अनुभव – रिषभ माने

ही गोष्ट आहे मे 2016 ची. तेव्हा मी एका ऑफिस मध्ये नुकताच जॉब ला लागलो होतो. साधारण 2 महिने झाले होते आणि बरेचसे मित्र ही झाले होते. एके दिवशी असाच आमचा मित्राच्या गावी पिकनिक ला जायचा प्लॅन झाला.. मित्राचे गाव होते कोकणातले कणकवली.. आम्ही 8 मित्र मैत्रिणी होतो. पिकनिक ला जायची तारीख ही ठरली 29 मे 2016. ठरल्या प्रमाणे तो दिवस जवळ येत होता पण मध्येच एक अडचण आली. 8 जणांपैकी 4 जणांना एक दिवस आधीची सुट्टी मिळू शकली नाही. त्यामुळे मग बाकीच्यांना पुढे निघायला सांगितले आणि आम्ही त्या दिवशी ऑफिस ची कामं आटपून रात्री निघायचे ठरवले.

निघायला जवळपास 10 वाजले. आमच्यापैकी फक्त सुशांत ला कार चालवता येत होती त्यामुळे तोच गाडी चालवत होता.

कोकण हायवे तितकासा चांगला नाही म्हणून आम्ही मुंबई ते कोल्हापूर व्हाया गगनबावडा घाटामार्गे जायचे ठरवले. देवाचे नाव घेऊन प्रवास सुरू झाला. बोलता बोलता कोल्हापूर रोड वरून गगनबावडा रोड ला कधी पोहोचलो कळलेच नाही. काही वेळातच आम्ही गगनबावडा घाट उतरून कणकवली च्या रोड ला लागलो. 

खर तर आम्हाला घाट उतरल्यावर रस्ता कळत नव्हता आणि त्यात GPS ही नीट माहिती देत नव्हते. पहाटेचे साधारण पावणे चार झाले होते. रस्ता कळत नसल्यामुळे आम्ही मित्राला फोन केला आणि पत्ता विचारु लागलो. मित्राने आम्हाला पत्ता सांगितला खरा पण आम्हाला त्या रात्रीच्या अंधारात काहीच कळत नव्हते.

मित्राशी बोलणे झाल्यावर आम्ही साधारण 200 मीटर पुढे आलो आणि गाडी थांबवली. मी आणि सुशांत पुढे बसलो होतो आणि प्रफुल आणि मनीष मागच्या सीट वर. तितक्यात रस्त्याच्या डाव्या बाजूने आवाज ऐकू येऊ लागला. तो आवाज भांड्यांचा होता आणि असे भासवत होता की कोणी तरी भांडी घासत आहे. पुढच्या क्षणी एक बाईंचा आवाज आला आणि काळजात चर्रर्र झालं. आम्ही त्या आवाजाच्या दिशेने एक टक पाहत होतो पण त्या गडद अंधारात काहीच दृष्टीस पडत नव्हते. ती म्हणाली ‘तुम्हाला जोगळेकर कॉटेज ला जायचे आहे ना, इथून सरळ जा थांबू नका.. पुढे गेल्यावर तुम्हाला 3 रस्ते दिसतील.. डावी कडचा रस्ता पकडून पुढे जात राहा आणि अजिबात थांबू नका’.. 

तो आवाज तसा साधा वाटत असला तरी मात्र ही वेळ साखरझोपेची असल्यामुळे भीती वाटणे साहजिक होते. आणि विशेष म्हणजे तो आवाज अगदी आमच्या बाजूला उभे राहून कोणी तरी बोलतेय असे भासवत होता.  मी गाडीतून उतरून बाहेर पाहणार तोच सुशांत ने मला अडवले आणि गाडीतून बाहेर उतरू दिले नाही. जास्त विचार न करता सुशांत ने गाडी चालू केली आणि आम्ही पुढे निघालो. 3-4 किमी नंतर आमची गाडी अचानक बंद पडली. आम्ही चारही जण गाडीतून खाली उतरलो. त्यावेळी 4 वाजून गेले होते. मी पुन्हा मित्राला फोन करायचा प्रयत्न करत होतो पण काही केल्या फोन लागत नव्हता. तेवढ्यात अचानक आम्हाला समोरून खूप लोक येताना दिसले. 

एखाद्या लग्नाची वरात असावी असे वाटत होते. पण वेगळेपण म्हणजे त्यात 7-8 बैल गाड्या होत्या आणि लाईट नसल्यामुळे त्यातल्या लोकांनी मोठे कंदील हातात धरले होते. साधारण 40-50 लोक, जुन्या पोशाखातले. आम्ही त्यांना रस्ता विचारला त्यातला एक माणूस म्हणाला ‘इथून या रस्त्याने सरळ जात रहा गावात पोहोचाल, तुमचे चारही मित्र तुमची वाट पाहत आहेत’

आम्ही काहीही न बोलता गाडीत जाऊन बसलो, सुशांत ने गाडी चालू केली आणि सुदैवाने गाडी चालू ही झाली. काही वेळानंतर एक गोष्ट आमच्या सगळ्यांच्या लक्षात आली आणि आम्ही भयंकर घाबरलो. त्या बाईंचा आवाज आला आणि तिने आम्हाला रस्ता सांगितला खरा पण आम्ही तिला कुठे विचारले होते की आम्हाला कुठे जायचे आहे. आणि या माणसाला कसे ठाऊक की आमचे 4 मित्र आधीच गावात पोहोचून आमची वाट पाहत आहेत. विचारांनी आमच्या डोक्यात मुग्यांच वारूळ उठलं.

ही चर्चा चालू असतानाच पुन्हा आमची गाडी बंद पडली. आणि आता मात्र समोरचे दृश्य पाहून आमची वाचाच बंद झाली. कारण डोळ्यासमोरून तीच लग्नाची वरात जात होती. पण यावेळेस मात्र त्या पूर्ण वरातीतल्या लोकांना लुटले होते, काहींना मारहाण झाली होती. ती वरात लुटारूंच्या विळख्यात सापडली असावी. आम्हाला पाहून आधी भेटलेला तोच माणूस आमच्याकडे आला आणि पाणी मागू लागला. 

काय घडतेय काही कळत नव्हते. असे वाटत होते की आम्ही वेगळ्याच काळात प्रवेश केला आहे. देवाचे नाव घेऊन आम्ही गाडी चालू केली आणि पुढे निघालो. काही मिनिट झाली असतील तोच माणूस एक क्षणासाठी आमच्या गाडीत मागे दिसला आणि काळजाचा ठोकाच चुकला. आम्हाला लग्नाच्या वाजंत्रीचा आवाज येऊ लागला आणि आता मात्र आम्ही पुरते घाबरलो. सुशांत जमेल तितक्या वेगात गाडी चालवत होता. देवाचे नाव घेत काही वेळा नंतर आम्ही कणकवली गावात येऊन पोहोचलो.

सकाळी आम्ही घडलेला प्रसंग सांगितला आणि साहजिकच आम्हाला सगळ्यांनी वेड्यात काढले. मित्राची आजी समोरच होती आणि आमचे बोलणे ऐकत होती. ती म्हणाली “तुम्ही जे अनुभवले ते इतरांनीही अनुभवले आहे, साधारण 40 वर्षांपूर्वी त्या वाटेवर एका लग्नाच्या वरातीला दरोडेखोरांनी लुटले होते आणि पूर्ण वरात संपवली होती. त्या सगळ्या लोकांना जीवानिशी मारले होते. आम्ही सर्व भान हरपून आजीचे बोलणे ऐकत होतो. काही वेळा नंतर आमच्या पैकी 2 जणांना ताप भरला होता. 

असे म्हणतात की आजही ती वरात कित्येकांना दिसते आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवास्याना अडवून धरते. आम्ही त्या भयंकर प्रसंगातून सुखरूप बाहेर पडू शकलो ही देवाची च कृपा.. 

Leave a Reply