अनुभव – प्राजक्ता कुलकर्णी

गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. जवळपास १५ वर्षांपूर्वीची. तेव्हा मी शाळेत शिकत होते. माझी आजी मुंबईत राहायची. दर वर्षी मी आणि माझी बहिण उन्हाळ्याच्या सुट्टीत आज्जी कडे राहायला जात असे. ते घर एका चाळीत होतं, चौथ्या मजल्यावर. चाळ म्हंटलं की घरं एकदम जवळ जवळ असतात, त्यामुळे आजूबाजूच्या घरात आमच्या वयाच्या खूप मित्र मैत्रिणी होत्या. एका उन्हाळी सुट्टीत, दुपारी जेवण झाल्यावर आम्ही खेळण्यासाठी एकत्र जमलो. विकास, सुप्रिया, चैताली, माझी बहिण व मी असा आमचा ग्रुप होता. चाळ छोटी असल्याने घराबाहेर खूप जागा नसायची, म्हणून आम्ही सर्वांनी terrace वर जमायचे ठरवले. त्या दिवशी ऊन होते, terrace वर पाण्याच्या टाकीच्या आडोशाला सावली मध्ये आम्ही जमलो.

रोज रोज पत्ते आणि कॅरम खेळून कंटाळा आल्याने आज काहीतरी नवीन खेळ खेळू असं ठरवलं. विचार करत असताना विकास म्हणाला की आपण planchet करूया. Planchet काय असते हे आमच्यापैकी कोणालाही माहीत न्हवत. पण काहीतरी नवीन म्हणून आम्ही सगळे तयार झालो. आम्हाला त्यांनी सर्व समजावून सांगितले तसे आम्ही तयारी ला लागलो. 

एक बोर्ड आणला, त्यावर A to Z असे alphabets लिहिले, 1 ते 10 असे आकडे काढले, दोन्ही च्या मध्ये डावीकडे, उजवीकडे आणि मधोमध असे 3 चौकोन काढले. एकात yes, दुसऱ्यात no आणि मधल्या चौकोनात home असे लोहिले. पाच रुपयांचे एक कॉइन आणले. आम्ही एकमेकांना घेरून बसलो आणि आमच्या मध्ये तो बोर्ड ठेवला.

ठरल्या प्रमाणे, प्रत्येकाने त्या कॉइन वर एक बोट ठेवले, आणि ते कॉइन होम असलेल्या चौकोनात ठेवले. Planchet वर भुतांना बोलावतात हे जरी खरं असलं तरी कोणाला बोलवायचे ते ठरत न्हवते. अपघातामध्ये गेलेल्या कोणाला किंवा मग अवेळी मरण पावलेल्यांना किंवा मग आपल्या पूर्वजांना, कोणाला बोलवायचे हे ठरत न्हवते. तसा विकास म्हणाला की आपण ह्या पैकी कोणाला ही नको बोलवायला, आपण अश्या व्यक्तीला बोलवू की आपल्या कडून जरी काही चूक झाली तरी planchet करताना ती व्यक्ती आपल्याला काही त्रास देणार नाही. झालं तर ठरलं मग, आम्ही सर्वांनी त्या coin वर बोट ठेवले व डोळे मिटले. Terrace मोकळी होती, छान मंद वारा सुटलेला, आमच्या शिवाय तिथे दुसरं कुणी न्हवतं. 

आम्ही डोळे मिटले व मन एकाग्र करू लागलो, ज्या व्यक्तीला बोलवायचे तिचा धावा करू लागलो. साधारण 10 मिनिटं उलटली असतील. आणि अचानक ते कॉइन हलू लागले. Home च्या चौकोनातुन किंचित सरकले, तसे आम्ही डोळे उघडले. एकमेकांना विचारू लागलो की कुणी हलवले नाणे? जो तो म्हणू लागला की मी नाही काही केले. आधी आम्हाला वाटले की बोटाच्या दाबामुळे मुळे हलले असेल कदाचित, भूत वगैरे काहीही खरं नाही. पण तसे न्हवते, coin खरच सरकले होते. खात्री करून घेण्यासाठी आम्ही प्रश्न विचारायचे ठरवले. आम्ही पहिला प्रश्न विचारला “खरोखर जर तू आला आहेस तर coin yes च्या चौकोनात हलव. आम्ही श्वास रोखून त्या बोर्ड कडे पाहत होतो. आणि बघता बघता ते कॉइन येस च्याच  चौकोनाच्या दिशेने हलू लागले. 

आम्ही सगळेच लहान असल्याने आम्हाला त्याचे गांभीर्य कळले नाही. आम्हाला मजा वाटू लागली. वाऱ्याचा वेग वाढू लागला होता. वातावरणात अचानक बदल जाणवू लागला. आता तो खरच झाला होता की फक्त मलाच तसे वाटत होते ते माहीत नाही. पण मी कोणाला काही सांगितले नाही. आम्ही सगळ्यांनी अजुन प्रश्न विचारायला सुरुवात केली. “तू आला आहेस ते कळले पण थोड्या वेळाने परत जाशील ना..?”. आम्ही हा प्रश्न विचारल्यावर काही मिनिट काहीच घडले नाही. पण नंतर हळु हळू ते कॉइन नो च्याच चौकोनात हलले. आता मात्र आम्ही थोडे घाबरलो. एव्हाना वाऱ्याचा जोर बराच वाढला होता. एखादे वादळ येणार आहे असे भासू लागले. आम्ही काय करतोय याची आम्हाला कल्पना नव्हती. आमच्या सोबत जाणकार कोणीही नव्हते. 

मग ठरवलं की पटापट काही दोन चार प्रश्न विचारायचे आणि घालवायची ही पीडा, उगाच काही झालं तर काय करणार. आम्ही प्रत्येकी प्रश्न विचारायला सुरवात केली, त्याची उत्तरे ही पटापट मिळू लागली. Coin प्रत्येक alphabet वर जाऊन थांबायचं आणि मग आम्ही ते जोडून उत्तर तयार कारायचो. आमचे प्रश्न साधे होते, त्याच्या मनाला काही इजा होईल असं आम्ही काहीही विचारायचे नाही असं ठरवलेलं. साधारण पाऊण तासाने आम्ही पुन्हा विचारले की आता आमचे प्रश्न विचारून झाले आहेत आता तू जाशील ना..? Coin परत नो वर हलले आणि आमच्या काळजाचा ठोकाच चुकल. आता मात्र आम्ही प्रचंड घाबरलो. म्हंटले हे जे कुणी आहे ते कधी गेलेच नाही तर… घाबरत घाबरत आम्ही परत डोळे मिटले, आणि विनंती करू लागलो की please जा, देवाचा धावा करू लागलो. 

साधारण १५ मिनिटांनी वारा थोडा शांत झाला, वादळी वातावरण थोडं कमी झालं, आम्ही डोळे उघडले, प्रश्न विचारला की अजून planchet वर असाल तर coin yes वर हलव.. आम्हा सगळ्यांच्या नजरा त्या बोर्ड कडे खिळल्या होत्या. जर ते येस वर हलले तर..? आम्ही जवळपास 5 मिनिट वाट पाहिली पण coin हलले नाही.  बहुतेक तो गेला असेल असं वाटून आम्ही जागेवर उभे राहिलो, देवाचं नामस्मरण केलं आणि तो बोर्ड फाडून फेकून दिला. थोडक्यात वाचलो असे सर्वांच्या चेहऱ्यावर भाव होते, पळत पळत खाली आपापल्या घरी गेलो, मी घरी जाताच आजी ला घट्ट मिठी मारली. त्या रात्री आम्ही कुणाशीही काहीही बोललो नाही, जेवलो आणि झोपी गेलो. मानसिक थकवा आल्या मुळे मला झोप लागली, सकाळचा प्रसंग आठवायचा नाही असं पक्क ठरवलं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही terrace वर जायला सुद्धा घाबरत होतो, त्या पूर्ण सुट्टी भर घरी बसूनच खेळ खेळलो. 

Leave a Reply