अनुभव क्रमांक १ –

मी आणि माझा मित्र समीर. आमची अगदी लहान पणापासून ची मैत्री आहे. आम्ही नेहमी एकत्र असायचो. अगदी एकाच कॉलेज मध्ये आणि एकाच क्लास मध्ये ही होतो. मी अधून मधून त्याच्या घरी क्रिकेट, फुटबॉल वैगरे खेळायला जात असतो. त्याच घर माझ्या घरापासून ५-१० मिनिटाच्या अंतरावर आहे. त्या दिवशी त्याचा मोठा भाऊ त्याच्या मित्रा बरोबर फार्म हाऊसवर गेला होता. त्यामुळे समीर घरी एकटाच होता. म्हणून आम्ही प्लॅन केला की आज त्याच्या घरी नाईट आऊट करूया. म्हणून आमच्या एका मित्राला म्हणजे रितिक ला ही बोलावले. समीर चा मोठा आलिशान बंगला आहे. मी लहानपणपासून त्याच्याकडे जात असलो तर राहायला म्हणून मी पहिल्यांदाच जाणार होतो. 

मी जेवण वैगरे करून समीर कडे जायला निघालो. रस्त्यात असतानाच मी रीतिक ला फोन लावला कुठे आहेस विचारायला तर तो म्हणाला की १५-२० मिनिटात येतो मी तू हो पुढे. लवकर ये म्हणत मी फोन ठेवला. समीर कडे पोहोचलो तेव्हा तो जेवत होता. त्याने मला ही जेवायला वाढले तसे मी त्याला म्हणालो “अरे मी जेऊन आलोय”. पण तरीही त्याने आग्रह केला आणि म्हणाला “असुदे रे.. जरा खा माझ्या सोबत”. आमच्या गप्पा सुरू होत्या. जेवण झाल्यावर आम्ही टेरेस वर गेलो. थंडगार वारा वाहत होता. तितक्यात समीर म्हणाला “अरे हा आला कसा काय नाही अजुन..” मी फोन लावणार तितक्यात रितीक चाच फोन आला. म्हणाला की मी जरा कामात अडकलो य मला जमणार नाही यायला. थोडा वेळ त्याच्याशी बोलून मी फोन ठेऊन दिला. 

आता मी आणि समीर दोघेच त्या भल्या मोठ्या बंगल्यात थांबणार होतो. आमच्या गप्पा संपल्यावर साधारण ११.३० ला आम्ही त्याच्या खोलीत गेलो. टाईमपास म्हणून लॅपटॉप वर कोणता तरी मुवी पाहत मी चिप्स खात बसलो होतो. पिक्चर संपे पर्यंत १.३० कधी वाजला कळलेच नाही. मला वॉश रूम ला जायला म्हणून मी उठलो. ते खोलीच्या बाहेर समोरच होते. मी हात धुवत होतो तितक्यात मला मागच्या खिडकीतून आत काही तरी पडल्याचा आवाज आला. मी झटकन मागे वळून पाहिले पण काही दिसले नाही. मी दुर्लक्ष करत विचार केला की मला भास झाला असेल. हात धुवून मी बेसिन चा नळ बंद केला आणि बाहेर जायला वळलो तसा मला पुन्हा कसलासा आवाज ऐकू आला. आता मात्र मी जरा विचारात पडलो. 

त्या बंगल्यात आम्ही फक्त दोघेच होतो पण मग हा आवाज. तितक्यात अतिशय जोरात आवाज झाला. असे वाटले की कोणी तरी अतिशय जोरात दार आपटले. मी दचकून धावत च बाहेर आलो. तसे समीर म्हणाला “काय रे.. काय झाले.. धावत का आलास”. तसे मी त्याला म्हणालो “तुला कसला आवाज नाही आला का” तसे तो माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला. मी त्याला विचारले “बोलशील का काही.. की फक्त असाच बघत राहणार आहेस”. तसे तो मला सांगू लागला. तू या घरात असा चौथा व्यक्ती आहेस ज्याला असा आवाज ऐकू आलाय. मलाच काय तो येत नाही. मागच्या महिन्यात माझा एक मित्र आला होता राहायला. त्याला ही असा तीन वेळा आवाज ऐकू आला. त्याने सांगितले की तो या खोलीत एकटा असताना त्याला खिडकीवर तीन वेळा वाजवल्याचा आवाज आला. 

इतकेच नाही तर अजुन एकाला रात्री झोपेत पायाला काही तरी स्पर्श करून गेल्या सारखे जाणवले. मी त्याचे बोलणे ऐकतच राहिलो. तो पुढे म्हणाला की “मला असे कधीच जाणवले नाही.. जर खरंच काही असेल तर कधी कोणाला त्रास झाला नाहीये.. फक्त जाणीव होते.. आणि हो जर कोणी नवीन राहायला आले तर त्यांना हा अनुभव येतोच..”

अनुभव क्रमांक २ – रश्मी दिघे

गोष्ट आहे २०१७ मधली जेव्हा मी पहिल्या वर्षात कॉलेज मध्ये शिकत होते. आमच्या कॉलेज बद्दल बऱ्याच अफवा होत्या की कॉलेज हाँटेड आहे पण मला वयक्तिक असे कधीच काही जाणवले नव्हते. पण त्या दिवशी मला असा एक अनुभव आला ज्याची मी कधीही कल्पना केली नव्हती. आमच्या कॉलेज ला खूप मोठा कॅम्पस आहे. आणि सगळ्यात प्रख्यात म्हणजे तिथला कॉलेज कट्टा. संध्याकाळची वेळ होती. साधारण ५.३० होऊन गेले होते. या वेळेपर्यंत कॉलेज मध्ये शुकशुकाट व्हायचा. मोजकीच मुलं मुली त्या कॅम्पस मध्ये दिसायची. 

विज्ञान शाखेतील विद्यार्थी असल्यामुळे आम्ही त्या दिवशी जर्नल पूर्ण करत बसलो होतो. त्यामुळे बराच उशीर झाला. मी बाहेरच्या कट्ट्यावर बसून माझ्या एका मैत्रिणीला जर्नल पूर्ण करण्यासाठी मदत करत होते. तसे आम्ही दोघीही लिखाण काम करण्यात पूर्ण व्यस्त होतो. तितक्यात माझ्या एका काजल नावाच्या मैत्रिणीने मागून येऊन मला मिठी मारली. आणि एक आवाज ऐकला “हाय काजल..” कोणी तरी अगदी कानात पुट पूटल्या सारखे वाटले. आवाज अगदी वेगळा होता जो या आधी मी कधीच ऐकला नव्हता. मी घाबरून माझ्या मैत्रिणीकडे पाहिले. ती ही माझ्या कडे घाबरलेल्या नजरेने पाहत होती. मी तिला विचारले की आता तू ते म्हणालीस का..? तसे तिनेही अगदी त्याच वेळी तोच प्रश्न मला केला. 

आम्ही दोघींनी आश्चर्याने काजल कडे पाहिले तसे ती म्हणाली “अग.. मीच मला माझ्या नावाने हाक मारीन का..?” मी पुन्हा माझ्या मैत्रीणीना विचारले की तुम्ही खरच काही बोलला नाहीत का.. मला फक्त नक्की करायचे होते कारण मला वाटून गेले की यांनी मस्करी तर केली नाहीये ना. पण त्यांनी साफ नकार दिला. त्या दोघींच्याही चेहऱ्यावर चे बदललेले भाव मला स्पष्ट जाणवत होते. आणि तो आवाज ही पूर्ण वेगळा होता म्हणजे मला सांगता नाही येणार पण खूप विचित्र होता. मी आजूबाजूला पाहिले पण त्या परिसरात आमच्या तिघिंशिवाय कोणीही नव्हते. तो आवाज अगदी कोणीतरी कानात पुट पुटल्या सारखा होता जो मी आज पर्यंत विसरू शकले नाहीये..

अनुभव क्रमांक ३ – कौस्तुभ घाडगे

मी सध्या इंजिनीरिंग च्याच दुसऱ्या वर्षाला आहे. ही गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वी ची आहे जेव्हा मी १० वित शिकत होतो. माझे आणि माझ्या आत्त्याचे घर जवळ च आहे. म्हणजे चालत गेले की अगदी ५ मिनिटांवर. त्याच वर्षात माझ्या आत्याची मुलगी म्हणजे माझी बहिण आम्हाला कायमची सोडून देवाघरी गेली. संपूर्ण कुटुंब दुःखात बुडालं होत. नंतर आत्या आणि तिचा मुलगा म्हणजे माझा भाऊ दोघेच त्या फ्लॅट वर राहायचे. त्या दिवशी आत्या ने मला काही कामा निमित्त घरी बोलावले. संध्याकाळी बोलावले होते पण मी मित्रांबरोबर खेळण्यात इतका व्यस्त झालो की आत्याकडे जाण्याचे विसरूनच गेलो. 

रात्री घरी आल्यावर लक्षात आले की आत्याने बोलावले होते. खूप उशीर झाला होता. रात्र ही बरीच झाली होती. मला वाटले की काही महत्त्वाचे काम असेल म्हणून मी आत्याकडे जायला निघालो. आत्याची बिल्डिंग खूप जुनी होती. ३ मजल्यांची असली तरी लिफ्ट नव्हती. मी बिल्डिंग च्या खाली आलो. रात्र झाल्यामुळे कोणीही नव्हते. त्या दिवशी मला नेहमी पेक्षा जरा वेगळचं जाणवत होत. हवेत गारवा पसरला होता. मी वर जायला निघालो. तिथे एका मजल्यावर २ फ्लॅट होते. अगदी समोरा समोर. मी पहिल्या मजल्यावर गेलो तर तिथे एक मुलगी उभी दिसली. ती एका बंद दरवाज्याकडे तोंड करून उभी होती. मला आधी वाटले की इतक्या रात्री ही मुलगी इथे काय करतेय. पण नंतर विचार आला की आली असेल कोणाकडे तरी.

तिच्याकडे दुर्लक्ष करत मी दुसऱ्या मजल्यावर जायला निघालो आणि समोर चे दृश्य पाहून माझा पायाखालची जमीन च सरकली. दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी जिनाच नव्हता. थोड्या वेळा साठी काही उमगलेच नाही. मला वाटले की मला भास होतोय किंवा मी शुद्धीत तरी नाहीये. विचार करतच मी मागे वळलो आणि त्या मुलीकडे लक्ष गेले. ती मुलगी एव्हाना वळून माझ्याकडेच पाहत होती. ती अतिशय गोड आवाजात जरा हसतच मला म्हणाली “हो मी ही जीनाच शोधतोय..”. ते ऐकुन मला काही सुचेनासे झाले. मी सरळ खाली उतरून ग्राउंड फ्लोअर वर आलो. काय घडतंय माझ्या सोबत हाच विचार डोक्यात सतत घोळत होता.  

मी बाहेरून बिल्डिंग कडे पाहिले. आत्याची बिल्डिंग च आहे. म्हणजे मी बरोबर ठिकाणी आलोय. मी पुन्हा वर जाऊन पाहिले तर तिथे ती मुलगी अजूनही तशीच उभी होती. असे वाटले की ती माझ्या येण्याची च वाट पाहतेय. काही कळण्याच्या आत तिने माझा हात धरला आणि मला वर घेऊन जाऊ लागली. या वेळेस तो जिना मला दिसत होता. मला तर काही समजतच नव्हत काय चाललय. माझ्यावर मोहिनी घातल्या सारखे झाले होते. माझ्यासोबत काय घडतेय ते मला कळत तर होते पण ते कळण्या व्यतिरिक्त मी काहीही करू शकत नव्हतो.. आम्ही दुसऱ्या मजल्यावर आलो आणि मी वळलो. जिथून मी काही क्षणापूर्वी वर आलो होतो तिथे कोणताही जिना नव्हता. तिने माझा हात घट्ट पकडला असला तरी मी संपूर्ण ताकद लावून मी हात झटकला आणि मागे वळलो.

मी जोरात वळल्यामुळे मागच्या भिंतीवर जोरात आपटलो आणि खाली पडलो. पुन्हा समोर पाहिले तर मला जिना दिसला तसे मी थेट खालच्या दिशेने धावत सुटलो. तशी ती ही माझ्या मागे धावत सुटली. मी धावत थेट माझ्या घरी गेलो. कोणाला काहीच न बोलता सरळ झोपून गेलो. त्या रात्री माझ्या बरोबर नक्की काय घडले, ती मुलगी कोण होती हे आजही न सुटलेलं कोड आहे. 

अनुभव क्रमांक ४ – विशाल खांदारे

हा प्रसंग माझ्या मोठ्या भावासोबत साधारण ८ वर्षांपूर्वी घडला होता. त्यावेळी माझ्या गावामध्ये दरवर्षी मेळा भरायचा. तो मेळा आमच्या घरापासून थोड्या लांब अंतरावर असायचा. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सूद्धा मेळ्याची तयारी जोरात चालली होती पण मी व माझ्या घरातली माणसे काही कारणामुळे जाऊ शकलो नाही. त्या रात्री माझी लहान भावं डे झोपून गेली होती. माझे दोन्ही काका आणि माझा मोठा भाऊ कामावरून अजूनही आले नव्हते. तिघेही एकाच ठिकाणी कामाला असल्यामुळे साधारण ९ वाजे पर्यंत घरी यायचे पण आज त्यांना बराच उशीर झाला. काकी ने त्यांना फोन केला तेव्हा ते म्हणाले की आम्ही तिघे मेळ्यात जात आहोत त्यामुळे घरी यायला उशीर होईल.

तुम्ही आमची वाट बघू नका. जेवण आटोपून झोपून जा. त्या रात्री मेळ्यात फिरून जवळपास १ ला ते घरी यायला निघाले. आधीच खूप उशीर झाला होता त्यामुळे नेहमी च्याच रस्त्याने न येता त्यांनी आड मार्गाचा रस्ता धरला कारण तिथून लवकर घरी पोहोचता येणार होते. त्या रस्त्यावरून येताना रेल्वे चे रुळ ओलांडून यावे लागते. तिथून लोकं राञीच्या वेळी जात नसत कारण ती जागा चांगली नाही असे ऐकण्यात आले होते. तिथे बऱ्याच लोकांचा रुळ ओलांडताना गाडी खाली येऊन मृत्यू झाला होता त्यामुळे तिथून येणे लोक टाळत असतं. रात्र बरीच झाली होती. जवळपास दीड वाजत आला होता. माझे काका लघवी करायला थांबले. तसा माझा भाऊ त्यांच्यासाठी थांबला. तो सहज म्हणून आजूबाजूला पाहू लागला. हिवाळ्याचा महिना असल्याने थंड गार वारा वाहत होता. त्या वाऱ्यामुळे अंगावर शहारे येत होते. 

त्या परिसरात अगदी गडद अंधार पसरला होता. फक्त आजूबाजूच्या घरांमधून हलकासा येणारा प्रकाश त्या रुळांवर पडत होता. माझा भाऊ हळु हळू चालत पुढे आला होता. तितक्यात त्याला कोणी तरी कण्हत असल्याचा आवाज येऊ लागला. वेदनेने कळवळत कण्हत होत कोणी तरी. त्याने पाहण्याचा प्रयत्न केला पण काही नजरेस पडत नव्हते. तो मागे फिरला आणि धावू लागला. पण माझे दोन्ही काका तिथे नव्हते. तो पुन्हा घराच्या रस्त्याने धावत सुटला आणि आधी तो आवाज आला होता त्याच जागेवर आला. तितक्यात मागून एक ट्रेन आली. तो एका कडेला उभा राहिला आणि ट्रेन जाण्याची वाट पाहू लागला. जशी ती ट्रेन निघून गेली तसे पुन्हा त्या परिसरात एक जीवघेणी शांतता पसरली. 

तो झपाझप पावले टाकत चालू लागला. तसे पुन्हा त्याला तो आवाज येऊ लागला. या वेळी ती आवाज त्याच्या अगदी पाया जवळून येत होता. त्याने घाबरून खाली पाहिले आणि त्याचे हृदय भीतीने धड धडू लागले. तिथे शिर नसलेलं धड होत. तो प्रचंड घाबरला आणि तिथून धावतच सुटला. काही अंतर धावल्या वर त्याला ते शिर पुढे पडलेले दिसले तसे ते पाहून काळजात अगदी चर्र झाले. त्याने पुन्हा मागे वळून पाहिले आणि समोरचे दृश्य पाहून त्याच्या शरीरातला सगळा त्राण च निघून गेला. शिर नसलेलं ते धड त्याच्या दिशेने धावत येत होत. तो हतबल होऊन त्या कडे पाहत होता. भीतीने अंगातली शक्तीच निघून गेली होती. तितक्यात एका मोटारसायकल चा आवाज त्याच्या कानावर पडला. 

काका त्याच्या दिशेने येत होते. त्यांनी त्याला बाईक वर बसवले आणि तिथून निसटले. घरी आल्यावर माझा मोठा भाऊ तापाने फणफणत होता. काकांनी तिथल्या एका मित्रा कडून बाईक मागितली होती. त्यामुळे त्यांना यायला उशीर झाला पण तो पर्यंत माझा भाऊ हळु हळू चालत पुढे आला होता. काकाच्या मित्राने त्यांना सांगितले की या रस्त्याने जाऊ नका पण त्यांच्या लक्षात आले की माझा भाऊ तिथे च चालत पुढे गेलाय. तेव्हा काका बाईक घेऊन वेळेवर माझ्या भावाकडे आले व त्याला यातून बाहेर काढले. नशिबाने माझा भाऊ वाचला नाही तर काय झाले असते कुणास ठाउक. घरी आल्यावर आजीने काकांना सांगितले की त्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी एका माणसाचा रेल्वे ओलांडताना मृत्यू झालेला तेव्हापासून अमावस्येच्या रात्री ते शिर नसलेलं धड पळताना दिसत.  

अनुभव क्रमांक ५ – अभिजित रांजनिकर

अनुभव माझ्या मामा सोबत २०१७ सा ली घडला होता. 

मामा आणि मामा चा एक मित्र त्या दिवशी एका गावात क्रिकेट ची खूप मोठी स्पर्धा होती ती बघायला गेले होते. ते गाव आमच्या गावापासून बरेच लांब होते. क्रिकेटप्रेमी असल्यामुळे अगदी शेवटचा सामना होईपर्यंत थांबले. त्यामुळे त्यांना घरी यायला बराच उशीर झाला. घरी पोहोचायला रात्र होणार होती म्हणून त्यांनी तिथल्याच एका छोट्याश्या हॉटेल मध्ये जेवण करायचे ठरवले. जेवण आटपून ते पुन्हा गावाच्या वाटेला लागले. मामा चा मित्र म्हणाला की मला एक शॉर्टकट माहितीये. तिथून जाऊ म्हणजे लवकर पोहोचू. त्या गावातून ते बाहेर पडले. रात्र बरीच झाली होती. 

गाव मागे पडले. अनोळखी रस्ता, थंडगार वारा आणि आजूबाजूला एकदम दाट शेती. पुढे होता तो रस्त्यावरचा काळोख. त्या काळोखातून वाट काढत त्यांची बाईक पुढे जात होती. तितक्यात अचानक त्यांची बाईक बंद पडली. तसे मामा चा मित्र चिडून च म्हणाला ” या बाईक ला पण आताच मारायचं होत”. ती खाली उतरला आणि म्हणाला “थांब बघतो मी दोन मिनिटात काय झालंय ते”. तसे मामा म्हणाला “ठीक आहे बघ काय झालंय ते.. मी जरा हलके होऊन येतो..”. मामा थोडे पुढे चालत गेला आणि रस्त्याच्या थोड्या खालच्या बाजूला उतरला. तितक्यात त्याला शेतातून कसलीशी सळसळ जाणवली. शेतात कोणी माणूस असावा म्हणून त्याने दुर्लक्ष केले. 

मामा मागे फिरणार तितक्यात एक लहान मुलगा त्याच्या वाटेत आडवा आला. तेवढ्यात मामाच्या मित्राचे ही लक्ष गेले. ते दोघे ही त्या मुलाला तिथे पाहून जरा दचकले च. कारण बरीच रात्र झाली होती. आणि तो भाग असा होता जिथं वस्ती अगदी च तुरळक होती. मामाने त्या छोट्याशा पोराला विचारायला सुरुवात केली. काय रे इथे काय करतो एवढ्या रात्रीचा.. तुझे आई-वडील कुठे.. मामाचे वाक्य पूर्ण होण्या आधीच तो मुलगा म्हणाला “ओ दादा जरा तंबाखू द्याना”. ते ऐकुन मामा जरा चिडत च म्हणाला “काय रे एव्हढ्या लहान वयात तंबाखू खातोस”. तो मुलगा थोड्या वेळ शांत झाला आणि पुन्हा म्हणाला “बरं बिस्कीट पुडा आणायला तरी पैसे द्या”. मामाने पाकीट काढून त्याच्या हातावर पैसे ठेवले. पण त्या लहान मुलाने मामा चा हात धरला आणि त्याला शेतात खेचत घेऊन जाऊ लागला. मामा ला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की त्या मुलाचे हात प्रमाणापेक्षा जास्त थंड आहेत. 

मामाला कळायला जास्त वेळ लागला नाही की हा प्रकार काही तरी वेगळाच आहे. तितक्यात मामाच्या मित्राने बाईक ला एक जोराची किक मारली तसे बाईक चालू झाली. मामा ने झटकन तिथून पळ काढला आणि शेतातून धावत बाहेर रस्त्यावर आला. मित्राने गाडी त्याच्या जवळ आणली तसे त्याच्या मागे बसून ते दोघेही सुसाट निघाले. काही दिवसानंतर त्यांनी या प्रकाराबद्दल चौकशी केली तेव्हा कळले की त्या रस्त्यावर एक मोठा अपघात झाला होता. त्यात तो मुलगा गेला. त्यानंतर तो सतत कोणाच्याही वाटेत आडवा येती आणि काही ही विचारतो. कधी तंबाखू, कधी विडी, कधी बिस्कीट तर कधी अजुन काही.. तिथल्या वाटसरू ना तो नेहमी दिसतो…

Leave a Reply