अनुभव – शरवरी कांबळे
माझे वय आता २० वर्षे आहे. कॉलेज च्या शेवटच्या वर्षात शिकतेय. राहायला मुंबई ला आहे. हा किस्सा माझ्या आई सोबत घडला होता जेव्हा ती शाळेत शिकत होती. साधारण १९८४ ची गोष्ट असेल. माझ्या आईला चार भावंडं आणि आई त्यात सगळ्यात लहान. म्हणून सगळ्यात जास्त लाड तिचे व्हायचे. माझे आजी आजोबा दोघे ही त्या काळी नोकरी करायचे. त्यामुळेच की काय पण त्या काळी आई वडिलांना आपल्या मुलांबद्दल आणि त्यांच्या मनातल्या गोष्टी, अडी अडचणी बद्दल जास्त काही माहीत नसायचे. माझी आई एका मोठ्या शाळेत शिकायला होती. ती साधारण ८ वी पर्यंत तिथे होती. पण नंतर आजोबांची बदली झाल्यामुळे तिला शाळा बदलावी लागली. आई तेव्हा ६वी ला होती. ती शाळा तिथल्या भागातील सगळ्यात मोठ्या आणि जुन्या शाळापैकी एक होती. त्या काळी एका वर्गात जास्तीत जास्त ३० ते ४० विद्यार्थी असायचे. त्या दिवशी आई दररोज प्रमाणे वर्गात बसली होती. तास सुरू होता पण तिला बाथरूम ला जायचं होत. म्हणून तिने परवानगी मागून एका मैत्रिणीला सोबत घेतले आणि वर्गा बाहेर आई. आधी म्हंटल्या प्रमाणे शाळा खूप प्रशस्त होती. जुन्या काळापासून असल्यामुळे कॉरिडॉरस् ही फार मोठे होते. शाळेच्या इमारतीला एकूण ५ मजले होते. माझ्या आई चा वर्ग तिसऱ्या मजल्यावर होता. तिथे मुख्य समस्या म्हणजे त्या मजल्यावर एकही वॉश रूम नव्हते. त्या इमारतीच्या दोन च मजल्यावर वॉश रूम होते. ते म्हणजे तळ मजल्यावर आणि शेवटच्या म्हणजे पाचव्या मजल्यावर.
माझी आई ने आणि तिच्या मैत्रिणीने ठरवले की एवढे दोन मजले चढण्या पेक्षा तळ मजल्यावर जाणे सोपे पडेल. तळ मजला शाळेच्या इतर मजल्यासारखा गजबजलेला नसायचा. तिथे जास्त वर्ग ही नव्हते. त्यामुळे तो मजला शांत असायचा. तेथे कोपऱ्यात एक छोटे मुलांचे व मुलींचे दोन वॉश रूम होते. त्या दोघी ही आत शिरल्या. तो मजला जरा सामसूम असल्यामुळे त्या दोघींना जरा भीती च वाटत होती. ते आत गेले आणि दरवाजा लाऊन घेतला. अवघे ८-१० सेकंद झाले असतील. तितक्यात आई असलेल्या दारावर एक जोरात थाप पडली. ती एकदम दचकली. ती दरवाजा उघडणार तितक्यात दार जोरात बडवले जाऊ लागले. बाहेर जे कोणी होते ते जणू दार तोडून आत येईल अस वाटू लागलं. माझ्या आई ला वाटले की एखादा विद्यार्थी असेल. पण किती ही घाई असली तरी इतक्या जोरात दरवाजा वाजवणे जरा विचित्र च होते. माझी आई आता पुरती घाबरली होती. त्या थापा अजूनही सुरूच होत्या. तिने कसलाही विलंब न करता एका झटक्यात दार उघडले. आणि बाहेर बघते तर काय.. बाहेर कोणीही नव्हते. जर कोणी त्यांची मस्करी करत असते तर पळताना दिसले असते, चाहूल तरी नक्कीच जाणवली असती. पण दार उघडल्यावर तो आवाज एका एकी थांबला आणि एक जीवघेणी स्मशान शांतता पसरली. माझ्या आई ची मैत्रीण ही बाहेर आली. माझ्या आई ने तिला प्रश्नार्थक नजरेने विचारले की तू दार वाजवत होतीस का..? पण ती काहीच बोलली नाही. तिचे वागणे जरा वेगळेच वाटले.
ती काहीच बोलत नव्हती पण तिच्या चेहऱ्यावरचे भय मात्र स्पष्ट दिसून येत होत. तिने माझा आई च हात पडकला आणि त्या दोघी थेट तिथून बाहेर निघून आल्या. बाहेर येताना ती हळूच पुटपुटली ” अग माझा दारावर पण कोणी तरी जोर जोरात थापा मारत होत.. माझी दार उघडायची हिम्मत नव्हती म्हणून मी दाराच्या फटीतून बाहेर पाहिलं पण बाहेर कोणीही नव्हत. जर कोणी असते तर निदान सावली तरी दिसायला हवी होती ना. पण तिथे खरंच कोणी नव्हत. पण तरीही..” आई तिचे बोलणे ऐकून अगदी सुन्न झाली होती. हा एकच किस्सा नव्हता तर त्या शाळेत असे बरेच अनुभव यायचे. त्या शाळेच्या कॅरीडोर्स मधून घूंगरांचा आवाज यायचा पण कोणीही दिसायचे नाही. या प्रसंगानंतर साधारण दोन वर्षांनी आईने ती शाळा बदलली.. नंतर जेव्हा माझ्या आजोबांनी विचारपूस केली तेव्हा समजले की ती शाळा खूप जुन्या काळा पासून ची आहे. पण ती शाळा होण्या आधी तिथे एक तमाश्याच्या तालीमीचा फड होता.. त्या काळी तेथे एक खुप सुप्रसीद्ध तमासगीर राहायची.. तीथे ती आणि तीचे सोबतचे नृत्य व वाजन करणारी लोक ही रहायची. तो तमाश्याचा फड खुप मोठा होतो. त्याच भागात लावणीचा कार्यक्रम व्हायचा. ती त्याच भागात नाही तर आजूबाजूच्या शहरात ही खूप प्रसिद्ध होती. पण म्हणतात ना तिच्या प्रसिद्धीला वैभवाला कोणाची तरी नजर लागली. एके दिवशी कार्यक्रम सुरू असताना अचानक आग लागली व सगळ्या गोष्टी क्षणार्धात पेटल्या. बघता बघता आग इतकी वाढली की फडातील काही लोक गुदमरून तिथेच मरण पावली.
काही महिन्या नंतर सरकार ने त्या दुर्घटनेच्या जागेवर शाळेचे बांधकाम करायचा निर्णय घेतला. आणि ती प्रशस्त शाळा बांधली गेली. पण तेव्हा पासून जवळपास राहणारी लोक म्हणतात की त्या लोकांचा आवाज त्या शाळेत रात्रीच्या वेळेला ऐकू येतो. कधी रात्री अपरात्री शाळेच्या टेरेस वरून ढोलकी, तबला, घुंगरू, गायन, संगीत ऐकू येते. काही लोकांनी त्या शाळेत जाऊन शोध घेणाचा विचार केला पण कोणाची हिम्मत च झाली नाही. अस म्हणतात की त्या शाळेत अजूनही त्या नर्तकी चा आत्मा अडकून पडलाय स्वतःच्या नृत्य आणि कलेची जोपासना करत. मला आई ने सांगितलेला प्रसंग ऐकून भीती तर वाटलीच पण त्या सर्व कलाकारांसाठी वाईट ही वाटले. मी अशीच अशा करेन की अशी घटना कोण सोबत बी पुन्हा होऊ नये.