अनुभव – प्रतीक्षा ओव्हाळ
मी प्रतीक्षा, माझ्या दोन बहिणी प्रज्ञा आणि प्रगती, आणि आमचा भाऊ. आम्ही चुलत भावंड लोणावळ्याला राहतो. दरवर्षी मॉन्सूनच्या सुरुवातीला, म्हणजेच जूनच्या सुरुवातीला, एक दिवसाची ट्रिप ठरवतो. जास्त पाऊस पडल्यानंतर पर्यटकांची गर्दी होते, त्यामुळे अशा वेळी ट्रॅफिक आणि गोंधळ टाळण्यासाठी हा वेळ आम्हाला सोयीचा वाटतो. कधी कधी ट्राफिक एवढी असते कि मार्केट ला जाण ही कठीण होतं. यावेळी आम्ही ठरवलं की लोणावळ्यातील एखाद्या हॉन्टेड लोकेशनला भेट द्यायची, जिथे आम्ही कधीच गेलो नव्हतो. सकाळी १०.३० वाजता आम्ही स्कूटी सुरु केल्या आणि निघालो खंडाळ्याला. आम्ही चौघे जण होतो, तिन्ही बहिणी आणि आमचा भाऊ. “बाबा व्हिला” नावाच्या ब्रिटिश काळातील एका जुन्या, पडिक कॉटेज कडे जायला. तिथे पोहोचलो आणि गेट जवळ स्कुटी पार्क केल्या. तेव्हा गेटजवळ एक मुलगा मोबाईल हातात घेऊन त्याच्या कुत्र्याला घेऊन उभा होता. आम्ही गेटमधून आत प्रवेश केला. कॉटेजच्या मागील बाजूला एक सुंदर निसर्गदृश्य होतं.
खाली दोन हायवे आणि समोर डोंगरांचे विहंगम दृश्य स्पष्ट दिसत होतं. आम्ही घाटात एका डोंगराच्या कडेला उभे होतो. आम्ही सेल्फी घेण्यात व्यस्त झालो, तेवढ्यात एका मिनिटात इतकं धुकं जमा झालं की माझ्या समोर केवळ एक फुटावर उभी असलेली माझी बहीणसुद्धा मला दिसत नव्हती. तसे सगळे म्हणाले कि इथून निघायला हवे कारण अजून बरीच ठिकाण राहिली आहेत. आम्ही बाहेर गेट पाशी चालत आलो तसे येताना जो कुत्रा अगदी शांत होता तो आता अचानक आमच्यावर खुप जोरात भुंकू लागला. जसे टाटाला आमच्या सोबत काही तरी दिसतंय कारण तो थेट आमच्या कडे नाही तर आमच्या थोडस बाजूला पाहून भुंकत होता. आम्ही त्या कडे दुर्लक्ष करून तिथून निघालो. दुसरं ठिकाण होतं वाल्वन डॅम. जो टुरिस्ट साठी बंद झालाय. त्याच्या पलीकडची बाजू डॅम चा एन्ड पॉईंट आणि रस्ता आम्हाला माहित होता. आम्ही स्थानिक असल्याने पर्यटकांपेक्षा जास्त सिनिक पॉईंट्स आणि रस्ते आम्हाला माहित होते.
धरणाच्या टोकाशी पोहोचण्यासाठी एका छोट्या टेकडीवरून चढून जावे लागते. तिथून वर आल्यावर एक छोटा ब्रिज आहे जो कमकुवत आहे. तो आम्ही काळजीपूर्वक क्रॉस केला कारण जर तिथून पडलो तर थेट डॅम च्या वाहत्या पाण्यात. तो ब्रिज पार करून दुसऱ्या बाजूला आलो. तिथे आमचा जेवण बनवण्याचा बेत होता. आणि त्या साठी आधीच आम्ही स्कुटी च्या डिक्की मध्ये सामान ठेवले होते. फक्त चिकन येताना वाटेतुन घेतलं होतं. आमच्या भावाच्या हातात चिकन होतं. आम्ही सगळी मांडणी केली. थोडासा ओलावा असला तर चूल पेटणार नाही असा विचार करून आम्ही लहान स्टो सोबत घेतला होता. पण जसे आम्ही त्या भागात आलो तसे डॅम चे शांत असलेले पाणी अचानक खवळले. आम्ही तिथून थोडं पुढे जाऊन एक चांगला स्लॉट शोधला आणि जेवणाची तयारी करू लागलो. साधारण साडे बारा झाले असावेत. पटापट चिकन रस्सा बनवला आणि जेवायला बसलो. तिथे गेल्यापासून वातावरण खूप अस्वस्थ करणार वाटत होतं पण आम्ही दुर्लक्ष करत होतो.
त्या भागात येताना भावाला मागून कोणी तरी चालत येतंय अशी चाहूल लागली होती पण तेव्हा त्याने कोणाला काहीच सांगितले नाही. आम्ही जेवायला बसलो असताना तिथे दोन कुत्रे आले तसे भावाने एक चिकन पीस चा तुकडा त्यांच्या दिशेने फेकला. जेवण आटोपल्यावर आम्ही गप्पा केल्या. मला सगळेच काही तरी लपवत होते एकमेकांपासून. मला ही त्या भागात खूप अस्वस्थ वाटत होतं पण मी माझ्या चेहऱ्यावर कसलेच हावभाव दाखवत नव्हते. संध्याकाळचे 5 वाजले. आम्ही सगळे आवरले आणि खाली उतरू लागलो. खाली उतरत असताना भाऊ अचानक विचित्र तोंड करू लागला आणि काही तरी बारळू लागला. त्यात हातवारे करून पाठीवर काही तरी जड आहे असे बोलू लागला. आम्ही जस जसे ती टेकडी उतरू लागलो तसे त्याच्या पाठीवरचे ओझे वाढू लागले. कारण तो हळू हळू वाकत चालला होता. सगळ्यात भयानक गोष्ट ही होती कि आम्हाला त्याच्या पाठीवर काहीही दिसत नव्हत. आम्ही कसे बसे घरी आलो.
आमची घरं जवळ जवळ च असल्याने आम्ही तिघी बहिणी सोबत बसलो होतो. सगळेच एकमेकांना आप आपले विचित्र अनुभव सांगत होतं. कोणी तरी सोबत असल्याचे प्रसंग सांगू लागले. त्या रात्री आम्ही तिघी ही घाबरलो होतो म्हणून एकत्र च झोपायच ठरवले. तिघी बहिणी, भाऊ आणि आमच्या सोबत अजून एक लहान चुलत बहीण होती तेव्हा ती शाळेत जायची. आम्ही सगळे एकत्र झोपलो. दोन बहिणी खाली, एक बहीण सोफ्यावर आणि लहान बहीण तिच्या बाजूला. आणि त्या रात्री आम्ही जे अनुभवलं ते कल्पना शक्तीच्या पलीकडचे होते. माझ्या एका बहिणी ला तिच्या काना जवळ कोणीतरी जोर जोरात श्वास घेत असल्या सारखं वाटू लागलं. ती बहीण माझ्या बाजूला पण लांब झोपली होती. आणि तिला तो जोरात श्वास घेण्याचा आवाज मी झोपले होते त्या दिशेने नाही तर उलट दिशेने आला होता जिथे कोणी ही झोपले नव्हते. तिने झटकन उठून लाईट लावला पण त्या बाजूला कोणीही नव्हतं. आम्ही सगळे गाढ झोपेत होतो.
तितक्यात तिला जाणवले कि आतल्या खोलीतल्या रिकाम्या बेड वर कोणी तरी सरकत खालच्या बाजूला येतंय. कारण चादर सरकण्याचा आवाज येत होता. ती प्रचंड घाबरली आणि आम्हाला उठवणार तितक्यात लहान बहीण स्वतःहून झोपेतून उठली आणि म्हणाली “ताई मला डोक्यात कां मारलं..?” तिला वाटल कि प्रज्ञा नावाच्या बहिणीने तिला डोक्यात फटका मारला. पण प्रज्ञा तर गाढ झोपेत होती, तिच्या आवाजाने उठून ती तिला ओरडली सुद्धा कि मी तुला हात पण लावला नाही तू उगाच शहाणपणा करू नकोस. आमचे सगळे बोलणे सुरु असतानाच जोरात घराचे आणि रूमचे दरवाजे एका एकी वाजू लागले आणि काही सेकंदात सगळे शांत ही झाले. तसे बाथरूम च्या बाहेरच्या बाजूने कोणीतरी फेऱ्या मारत असल्याचा आवाज येऊ लागला. आम्ही सगळेच घाबरून देवाचे नाव घेऊ लागलो. ती रात्र आम्ही तशीच जागून कशीबशी काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जवळच्या मंदिरात जायचं ठरवलं.
ठरल्या प्रमाणे आम्ही अंघोळी उरकल्या आणि मंदिरात जाऊन दर्शन करून घरी परतलो. त्या नंतर आम्हाला घरात काहीच जाणवलं नाही. आम्हाला माहित नाही ते काय होतं.. पण आमच्या सोबत नक्की काही तरी आलं होतं. खंडाळा घाटाच्या ब्रिटिश कॉटेज मधून, त्या डॅम च्या परिसरातून कि अजून कुठून ते माहित नाही. पण येताना कदाचित आम्ही फक्त चौघे नव्हतो आलो. काय आलं होतं ते देवालाच माहित आणि त्याच्याच कृपेने आम्हाला जास्त त्रास झाला नाही. या आधी आम्हाला आमच्या घरात कधीच असे अनुभव आले नव्हते. पण त्या एका रात्री नंतर आम्ही अश्या हौन्टेड जागा शोधण, तिथे जाणं कायमच बंद केलं..