लेखक – सिद्धार्थ पुंडगे
रामचंद्र हा माझा आतेभाऊ. ही घटना त्याच्या सोबत घडली होती. साधारणतः २० वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. रामचंद्र एक खाजगी कंपनीमधे कामाला होता. नेहमीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या गावी फिरण्यासाठी आला होता. गावी आल्यावर त्याला वेळेचे भान राहत नसे, “गावी आलो आहे, आराम करण्यासाठी, मौजमजा करण्यासाठी” हे त्याचे ब्रीद वाक्य. गावात त्याचे बरेच मित्र होतेच, पण यावेळी त्याने आपल्या एका मित्राला ही सोबत आणले होता. त्याच्या मित्राचे नाव होते नाथा. नाथा तसा अंगाने सडपातळ आणि भित्रा होता, तर रामा तब्येतीने मजबूत आणि धाडसी. चांगलीच आठ दिवसाची सुट्टी घेऊन दोघे आले होते. शेजारच्या गावी एक ढाबा होता. रामा गावी आला की २-४ फेऱ्या तिथे होतच असत.. यावेळीही दोघे सुट्टीचा यथेच्छ आनंद घेत होते.
त्यांना येऊन साधारणतः ४ दिवस झाले होते. त्या दिवशी दुपारी गावातील एका मित्राने त्याला सांगितले की त्यांच्या गावापासून साधारणतः ३० किलोमीटर अंतरावर एक नवीन ढाबा चालू झाला आहे, तिथे गावरान चिकन खुप छान मिळते. आपण उद्या गावातील सगळी मुलं मिळून जाऊ तिकडे. सकाळी निघून आणि दुपारी मस्त जेवण वैगरे करून संध्याकाळी अंधार पडायच्या आत गावात येऊ. तो रस्ता जरा विचित्र आहे त्यामुळे लवकर घरी येऊ. इतके सांगून तो मित्र तिथून निघून गेला. त्याला ऐकुन कधी जातोय असे झाले होते. त्यात गावातला फाफट पसारा घेऊन जाणे त्याला टाळायचे होते म्हणून उद्याची वाट न पाहता आजच संध्याकाळी निघायचे आणि रात्री त्या ढाब्यावर मस्त जेवण हाणून घरी यायचे असा बेत पक्का केला. सोबत नाथा होताच.
घरी कळवून संध्याकाळी तो लगेच नाथा ला घेऊन निघाला. रस्ता खूपच खराब होता त्यामुळे त्यांना पोहोचायला खूपच वेळ लागला. तिथे गेल्यावर त्या दोघांनी अगदी मनसोक्त जेवण करून घेतले. एव्हाना ९ वाजत आले होते. दोघे पुन्हा गावी येण्यासाठी निघाले. रस्ता अतिशय खराब असल्याने काही अंतर पार केल्यावर बाईक चे टायर पंक्चर झाले. ते दोन गावांच्या मधोमध असल्याने अजुन काही किलोमीटर तरी एकही दुकान सापडणार नव्हते. म्हणून शेवटी गाडी ढकलत ते निघाले. साधारण अर्धा तास गाडी ढकलत पुढे आले होते. दोघेही भरपूर थकले होते. रस्त्यावर वाहने ही दिसेनाशी झाली होती. कधी एकदा वस्ती असलेला परिसर येतोय असे झाले होते.
पुढच्या काही मिनिटात एक छोटे गॅरेज दिसले. त्याच्याकडे जाऊन बाईक दुरुस्त करून घेतली. त्या गॅरेज वाल्याने त्यांना विचारले की या रस्त्याने कुठे निघाला आहात तसे त्यांनी सांगितले की आम्ही अलीकडच्या गावात जेवायला आलो होतो आणि आता पुन्हा घरी चाललो आहोत. तसे तो म्हणाला की या रस्त्याने रात्री नाही गेलात तर बरे होईल. त्या दोघांनी हसतच म्हटलं काही नाही होत हो. तसे तो गॅरेज वाला पुन्हा म्हणाला “तुम्हाला जायचे असेल तर खुशाल जा पण रस्त्यात कुठे गाडी थांबवू नका”. रामाने ठीक आहे म्हणत गाडी काढली पण नाथा मात्र तो गॅरेज वाला असे का बोलला असेल याच्या विचारात पडला. जवळपास १० वाजत आले होते. गावाकडचा परिसर असल्यामुळे रस्त्याकडे ला लाईट नव्हतेच.
रात्रीच्या त्या गडद अंधारात ते गावाच्या दिशेने जाऊ लागले. रस्त्यावर बरेच खड्डे असल्याने त्याला गाडी जोरात घेता येत नव्हती. त्यामुळे अगदी हळू गाडी चालवत ते जात होते. काही अंतर पार केल्यानंतर वस्ती मागे पडली आणि ते पुन्हा एकदा निर्मनुष्य भागात शिरले. तितक्यात त्यांना रस्त्याकडे ला कोणी तरी उभे दिसले. थोडे जवळ जाताच त्यांना जाणवले की एक म्हातारा माणूस उभा आहे. तो गाडी थांबवण्यासाठी हात करत होता. नाथाने त्याला हळूच खुणावले की गाडी थांबवू नकोस त्या गॅरेज वाल्याने काय सांगितले होते आठवतेय ना. तसे तो हसतच म्हणाला “अरे काय नाथा त्या वेड्याचे ऐकतो.. खरच एक नंबरचा फट्टू आहेस तू”. त्याने त्या म्हाताऱ्याच्या अगदी जवळ जाऊन गाडी थांबवली.
सत्तरी ओलांडली असावी. काळपट चेहरा. मळके कपडे जणू फाटल्यागत भासत होते. पण अंधार असल्यामुळे त्यांनी जास्त लक्ष दिले नाही. रामाने त्याला विचारले “बाबा कुठे जायचे आहे सोडू का?”. तसे तो माणूस म्हणाला “पुढं आंब्याची बॅग आहे तिथे सोडा”. रामाने “हो बाबा बसा ना” म्हणत गाडी पुन्हा चालू केली. आता गाडीवर ते तिघे बसले होते. रामा, नाथा आणि मागे तो म्हातारा.. काही अंतर पुढे गेल्यावर नाथा ने तिरक्या नजरेने मागे पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जाणवले की तो म्हातारा मान खाली घालून बसला होता. नाथा अगोदरच भित्रा होता आणि हे रामा ला चांगलेच माहीत होते. त्यामुळे आता आपण त्याला काही सांगायला गेलो तर आपल्याला पुन्हा वेड्यात काढेल म्हणून तो काहीच बोलला नाही. पण नकळत पुन्हा त्याची नजर खाली गेली आणि त्या म्हाताऱ्या चे हात दिसले.
त्याचे हात हळु हळू वाढत होते आणि बघता बघता गाडी च्याही पुढे पोहोचले. ते भयाण दृश्य पाहून नाथा प्रचंड घाबरला. तो भीती ने थरथर कापू लागला आणि त्याच्या तोंडातून एक जोराची आरोळी निघाली. जसा नाथा ओरडला तसे त्या म्हाताऱ्याने नाथाच्या तोंडावर जोराचा प्रहार केला. रामा धाडसी होता म्हणून न घाबरता त्याने गाडी थांबवली आणि मागे वळून पाहणार तितक्यात तो म्हातारा दिसेनासा झाला. नाथा वेदनेने प्रचंड व्हीवळत होता. ते एक पिशाच्च होत. ते दोघेही खूप घाबरले होते. रामाने देवाचे नाव घेत पुन्हा गाडी सुरू केली आणि गावाच्या दिशेने जायला निघाले. काही अंतर पुढे आले आणि पुन्हा तोच म्हातारा त्यांना रस्त्या कडेला उभा दिसला. तसे रामाने नाथा ला सांगितले डोळे बंद कर आणि मला घट्ट पकडून बस. नाथाने वेदनेने विव्हळत त्याला मिठी मारली.
रामाला पुन्हा त्याच्याकडे पाहायचे ही नव्हते पण तरीही तिरक्या नजरेने त्याने पाहिले आणि त्याच अवसान च गळून पडलं. तो त्यांच्या दिशेने पुढे सरकत येत होता. चालत नव्हता पण तरीही त्यांच्या जवळ येत होता.. मागे बसलेला नाथा भीतीने थरथर कापत होता, जबर मार लागल्याने त्याला नीट बोलता येत नव्हते. गाडी जवळ जवळ आता तासभर चालवून देखील रामाला आपले गांव किंवा वस्ती दिसत नव्हती. गाडीच्या प्रकाशात त्याला रस्त्याच्या कडेला एक छोटेसे देऊळ दिसले. रामाने क्षणाचाही विलंब न करता गाड़ी त्या देवळाच्या दिशेने घेऊन गेला. देवळात एका दगडाला शेंदूर लावला होता, रामाने शेंदूर घेऊन स्वतःच्या आणि नाथाच्याच कपाळाला लावला तसा दोघांना थोडा धीर आला. दोघांनी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. दोघे देवाचे नामस्मरण करतच होते.
काही वेळाने ३-४ गाड्यांच्या हेड लाइटचा प्रकाश रस्त्यावर दिसु लागला. त्या मिट्ट काळोखात तो प्रकाश बघून दोघांना थोडा धीर आला. गाड्या जवळ आल्यावर कळले की गाडीवरील माणसे ही त्यांच्याच गावातील होती. बराच वेळ झाला तरी दोघे आले नाही म्हणून गावातील रामाचे काका आणि इतर गावकरी त्यांना शोधायला आले होते. रामाच्या त्या मित्राने अंदाज लावला होता की ते दोघे त्याच गावी ढाब्यावर जेवायला गेले असावेत. दोघांनी त्यांच्या सोबत घडलेला प्रकार काकाला आणि गावातील लोकांना सांगित ला. काका सगळे ऐकत होती शांत होते आणि मग एक दीर्घ श्वास घेत म्हणाले .. तुम्ही खरच वाचलात तुमचे नशीब बलवत्तर होते. बऱ्याच वर्षांपूर्वी या रस्त्यावर एक अपघाता मधे त्या म्हाताऱ्याचा इथे मृत्यु झाला होता. तेव्हापासून त्याचा आत्मा या रस्त्यावर भटकतोय. तेव्हापासून आजपर्यंत या रस्त्यावर अगणित अपघात झालेत. कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
शेजारील गावकरी या रस्त्यावरून रात्रीचा प्रवास कधीच करत नाहीत. आणि जो कोणी करतो तो प्रत्येक वेळी त्याच सावट बनतो. ज्याने कोणी त्यांला आपल्या गाडीवर बसवले त्यांना आपला जिव गमवावा लागला.. सर्व हकीकत ऐकून रामा आणि नाथा प्रचंड घाबरले होते. नाथा अजूनही तसाच होता त्याला नीट बोलताही येत नव्हते. पण जीव वाचला म्हणून ते दोघे शांत होते. सर्वांनी मिळून देवाला नमन केले, सर्वांनी शेंदूर कपाळाला लावला आणि गावाच्या दिशेन निघाले..