अनुभव – फरदिन खान

माझे वय आता २७ वर्ष असून मी राहायला वाशिम जिल्ह्यात आहे. अनुभव साधारण ४-५ वर्षांपूर्वीचा आहे. २०१७ सालचा. आम्हा चार जिवलग मित्रांचा ग्रूप आहे ओम, महेश, साहिल आणि मी. बऱ्याच वर्षांपासून आम्ही मित्र आहोत. आणि चौघांना ही गड, किल्ले आणि डोंगरावर ट्रेकिंग ला जायची आवड आहे. त्यामुळे आम्ही आवर्जून अश्या ट्रिप ला जात असतो. या वेळी ही आम्ही अश्याच एका किल्ल्यावर जायचा बेत आखला. ३ डिसेंबर रोजी आम्ही सकाळी ९ ला घरून फोर व्हीलर घेऊन निघालो. नेहमी प्रमाणे अगदी मजा मस्ती करत चाललो होतो. प्रवास अगदी छान झाला आणि दुपार पर्यंत आम्ही तिथे पोहोचलो सुद्धा. साधारण २ वाजले होते मग गेल्या गेल्या काही वेळात फ्रेश झालो आणि जेवण वैगरे आटोपले. तिथून थेट किल्ल्यावर गेलो आणि बरेच फिरलो. संध्याकाळ चे ६ वाजले असतील. तितक्यात महेश म्हणाला ” आज काही नीट फिरणं झालं नाहीये, आपण इथेच जवळपास एखादी रूम बघू, राहू आणि उद्या पूर्ण दिवस फिरून मगच इथून निघू.. काय म्हणणं आहे तुमचं..? ” साहिल ला हे आवडले नाही बहुतेक तसे तो लगेच बोलला ” मी नाही राहू शकत इथे, आपले लगेच परतायचे ठरले होते..” आता मत वेगळे झाल्यामुळे आमच्यात जरा वाद झाला. पण शेवटी सगळ्यांचे एकमत झाले आणि ठरले की आजची रात्र इथे एखाद्या लॉज वर रूम मध्ये काढायची. हे सगळे ठरे पर्यंत अंधार झाला होता. वेळ न घालवता आम्ही लगेच तिथून निघालो आणि हॉटेल, लॉज शोधू लागलो. 

जिथे रूम मिळाली ती त्या किल्ल्यापासून जवळपास ३ किलोमिटर अंतरावर होती. आम्ही पैसे वैगरे भरून चेक इन केले आणि रूम मध्ये आलो. तसे ते लॉज साधेच होते आणि आम्हाला ही फक्त एक रात्र थांबायचे असल्यामुळे आम्ही जास्त विचार केला नव्हता. तिथेच आम्ही थोडेसे खाऊन घेतले. तेवढ्यात ओम ला काय सुचले माहीत नाही पण तो म्हणाला ” चला आपण किल्ल्यावर जाऊ, रात्री मजा येईल आणि थोडे एडवेंचर ही होईल..” तसे मी त्याला समजावत सांगू लागलो ” अरे रात्रीची वेळ आहे, किल्ला वैगरे बंद असतो, तिथे आत जाऊ देत नाहीत.. आणि पण असे रात्री तिथे जायला नको..” त्यावर ते तिघे ही हसू लागले आणि माझी मस्करी करू लागले. पण त्यांना रूम वर थांबायची इच्छा नव्हती म्हणून मग मला ही नाईलाजाने त्यांच्यासोबत जावे लागले. अंतर जास्त नसल्यामुळे १५-२० मिनिटांत आम्ही त्या किल्ल्याजवळ येऊन पोहोचलो. आणि मी सांगितल्या प्रमाणेच झाले. तिथल्या एका चौकी दाराने आम्हाला अडवले आणि तो चिडून च म्हणाला ” ही कोणती वेळ आहे किल्ल्यावर यायची, बंद झालाय आता.. पळा इकडून आणि पुन्हा येऊ नका अश्या वेळेला..” मी फक्त माझ्या मित्रांकडे पाहिले आणि त्यांना त्यांची चूक कळली. आम्ही ही त्याचे बोलणे ऐकून परत जायचा विचार करू लागलो. पण जाताना आम्हाला लक्षात आले की किल्ल्याजवळ एक मोठे तळे आहे आणि त्यात खूप पाणी भरलय. मी मनात विचार केला की आता आलोच आहोत तर तळ्या जवळ बसू काही क्षण. मी मित्रांना म्हणालो की आपण इतक्या दूर आलोय तर तळ्या जवळ बसून शेकोटी पेटवू आणि बसू थोड्या वेळ, गप्पा गोष्टी करू. नाही तरी रूम वर जाऊन झोपणाराच आहोत.

मित्रांना ही बोलणे पटले आणि आम्ही सगळे त्या तळ्याच्या दिशेने चालू लागलो. परिसर अगदीच निर्मनुष्य होता. त्यात डिसेंबर महिना असल्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा पसरला होता. काही मिनिटांत आम्ही तळ्या जवळच्या भागात आलो. अंधार असला तरी दूरवर असणाऱ्या एका विजेच्या खांबाचा प्रकाश तिथं पर्यंत जेमतेम पोहचत होता. त्याच्याच पुसट श्या प्रकाशात आम्ही शेकोटी पेटवण्यासाठी छोटी लाकड, काठ्या चाचपडत शोधत होतो. काही मित्रांनी मोबाईल फ्लॅश लाईट सुरू केला पण त्याने जास्त काही मदत मिळत नव्हती. मला सुकलेल्या झाडाच्या काही काठ्या सापडल्या होत्या ज्या हातात धरून मी अजून शोधात होतो. तितक्यात मला जाणवले की माझ्या मागून कोणी तरी चालत येतंय. मी जरा सावध झालो. मित्र नव्हते कारण ते तिघे ही माझ्या नजरे समोर होते. कसलाही विचार न करता मी झटकन मागे वळून पाहिले पण मागे कोणीही दिसले नाही. पण त्याच भागात मला झाडाचे एक मोठे खोड दिसले जे अगदीच सुकले होते. त्याच्या लहान फांद्या तोडयला म्हणून मी पुढे चालत गेलो. मला कळले नाही की माझे मित्र एका दिशेला आणि मी त्यांच्या अगदी विरुद्ध दिशेला चालत त्यांच्यापासून लांब जातोय. त्या झाडाच्या मागे बरीच गर्द झाडी, झुडूप होती. वातावरणात थंडावा होता पण वारा अजिबात नव्हता. सगळ काही अगदी स्थरी होत. जसे मी त्या झाडाजवळ जाऊन त्याच्या फांद्या तोडायला सुरुवात केली तसे मला मागच्या गर्द झुडुपात एक वेगळीच हालचाल जाणवली. मी एकदम जागीच स्तब्ध झालो आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. 

तिथे मित्रांचे जाणे शक्य नव्हते कारण तो भाग लहान लहान काटेरी झुडुपानी भरलेला वाटत होता. मी हिम्मत करून मोबाईल चा फ्लॅश त्या दिशेने फिरवला आणि जे काही पाहिले ते उभ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. लाल रंगाची साडी नेसलेली एक बाई समोरच्या एका झाडाभोवती फेऱ्या मारत होती. तिचे लांबसडक केस जे चेहऱ्यावर आल्यामुळे चेहरा झाकला गेला होता. अश्या अवेळी एका स्त्रीचे इतक्या निर्मनुष्य आणि गर्द झाडीच्या भागात असणे कोणालाही न पटण्यासारखे होते. कोण आहे, इथे काय करतेय आणि विचित्र गोष्ट म्हणजे अश्या झाडाला गोल फेऱ्या का मारते य असे असंख्य प्रश्न मनात काहूर माजवत होते. तितक्यात तिला माझी, मी असण्याची चाहूल लागली आणि तिने माझ्याकडे पाहिले. तिची ती काळीज चिरणारी भयानक नजर पाहून मी जोरात ओरडलो आणि उलट मित्रांच्या दिशेने धावत सुटलो. ते ही माझे ओरडणे ऐकून माझ्या दिशेने धावत आले आणि विचारू लागले की काय झाले. पण मी इतका घाबरलो होतो की माझा तोंडून शब्द च फुटत नव्हते. आम्ही त्या भागातून बाहेर आलो, मी काही मिनिट घेऊन स्वतःला शांत lकेलं, सावरलं आणि मग माझ्या सोबत घडलेला भयानक प्रसंग सांगितला. मी कधीच कोणत्या गोष्टी मस्करित सांगायचो नाही त्यामुळे त्यांना लगेच कळले की याने नक्की काही तरी पाहिलं आहे जे सहसा कोणाला दिसत नाही आणि जरी दिसले तर त्याची काय अवस्था होते. त्यांनी एव्हाना शेकोटी पेटवली होती जिथे ते मला घेऊन आले. ते मला समजावत सांगू लागले की जास्त विचार करू नकोस, सोडून दे.. तुला भास झाला असेल वैगरे.. 

पण मला माहित होते की मी असे काही पाहिले आहे जे सांगून ही कोणाला पटणार नाही. मी त्यांना एकच सांगत होतो की या भागातून बाहेर पडूया, इथे जास्त वेळ थांबणे ठीक नाही. पण ते ऐकायला तयार नव्हते कारण थंडी मध्ये त्या शेकोटी जवळ बसून ऊब घ्यायला त्यांना बर वाटत होत. माझ्या तिथून जाण्यासाठी विनवण्या सुरूच होत्या. काही वेळ उलटला. तितक्यात एके क्षणी साहिल च्या कानात कोणीतरी पुट पुटल ” उठ इथून.. नाही तर जिवंत गाडेल..” तो ताडकन उठून उभा राहिला. आणि अगदी त्याच क्षणी महेश ही उठून उभा राहिला. त्या दोघांना ही तो आवाज ऐकू आला होता. ते घाबरत म्हणाले ” हा बरोबर बोलत होता, चला इथून..” असे बोलता बोलता ते दोघे तिथून धावतच सुटले. आम्ही चौघेही कसे बसे पळत कार पर्यंत आलो. धडपडत गाडीत बसलो आणि सुसाट रूम वर जायला निघालो. पुढच्या १५ मिनिटात आम्ही रूम वर आलो. पण हे सगळं इतक्यावरच थांबणार नव्हत. रूम वर आल्यावर ही कोणीच कोणाशी काही बोलत नव्हत. रात्रीचे ३ वाजले होते. आम्ही कसे बसे झोपायचा प्रयत्न करत होतो पण इतके घाबरलो होतो की झोपही लागत नव्हती. तितक्यात मला कसलासा आवाज येऊ लागला. बहुतेक बाजूच्या रूम मध्ये कोणीतरी रडत होत. मी महेश ला उठवले तसे त्याने फक्त हाताने इशारा करून सांगितले की शांत रहा, काही बोलू नकोस.. मला कळून चुकले की त्याला ही तो रडण्याचा आवाज ऐकू येतोय. तो हळूच म्हणाला ” दुर्लक्ष कर आणि झोपून जा..” खरे तर आम्ही दोघे ही भीती ने अक्षरशः थरथर कापत होतो. 

आम्ही देवाचे नाव घेऊ लागलो पण परिस्थिती आवाक्यात येत नव्हती. कारण आम्ही फक्त चौघे रूम वर आलो नव्हतो. आमच्यासोबत अजुन काही तरी आल होत. रडण्याचा आवाज बंद झाला आणि पुढच्या क्षणी माझ्या बेडच्या खालून जोरात एक दणका बसला. मी भीती ने शहारून गेलो.  तो दणका इतका जोरात होता की जसे बेड खाली कोणीतरी आहे आणि पूर्ण ताकदीनिशी त्यावर प्रहार करतेय. आम्ही आधीच इतके घाबरलो होतो की अजुन काही सहन करण्याची शक्ती उरली नव्हती. आम्ही चौघेही रूम च्या बाहेर धावत सुटलो आणि आरडा ओरडा करून ppलोकांना जमा केले. ती रात्र आम्ही तसेच बाहेरच्या कॉरिडॉर मध्ये बसून काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी एक वयस्कर इसम आला आणि सांगू लागला ” तुम्ही रात्री किल्ल्याजवळ गेला होता असे कळले. तुम्ही नक्कीच त्या तलावाजवळ गेला असाल.. ” आम्ही हो म्हंटले. तसे तो पुढे म्हणाला ” काही वर्षांपूर्वी त्या तलावाजवळ एका नाव वधू ने पाण्यात उडी मारून जीव दिला होता. तेव्हापासून तिचा आत्मा तिथे भटकतो. तिचा फेरा असतो त्या तलावाच्या जवळ. बऱ्याच लोकांना चित्र विचित्र अनुभव आले आहेत. कोणाला ती दिसते तर कोणाला तिचा आवाज ऐकू येतो. ती सहसा कोणाला इजा पोहोचवत नाही पण तिच्या हद्दीत आल्याचे तिला आवडत नाही. येताना फक्त तुम्ही आला नाहीत तर बहुतेक त्या वाईट शक्तीला ही सोबत घेऊन आलात.” हा सगळा भयानक प्रकार ऐकून आम्ही थेट घरी आलो.. पण घरी आल्या नंतर आम्हाला कसलाही त्रास झाला नाही.

Leave a Reply