अनुभव – अनिकेत झेंडे

त्या दिवशी आम्ही सगळे मित्र नेहमीच्या ठिकाणी जमलो होतो. मी खूप दिवसांनी माझ्या मित्रांना भेटत होतो. वेदांत, जेडी, रवी सगळे आले होते. त्यांची नाईट आऊट बद्दल च चर्चा चालू होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी नाईट आऊट केले होते तेव्हा बरीच मजा केली. रात्री २-३ वाजता बाईक घेऊन फिरून आले वैगरे सांगत होते. मला त्यांच्या सोबत जाता नाही आले हे मात्र मला खटकले. शेवटी मी न राहवून त्यांना म्हणालो मग आज जर प्लॅन असेल तर मी ही येतो. रवी च्या घरी जमायचे ठरले. त्या दिवशी जेवण वैगरे लवकरच आटोपून मी रवी च्या घरी गेलो. 

माझ्या आधीच माझे सगळे मित्र येऊन माझीच वाट पाहत बसले होते. साधारण ११ वाजले असतील. आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. मजा मस्ती करत आमचा टाईमपास सुरु होता. मित्र सोबत असलो की वेळ कसा निघून जातो कळतच नाही. आमच्या गप्पामुळे कोणाला वेळेचे भानच राहिले नाही. मी सहज म्हणून घड्याळ्यात पाहिले तर ३ वाजायला आले होते. मला जरा भूक लागली होती म्हणून मी रवी ला म्हणालो “मॅगी वैगरे असेल तर बनव ना”.. तसे ही वेदांत आणि रवी च्याच हाताची मॅगी मस्त असते म्हणजे ते बनवतात च तसे.. पण त्या रात्री आम्ही मॅगी आणायला विसरलो हे नंतर लक्षात आले. 

तितक्यात जेडी म्हणाला चल आपण जाऊन मॅगी घेऊन येऊ. मी त्याला म्हणालो की इतक्या रात्री कोणते दुकान उघडे असणार आहे. तसे तो म्हणाला की मला माहितीये एक दुकान, मी कालच गेलो होतो रात्री. तसे मी तयार झालो. आम्ही रवी ची बाईक घेऊन निघालो. काही दिवसांपूर्वी एका अपघातामुळे त्याच्या बाईक चे हॅण्डल जरा वाकडे झाले होते त्यामुळे चालवत असतानाच बाईक एका बाजूला आपोआप जायची. तरीही मी अंदाज घेत बाईक चालवत होतो. वस्तीचा परिसर मागे पडला आणि आम्ही एका ब्रीज वर आलो. रात्रीचे ३ वाजून गेले होते त्यामुळे रस्ता अगदीच निर्मनुष्य झाला होता. मी सहज म्हणून जेडी ला विचारले ” यार.. हे भूत वैगरे खरंच असतात का..? एखादे दिसले तर मजा येईल ना..”

आमच्या ग्रुप मध्ये मला सगळ्यात विचित्र सवय आहे. अश्या गोष्टींना मी अजिबात मानत नव्हतो. उलट सुलट बोलायचो. नको त्या वेळी नको त्या ठिकाणी मस्ती करायचो. आणि याच कारणामुळे मित्रांच्या शिव्याही तितक्याच खायचो. जेडी आणि माझे विचार बरेच जुळतात त्यामुळे त्याच्या समोर असे विचित्र काही बोलायला मला काहीच वाटायचे नाही. तर आम्ही त्या ब्रीज वरून जात असताना थांबलो. असेच टाईमपास म्हणून. तो ब्रीज असा आहे ना की एका बाजूला रेल्वे क्रॉसिंग आहे आणि दुसऱ्या बाजूला स्मशान घाट आहे. परिसर एकदमच शांत होता. कसलाही आवाज नाही. आमच्या दोघांशिवाय कोणीही दृष्टीस पडत नव्हते. तसे ही अश्या अवेळी कोण दिसणार म्हणा. सगळा परिसर निद्रेच्या आहारी गेला होता. 

आम्ही थोडा वेळ थांबून तिथून निघालो. जेडी ला कुठे काय मिळते हे सगळे माहीत होते. त्यामुळे पुढचा रस्ता त्यानेच मला दाखवला आणि मी तिथे गाडी वळवली. पण तिथले दुकान आज नेमके बंद होते. तसे तो म्हणाला की मला अजून एक ठिकाण माहिती आहे, आता इतक्या लांब आलोच आहोत तर आपण तिथे जाऊन बघू. तसे आम्ही तिथून अजुन थोडे पुढे गेलो पण ते दुकान ही बंद. जेडी म्हणाला की काल दुकान उघडे होते आज काय प्रोब्लेम झालाय काय माहीत. आम्ही तिथून पुढे एका बस स्टॉप जवळ गेलो. आणि शेवटी एक दुकान दिसले. शटर अर्धवट लावले होते पण तिथे आम्हाला मॅगी मिळाले. सोबत चिप्स वैगरे ही खायला घेतले. एवढे लांब येऊन काही तरी फायदा झाला असा विचार करत आम्ही पुन्हा घरच्या वाटेला लागलो. 

एक गोष्ट मला जरा विचित्र वाटली की बस स्टॉप चा परिसर असून सुद्धा तिथे कोणीही नव्हते. मनुष्य जाऊद्या पण एखादा कुत्रा वैगरे काही दिसले नाही. पूर्ण रस्ता अगदी सामसूम होता. घरी परत येताना मुख्य रस्त्याशिवाय एक शॉर्ट कट आहे त्यामुळे आम्ही तिथून यायला निघालो. मी त्या रस्त्याला वळलो तेव्हा जाणवले की त्या रस्त्यावर स्ट्रीट लाईट तर होते पण ते बऱ्याच अंतरावर होते. म्हणजे एक स्ट्रीट लाईट पासून दुसरा बराच लांब होता. तसे आमच्या बाईक चा हेड लाईट नीट होताच पण तरीही अंधार खूप जाणवत होता. मी बाईक चा वेग कमी केला आणि जेडी ला विचारले “काय रे.. जायचे ना इथूनच”. तसे तो म्हणाला “चल आता.. टर्न घेतलास आहेच तर जाऊ याच रस्त्याने”. तसे मी ठीक आहे म्हणत बाईक चा वेग पुन्हा वाढवला. 

आम्ही तिथून थोडे आत आलो होतो. पुढे उजव्या बाजूला एक वळण दिसत होते म्हणून मी वेग कमी केला आणि बाईक त्या दिशेला वळवली. आम्ही जसे त्या दिशेला वळलो तसे जेडी जोरात ओरडत म्हणाला “अन्या बाईक पळव.. लवकर पळव बाईक..” मी एकदम दचकलो. त्याला विचारू लागलो की काय झाले ओरडयला अचानक. पण तो इतका घाबरला होता की फक्त एकच वाक्य बोलत होता “बाईक पळव अन्या.. थांबू नकोस.. वेग अजिबात कमी करू नकोस”. आता मात्र मला ही नको नको त्या शंका येऊ लागल्या तसे मी बाईक वेगात घेतली. एकतर त्या बाईक चे हॅण्डल बेंड झाल्यामुळे बाईक भलती कडे जात होती पण तरीही कसे तर सावरत मी चालवत होतो. इतक्यात वेगात होतो की तीन स्पीड ब्रेकर वरून मी गाडी उडवत च नेली. समोर मेन रोड दिसत होता. तितक्यात समोरून एक ट्रक क्रॉस होऊ लागला. आपण आता थेट त्या ट्रक च्याच टायर खाली येणार असे एका क्षणासाठी वाटले.  

मी जेमतेम वेगावर नियंत्रण आणत दिशा बदलली आणि थोडक्यात बचावलो. आम्ही जसे त्या रोड वर आलो तसे जेडी भीतीने घाबरून रडायलाच लागला. मी त्याला विचारू लागलो तसे तो म्हणाला “अन्या मी हे काय पाहिले.. तू गाडी थांबवू नकोस..” तो प्रचंड घाबरला होता. मला काहीच कळायला मार्ग नव्हता. फक्त एकच गोष्ट कळली होती की याला त्या वळणावर नक्कीच काही तरी दिसले आहे. मी त्याच्या शी जास्त संवाद न साधता थेट घरी आलो. मी बाईक पार्क करतच होतो तसे जेडी घराकडे धावला. वेदांत ने दरवाजा उघडला तसे जेडी आत धावत गेला. थेट बेडरूम मध्ये जाऊन बसून रडू लागला. त्यांना वाटले की आम्ही नक्कीच कोणाला तरी उडवून म्हणजे एक्सी डें ट करून आलोय. मी त्याच्या मागून आत आलो तसे ते मला विचारू लागले काय रे.. काय झाले.. 

मी म्हणालो की अरे मलाच माहीत नाही काय झाले. जेडी ला पाणी प्यायला दिले. काही वेळानंतर तो शांत झाला आणि सांगू लागला. “आम्ही त्या शॉर्ट कट रस्त्याच्या वळणाला होतो तेव्हा मला तिथे एक बाई उभी दिसली. ती संपूर्ण नग्न अवस्थेत होती आणि मला बोलवत होती. नंतर ती आमच्या बाईक मागे धावू लागली.” मी त्याचे बोलणे ऐकून पटकन म्हणालो “अरे कोण बाई, काय बोलतोय.. त्या वळणावर कोणीही नव्हते..” तसे तो म्हणाला “होती.. तिकडेच होती तुला दिसली नाही पण मला दिसली.. केस मोकळे सोडले होते.. अंधारात चेहरा फक्त एकदाच दिसला जेव्हा बाईक चा हेड लाईट तिच्यावर पडला..” रवी ला हे सगळे माहीत होते. तो संपूर्ण हनुमान चालीसा म्हणाला आणि सांगितले की बहुतेक ती बाई तुमच्या मागे आधी पासूनच होती. तुम्ही मध्ये कुठे थांबला होतात का.. तसे मी म्हणालो “हो.. आपल्या ब्रीज वर थांबलो होतो काही मिनिट..”

रवी म्हणाला “बरोबर.. म्हणजे तिथून ती तुमच्या मागावर होती पण नंतर जेडी ला दिसली. आज सर्व पित्री अमावस्या आहे.” मी विचार करतच राहिलो कारण बाईक मी चालवत होतो. टर्न घेतल्यावर ती बाई पहिल्यांदा मला दिसायला हवी होती पण तसे झाले नाही. माझ्या आयुष्यातला हा पहिला भयानक अनुभव होता जो मी कधीही विसरू शकणार नाही. त्या प्रसंगामुळे आमचा अपघात होता होता राहिला. सुदैवाने आम्ही थोडक्यात वाचलो.

Leave a Reply