आज ५ सप्टेंबर, शिक्षक दिन. मी एक शिक्षक असल्याने आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी एकदम खास. आजचा अर्धा दिवस हा सर्व कार्यक्रमात गेला. आणि दुसरे म्हणजे आज मुलांनी खूप काही गिफ्ट्स दिलेले. मी गणिताचा शिक्षक म्हणून काही मुलांना आवडत नसेन पण आज दिलेल्या मुलांच्या गिफ्ट्सनी माझी बॅग पुरती भरून गेली. रोजपेक्षा आज बॅगच वजन जडच लागत होतं. संध्याकाळ झाली. शाळाही सुटली. आज थकवाही आला होता. त्यात भर फार तर माझं एक कामही राहिलं होतं. मुलांमागे एक एक शिक्षकही आपापल्या घरी गेले. शेवटी मीच राहिलो. काही वेळाने शिपाई काकाही आले. ते म्हणाले, “काय सर जायचंय का नाही आज? सात वाजत आले आहेत.” “हो. हो. हे एकच पान राहिलंय. ते झालं का मी पण निघतोच.” , मी सांगितले. बघता बघता कामही झालं. घड्याळ बघितलं. सव्वा सात वाजलेले. पटापट सगळं आवरलं आणि काकांना “भेटू परवा परत.” असं सांगून शाळेच्या बाहेर पडलो. जवळपास अंधारच पडला होता. स्टेशनवर पोहोचलो. स्टेशन वरून ट्रेन पकडली. तर आज वेगळंच चित्र होतं. बोटावर मोजता येतील एवढी माणसंच ट्रेनच्या डब्यामध्ये होती. तीही आपापल्या स्टेशन वर उतरत होती. मात्र आता माझं स्टेशन येणारच होतं आणि बघता बघता आलंही. मी ही उतरलो. मात्र चालताना कोणीतरी मागे आहे असं वाटतं होतं. पण मी लक्ष दिलं नाही. तसाच खूप वेळही झाला होता.
रात्र पडली होती. वरून रस्त्यावरचे दिवेही चालू बंद होत होते. एका गोष्टीचं मात्र समाधान होतं की उद्या दिवसभर झोपायला मिळणार कारण रविवार आहे. पण एक वेगळीच भीती वाटत होती. मघापासून कोणतरी मागे होतं. धाडस करून मी मागे वळून पाहिलं आणि भीतीच संपली. एक ८ ते १० वर्षांचा मुलगा माझ्या मागे चालत होता. मी त्याच्या जवळ जाऊन विचारलं, “काय रे? माझ्या मागे का फिरतोयेस?” त्यावर त्याने केविलवाण्या नजरेने बघत माझ्याकडे एक लिफाफा दिला. आणि विचारलं, “तुम्ही शिक्षक आहात?” मी डोकं हलवून ‘हो’ सांगून विचारलं, “तुला कसं कळालं?” “तुमच्या हाताकडे बघून! खडूचा पांढरा रंग लागलाय.”, त्याने उत्तर दिलं. मी त्याच्याकडे बघून गालात हसलो. त्याने दिलेला तो लिफाफा मी कुतूहलाने उघडताच त्याने ‘थांबा’ असं सांगितलं. तो बोलला, “हे आता नका उघडू. घरी जाऊन उघडा. याच्या बदल्यात काही खायला असेल तर द्याल का?” मी बॅगेत बघितले तर आज शाळेत मुलांनी काही चॉकलेट्स दिली होती. त्यातली काही मोठी होती ती मी त्याला काढून दिली आणि सांगितले, “आता तरी माझ्याकडे हेच खायला आहे. म्हणून हे ठेव.” चॉकलेट्स देताच तो पळत पळत गेला आणि अंधारात दिसेनासा झाला. मात्र त्याने दिलेल्या लिफाफ्याचं जरा आश्चर्य वाटलं. पण घरी जाऊन आरामात बघू हा विचार मनात आला.
शेवटी घरी पोहोचलो. ती गिफ्ट्सनी भरलेली बॅग खांद्यावरून उतरवली आणि थेट बाथरूम गाठलं. अंघोळ केली. किचनमध्ये गेलो कामवाल्या बाईंनी जेवण करून ठेवलं होतं. ते गरम केलं आणि जेवायला बसलो. एवढी वर्ष एकट्यानेच काढल्याने आता तर सर्व अंगवळणी पडलं होतं. जेवूनही झालं. रोजचा पेपर आला होता तो ही वाचत बसलो तो ही काही वेळाने वाचून संपला. फोनही वापरला. आता करण्यासारखंही काही नव्हतं. कंटाळा आला होता. मग बॅगकडे लक्ष गेलं. मुलांनी दिलेली गिफ्ट्स उघडली. कोणी ग्रीटिंग्ज, कोणी शो-पीस, तर कोणी आणखी काही दिलेलं. त्यातही मन रमेना. मग आठवलं, की रस्त्याने येताना एका मुलाने लिफाफा दिला होता. तो घडी मारून पँटच्या खिशात ठेवलेला. लगेच मी बाथरूम मध्ये गेलो आणि तो लिफाफा बाहेर काढला. नशीब जास्त भिजला नव्हता. त्याच्या एक बाजूने फाडून त्याच्या आतला कागद बाहेर काढला. तोही कडेकडेने भिजला होता पण मधे चांगला होता. सुरुवातीला वाटलं की पत्र लिहिलं असावं पण उघडल्यावर वेगळंच !
ते एक चित्र होतं. मी तरी ते पहिल्यांदाच बघितलं होतं. एक स्त्री पलंगावर झोपली आहे आणि तिच्या बाजूला एक मुलगा कानावर हात देऊन उभा आहे. आणि त्या पलंगाच्या मागे काही ४ ते ५ लोक उभे आहेत. बघून थोडं कसंतरीचं वाटलं. थोडं आश्चर्यही वाटलं. मनात विचार आला की हे साधसुद चित्र वाटतं नाही. मीही थोडा विचार केला पण हे चित्र पहिल्यांदाच बघितलं असल्यामुळे काही सुचत नव्हतं. रात्री ऑनलाइन असलेल्या माझ्या मित्रांना त्याचा फोटो पाठवला पण त्यांनाही काही याबद्दल माहीत नव्हतं. त्यांनी उलट मलाच वेड्यात काढलं. पण मला आता ह्या चित्रबद्दल खूप प्रश्न पडले होते, हे काय चित्र आहे? कोणी काढलंय? त्या मुलाला कोणी दिलं? आणि त्याने मलाच का दिलं? डोकं नुसतं जड झालं होतं हे चित्र बघून. मग मनात निश्चय केला, आता उद्यातर रविवारच आहे तर आज रात्रभर ह्या चित्राची माहिती काढू. लागू दे किती वेळ लागायचाय तो.
किचनमध्ये गेलो. एक स्ट्रॉंग कॉफी बनवली आणि शोधमोहीम सुरू केली. घरात तर गणिताच्या पुस्तकांशिवाय इतर कोणती पुस्तके नव्हतीच. मग आता एकच पर्याय होता तो म्हणजे इंटरनेट ! कुठून सुरुवात करावी हे ठरत नव्हतं. सोर्स एकच होता ते म्हणजे हे चित्र. शेवटी ओल्ड पैंटिंग्स पासून शोधायचं ठरवलं. खूप सारी चित्रे बघितली. ते वेगवेगळे रंग पाहून डोळे दुखू लागले होते. जवळपास २ तास होत आलेले. पण हे चित्र काय आहे याचा पत्ताच लागत नव्हता. या कामातून ब्रेक घ्यावा असं ठरवलं. रात्रीचे दीड वाजले होते आता. वाटलं घराच्या आजूबाजुने थोडं फिरून येऊ.
कसाबसा घरात पोहोचलो. जास्त वेळ घराबाहेर नव्हतो गेलो. पण का गेलो याचा पश्चाताप होत होता. घरापासून हाकेच्या अंतरावर जात नाही तर ते दृश्य! नको त्याचा विचारच नाही करवत. पण तिथपासून असं का वाटतंय की माझ्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे. आता तर फारच अस्वस्थ वाटत होतं. कारण ते दृश्य. न राहवून तेच डोळ्यासमोर येते. रस्त्याच्या कडेला ती उभी असलेली बाई. साधारण तिशीतली असावी. सारखी खोकत होती. तेही बेसुमार. तिचा आवाज अजून कानात घुमतोय. आठवावं तरी कसंतरीच होतं. खोकताखोकता तिच्या तोंडातून पडणारं ते रक्त आणि तो श्लेष्मा. एखादा आजार असावा तिला. नको ते बीभत्स चित्र.
हा ! चित्र मला त्या चित्राची माहिती हवी होती. बरोबर. बरं झालं. त्यामुळे मला ह्याचातरी विसर पडेल. ठीक. चला घेऊ परत फोन हातात. पण घरात एकटा असूनही मला का असं वाटतंय की कोणीतरी आहे इकडे ? सारखं बघत आहे कोणीतरी. एवढी ५ ते ६ वर्षे झाली पण तेव्हा अशी भीती कधी वाटली नाही. आजच का? काय आहे काय माहीत ? असो एकदा दोनदा सर्व घर फिरलो पण कोणीच नाही. असावा. माझा भासच असावा. जाऊ दे. किती चित्रं बघितली पण काहीच सापडेना. पावणे तीन वाजले आता. कॉफीचाही आता असर कमी झालेला. झोप येऊ लागलेली. तेवढ्यात नशिबाने का होईना. ते चित्र सापडलं. त्याखाली त्याच्या आणखी कॉपी होत्या. नाव काय ? तर, ‘द डेड मदर.’ नवीन पेज ओपन केलं. सर्च बार मध्ये टाईप केलं. द डेड मदर. अच्छा. हे तर खूप जुनं पेंटिंग आहे. जवळपास १९०० च्या सुमारास काढलंय. या चित्रबद्दल आता मला खूप उत्सुकता लागलीये. खूप काही शोधलं. पण आता हे वाचून खूप मोठा धक्का बसला की हे चित्र अशुभ आहे.
तिथे लिहिलेलं की हे चित्र जिथे असेल तिथे नेहमी कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवलेली असेल. हे काय ? काहीही लिहीत बसतात. पण मघापासून मलाही असंच काहीसं जाणवत होतं. आता तर अजून भीती वाटू लागलेली. याची माहिती वाचून. एडवर्ड मंच नावाच्या चित्रकाराने हे काढलेलं. आणि खास म्हणजे हे त्याच्या जीवनात घडून गेलंय. त्याच्या पाचव्या वर्षी त्याची आई टीबीमुळे गेली. त्या चित्रातील तो मुलगा हाच चित्रकार आहे. आणि ती मेलेली बाई त्याची आई…….. आणि काल ५ सप्टेंबर होता. हा तर या चित्रकाराचा जन्माचा दिवस होता. या सर्वाचं काही सूत तर नसेल???
तोच किचनमध्ये काहीतरी पडायचा आवाज आला. धावत आत गेलो. आणि बघून पायाखालची जमीन सरकली. छातीत धडधड वाढली. घाम pफुटला. कारण समोर तीच बाई उभी होती. मला भीतीने किचनची लाईट लावायचंही सुचलं नाही. मागून रूम मधल्या येणाऱ्या आणि किचनच्या खिडकीतून येणाऱ्या चांदण्यात तिचं ते रूप भयाण दिसत होतं. एवढ्याच प्रकाशात काय ते दिसत होतं. विस्कटलेले केस. कृश झालेले ते हात. ओठांवर आणि जबड्यावर पसरलेलं स्वतःच रक्त. लाल रंगात माखलेला तो पांढरा मळकट गाऊन. मात्र आता मी काहीही करू शकत नव्हतो. तोंडातूनही शब्द फुटत नव्हतो. शेजारीही झोपले असतील. आणि जागे असले तरी ते बोलतात तरी कुठे. न राहवून त्या चित्राची आणि ह्या बाईची मनातल्या मनात विचार जुळवाजुळव केली. म्हणजे ही तीच बाई असावी. आणि हे चित्र मला देणारा तिचा मुलगा. माझ्या काहीही लक्षात न येता तोच तिने आपल्या उजव्या हातात सुरा घेतला आणि माझा उजवा हात धरून…………(खसकन्)