अनुभव – सार्थक गोसटवर
माझा एकूण पाच मित्रांचा ग्रुप आहे. मी, निशांत, आश्विन, यश आणि तुषार. आम्ही ५ ही जण इंजिनिअरिंग चे विद्यार्थी आहोत. त्या दिवशी आम्ही रात्री हॉस्टेल मेस मध्ये जेवत होतो तेव्हा सहज म्हणून ट्रीप चा विषय निघाला. नेमक्या ३ दिवस सुट्ट्या लागोपाठ आल्या होत्या त्यामुळे आपण मस्त एखादी ट्रीप प्लॅन करायला हवी अशी चर्चा सुरू झाली. बऱ्याच चर्चे नंतर तुषार च्या कोकणातल्या फार्महाऊस वर जायचे नक्की झाले. तिथेच ३ दिवस राहायचे आणि मजा मस्ती करायची असे ठरले. तशी लागलीच आम्ही सगळी तयारी करायला सुरुवात केली. निशांत ने हार्ड ड्रिंक्स चा बंदोबस्त केला आणि आश्विन ने त्याच्या वडिलांची ४ व्हीलर मेनेज केली. दिवसभर कॉलेज करून त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही प्रवासाला सुरुवात केली.
कॉलेज च्या मित्रांसोबत असे ट्रीप ला जाण्याची मजा निराळीच आहे. जसा गाडी ने वेग धरला तसा थंडगार वारा आत येऊ लागला. दिवस भराचा थकवा, कंटाळा एका क्षणात कुठच्या कुठे निघून गेला. हळु हळु सुरू मावळतीला जात होता. बघता बघता अंधार पडायला ही सुरुवात झाली. आमच्या गाडीत मस्त लहान आवाजात गाणी सुरू होती. आमच्या गप्पा , मजा मस्ती तर चालूच होती. जवळपास ३ तासांच्या प्रवासानंतर आम्ही एखाद्या हॉटेल किंवा धाब्यावर थांबून जेवायचा निर्णय घेतला. ९-९.३० झाले असावेत. रस्त्यात एक चांगला धाबा बघून आम्ही गाडी थांबवली. गाडी बाहेरच्या बाजूला पार्क करून आम्ही आत शिरलो तसा खमंग वास आला आणि आमची भूक अजूनच वाढली. मेस मध्ये खाऊन कंटाळलो होतो आणि त्यात इतक्या महिन्या नंतर बाहेरचे खायला मिळणार होते. आत जाऊन पटापट ऑर्डर दिली आणि जेवणावर ताव मारला. जेवण करता करता माझा एक मित्र म्हणाला की गावाला जाण्यासाठी इथून पुढे २ रस्ते आहेत. मुख्य रस्त्याने गेलो तर जवळपास ३ तास लागतील आणि शॉर्टकट ने गेलो तर २ तास. आपल्याला १ तास वाचवायचा असेल तर बोला. हो पण त्या रस्त्यावर बद्दल मी फक्त ऐकून आहे पण अजून तिथून जाण्याचा योग आला नाहीये.
तसे मी म्हणालो ” अरे इतकेच ना, इथून निघताना काऊंटर वर विचारपूस करून घेऊ त्या रस्त्या बद्दल मग ठरवू”. सगळ्यांनी होकार दिला. आम्ही जेवण आटोपले, बिल द्यायला म्हणून मी आणि माझा एक मित्र आम्ही काऊंटर वर गेलो. आम्ही काऊंटर पासून काही अंतरावरच बसलो होतो त्यामुळे त्या मालकाने आमचे बोलणे ऐकले असावे बहुतेक. आम्ही जसे बिल भरायला तिथे गेलो तसे तो स्वतःच म्हणाला “ऐकले मी तुमचे बोलणे., जास्त वेळ लागला तरी चालेल पण त्या शॉर्टकट ने जाऊ नका, तो रस्ता बरोबर नाही.. त्यात आज अमावास्ये ची रात्र आहे..” आम्ही दोघांनी फक्त होकारार्थी माना डोलावल्या. त्याचे बोलणे ऐकून मला वाटले की रस्त्याचे काही तरी रहस्य नक्कीच आहे. आम्ही दोघे मागे वळलो आणि मागे उभे असलेले मित्र गालातल्या गालात हसू लागले. मी मात्र आधीच जरा भित्रा असल्याने त्याच्या बोलण्याचा विचार करत होतो. आम्ही तिथून बाहेर पडलो. जेवल्यावर लगेच प्रवास नको म्हणून आम्ही काही वेळा तिथल्याच आवारात फिरत होतो. साधारण १०.३० ला आम्ही गाडीत बसून आमच्या मार्गाला लागलो.
पुढच्या १५-२० मिनिटात आम्ही त्या शॉर्टकट असलेल्या वळणा जवळ येऊन पोहोचलो. आश्विन ने गाडी थांबवली तसे तुषार म्हणाला ” काय झालं रे गाडी का थांबवली..” तसे आश्विन ने विचारले “सांगा आता काय करायचं.. सरळ मुख्य रस्त्याने जायचे की या शॉर्टकट ने वळायचे.. ठरवा पटापट..” मी सोडून सगळे म्हणाले की या शॉर्टकट ने जाऊ म्हणजे गावात लवकर पोहोचू. मी मात्र काहीच बोललो नाही. मला त्या माणसाचे बोलणे आठवले. माझे मन काही मानत नव्हते पण यांना काही बोलायला गेलो तर हे आपली खेचणार, किती घाबरतो, फत्तू आहेस वैगरे चिडवणार त्या पेक्षा गप्प राहिलेले बरे. तसे ही आपण कुठे एकटे जाणार आहोत, मित्र ही सोबत आहेत अशी स्वतःच्याच मनाची समजूत काढू लागलो. पुढच्या काही क्षणात आमची गाडी पुढचे वळण घेऊन त्या शॉर्टकट रस्त्याला लागली. उगाच कसली तरी भीती जाणवत होती. कुठे त्या माणसाला विचारायला गेलो, त्याने ही उगाच काही तरी मनात भरवले.
साधारण ५-१० मिनिटानंतर मला दिसले की या रस्त्याला पुढे स्ट्रीट लाईट ही नाहीयेत. म्हणजे फक्त आमच्या गाडीचे हेड लाईट तेच काय तो रस्ता दाखवणार. आजू बाजूला पहिले तर मिट्ट अंधार. थोडी फार झाडी झुडूप होती आणि मध्येच एखाद दुसरे उंच झाड दिसायचे. काही तासांपूर्वी मनाला प्रसन्नता देणारा गार वारा आता अगदी नकोस वाटू लागला. मी सगळ्यांना सांगून गाडीच्या काचा बंद करून घेतल्या. माझे लक्ष बाहेरच होते. बाहेर अंधार असला तरीही कार हेड लाईट च्याच प्रकाशात मी आजूबाजूचा परिसर न्हायाळण्याचा प्रयत्न करत होतो. साधे एक घर, एखादी झोपडी काहीच दिसत नव्हते. अगदी निर्मनुष्य परिसर होता. अजुन एक गोष्ट लक्षात आली की या रस्त्याला लागून आता अर्धा तास होत आला पण समोरून एकही गाडी पास झाली नाही. इतकेच काय तर आपल्या गाडी मागे किंवा पुढे एकही वाहन आले नाही.
मी मित्रांना सांगायला म्हणून समोर पाहिले तसे सर्रकन गाडी समोरून काही तरी अतिशय वेगात निघून गेले. ते इतक्या वेगात गेले की नक्की काय होते हे सुद्धा कळले नाही. माझे हृदय भीती ने धड धडू लागले. आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो. आता मात्र मला त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक भीती जाणवली. तितक्यात आमच्यातला एक म्हणाला “एखादे जनावर असेल, जाऊ द्या..”.. मी त्याचे वाक्य तोडत म्हणालो “अरे पण इतक्या वेगात कसे जाईल..”. या शॉर्टकट ने येऊन आपण चूक तर केली नाही ना असा विचार मनात डोकावून गेला. पण आता असा विचार करून काही उपयोग नव्हता. किंबहुना त्याला खूप उशीर झाला होता. आता मागे वळणे मूर्खपणा ठरला असता म्हणून आम्ही त्याच रस्त्याने पुढे जात राहिलो. एव्हाना एक तास होत आला होता. उरलेल्या एका तासात आम्ही गावात पोहोचणार होतो. कोणी काहीच बोलत नव्हतो. आता रस्ताही कच्चा वाटत होता त्यामुळे आश्विन ने गाडीचा वेग कमी केला. आमच्यातले काही मोबाईल मध्ये घुसले होते पण मी मात्र बाहेरच पाहत होतो.
कार हेड लाईट च्याच प्रकाशामुळे अचानक एका झाडावर लक्ष गेले आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. त्या झाडाच्या एका फांदीवर एक सावली उलटी लटकलेली दिसली. एक मिनिट.. तिथे खरंच कोणी होत की मला फक्त भास झाला.. गाडी त्या झाडाला ओलांडून पुढे गेली आणि मागे काही तरी पडण्याचा आवाज आला. पुन्हा काळजात धस्स झालं. म्हणजे काही क्षणापुर्वी झाडाच्या फांदीवर नक्की कोणी तरी होत जे आता खाली आल. खात्री करायला मागे वळून पहायची अजिबात हिम्मत नव्हती. मी शेजारी बसलेल्या माझ्या मित्राकडे निशांत कडे पाहिले. त्याचे डोळे ही विस्फारले होते. मला कळून चुकले की मला झालेला भास नव्हता, मी जे पाहिले ते त्याने ही पाहिले होते. अचानक ड्राईव्ह करत असलेला आश्विन भीती ने कापू लागला. तसे त्याच्या शेजारी बसलेल्या तुषार ने विचारले “काय रे काय झाले.. इतका का घाबरला आहेस..”
मला कळले की त्याने आमच्याहून भयानक काही तरी पाहिले आहे. त्याची नजर समोर होती पण रस्त्यावर नाही तर रियर व्ह्यू मिरर मध्ये.. आणि नकळत माझे ही लक्ष तिथे गेले. ते आमच्या गाडी मागे धावत नव्हते तर मागच्या काचेवर चिकटले होते. संपूर्ण काळभोर शरीर, त्वचेला अक्षरशः चिरा पडल्या होत्या. त्यातून कसले चिकट द्रव्य ओघळत होत, रक्त नव्हते पण हिरवट द्रव्य भासत होते. हाताच्या दोन्ही पंजांची तीक्ष्ण नखे गाडीच्या काचेला धरून होती. ते एक पिशाच्च होते. एखादे हिंस्र श्र्वापद आपल्या भक्षाला जसे पाहते तसे ते आम्हाला पाहत होते. ते भयानक दृश्य पाहून आमची तर बोबडीच वळली. तितक्यात त्यांच्या तोंडून एका किळसवाण्या आवाजात वाक्य बाहेर पडले “मला भूक लागली आहे..” त्याचा तो भरडा आवाज ऐकून जणू आमच्या शरीरातले रक्त च गोठून गेलं. पण संपूर्ण जीव एकवटून आम्ही आरडा ओरड सुरू केली. पण आमचा आवाज त्या पिशाच्च शिवाय दुसरे कोणीही ऐकू शकत नव्हते.
आश्विन चा स्टिअरिंग वरून ताबा सुटू लागला. तो इतका घाबरला होता की त्याला गाडी सांभाळता येत नव्हती. गाडी वरचा तोल सुटेल म्हणून आम्ही सावरून त्याला धीर देऊ लागलो. तुषार ने रिअर व्ह्यू मिरर वर रुमाल टाकला जेणेकरून त्याला मागचे दृश्य दिसणार नाही. त्याने गाडीचा वेग वाढवला. आम्ही सगळे जीव मुठीत धरून बसलो होतो. या सगळ्यातून बाहेर पडायची वाट पाहत होतो. पण तितक्यात गाडीच्या छतावर काही तरी आदळण्याचा आवाज आला आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तितक्यात ते पिशाच्च गाडीच्या समोर बोनेट वर येऊन बसले. आम्हाला कळून चुकले की हाच तो मृत्यू चा क्षण.. आमची गाडी अतिशय वेगात होती आणि ज्याची भीती होती तेच झाले. आश्विन चा स्टिअरिंग वरून ताबा सुटला आणि गाडी रस्त्याकडे ला असलेल्या मोठ्या दगडा वरून उडून पलटी घेत समोरच्या भिंतीवर जाऊन अतिशय जोरात आदळली.
बऱ्याच वेळाने मला शुद्ध आली. त्या भीषण अपघाता मुळे मला जबर मार लागला होता. संपूर्ण अंगाची लाही लाही होत होती. डोक्याला हात लावला तर रक्त होत. माझच. डोकं फुटून रक्त वाहत संपूर्ण शर्ट भिजले होते. मी गाडीत नजर फिरवली. माझ्या प्रमाणेच माझ्या मित्रांना ही बरीच दुखापत झाली होती. मी चौघांचे ही श्वास तपासून पाहिले आणि जिवात जीव आला. ते फक्त बेशद्ध झाले होते. मी त्यांना शुद्धीवर आणायचा अतोनात प्रयत्न करू लागलो. बऱ्याच वेळा नंतर माझा प्रयत्नांना यश आले आणि त्यातल्या दोघांना शुद्ध आली. आम्ही मदतीसाठी पुन्हा हाका मारू लागलो. तितक्यात कुठून तरी एक माणूस आला आणि त्याने आम्हाला एक एक करत गाडी बाहेर काढले. मला बाहेर काढल्यावर समोर लक्ष गेले. आमची गाडी ज्या भिंती ला आदळली होती ते शिव मंदिर होते. आणि आमच्या मदतीला जो माणूस धावून आला तो त्याच मंदिरातला पुजारी होता. त्यांनी आम्हाला त्या मंदिरात नेऊन बसवले. सगळ्यांना तिथे घेऊन आल्यावर त्याने हाक दिली तशी त्याची बायको आम्हाला पिण्यासाठी पाणी घेऊन आली. बहुतेक तो पुजारी तिथेच मंदिरा शेजारी एका लहान खोलीत रहायचा.
आम्ही पाणी प्यायलो आणि माझे लक्ष समोर गेले. गाडीचा हेड लाईट समोरच्या झाडावर पडला होता. त्याच्या मागच्या बाजूला बऱ्याच अंतरावर ते पिशाच मला पुन्हा दिसले. माझ्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून ते पुजारी म्हणाले “घाबरु नका, ते इथे येऊ शकत नाही, तेवढी शक्ती त्याच्यात नाही, तुम्ही अगदी निश्चिंत रहा.” त्याचे असे बोलणे ऐकून आम्हाला जरा धीर आला. ती रात्र आम्ही तशीच मंदिरात बसून काढली. सतत असा भास होत होता की ते इथेच अवती भोवती फिरते आहे आणि आम्ही बाहेर येण्याची वाट पाहतेय. त्या प्रसंगामुळे आम्हाला झोप लागणे जवळ जवळ अशक्य होते. हळु हळु पहाट होऊ लागली तसे तो भास होणे बंद झाले. पुजारी काकांनी बाजूच्या गावात जाऊन एक लहान अंब्यू लस मागवली आणि मदतीला अजुन २-३ माणसांना बोलावले. तिथल्याच एका दवाखान्यात आम्हाला ऍडमिट केलं. ती भयाण रात्र तर संपली होती पण आम्हाला कधीही न विसरता येण्यासारखा अनुभव देऊन गेली. जो पर्यंत जिवंत आहोत तो पर्यंत हा अनुभव कायम स्मरणात राहील. त्या नंतर कधी ही आम्ही त्या मार्गाने गेलो नाही. त्या जागेत असे काय आहे, त्याचा भूतकाळ काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही कधीच प्रयत्न केला नाही, तितके आमचे धाडस झाले नाही असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही..