आहेत. पण ते म्हणतात ना काही प्रश्न न सोडविलेलेच बरे.. या एका प्रसंगांनंतर मला गावी जाण्याची खरंच भीती वाटू लागली होती..

Leave a Reply