ही घटना माझ्या मित्रासोबत घडली आहे आणि त्याच्याच शब्दांत सांगत आहे. 2018 ची गोष्ट आहे. मी आणि माझे ऑफिसचे मित्र आऊटिंगसाठी गेलो होतो. आऊटिंग होती लोणावळ्याला. जाण्याची काही पाहिली वेळ नव्हती त्यामुळे काही वावगे नव्हते. पण रोजच्या कामाच्या व्यापातून विरंगुळा त्यामुळे मीच नाही तर सगळे खूप उत्साहात होते. 

आणि जे घडलं त्यामुळे तो दिवस मला अजूनही लक्षात आहे आणि कदाचित मी तो कधीच विसरू शकणार नाही.  दिनांक 23 जून 2018. आम्ही आठ मित्र गाडी घेऊन लोणावळ्याला निघालो होतो. शनिवारी निघून रात्री व्हीला  ला राहणार होतो. ठरल्या प्रमाणे शनिवारी सकाळी मजा-मस्ती करत निघालो. पावसाळ्याला नुकताच सुरुवात झाली होती. घाटातले रस्ते आणि डोंगरावरून वाहणारे निसर्गरम्य धबधबे. दुपारी एका फेमस धबधब्यावर थांबून मजा केली. तिथून निघायची कोणाचीच इच्छा नव्हती. पण व्हीला  वर पोहोचायला उशीर होईल म्हणून तिथून निघालो. संध्याकाळी पोहोचलो आणि फ्रेश झालो. सात साडे सात ला आमच्या पार्टीला सुरुवात झाली. दारू वैगरे सगळा बंदोबस्त केला होता. पण आमच्या मधला एक मित्र शांत होता. त्याच काय बिनसलं होतं कोणास ठाऊक.

आम्ही आमच्याच धुंदीत असल्यामुळे त्याकडे जास्त लक्ष देत नव्हतो. थोड्या वेळाने येउन मिसळेल आपल्यात असे वाटले. पण बराच वेळ झाला एकटाच एका कोपऱ्यात बसून होता. शेवटी मला राहवले नाही म्हणून मी त्याला बोलवायला गेलो. पण तो काहीच बोलत नव्हता. शेवटी मी सुद्धा वेळ न घालवता पुन्हा आलो आणि पेग रिचवू लागलो. ऑफिस चा ग्रुप असला तरी टिंगल टावाळ्या काही कमी नव्हत्या. एकमेकांची नक्कल करून चांगलीच मजा सुरु होती. सर्वजण एन्जॉय करत होतो. दहा साडे दहा वाजत आले होते पण आमचा गोंगाट सुरूच होता. तिथल्या स्पीकर वर मोठ्या आवाजात गाणी लावून आम्ही ओरडत होतो. तितक्यात तो मित्र उठून जोरजोरात बोलायला लागला “ गाणी बंद करा.. आवाज नका करू.. गाणी बंद करा.. “ सुरुवातीला आम्ही त्याच्यावर आवाज चढवून बोलून त्याला गप्प करायचा प्रयत्न केला पण तो वैतागून रागात बोलत होता. तसे आमच्यातला दुसरा मित्र आधीच दारूच्या नशेत असल्यामुळे त्याच्याशी वाद घालू लागला. 

तो दुसरा मित्र जरा दीड शहाणाच होता त्यात दारूकाम केल्यामुळे त्याला अजून हुरूप आला होता. शेवटी खूप भांडण झालं दोघांचं, शिवीगाळ झाली. आमची सगळी मजा मस्ती एका क्षणात बंद झाली. सगळा मूड ऑफ झाला. आम्ही गाणी वैगरे बंद करून आप आपल्या रूम मध्ये झोपायला गेलो. 4 जणांसाठी एक रूम अश्या 2 रूम होत्या. ज्या समोरासमोर होत्या. बेडवर पडल्या पडल्या मला झोप लागली. रात्रीचे 3 वाजले असतील. मला जोरात बाटली फुटल्याचा आवाज आला आणि त्याच सोबत कोणी तरी वेगळच ओरडत असल्याचा.. नशेत असल्यामुळे शुद्धीवर यायला थोडा वेळ लागला. पण जेव्हा कळले की काय घडतंय तेव्हा जवळ जवळ सगळी नशाच उतरून गेली. त्या शांत असलेल्या मित्राने दारूची बाटली फोडून एका काचेने स्वतःच्या हातावर बरेच वार केले होते. रक्ताच्या थारोळ्यात तो बसला होता. त्याला थांबवण्या साठी दोघांनी त्याचे हात घट्ट पकडून ठेवले होते. त्याच्या तोंडावर पाणी मारून वैगरे त्याला शुद्धीवर आणले.

तो असं कां करत होता हे मात्र कोणालाच कळतं नव्हत. त्याला धरून रूम मध्ये घेऊन गेले. अर्ध्या पाऊण तासाने त्याला झोप लागली आणि नंतर इतर मित्रही झोपले. पावणे चार च्या सुमारास एकाला लघवी आल्यामुळे जागं आली. जसे तो उठला त्याला जाणवले की ज्या मित्राने स्वतःच्या हातावर वार केले होते तो रूम मध्ये दिसत नाहीये. त्याने धावत जाऊन दुसऱ्या रूम मध्ये पहिले पण तिथे ही नाही. तो पटकन गॅलरीत गेला आणि बाहेर पाहू लागला. तसे त्याला दिसले की तो मित्र स्विमिंग पूल जवळ उभा राहून आकाशात एकटक बघत आहे. ते दृष्य पाहून त्याची चांगलीच तांतरली. त्याने घाबरून सगळ्या मित्रांना उठवलं. कारण एकटं जाऊन त्याला घेऊन येणं शक्यच नव्हतं. आम्ही सगळे बाहेर गेलो. खरंच त्याचं अंधाऱ्या रात्री अस आकाशात एक टक बघत राहणं ते पण अनोळख्या ठिकाणी. ते दृष्य खूपच भयाण वाटत होतं. त्याला धरून आम्ही रुम मध्ये आणलं. तो काहीच बोलत नव्हता. एकदम गप्प, चेहऱ्या वर कसलेच हाव भाव नाही. त्याला बेड वर झोपवलं आणि तो गाढ झोपूनही गेला जसे काही झालेच नाही. आम्ही मात्र झालेल्या प्रकारामुळे बरेच घाबरलो होतो म्हणून आम्हाला झोपचं लागली नाही. 

पहाटे साडे पाच पावणे सहाच्या दरम्यान तो उठला. आम्ही त्याला विचारू लागलो पण तो एकच वाक्य म्हणाला “ काहीतरी विचित्र होतय.. पण इथून निघूया आणि घरी जाऊया.. “ इतक सगळं घडल्यावर आम्ही सुद्धा तिथे थांबण्याच्या मनस्थितीत नव्हतो. त्यामुळे त्याच्या म्हणण्यानुसार सगळी तयारी केली आणि सकाळीच चेक आउट करून घरी यायला निघालो. सगळाच बेत फसला होता. कोणीच कोणाशी जास्त बोलत नव्हतो. त्या मित्राला घरी सोडलं आणि आम्ही ही आप आपल्या घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरून आम्हाला फोन आला. त्याच्या वडिलांनी फोन केला होता आणि आम्हाला सगळ्यांना त्याच्या घरी बोलावले होते. माझ्या मनात भीती दाटून आली होती. आम्ही जेव्हा घरी पोहोचलो, तेव्हा पाहिलं की तो फक्त खिडकीच्या बाहेर एकटक बघत होता. आल्यापासून घरी कोणाशी बोलत नव्हता. त्याचे वागणे तसेच होते जसे व्हीला  वर वागत होता. त्याचे वडील आम्हाला विचारू लागले की, “नेमकं काय झालं? हा आल्यानंतर अधून मधून फक्त जोरजोरात ओरडतोय, ‘गाणी बंद करा, गाणी बंद करा!’ आणि त्याशिवाय दुसरे काहीच बोलत नाहीये.

कितीदा विचारून पहिले, दवाखान्यात नेऊन आणले. काय झालेय याला.. तुम्ही नक्की कुठे गेला होतात..? आणि या हातावरच्या जखमा कसल्या आहेत..? जाण्याआधी तर या नव्हत्या त्याच्या हातावर.?” त्या रात्री जे काही घडलं ते आम्ही त्याला सविस्तर सांगितलं. त्यांनी लगेच एका वैद्या कडे नेलं ज्यांना बाहेरच काही असेल ते बघता यायचं. तेव्हा कळलं की याच्यावर काही वाईट शक्तीचा प्रभाव आहे. त्याला बाहेरची बाधा झाली आहे. त्याच्या घरच्यांनी वेळ न घालवता गावी जाण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून तिथे त्याच्यावर काही उपाय करून हे सर्व दूर करता येईल. पण तिकीट मिळायला काही दिवस लागले. दिनांक 2 जुलैला गावी जाण्यासाठी सकाळी 5:30 ची ट्रेन ठाण्याहून होती. त्याचे वडील, काका आणि तो गावी जाण्यासाठी तयार झाले. पहाटे 5 वाजता ठाणे स्टेशवर पोहोचले. त्याला टॉयलेट ला जायचं होतं म्हणून तो प्लॅटफॉर्म वरच्या एका टॉयलेट मध्ये गेला. 10-15 मिनिट झाली तरी तो परत आला नाही. त्याचे वडील आणि काका त्याला पाहायला गेले तर तो आत नव्हता. त्याला संपूर्ण प्लॅटफॉर्म वर शोधले पण तो कुठेच सापडत नव्हता. 

शेवटी ठाणे स्टेशन मास्टरकडे जाऊन संपूर्ण प्रकार सांगितला. सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. रेल्वे प्रशासन ही कामाला लागले. त्याच्या वडिलांनी आम्हा मित्रांना फोन करून चौकशी केली की तुमच्याकडे आलाय का.. आम्हाला देखील हे समजल्यावर आम्हीही त्याच्या शोधासाठी निघालो. संपूर्ण दिवस त्याची शोधमोहीम सुरु होती. आम्ही सगळे मित्र सर्वोपारी प्रयत्न करत होतो त्याला शोधण्याचा. त्या दिवशी किती नंबर डायल केले, कोण कोणत्या ठिकाणी जाऊन शोधले आमचे आम्हालाच माहित. संध्याकाळ झाली तरी त्याचा काहीच पत्ता नव्हता. 6 च्या सुमारास त्याच्या वडिलांचा फोन आला. त्यांनी आम्हाला तातडीने राजावाडी हॉस्पिटलला बोलावलं होतं आणि ते ही तिथेच पोहोचण्याच्या मार्गांवर होते. त्यांच्या आवाजावरून ते खूपच अस्वस्थ वाटत होते म्हणून आम्ही त्यांना विचारलं, “काय झालं काका?” तेव्हा ते म्हणाले, “सायन आणि माटुंगामध्ये कुठेतरी एक मृतदेह सापडला आहे. तुम्ही राजावाडी हॉस्पिटलला या.” त्यांचे बोलणे ऐकूण छातीत धड धडायला लागलं. ज्याची भीती होती, जे व्हायला नको होतं तेच झालं. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आम्हाला बोलावलं होतं. आणि हो… तो आमचा मित्रच होता.

आम्ही त्याला कायमच गमावलं होतं. आमच्या जिवलग मित्राला. कंठ दाटून आला होता, बाहेर आलो आणि आपसूक डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण नंतर रागात आम्ही गाडी काढून लोणावळ्याला गेलो, त्या व्हीलावर जाऊन त्या मालकाशी खूप वाद घातला. घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला आणि म्हणालो की आम्ही आमच्या मित्राला गमावले आहे, त्याला असे वेड लागण्याचे कारण म्हणजे इथे नक्की असे काही तरी आहे. पण तो काहीही मान्य करायला तयार नव्हता. शेवटी आम्ही हताश होऊन तिथून निघालो पण तरीही आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली. त्या भागातल्या लोकांशी बोलल्यावर समजलं की त्या व्हिलाच्या टेरेसवर रात्री एक बाईच्या अतृप्त आत्म्याचा वास आहे, तिथे राहणाऱ्या लोकांना ती टेरेस वर चालताना दिसते आणि ती असंच सगळ्यांना बाहेर बोलावते आणि मग झपाटते. त्यामुळे तिथे पर्यटक एकाहून अधिक रात्री थांबत नाहीत. हा प्रकार ऐकून आम्हाला धक्का बसला. 

त्या एका ट्रिप मूळे आमचे आयुष्यच बदलले, या प्रसंगात आम्ही आमचा मित्र गमावला.. तो कायमचाचं.. या बद्दल ची खंत आम्हाला आयुष्यभर सलत राहील.. 

Leave a Reply