अनुभव – सौरभ गायकवाड

ही घटना माझ्यासोबत साधारण ४ वर्षांपूर्वी घडली होती. माझा काका म्हणजे गणेश काका शिर्डीच्या साईबाबां चा निस्सीम भक्त आहे. साई बाबांवर त्याची अपार श्रद्धा. दरवर्षी तो शिर्डी ला पद यात्रा करत जातो. त्यांचा एक लहानसा ग्रुप आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही तो शिर्डी ला जाणार होता. सगळी तयारी झाली होती. बऱ्याच वर्षांपासून माझी ही खूप इच्छा होती म्हणून मग मीही ठरवले की आपण ही जावे काका सोबत. जोडीला माझ्या जिवलग मित्राला नितीन ला ही घेतले. कुठे ही जायचे म्हंटले की तो माझ्या सोबत असतोच. आम्हाला पदयात्रा करत चालत जाण्याचा अनुभव घ्यायचा होता. मी खूप उत्साही होतो. सुरुवातीला मनात जरा कुणकुण होती की आम्ही जायचे ठरवलेय तर खरे पण गणेश काका ऐकेल की नाही. 

मी आणि नितीन ने त्याला त्याच्या बरोबर यायचे विचारले. मला वाटलं की तो आढेवेढे घेईल पण तो सहज तयार झाला आणि मग काय आमच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. मी येणार म्हणून गणेश काका खूप खुश होता. पण त्याला माझ्या बद्दल काळजी वाटत होती हे मला सतत जाणवत होते. पदयात्रा करत चालत जाणे म्हणजे तितके सोप्पे नसते याची त्याला चांगलीच जाणीव होती. त्यामुळेच आम्हाला जमेल की नाही याची बहुतेक त्याला काळजी वाटत असावी. पण काका सोबत असल्यामुळे मी एकदम बिनधास्त होतो. आमची ही जायची तयारी सुरू झाली. थंडीला नुकतीच सुरुवात झाली हाती म्हणून स्वेटर, कानटोपी बरोबर घेतलेच होते. इतरही गरेजेचे सामान घेतले. बॅग्स पॅक झाल्या.

डिसेंबर महिना असल्यामुळे गारठा चांगलाच वाढला होता. त्या दिवशी लवकरच झोपलो. पहाटे ४ ला काकड आरती करून आमचा जवळपास ३४ जणांचा ग्रुप मुंबईहून निघाला. चालताना अखंड साई भजन करण्यात रंगून जात होतो. आमचा प्रवास चालू होता पण अजिबात थकल्या सारखे वैगरे जाणवत नव्हते. चार दिवस झाले होते आणि आम्ही नाशिक ला पोहोचणार च होतो. काही किलोमीटर चे अंतर बाकी होते. तेवढ्यात नितीन मला म्हणाला अरे सौऱ्या चार दिवस झाले सिगारेट नाही प्यायलो.. चल ना सुमडीत कश मारून येऊ, त्याच्या हातात क्लासिक माइल्ड चे अख्खे पाकीट होते. तलफ तर मलाही झाली होती आणि सिगारेटचे पाकीट बघून माझाही तोल ढळला. मी आणि नितीन आम्ही दोघंही गणेश काकाचा डोळा चूकवून मुद्दाम हळू चालत सगळ्यात मागे राहिलो. अंधार पडायला सुरुवात झाली होती. 

ते जसे थोडे पुढे गेले तसे आम्ही रस्त्याच्या एका कडेला थोडस खालच्या बाजूला उतरलो. नितीन ने पाकिटातून दोन सिगारेट काढून पेटवल्या.. मस्त झुर्रके मारत आम्ही सिगारेट ओढू लागलो. ४ दिवसानंतर वेळ मिळाला होता. मी सहज म्हणून आजूबाजूला पाहत होतो. वस्तीही तुरळक होती. वातावरणात कमालीचा गारवा जाणवत होता. अधून मधून एखादी थंडगार वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्श करून जायची तसे अगदी शहारल्या सारखे व्हायचे. आम्ही त्याच जागी उभे राहून एका मागोमाग एक अश्या ३-४ सिगारेट संपवल्या. मी नितीन ला म्हणालो “चल रे.. खूप वेळ झाला.. हे सगळे खूप पुढे निघून गेले असतील.. आणि काकाला कळण्याआधी जाऊ नाही तर उगाच तो ओरडायचा”. तसे तो म्हणाला “थांब जरा.. मी लघवी करून येतो..” तसे मी ही गेलो. एव्हाना अंधार गडद होऊ लागला होता. 

त्या परिसरात कोणीही दृष्टीस पडत नव्हते. आमचा ग्रुप तर एव्हाना खूप पुढे निघून गेला होता. मी मोबाईल चा फ्लॅश लाऊन अजुन थोडे आतल्या भागात झुडपा शेजारी गेलो. तितक्यात पायाखाली काही तरी आले आणि ते दाबले गेले असे जाणवले. मी झटकन पाऊल उचलले आणि फ्लॅश खाली वळवला. तिथे हळद कुंकू लावलेले, टाचण्या टोचलेले लिंबू पडले होते. मी हळु हळू फ्लॅश सरकवत पुढे नेत होतो. तसे समोर नारळ वैगरे दिस ला. मी समजून गेलो की अश्या जागी उतारा काढून ठेवलाय म्हणजे ही जागा.. गेले १५-२० मिनिट आपण इथे आहोत आणि त्यात भर म्हणून आता पायाखाली हे लिंबू चिरडले आपण. मी झटकन म्हणालो “नितीन आपण इथून निघायला हवे.. मी त्याचा हात पकडला आणि सरळ धावतच सुटलो.

अचानक मला जाणवू लागले की आमच्या पाठीमागे अजुन कोणी तरी आहे आणि ते आमचा पाठलाग करतेय. मी धावताना २-३ वेळा मागे वळून पाहिले पण अंधार इतका होता की मागे कोणीही दिसत नव्हत. एव्हाना आमचा ग्रुप खूप पुढे निघून गेला होता. साधारण ७-८ मिनिट झाली आम्ही पळत होतो. आता मात्र आम्ही दोघेही खूप दमलो. जे व्हायला नको होते तेच झाले. आम्ही धावताना रस्ता चुकलो आणि कोणत्या तरी आडवाटेला लागलो. आम्ही चारही बाजूला पाहत होतो की कुठे आमचा ग्रुप दिसतोय का पण त्या अंधाऱ्या वाटेवर आम्ही दिशाहीन झालो होतो. दमल्यामुळे आम्ही आता एका ठिकाणी येऊन थांबलो आणि धापा टाकू लागलो. घशाला कोरड पडली होती. तोंडातून शब्द ही फुटत नव्हते. मी नितीन कडे पाहिले तर त्याचीही अवस्था माझ्यासारखीच झाली होती. 

आम्ही पुन्हा समोर दिसत असलेल्या वाटेने चालू लागलो. तितक्यात आम्हाला त्या वाटेवर एक विहीर दिसली. तसे जीवात जीव आला. वाटले की पाणी तरी प्यायला मिळेल. ती विहीर त्या वाटेपासून बऱ्याच आतल्या भागात होती. आम्ही त्या दिशेने चालत जाऊ लागलो तसे जाणवले की तिथे कोणी तरी पाठमोर उभ राहून पाणी उपसतय. मी विचार केला की याच्याकडून च थोड पाणी प्यायला मागू आणि यालाच विचारू की मुख्य रस्त्याला कसं लागायचं. म्हणून मी थोडे पुढे चालत गेलो आणि त्याला विनंती करत म्हणालो “दादा.. ” तसे तो एका एकी थांबला आणि हळूच मागे आमच्या दिशेने वळला. आम्ही दोघेही त्याच्या कडे पाहतच राहिलो. अतिशय वाईट अवस्था होती त्याची. 

अस्ताव्यस्त कपडे, पांढरेशुभ्र केस आणि पायाला जखम झाली होती. त्यातून रक्त ही वाहत होते. वयाची सत्तरी गाठलेला वाटत होता. त्याचा असा विचित्र अवतार बघून त्याच्याकडून पाणी मागण्याची हिम्मत च झाली नाही. तितक्यात त्याने आम्हाला विचारले “काय रे पोरांनो.. कुठे निघाला एवढ्या रात्री..” तसे आम्ही त्याला सगळे सांगितले. तसे तो म्हणाला “ठीक आहे.. माझ्या मागून चला, मी दाखवतो रस्ता”. मी आणि नितीन एकमेकांकडे प्रश्र्नार्थी नजरेने पाहू लागलो. आता त्याच्या मागून चालण्या व्यतिरिक्त आमच्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता. तो लंगडत च चालू लागला तसे आम्ही आपसूक त्याच्यामागे चालू लागलो. काही अंतर चालले असू तितक्यात माझ्या पायाला काही जोरात तरी लागले म्हणून मी थांबलो आणि पाहू लागलो. तसे नितीन ही थांबला आणि त्याने मोबाईल चा फ्लॅश लाऊन पहिला. ठेच लागून बोटातून रक्त येऊ लागले होते. तसे नितीन म्हणाला “बघून चाल रे जरा..”.

ठीक आहे असे म्हणत मी समोर पाहिले तर तो म्हातारा कुठे अंधारात निघून गेला काही कळलेच नाही. मी म्हणालो “काय रे.. हा कुठे गेला”. तसे नितीन म्हणाला “सोड त्याला.. याच रस्त्याने पुढे चालत जाऊ म्हणजे मुख्य रस्त्याला लागू आपण”.  रात किड्यांचा किर्र आवाज चारही बाजूंनी येत होता. दूर दूर वर फक्त गर्द झाडी तेव्हढीच काय ती दिसत होती. त्या व्यतिरिक्त होती ती फक्त भयाण शांतता. काही पावले पुढे चालत गेलो आणि रस्त्यावर तोच म्हातारा पडलेला दिसला. फरक एवढाच होता की त्याची त्वचा पूर्ण सडून गेली होती जसे तो आता नाही तर खूप आधीच मारून पडलाय. ते दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे थांबण्याचा काही अर्थ नव्हता म्हणून आम्ही तिथून पळ काढला. वाट दिसेल तिथे धावत सुटलो. 

आमच्याकडुन झालेली चूक आम्हाला लक्षात आली होती. साईंचे नाव घेत आम्ही पळत होतो. घड्याळात पाहिले तर ९ वाजून गेले होते. मी काका ला फोन लावायचा प्रयत्न केला पण नेमका त्याचाही फोन लागत नव्हता. आम्हाला तीच विहीर पुन्हा दिसली आणि कळून चुकले की आम्ही एका घेऱ्यात अडकलो आहोत. मी देवाचे नाव घेतले आणि सरळ दिशेने धावत सुटलो. जीवाच्या आकांताने आम्ही दोघेही धावत होतो. पुढच्या काही क्षणात आम्हाला मुख्य रस्ता दिसला तसे जीवात जीव आला. सुदैवाने आमचा ग्रुप तिथेच एका ढाब्यावर थांबलेला दिसला. गणेश काका आमच्यावर खूप चिडला होता. त्याची बरीच बोलणी खाल्ली. तसेही चूक आमची होती त्यामुळे ऐकुन घेण्या वतिरिक्त काही पर्याय नव्हता. झाला प्रकार आम्ही त्याला कथित केला. 

तिथला एक चहाच्या टपरी वाला आमचे बोलणे ऐकत होता. आमचे सांगून झाल्यावर तो म्हणाला ” एक सांगू का तुम्हाला.. खर म्हणजे असा लंगडा म्हातारा खूप लोकांना दिसतो. मी पाहिले नाहीये पण खूप लोकांकडून ऐकले आहे.. त्या म्हाताऱ्याला म्हणे एका कार वाल्याने उडवले होते आणि त्याचे प्रेत त्या विहिरीजवळ टाकून तो तिथून पळून गेला होता तेव्हा पासून तो रात्री त्या आड वाटेला दिसतो असे इथे लोक म्हणतात. नितीन आणि मी त्याचे ते बोलणे अवाक होऊन ऐकत होतो. गणेश काकाने आम्हाला जेवायला दिले आणि जेवण झाल्यावर आम्ही धाब्यावर इतरांची वाट बघत थांबलो होतो. सहज म्हणून पुन्हा त्या चहाच्या टपरीवर लक्ष गेले. त्या चहाच्या टपरी मागे कोणी तरी उभ होत. अंधार असल्यामुळे नीट दिसत नव्हत. पण तितक्यात समोरून एक ट्रक आला आणि त्याच्या हेड लाईट चा प्रकाश त्या भागात पडला. तोच म्हातारा आम्हाला पाहून हसत होता.. 

Leave a Reply