अनुभव – आकाश धडम
मी दर वर्षी माझ्या गावाला जातो. लॉक डाऊन असताना कसे बसे इ पास मिळवून मी 17 मे 2020 या दिवशी गावी गेलो होतो. खूप महिन्यांनी यायचा योग आला होता त्यामुळे मित्र भेटले आणि एक वेगळाच आनंद झाला. त्या मध्ये माझा मित्र साईराज. हा खूप धाडशी आहे. आमचे बरेच बोलणे झाले. आणि निरोप घेताना त्याने मला विचारले ” आज शेतात पाणी सोडायला जायचे आहे, सोबत येशील का.. आपल्याला निवांत बोलता येईल.. ” तसे मी ठीक आहे म्हंटले आणि किती वाजता जायचे आहे ते विचारले.. त्यावर तो म्हणाला “पहाटे ३.३० च्या सुमारास जाऊ, मी तुला उठवायला येईन..”. मी येतो असे सांगून आपल्या घरी आलो. ठरल्या प्रमाणे तो रात्री मला घ्यायला आला आणि मी लगेच तोंडावर पाणी वैगरे मारून घराबाहेर पडलो. आम्ही चालतच निघालो. संपूर्ण गाव निद्रेच्या आहारी गेले होते. रस्ता ही पूर्ण सामसूम होता. काही वेळात आम्ही शेतात येऊन पोहोचलो. त्याने पाणी सोडले आणि आम्ही दोघं जवळच्या बांधावर गप्पा करत बसलो. तिथेच शेताला लागून एक ओढा होता. बराच वेळ उलटला. अधून मधून कुठून तरी वाऱ्याची एक झुळूक अंगाला स्पर्श करायची आणि एक वेगळाच दिलासा देऊन जायची. तितक्यात मला बाजूच्या शेतातून २-३ बोकड येताना दिसली.
मी निरखून पाहू लागलो तसे जाणवले की २-३ नाही तर तिथे बरीच बोकड होती. अंधार तसा बराच होता पण खूप वेळ अंधारात राहिले की हळु हळु आपल्या डोळ्यांना त्या अंधाराची सवय होते आणि मग बऱ्यापैकी दिसायला लागते तसेच काहीसे आमच्यासोबत झाले होते. मी लगेच साईराजला खुणावून सांगितले. तसे तो पटकन बांधावरून उडी मारून बाजूच्या शेतात बोकड पकडायला धावला. ते बघून मी ही त्याच्या मागे गेलो. त्याने एक आणि मी एक अशी २ बोकड पकडली. आम्ही पुन्हा आमच्या शेताकडे यायला निघालो. येताना ओढा ओलांडताना सहज पाण्यात लक्ष गेले आणि सर्वांग शहारले. दोन्ही हाताने धरलेल्या बोकडला डोकेच नव्हते. साईराज ची ही चांगलीच तांतरली. आम्ही हातातली बोकड तिथेच ओढ्यात टाकून सरळ धाव ठोकली. आम्ही दोघेही जीव मुठीत धरून पळत होतो. मी साईराज ला इतके घाबरले ले पहिल्यांदा पाहिले असेल. पळत असताना आम्हाला मागून आमच्या नावाने हाका ऐकू येत होत्या जे सगळ्यात भयानक होते. दोघेही घरी आलो आणि माझी शुद्ध हरपली. डोळे उघडले तेव्हा सकाळ झाली होती, डॉक्टर आणि शेजारची मंडळी जमा झाली होती. मला आजोबांनी विचारल्यावर मी जे जे घडले ते सांगून टाकले. त्यावर ते म्हणाले की त्या जागेला भटकी म्हणतात. तिथे खूप भयानक अनुभव येतात.